२२/११/२०१८

Consecration Ceremony of The Universal Temple of Shri Ramkrishna , Aurangabad. article enllight on this ceremony


अनुपम्य सुख सोहळा रे
     16,17,18 नोव्हेंबर रोजी रामकृष्ण ध्यान मंदिराचा लोकार्पण सोहळा औरंगाबाद येथे पार पडला. पाणचक्की, बिबीका मकबरा  दौलताबाद किल्ला,वेरूळ विविध संतक्षेत्रे इत्यादींनी समृद्ध असलेल्या औरंगाबाद परिसरात आता रामकृष्ण ध्यान मंदिराची सुद्धा भर पडली. मलिक अंबरने वसवलेल्या पूर्वाश्रमीच्या खडकी व आताच्या औरंगाबाद शहरात आणखी एक स्थान भाविक, पर्यटकांसाठी उपलब्ध झाले. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस औरंगाबाद येथे श्रीमती सहस्त्रबुद्धे, बी. जी. देशपांडे, बिडवई आदींनी स्वामी रकानंदजी महाराज व नागपूरच्या रामकृष्ण मंदिराचे तत्कालीन अध्यक्ष व्योमानंदजी स्वामी यांच्या यांच्या प्रेरणेने शहरात दर रविवारी रामकृष्ण परमहंस यांच्या कथा , त्यांचे संदेश यांचे वाचन सुरु केले. श्री यत्नाळकर हे वरद गणेश मंदिरात रामकृष्ण मिशनची पुस्तके विक्रीचे कार्य संभाळत असत. पुढे 1985 मध्ये रामकृष्ण मंदिरासाठी जागेची पहाणी सुरु झाली. सध्याची जागा कम्युनिष्ट विचारधारेचे चौधरी यांनी बाजारमुल्यापेक्षा कमी भावात मंदिरासाठी दिली. पुढे लगतची दोन एकर जागा सुद्धा बाजारमुल्याने दिली. व औरंगाबाद शहरात रामकृष्ण-विवेकानंद समितीचे कार्य अधिक विस्तृत झाले. पुढे 2005 मध्ये औरंगाबादचे हे रामकृष्ण मंदिर बेलूर मठाशी संलग्नित झाले व सध्याची मंदिराची नूतन वास्तू उभारण्याचे कार्य 2009 या वर्षी सुरु झाले. बेलूर मठाच्या रचनेप्रमाणेच हे मंदीर सुद्धा उभारले गेले. बीड वळणमार्गावर, बजाज हॉस्पिटल शेजारी एका मोठ्या चौथ-यावर हे मुख्य मंदीर उभारले आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर सुंदर,विलोभनीय अशी बाग,दोन्ही बाजूंनी कमल पुष्पे आहेत. दर्शनी भागावर समोरील दोन कळसांच्या मध्ये गणपती विराजमान आहे. गणपतीच्या खालील बाजूस दोन गजराजांच्या मध्ये रामकृष्ण मिशनचे बोध चिन्ह आहे. मागील बाजूस चारीही बाजूंनी वेढलेल्या 12 कळसांच्या मध्ये मंदिराचा मुख्य कळस आहे.भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेशित झाल्यावर रामकृष्ण परमहंस यांची भव्य मूर्ती व मूर्तीच्या दोन्ही बाजूस मॉं सारदा व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा आहेत. प्रवेशव्दाराच्या वर आतील बाजूने पंढरीचा राजा विठ्ठल,महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय व संतांची मांदियाळी रेखाटली आहे. अत्यंत प्रसन्न वातावरण असलेल्या या मंदिराचे 17 नोव्हेंबर रोजी देश विदेशातून आलेल्या चारशेहून अधिक उच्च विद्याविभूषित संन्यास्यांच्या उपस्थितीत या रामकृष्ण ध्यान मंदिराचे पवित्र संस्कारीकरण करण्यात आले. मंदिर खुले होण्यापूर्वी सर्व संन्यासी वृंदांनी सकाळी 6.30 वाजता मंदिरास विविध भाषांत भजने गात परिक्रमा केली. त्यानंतर 7.30 वाजता श्रीमंत स्वामी वगीशानंदजी महाराज यांच्या करकमलांव्दारे या विश्वमंदिराचे पवित्र संस्कारीकरण पार पडले.कर्मयोग,राजयोग,राष्ट्रनिर्माण,नारी शक्ती,गृहस्थ व पित्याची कर्तव्ये अशा विषयांवर विविध संन्यास्यांच्या प्रवचनां बरोबरच विद्यार्थी व तरुणांसाठी संगीतमय नाटके सुद्धा होती. 20 ते 25 हजार प्रतिनिधी हा नयनरम्य ऐतिहासिक सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी देशभरातून उपस्थित झाले होते. काही विदेशी नागरीकांनी सुद्धा उपस्थिती लावली होती. दि.17 रोजी महाराष्ट्रातील संत परंपरेवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम तर अत्यंत दर्शनीय श्रवणीय झाला. सर्व कार्यक्रम वेळेवर पार पडत होते, कुठेही काही कोलाहल,गडबड नव्हती. तात्पुरती प्रसाधन गुहे अगदी स्वच्छ होती, पिण्याच्या पाण्याची विपुल सोय होती. अत्यंत शिस्तबद्ध रीतीने सर्व सोहळा पार पडला. रामकृष्ण ध्यान मंदिराच्या या लोकार्पण कार्यक्रमावेळी भजनात दंग होऊन नृत्य परिक्रमा करतांना पाहून तुकोबांचा “खेळ मांडीयेला वाळवंटी घाई , नाचती वैष्णव भाई रे “ हा अभंग आठवला आणि त्यातीलच एक ओळ असलेल्या “अनुपम्य सुख सोहळा रे ” याप्रमाणेच औरंगाबादचा हा रामकृष्ण मंदिर अनावरण सोहळा अनुपम्य होता.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा