२५/०१/२०१९

Article on completion of 287 years to opening ceremony of Shaniwar Wada, a historical fortification in the city of Pune in Maharashtra, India.

287 वर्षाचा मराठा पराक्रमाचा साक्षीदार
        22 जानेवारीला रेडीओवर मराठ्यांच्या पराक्रमाच्या साक्षीदार असलेल्या वास्तूच्या उद्घाटनास 287 वर्षे झाली असे ऐकले. ध्वनी वर्धनासाठी आपसूकच बोट रेडीओच्या ध्वनी वाढवणा-या कळेकडे गेले. निवेदकाने पुढे सांगितले की शनिवारवाडयाचे उद्घाटन शनिवार  दि 22 जानेवारी 1732 रोजी झाले होते. त्यापूर्वी पायाभरणीचा समारंभ सुद्धा  शनिवार दि 10 जानेवारी 1730 रोजी झाला होता. शनिवार या मराठी दिवसाच्या नावावरूनच शनिवारवाडा हे नांव रुढ झाले. दिनविशेष संपले. परंतू मनात शाहू महाराज, त्यांचे सेनापती पेशवे, पहिल्या बाजीरावांनी गाजवलेला पराक्रम, समोरासमोर केलेल्या लढाया, विस्तृत केलेले मराठा साम्राज्य त्यांनीच बांधलेला शनिवारवाडा, राघोबादादा व त्यांनी गाजवलेला पराक्रम, “अटकेपार” लावलेला मराठ्यांचा झेंडा , माधवराव , थेऊर गणपती. सारे आठवू लागले. इतक्या वर्षात या शनिवारवाड्याने काय-काय नाही पाहिले. असे म्हटले जाते की कसबा पेठेत मुळा-मुठा नदीच्या तीरावरील  सात मजली शनीवारवाड्याच्या सर्वात वरच्या मजल्यावरून 17 किमी अंतरावरचे आळंदीचे ज्ञानेश्वर मंदिर दिसत असे.आता केवळ परकोटाच्या भिंती व मुख्य दरवाजा म्हणजे दिल्ली दरवाजा शिल्लक असलेल्या कितीतरी घटनांचा साक्षीदार हा शनिवारवाडा आहे. पहिल्या बाजीरावाचा पराक्रम याने पाहिला ,चिमाजी आप्पाचा पराक्रम व बंधुप्रेम पाहिले, नाना फडणीसची हुशारी पाहिली,बारभाईचे कारस्थान पाहिले,रघुनाथरावांचे धृतराष्ट्रासारखे सत्तेसाठी झुरणे पाहिले, आनंदीबाईंचा “ध चा मा“ पाहिला, रमा-माधवाची प्रिती पाहिली, माधवरावाच्या अकाली मृत्यूने तो हळहळला, पुढे गारद्यांनी मारलेल्या नारायणरावाच्या “काका मला वाचवा” अशा आरोळ्या मूकपणे ऐकल्या.कितीतरी वर्षे पौर्णिमेच्या दिवशी त्या आरोळ्या वाड्यात घुमत राहिल्याच्या शंका/कुशंका सुद्धा ऐकल्या. पहिल्या बाजीरावाचा जसा पराक्रम पाहिला तर दुस-या बाजीरावाची आगतिकता पाहिली. हे सर्व पहात-पहात
कात्रज वरुन खापरी नालीकांद्वारे ज्यात पाणी आणल्या गेले होते त्याच या भक्कम वाड्याने इंग्रजांच्या हल्ल्यात आपलीच झालेली मोठी क्षती पाहिली.पुढे लागलेल्या मोठ्या आगीत होरपळणे अनुभवले. मराठ्यांचा संपूर्ण भारतात वर्चस्व,दबदबा निर्माण होण्याचे एकेकाळचे हे केंद्रस्थान होते.परंतू या वाड्याकडे सकारात्मक दृष्टीकोनाने न पाहता संकुचित नजरेने पाहिले जाते. कित्येकांना/ फिल्मवाल्यांना पहिले बाजीराव केवळ मस्तानीपुरते तेवढे माहीत आहे. त्यांचा पराक्रम ना त्यांनी कधी ऐकला ना कधी तो जाणण्याचे कष्ट घेतले.काही वर्षांपूर्वी काही नतद्र्ष्टांनी या वाड्यावर थुंकण्याची मोहीम काढली होती. आपल्या इतिहासाची,पूर्वजांची महानता न पाहता जाती भेदांच्या बंधनात आजही अडकलेल्यांना हे सुद्धा कळत नाही की  कधीतरी आपले कुणीतरी पूर्वज सुद्धा याच मराठ्यांच्या फौजेत सहभागी असतील, कुणी सरदार तर कुणी सैनिक असतील. त्यांच्याच पराक्रमावर थुंकण्यासाठी निघण्याची मोहीम काढणे किती लाजिरवाणे आहे.महाराष्ट्राचे हेच मोठे दुर्दैव आहे.येथे अजूनही आपली दुष्टी व्यापक होत नाही किंवा राजकारणी होऊ देत नाही.राजकारणी त्यांच्या चेल्या चपाट्यांकरवी आपल्या डोक्यात काही तरी खुळ घालतो व आपणही सर्वांगीण विचार न करता त्याप्रमाणे वागू लागतो. आज कित्येकांना आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची काहीही माहिती नाही.त्याचप्रमाणे शनिवारवाडा , त्याचा  ईतिहास हा सुद्धा लोकांना माहीती नसेल.पेशवे वंशावळ, पेशव्यांची स्वामीनिष्ठा, त्यांचा पराक्रम हे तर चार-पाच ओळीत शालेय शैक्षणिक अभ्यासक्रमात आटोपले जाते. ज्या शनिवारवाड्याने संपूर्ण भारतात, केवळ भारतातच नव्हे तर अटकेपार पर्यंत आपल्या मराठ्यांचा दबदबा निर्माण केला होता त्याची माहिती त्याचा अभिमान आम्हा तमाम मराठ्यांना असायला नको का? तर तो असायलाच हवा. आज आपल्या काही अवशेष काही खुणांंसह शनिवारवाडा गेल्या 287 वर्षांपासून मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे.त्याच्या समोरचा बाजीरावांचा तो भव्य पुतळा तरुणांना सतत कार्यरत राहण्याची, निडर, पराक्रमी राहण्याची, देशाप्रती एकनिष्ठ राहण्याची प्रेरणा देत उभा आहे. पुरातत्व विभागाने लक्ष घालून छोटी का होईना परंतू मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या त्या सात मजली शनिवारवाड्याची एक प्रतिकृती त्या ठिकाणी उभारावी हिच खरी शाहू महाराजांना व त्यांच्या पराक्रमी सरदारांना श्रद्धांजली ठरेल.

२३/०१/२०१९

Article about hacker Sayed Suja statement about EVM hacking in London press conference

हे इव्हीएम हॅक होत अशीन का राजेहो ?

     परवा बाहेर गावाहून येता-येता एका खेडे गांवातील चहाच्या दुकानावर चहा घेण्यासाठी म्हणून थांबलो. आम्हा मित्रांची “चाय पे चर्चा” सुरू झाली.विषय अर्थात राजकारणाचा, इव्हीएम हॅकचा. इंग्लंड मध्ये आशीष रे या पूर्वी  नॅशनल हेरॉल्ड मध्ये लिहिणा-या एका पत्रकाराने पत्रकार परीषद आयोजित केली होती. त्यात कुठल्यातरी बादरायण संबंधाने कोंग्रेसचे कपिल सिब्बल सुद्धा होते. या परीषदेत सय्यद सुजा नामक हॅकर बोलला की भारतात म्हणे इव्हीएम हॅक होते. ज्यांच्या मृत्यू अहवालात अपघातामुळे मानेत दुखापत झाल्यामुळे मृत्यू अशी नोंद असलेल्या गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू नसून त्यांची हत्या झाली आहे व त्या हत्येचे कारण सुद्धा इव्हीएम हॅक हेच आहे असे हा सुजा म्हणाला. या बाबत आमची चर्चा सुरू होती. तो ग्रामीण मध्यम वयाचा चहावाला चहा बनवत होता. परंतू त्याचे कान आमच्याच बोलण्याकडे आहे हे जाणवले. आमची चर्चा पुढे सरकतच होती. “च्या घ्या सायेब”,तो म्हणाला.यक विचारू का सायेब “हे इव्हीएम खरच हॅक होत अशीन काहो?. सद्यस्थितीत हा खरे तर सर्वांचाच प्रश्न आहे.चहा पितांना आमची चर्चा थोडी मंदावली.”म्या म्हनतो सायेब याईनं हे मताईची मशीन आणलीच काउन हो?,विदेशात त म्हने सोडली त्याईन वापरन आम्ही त्याच्याकडे पाहीले.“त्या राजस्थानात अन त्या मध्य प्रदेशात,आन लगे त्या छत्तीसगड मध्ये बी असच झालं आशीन का हो? नीरा इव्हीएम हॅक, इव्हीएम हॅक करायले लागले.”आम्ही त्याला चहा पित असल्यामुळे मंद स्मित करून प्रतिसाद दिला तर मग तो अजूनच खुलला.निवडणूक आयोग त म्हनते हे मशीन काई हॅक नाई करता येत. मंग कस काय हा सय्यद सुजा असं म्हनते,आजलोक काय झोपला होता काय हयो गडी?जवा मुंडे सायेब गेले तवा कुटी गेलता हा? बरं इव्हीएम हॅक होते म्हनते त मंग त्या मतपेट्या कोन्या सुदया होत्या हो? त्या बी त राजा याईचे लोक डारेक्टच हॅक करत ना हो.अन लगे ठप्पे बी मारत,एकच मानूस लय ठप्पे मारे.राजेहो आपले लोक काई सुधरत नाय ना हो.राजा भारतात बनेल मशीन ते बी काय ते गोपनीय का काय लय सुरक्षेत बनवेल त्या मशीनीत जुगाड होते हे त्या इंग्लंडातला तो जुगाडी सांगते. त्यालेच धरा न म्हनं पयले, हे अस जुगाड करून देन काय बरबर होय का राजा?. त्याचे ते ग्रामीण भाषेतील परंतू पटेल असे ते बोलणे ऐकून आम्ही सुद्धा चकीत झालो. खरे होते त्याचे या भारतात हे असेच होत राहणार का? पूर्वी मतपेट्या हॅक अर्थात पळवून नेल्या जात,एकच माणूस,किशोरवयीन मुले मतपत्रिकेवर शिक्के मारून येत असत. आता हे इव्हीएम हॅकींगच्या चर्चा.भारतात काय असेच सुरू राहणार का?एका ग्रामीण चहावाल्याला पडलेला “हे इव्हीएम खरच हॅक होत अशीन काहो?”हा प्रश्न सर्वच भारतवासीयांना पडला आहे. 2019 च्या निवडणूक निकालानंतर जर सत्तापालट झाला तर सत्तेत येणारे इव्हीएम वर शंका घेतील की नाही ते पाहू.

१६/०१/२०१९

"Asar" report on education in Maharashtra


गुणवत्तेत सुधार तरीही बरेच “बाकी”   
     
 "असर” या संस्थेमार्फत दरवर्षी शैक्षणिक स्थितीचा  अहवाल सादर केला जातो. असरच्या अहवालाचे यंदाचे हे 13 वे वर्ष आहे. या वर्षी यंदा ग्रामीण भागातील 990 गावांत शाळा व विद्यार्थ्यांची पाहणी करण्यात आली. या पाहणीत महाराष्ट्रातील शैक्षणिक दर्जा हा गेल्या चार वर्षात इतर राज्यांच्या तुलनेत उल्लेखनीय असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. तसेच खाजगी शाळांच्या तुलनेत जि. प शाळांची शैक्षणिक स्थिती अधिक चांगली असल्याचे समोर आले आहे. मागील चार वर्षात अनेक जि. प शाळांनी खरोखर उल्लेखनीय कार्य केले आहे. शाळांचा दर्जा सुधारला आहे. स्वामी विवेकानंदांनी पूर्वीच सांगितलेला ज्ञानरचना वाद पाश्चात्यांकडून परत आपल्याकडेच आल्यावर त्याची अंमल बजावणीही अनेक शाळांत केली गेली.शिक्षणात नवीन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला आहे हे सर्वश्रूत आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे व असरच्या उषा राणे या दोघांनीही शासकीय शाळांतील गुणवत्तेत वाढ झाली असल्याचे म्हटले आहे. ही नक्कीच सकारात्मक बाब आहे. परंतू वाढलेल्या या शैक्षणिक दर्जासोबतच असरच्या अहवालात आणीखीही बरेच काही आहे व ते धक्कादायक सुद्धा आहे. असरच्या या अहवालात 60 टक्के विद्यार्थ्यांना भागाकर येत नसल्याचे समोर आले आहे. वर्ग आठवीच्या मुलांना तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागता येत नाही. अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण 40 टक्के आहे. तसेच खाजगी शाळांच्या तुलनेत जि.प. शाळांतील मुलांना भागाकर येण्याचे प्रमाण हे जास्त आहे. बेरीज, वजाबाकी येण्याची आकडेवारी सुद्धा निराशाजनकच आहे. एककेकाळी अत्यंत प्रगत शैक्षणिक परीस्थिती असलेल्या महाराष्ट्रात असरच्या अहवालानुसार शिक्षणाचा दर्जा चांगला असल्याचे संगितले गेले तरी प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गांतील मुलांना भागाकार,वजाबाकी येत नसल्याचे चित्र धक्कादायक आहे.ज्या देशात पूर्वी शिक्षणासाठी म्हणून विदेशातून विद्यार्थी येत, ज्या देशात अनेक नामांकीत विद्यापीठे होती. ज्या देशात प्रख्यात गणितज्ञ होऊन गेले त्या देशात ते शिक्षण पूर्वीसारखेच राहायला हवे व विद्यार्थ्यांना सुद्धा छोटी-छोटी गणिते सहज सोडविता यावीत. त्यासाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहायला हवे. शिक्षण क्षेत्रात याबाबत नक्कीच विचार व्हावा. खाजगी व शासकीय शाळांनी असरच्या अहवालाचे वाचन करून आपल्या शाळांत सुद्धा साध्या, छोट्या-छोट्या गणिती प्रक्रिया,उदाहरणे यांच्या चाचण्या घ्याव्या. आजच्या पिढीला जसे त्यांचे तळमळीने शिकवणारे शिक्षक आठवतात तसेच सध्याच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचे शिक्षक आठवावेत असे वाटते. आज जरी एकूण शैक्षणिक गुणवत्तेत सुधार झाला असला तरीही विद्यार्थ्यांना न येणा-या भागाकारांची अद्यापही “बाकी” उरलीच आहे.