०९/०१/२०१९

Article about All India Marathi Literary Conference (Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan)


साहित्य सम्मेलनातील वाद टाळावेत  

मराठी साहीत्य सम्मेलन  आणि वाद हे जणू समीकरणच ठरले आहे की काय असे रसिकांना आता वाटू लागले आहे. यंदाच्या यवतमाळ येथे होणा-या साहीत्य सम्मेलनात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित केले होते. परंतू त्यांना पुनश्च सम्मेलनात न येण्याचा संदेश पाठवला गेला. हे वृत्त आले आणि मग वाद व एकच ऊहापोह सुरू झाला. मराठी साहीत्य सम्मेलन मग त्यात इंग्रजी लेखिका कशा ? असे भाषिक स्वरूप त्याला देण्यात आले. त्यात मनसे हा राजकीय पक्ष सुध्दा आला. परंतू राज ठाकरे यांनी मात्र त्यांचा व त्यांच्या पक्षाचा  नयनतारा सहगल यांना काही एक विरोध नसल्याचे स्पष्ट केले. मग असे काय घडले असावे की नयनतारा सहगल यांना विरोध झाला असावा? पंडीत नेहरू यांची भाची असलेल्या नयनतारा या पुरस्कार वापसी मधे अग्रणी होत्या. हेच त्यांना न येण्याचे कळवण्याचे कारण आहे का आणखी काही. हे स्पष्ट नाही. परंतू काही ना काही कारणाद्वारे नेहमीच साहीत्य सम्मेलनात वाद उपस्थित होत असतात. वादग्रस्त विधाने साहित्यिक करीत असतात. मराठी भाषिक हा नेहमीच सुसंस्कृत समजला जातो, देशात महाराष्ट्राची एक चांगली प्रतिमा आहे. परंतू साहित्य सम्मेलनातील सततचे होणारे वादाचे मुद्दे,अंतर्गत वाद,वादग्रस्त विधाने यांनी मराठी साहित्यिकांची प्रतिमा जनमानसात नक्कीच खराब होत असावी.सद्यस्थितीत मराठी साहीत्यात रुची ठेवणा-यांच्या संख्येत दिवसागणिक घट होते आहे. विकीपिडीयावर सर्वाधिक कमी वापर होत असलेली भाषा मराठी आहे. मराठी साहीत्यात प्रतिभावंत लेखकांची संख्या सुध्दा खालावत चालली आहे.कित्येक मराठी भाषिकांची मुले निव्वळ इंग्रजाळलेली झाली आहेत. त्यांना मराठी आकडे कळत नाही, मराठी शब्द व त्यांचे अर्थ माहीत नाहीत अशी स्थिती आहे,मराठी शाळा मृत्यूशय्येवर आहेत.या सर्वांकडे सरकार, स्वत: मराठी भाषिक, साहित्यिक या सर्वांचे साफ दुर्लक्ष होत असून सतत काही ना काही वाद उपस्थित होणा-या मराठी साहीत्य सम्मेलनांवर मात्र करोडो रुपये खर्च होत आहेत. यावर नक्कीच काहीतरी उपाय योजना व्हावी, यात राजकीय हस्तक्षेप न व्हावा. बुद्धिवंत, सरस्वतीचे आशीर्वाद प्राप्त असलेल्या साहित्यिकांकडून जनतेला, समाजाला मोठ्या अपेक्षा आहेत.या महाराष्ट्रात पहिल्या मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष म. गों. रानडे यांच्यासारख्यांनी तसेच टिळक, सावरकर, आगरकर,प्र. के अत्रे,पु. ल देशपांडे अशा कितीतरी प्रतिभावंतांनी समाजासाठी आपल्या लेखण्या झिजवल्या.परंतू दुर्दैवाने आज मात्र तसे होतांना दिसत नाही.मराठी साहित्यिकांनी,सरकारनी,आयोजकांनी,माध्यमांनी सर्वांनी हे वाद कसे टाळता येतील हे पाहणे जरूरी नाही का? वाद विरहीत व ज्यातून काहीतरी ठोस,समाजावर प्रभाव पडेल असे काही घडले तर ते मराठी साहित्य सम्मेलन यशस्वी म्हणता येईल अन्यथा नसते वाद उत्पन्न होणारी, विवादात पडणारी मराठी साहित्य सम्मेलने आयोजित करून उपयोग तरी काय? यंदाच्या सम्मेलनात जे घडले ते फार चुकीचे घडले. कुणाला आमंत्रित क्ररायचे व कुणाला नाही हा आयोजकांचा हक्क आहे परंतू आमंत्रित केलेल्या व्यक्तीस न येण्याचे कळवणे यात समस्त मराठी भाषिक व राज्याची नामुष्की आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा