१४/०१/२०१९

Article about grandmother "Maai"

माझी आजी "माई"


     आज भोगी, सकाळ पासूनच अनेक संदेश सुरु झाले. परंतू भोगी आली की एक आठवण येते. ती म्हणजे आमच्या आजीची , माईची. माई या नावातच माया आहे. यशोदा नांव असलेल्या माई ने तीचे माई हे नांव पुरेपूर सार्थक केले. आजोबा दत्तात्रय रामचंद्र वरणगांवकर उपाख्य नानासाहेब हे कर्तुत्ववान. वैद्य , परवानाधारक शिकारी. परंतू नानासाहेब यांच्या कर्तुत्वामागे माईच होती, माईचा त्याग होता. आम्ही लहानपणापासून माईला दृष्टी नसलेलेलेच पाहिले आहे. माईचे डोळे कधी गेले ? ,  कसे गेले ? याची तीळमात्र कल्पना आम्हाला आजतायागात नाही. परंतू अंध असूनही माई अनेक कामे एखाद्या डोळसालाही लाज येईल अशी करीत असे. नाना करारी होते तर माई खूप  मायाळू. लहानपणी आम्ही भावंड माई भोवती गोळा होत असू व तिच्या अचाट गोष्टी ऐकत असू. देवांच्या, भुतांच्या अनेक गोष्टी माईने आम्हाला सांगाव्यात व आम्ही सर्व विसरून त्यात रममाण व्हावे. तिच्याजवळ अनेक ओव्या व अजब गाण्यांचा खजिना होता. बकरी चोराची “को दारा, को भिंती“, बोरे खाणा-या कोल्ह्याची “कोल्होबा कोल्होबा बोरोली पिकली“ सारख्या मजेशीर गोष्टी “बाबा ढेकणाने मजला पिसाळले” सारखी अजब गाणी हे अजूनही चांगले स्मरणात आहे. हा लेख लिहितांना माईची केस विंचरण्याची “फणी”, अंबाड्याचा “आकडा”, अंग घासण्याची “वजरी” , माईची ती जुन्या धाटणीची चामड्याची विशिष्ट व ठराविक चप्पल सर्व डोळ्यांसमोर येत आहे. माई अंध असल्याने आम्ही सर्वच भावंडे माईला कुठे जायचे असले तर हात धरून घेऊन जात असू. बाहेर गेले तर तिला चप्पल घालून देत असू. शेजारच्या आजींकडे माईला नेत असता पायात चप्पल नसली तर रस्त्यातील दगडे बाजूला करीत असू. एकदा यात्रेला गेलो असता माईला वडीलांनी पाठीवर घेतल्याचे ते दृश्य अजूनही स्मरणात आहे. माईचा पाय भाजला होता असे वडील सांगतात. माझ्यापेक्षाही जेष्ठ भावंडांच्या स्मरणात तर माईच्या आणखीही कितीतरी गोष्टी असतील. माईच्या अखेरच्या दिवसांत, नानांच्या निधनानंतर आक्काने, जेष्ठ भगीनीने माईला रामायण, का महाभारत वाचून दाखवले होते. माईची बसण्याची जागा ठरलेली होती. सर्व कामे आटोपली की माई तिथे बसून माळ जपत असे. नाना वारल्यावर एक वर्षाने माई सुद्धा गेली, शेवटी-शेवटी तिला अन्न गिळतांना त्रास होत असे, ती कणकेची लापशी जास्त खात असे. अखेरच्या दिवसांत तिला तिच्या जुन्या स्मृती खूप येत होत्या, ती भान हरपून जुनी नांवे, जुन्या आठवणीच सांगत असे. डॉ. देशपांडे तपासण्यासाठी येत. एक दिवस मी नेहमीप्रमाणे संध्याकाळी शाळेतून घरी येत होतो. आर्य समाज जवळ गल्लीतील शोभा वहिनी भेटल्या, म्हणाल्या “अरे माई गेल्या” मी सातवीत होतो मनात विविध भावना दाटून आल्या, घरी गेलो, शोकाकूल वातावरण होते. सुरुवातीला रडूच आले नाही. परंतू दुस-या दिवशी खूप रडलो. हे लिहितानांही भावविभोर झालो आहे. आज आमचे कुटुंबीय एकत्र जमले की मुख्यत: नानांच्या आठवणी जास्त निघतात. त्या तुलनेत माईचे स्मरण मात्र कमी केले जाते. परंतू नानांनी जे काही केले त्यामागे माईची खूप मोठी भूमिका आहे, तिचा त्याग आहे, मुलांना संभाळणे आहे. नाना-माईच्या मुलांमध्ये ज्याप्रमाणे नानांचा करारीपणा, बेधडकपणा, निडरता आली आहे तितकाच माईचा साधेपणा, कणव, माया व आपुलकी उतरली. नाना-माईची जी काही थोडी बहुत सेवा घडली त्यामुळे तसेच त्यांच्या प्रेम, मायेमुळे व आशीर्वादरुपी धनामुळे जीवनातल्या या रहाटगाड्यात खाऊन-पिऊन सुखी आहे. अजून पाहिजे तरी काय?आज भोगीच्या दिवशी, माईच्या स्मृतीदिनी माईला ही शब्दरूपी श्रद्धांजली.

२ टिप्पण्या: