२६/०२/२०१९

Second Surgical Strike of India , and V D Savarkar thaughts


पुलवामा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर व सावरकर विचार 
“लेखण्या मोडा व बंदुका हाती घ्या” असे म्हणणा-या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी याच दिवशी म्हणजे आज सकाळी 3.30 वाजता भारतीय वायूसेनेतर्फे पाकव्याप्त काश्मीर मधील जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेकी तळांवर हवाई हल्ले केले.1000 किलोचे बॉम्ब टाकले.यासाठी पाकिस्तानातील थेट मुझफराबाद, बालकोट पर्यंत भारतीय मिरज विमाने घुसली आणि हे हल्ले केले गेले. या हल्ल्याचे वृत्त झळकताच सारे भारतवासी सुखावले. पुलवामा हल्ला झाल्यावर संपूर्ण भारतात पाकिस्तान व ऐत्रेक्यान विरुद्ध तीव्र रोष, संताप होता. या हल्ल्यामुळे या संतापाचे शमन झाले आहे. ज्या जैशच्या अतिरेक्यांनी आपल्या CRPF च्या 40 पेक्षा जास्त जवानांना मारले होते त्या जैशचे अल्फा-3 व इतर सर्व अतिरेकी संघटनांच्या अतिरेकी तळांवर हल्ले करण्यात यश मिळवले. सुमारे अर्धा तास हे हल्ले सुरु होते. भारताच्या या हल्ल्याने पाकडे व त्यांच्या अतिरेकी संघटनांना चांगलाच हादरा बसला. भारताने आता कात टाकली आहे. हा दुसरा “सर्जिकल स्ट्राईक” पाहून पाकडे व जगला आता भारत बदलला असल्याची जाणीव आता झाली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनातील गोष्ट घडल्याने भारतवासी सुखावले टर आहेतच  परंतू आपला भारत आता मजबूत देश असल्याची भावना सुध्दा जनमानसात दृढावली आहे. मा. पंतप्रधानांनी पुलवामा हल्ल्यानंतर भारत हे सहन करणार नाही असे म्हटले होते व लष्काराला सुट दिली होती. “पुलवामा के गुनाहगारोंको सजा कहॉं दी जायेगी ,कब दी जायेगी ये हमारी सेना तह करेंगी” असे पंतप्रधान मोदि यांनी तेंव्हा विधान केले होते. व त्याप्रमाणेच ते घडले. त्यानंतर भारताने पाकिस्तानचा MFN दर्जा सुद्धा काढला.युनोच्या सुरक्षा परिषदेत सुद्धा पाकिस्तानला चांगली चपराक मिळाली. पुलवामा हल्यानंतर अनेक देश भारताच्या पाठीशी उभे राहिले. मा. पंतप्रधानांच्या विदेश दौ-याचे हे फलित होते. सुमारे दोनशे ते तीनशे अतिरेकी या हल्यात यमसदनी धाडल्या गेल्याचा तूर्तास अंदाज आहे. अद्याप अधिकृत आकडेवारी येणे बाकी आहे. परंतू हे हल्ले झाल्याची पुष्टी मात्र मिळाली आहे. तरीही आपल्या देशातील तथाकथित बुद्धिवंत, विचारवंत आता काही ना काही बरळतीलच परंतू त्यांच्या त्या बरळण्याचा काही एक परिणाम आता जनतेवर होत नाही. या हल्यामुळे आपल्याच देशातील काही पाकडेप्रेमी , मानवाधिकारवाले , बुरसटलेल्या विचारांचे परंतू पुरोगामी म्हणवणारे काही महाभाग, सतत 56 इंच छातीचा उल्लेख करून हिणवणारे काही जाणते नेते यांना चांगलीच चपराक बसली आहे. या ह्ल्ल्यांपुर्वी युद्धाभ्यास सुद्धा झाला होता. “हमको छेडना नही, छेडेंगे तो हम छोडेंगे नही” असे सुद्धा आपले पंतप्रधान म्हणाले होते. तसे त्यांनी करून दाखवले. संपूर्ण देशात आता हाय अलर्ट जारी झाला आहे. नागरीकांनी आता जागृत राहणे जरुरी आहे. राष्ट्रीय सुरक्षा समितीची आता बैठक होत आहे. पाकिस्तान सुद्धा प्रत्युत्तर सुद्धा देऊ शकतो.अतिरेकी हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपले सैनिक आपल्या सुरक्षा यंत्रणा नक्कीच सज्ज आहेत. परंतू काहीही झाले तरी जनता मात्र भारतीय लष्कर व सरकारच्या पाठीशी आहे. योगायोगाने आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे व आजच्या दिनीच हे हल्ले केले गेले. सावरकर जहाल देशभक्त होते “शत्रूच्या भूमीत घुसून युद्ध चालवणे हा युद्ध जिंकण्याचा प्रभावी मार्ग आहे” असे सावरकरांचे मत होते. या त्यांच्या विचारांनुसार भारताने हा दुसरा “सर्जिकल स्ट्राईक” केला आहे. पाकड्यांचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत आली आल्यावर ज्या थोर भारतीय स्वतंत्रतासेनानीस  नेहरू सरकारने अटक केली होती त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आत्मा सुद्धा आज सुखावला असेल. भारत सरकार व भारतीय वाय्द्ल यांचे त्रिवार अभिनंदन. जय हिंद !

२१/०२/२०१९

Article about common men's love, respect about Army Jawan and

..पैसे मत ले मोमबत्ती जवानोके लिये है 
    14 फेब्रुवारीला पुलवामा येथे जैशे-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला केला 45 पेक्षाही अनेक जवान हुतात्मा झाले. संपूर्ण जग हादरले,हृद्य द्रवले,संताप, राग,दु:ख सा-या भावना भारतीयांच्या मनात दाटून आल्या होत्या.देशभर निषेध नोंदवला गेला. मोर्चे, शोकसभा झाल्या. पाकिस्तान विरोधी नारे, पाकिस्तानचा ध्वज जाळणे, दहशतवादाचा प्रतीकात्मक पुतळा जाळणे या सारख्या निषेधाच्या कृती देशभर झाल्या. जनतेने त्या उत्स्फूर्तपणे केल्या . सरकारने तसेच विरोधी पक्ष व इतर सर्व पक्षीयांनी याची अवश्य दखल घेण्याची आज नितांत गरज आहे. कारण अनेक जयचंद आजही आहेतच किंबहुना त्यांची संख्या अधिक झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष किमान राष्ट्रीय भावना व राष्ट्र प्रेम याबातीत तरी एकमताचे हवेत.इतर कार्यक्रम भलेही वेगळे असोत.परंतू आपल्या देशातील काही नेत्यांची त-हा मात्र राष्ट्रविरोधी असल्याची प्रचिती वारंवार येत असते. मणिशंकर अय्यर पाकीस्तानात जाऊन काय बरळतात,राहुल गांधी मागे चीनच्या आंतराराष्ट्रीय अधिका-याला जाऊन काय भेटतात, त्या सिद्धूला इम्रान व पाकिस्तानचा काय पुळका आला आहे.अरे शीख पंथीयांचे बलिदान तू विसरला का? काल महेबुबा मुफ्ती म्हणे इम्रान नवीन आहे त्याला थोडी संधी द्यायला हवी.या नेत्यांची ही वक्तव्ये,अशी वागणूक काय दर्शवते ? जनतेने यांना त्यांची जागा दाखवणे व भविष्यात असल्या नेत्यांना आपल्या मतदानाच्या ताकदीने राजकारणातून हद्दपार करण्याची देशाची नितांत गरज झाली आहे.असल्या नेत्यांबद्दल सरकारने खाली ओळी जरूर ध्यानात घ्याव्यात
”कहनी होगी एक बात एस देश के पहेरेदारोसे
संभालके रहना अपनेही घरमे छुपे गद्दारोंसे“
पाकिस्तान प्रेमाची भाषा बोलणा-या या नेत्यांपेक्षा तर या देशातील गरीब, सामान्य,मजूर कामगार वर्ग श्रेष्ठ की जवानांच्या या हल्ल्याबाबत हा वर्ग प्रक्षुब्ध झाला,जवान आपले आहेत  आपल्यासाठी आहेत, देशासाठी आहेत , ऐन तारुण्यात हौतात्म्य पत्करत आहे हे हाच गरीब वर्ग जाणतो. याचे दाखले सुद्धा बिकट परिस्थितीच्या वेळी अनेकदा दिसून आले आहेत.कामगार वर्गाने सुद्धा पुलवामा हल्ल्यातील जवानांसाठी 17 लाख रुपये जमा केले. गरीब कष्टकरी,अल्प मेहनताना मिळत असूनही हा वर्ग देशासाठी सदैव त्वरीत पुढे आला आहे. धनिकांनी तर मदत केलीच परंतू यावेळी अनेक अल्प उत्पन्न गटातील लोक सुद्धा मदतीच्या बाबतीत आघाडीवर होते.काही राजकारणी मात्र पुलवामा हल्ल्याचे राजकारण करण्यात गुंतले आहेत. म्हणूनच आपल्या देशात जनतेची राजकारण्यांप्रतीची भावना चांगली नाही. देशावर संकट आले तर सर्व मतभेद,पक्षभेद विसरून एकत्र राहून इतरांना आपल्या ऐक्याची ताकद दर्शविली गेली पाहिजे.आज जनभावना तीव्र आहेत.देशातील सामान्यातील सामान्य माणूस क्रुद्ध झाला आहे.लहानमुले सुद्धा आपल्या जवानांच्या प्रेमापोटी,देशावरील प्रेमापोटी, मोर्चे, कँडल मार्च शोकसभांमध्ये मोठ्या संख्येने दिसून येत आहेत.काल  खामगांव शहरात शिक्षण विभागाने कँडल मार्च काढला होता.मोठ्या संख्याने जि.प.,खाजगी शाळा,इंग्रजी विनाअनुदानीत शाळांचा समावेश या मार्चमध्ये होता.मोठ्या संख्येने शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी या मार्च मध्ये आले होते.काही तर कुटुंबियांना सुद्धा घेऊन आले होते.याच प्रसंगी सामान्य जनतेची देशाप्रतीची,हुतात्मा झालेल्या जवानांप्रतीची प्रेम भावना,आदर भावना पाहून डोळे पाणावले गेले.या मार्च निघाल्यावर अनेक लोक समाविष्ट होत होते.एके ठिकाणी मेणबत्त्या कमी पडल्या म्हणून शेजारीच्या एका छोट्याश्या टपरीवजा दुकानात मेणबत्त्या घेण्यासाठी म्हणून एक शिक्षक बांधव गेला. दुकानाच्या शेजारी एक सायकल घेऊन एक सामान्य गृहस्थ मार्च पहात उभा होता. त्याने ते पाहिले व दुकानदाराकडे पाहून तो म्हणाला “..पैसे मत ले मोमबत्ती जवानोके लिये जल रही” त्याचे ते बोल ऐकून अनेकांना त्याच्याप्रती आदर,प्रेम वाटले. त्या दुकानदाराने सुद्धा पैसे घेतले नाही. गोष्ट लहान आहे परंतू साध्या गोष्टीतूनही सामान्यांचे देशप्रेम, जवान व त्यांच्या प्रतीची भावना दिसून येते. सरकारने व सर्वच पक्षांनी ही जन भावना ओळखावी व येन केन प्रकारेण त्या पाकड्यांचा व त्यांच्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करावा ,निप्पात करावा.जनता काहीही प्रसंग सोसायला तयार आहे.अगदी मरायला सुद्धा.

१५/०२/२०१९

Article on the terrorist attack on CRPF Soldiers in Pulwama

...धर्म हिंसा तथैव च:
     काल पुलवामा येथे CRPF जवानांच्या ताफ्यामध्ये वाहन घुसवून फिदाईन हल्ला केला. या हल्ल्यात आतापावेतो ४४ जवान शहीद झाले. या घटनेचे वृत्त वाचून,दृश्ये पाहून मन हेलावले. संताप अनावर होत आहे. प्रत्येक भातीयांचा प्राण सैनिकांनो तुमच्यासाठी तळमळला. संपूर्ण भारतात दररोज ११ अब्ज रुपयांचे व्याज भरणा-या नापाक पाकिस्तानमध्ये पोसल्या जाणा-या अतिरेक्यांबद्दल तीव्र संताप,रोष वक्त होत आहे.स्वतंत्रताप्राप्तीपासून हा आपला बदलवता न येणारा शेजारी पाकिस्तान सतत कुरापती काढत आलेला आहे.प्रत्यक्ष युद्धात भारतीय सैनिकांनी अक्षरश: धूळ चारली आहे. आता प्रत्यक्ष युद्ध करण्याची हिम्मत अंगी नसल्याने अतिरेक्यांना पोसून त्यांच्याआडून हल्ले घडवीत आहे. गेल्या चार वर्षात अनेक अतिरेक्यांचा खातमा भारतीय जवानांनी केला.अतिरेक्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या,अतिरेक्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली.त्यामुळे अतिरेकी संघटना सैरभैर झाल्या,त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले.त्याच संतापातून जैश-ए-मोहम्मद या संघटनेने हा कालचा हल्ला केला.पाक व अतिरेकी संघटना यांनी ध्यानात ठेवावे की या अगोदर सर्जिकल स्ट्राईकने जसे उत्तर दिले गेले होते. तसेच उत्तर किंवा त्याहीपेक्षा मोठे उत्तर तुम्हाला हमखास मिळणारच मा.पंतप्रधान, मा.गृह्मंत्री यांनी या हल्ल्याचे चोख उत्तर दिले जाईल असे म्हटलेच आहे.त्यांच्या म्हणण्या प्रमाणे समस्त भारतीयांना आता खरोखरच पाकिस्तानला धडा शिकवावा असे वाटत आहे. याप्रसंगी जे काय आंतरराष्ट्रीय सोपस्कार व बाबी असतील त्या पहाव्यात, जगाने घातले निर्बंध तर घालू देत,चीन ला डोळे वटारू देत काहीही होऊ देत आम्ही समस्त भारतवासी सरकार व लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.वेळे प्रसंगी हाती शस्त्र सुद्धा घेऊ.दुष्काळाचा सामना करावयाचा होता तेंव्हा लालबहादूर शास्त्री यांच्या आवाहनास भारतवासियांनी पाठिंबा दिला होता.अटल बिहारी वाजपेयी यांनी जागतिक निर्बंध झुगारून अणुचाचण्या घेतल्या होत्या.याप्रमाणे जर पाकिस्तान व पाक पुरस्कृत आतंकवाद यासाठी सरकार काही ठोस पाउल उचलत असेल तर जनता जशी लालबहादूर शास्त्री, अटलबिहारी वाजपेयी यांच्या पाठीशी उभी राहिली होती तशीच पुन्हा सरकारच्या पाठीशी उभी राहील. पाक हे म्हणजे कुत्र्याचे शेपूट आहे त्याच्याशी कितीही चर्चा करा,गाड्या सोडा,बस सोडा त्यांच्या कलाकारांना डोक्यावर घ्या. लष्कराच्या हातातील कळसूत्री बाहुले असलेले पाकडे सरकार काही दहशतवाद आटोक्यात आणण्यास पाऊले उचलणार नाही.आता गरज आहे ती इस्त्राइलसारखे धोरण आखण्याची, गरज आहे अमेरिकेसारखी की ज्या देशाने पाक मध्ये घुसून ओसामा बिन लादेचा खातमा केला होता तशा धाडसी कृतीची. पाकडे व त्यांनी पोसलेले दहशतवादी यांच्या विरोधात असे ठोस पाउल उचलणे हीच आता आपली प्राथमिक गरज आहे. आता आपण सुद्धा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात पहिल्या पाच मध्ये आहोत.आपण सुद्धा शक्तीशाली आहोत हे सिद्धच आहे.त्याची जाणीव करून देण्यासाठी आपल्याला कुण्या जांबुवंताची सुद्धा गरज नाही.आपले लाख मोलाचे जवान कुणाचे भाऊ, कुणाचे पती,कुणाचे पिता धारातीर्थी पडतच आहेत तरीही या पाकला आपण वेठीस आणू शकत नाही ? आज भारतभरात तीव्र संतापाची लाट आहे. आता “खून का बदल खूनसे” हवा. या सरकारचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. या सरकारने व आगामी जे कोणते सरकार येईल त्यांनी या पाक व त्यांचा आतंकवाद यांना जशास तसे उत्तर देणे हेच जनतेला अपेक्षित आहे.तसे न झाल्यास जनतेच्या संतापच उद्रेक होईल व त्यातून काय होईल याचा नेम नाही.भारतात “अहिंसा परमो धर्म:” हे जरी आपण अर्धवट मानत असलो, प्रथम आक्रमण करीत नसलो तरी आता धर्माच्या रक्षणासाठी, मानवतेच्या कल्याणासाठी, शांततेसाठी  
अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च: l"
अर्थात अहिंसा सर्वात मोठा धर्म आहे त्याचप्रमाणे धर्म रक्षणासाठी कलेली हिंसा ही सुद्धा श्रेष्ठच आहे. त्याची वेळ आता आलेली आहे. भगवान श्रीकृष्णाला सुद्धा कौरव पांडवांच्या युद्धात सत्याच्या विजय व्हावा याकरीता एकदा का होईना शस्त्र उचलावेच लागले होते.

१४/०२/२०१९

Memories of beautiful actress and Marilyn Monroe of Bollywood Madhubala

सौंदर्यवती मधुबाला 

     डिजिटल युग आहे. ब्राउजरचे होमपेज गुगल असल्याने. ब्राउजर सुरु करताच गुगलचे दर्शन होतच असते. तसेच ते आजही झाले. काही वर्षांपासून गुगलने डूडल हा प्रकार सुरु केला. या डूडलद्वारे गुगल अनेक नामांकित, थोर, राष्ट्पुरुष,वैज्ञानिक अशा व्यक्तींची आठवण एक ग्राफिक्सद्वारे करून देत असते. आज सकाळी ब्राउजर उघडताच डूडलवर अप्रतिम सौदर्यवती, रूपवान ,गतकाळातील गुणी अभिनेत्री मुमताज जेहान बेगम देहलवी उपाख्य मधुबाला हिचे चित्र दिसले. व माउस पॉइंटर डूडलवर विसावला. “Madhubala’s 86th birthday” अशी टीप आली आणि "अच्छाजी मै हारी" अशी आशाजींच्या आवाजात रागावलेल्या देव आनंदची काला पानी या चित्रपटात विनवणी करणारी , चलती का नाम गाडी चित्रपटातील "ओल्या साडीचा पदर पिळणारी एक लाडकी भिगी भागीसी" रूपसंपन्न मधुबालाच्या आठवणी ताज्या झाल्या. डूडलवर हिन्दी चित्रपटसृष्टीची मर्लिन मन्रों म्हणून ओळखल्या जाणा-या तिचे ते सुप्रसिद्ध गाणे जब प्यार किया तो डरना क्याया गीतावरील नृत्य करतांनाचे चित्र होते. तसे पाहू जाता आजच्या तोकड्या कपड्यातील नट्यांना सुंदर समजणा-या पिढीला 1950-60 च्या या अभिजात सुंदर अभिनेत्री बाबत फारशी कल्पना नसेल. बालपणीच कुटुंबासाठी अर्थार्जन व्हावे म्हणून तिला कुटुंबीयांनी चित्रपटात दाखल केले. अशोककुमार, दिलीपकुमार,देव आनंद, किशोरकुमार सारख्या तत्कालीन अभिनेत्यांसह तिने अनेक भूमिका वठवल्या. त्यानंतर ती अभिनेत्री झाली. दिलीपकुमार सोबत प्रेमाचे तिचे किस्से गाजले. परंतू पुढे आजाराने ग्रस्त झाल्यावर चलती का नाम गाडी, हाफ तिकीट , झुमरू या चित्रपटात तिच्यासह काम करणा-या किशोरकुमारने तिला असाध्य आजार आहे हे माहीत असूनही तिच्यासह लग्न केले. तिला विदेशात उपचाराकरीता नेले. परंतू 70 चित्रपटात भूमिका करणा-या या अभिनेत्रीस वयाच्या 36 व्या वर्षी मृत्यूस स्वाधीन व्हावे लागले. पडद्यावर मधुबालाला पाहणे हा एक सुखद अनुभव रसिक अनुभवत असतानाच ती रसिकांना धक्का देऊन गेली. सुंदर,अवखळ

मधुबालाचे आजही माध्यमांवर अनेक चाहते आहेत. तिची आजही पाहणारे, ऐकणारे अनेक रसिक आहेत. समाज माध्यमांवर आजही कुणी मधुबालाचे फोटो पोस्ट केले तर त्यांना अनेक लाईक्स मिळतात. 14 फेब्रुवारी या पाश्चात्त्यांच्या प्रेमाच्या दिनी म्हणजेच व्हॅलेंटाइन डे च्या पार्श्वभूमीवर मधुबालाचा जन्म झाला. रसिकांनी ,तिच्या चाहत्यांनी तिला भरपूर प्रेम दिले. ती मात्र प्रेमाच्या बाबतीत उपेक्षितच राहिली. कुटुंबियांच्या धाकात राहून त्यांच्यासाठी पैसे कमवीत राहिली. दिलीपकुमार कडून ते मिळेल ही आशा तिला होती परंतू तेथेही निराशाच तिच्या नशिबी आली.अगदी शेवटी किशोरकुमार कडून तिला ते प्रेम मिळाले परंतू तेंव्हाच तिची शेवटची घटका समीप आली होती. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवालायाप्रमाणे या पृथ्वीवरील या अप्सरेच्या या सुहास्यवदनेच्या प्रेमात  कदाचित ईश्वर सुद्धा पडला असावा. म्हणूनच व्हँलेंटाईन डे च्या दिनी जन्मलेल्या तिला अवघ्य्या 36 व्या वर्षी तिला बोलावणे धाडले गेले. आज मधुबाला हयात असती तर 86 वर्षांची असती. गुगलने आज रसिकांना तिच्या स्मृती करून दिल्या. एक मासिकाने तिला जगातील महान अभिनेत्री असा उल्लेख केला आहे तर वर्ष 2008 मध्ये डाक विभागाने तिच्या स्मृती प्रित्यर्थ तिकीट सुद्धा काढले होते.  

११/०२/२०१९

Article written in year 2016 on my beloved uncle and his favorite Ambassador car

काका दी गड्डी !

दादांसाठी (माझे वडील) Pleasure घेतली तेंव्हा एक लेख लिहिला होता. तेंव्हाच मनात आले होते की सर्वांचे काका अगदी त्यांच्या मुलांचेही काका असलेल्या काकांवर सुद्धा एक लेख लिहावा. तसे त्यांच्या अँम्बेसॅडर गाडी या विषयावर एक लेख लिहिला होता. परंतू काकांवर लिहिण्याचा योग येत नव्हता. पोस्टाची नोकरी, डिंक, मोटार लाईन, जमीन जुमला, संस्था, वैद्य असलेल्या वडिलांचे नांव राहावे म्हणून आयूर्वेदिक वाघ छाप दंत मंजन असे अनेक व्यवसाय सांभाळून ज्यांनी प्रपंच नेटका केला. इतके व्याप सांभाळणा-या तसेच सर्वच आप्त स्वकीयांच्या सुख-दु:खाची सतत जाणीव ठेवणा-या काकांचे जीवनात “इस इस्टोरी मी लव्ह है, ड्रामा है, ट्रॅजेडी है” याप्रमाणे अनेक घटना आहे. अशा अष्टपैलू “काका” उपाख्य रावसाहेब म्हणजेच सुरेश दत्तात्रय वरणगावकर या विषयास A4 साईजचा कागद कसा पुरसा कसा ठरेल? म्हणून मग “काका डी गड्डी” हाच विषय ठरवला. काकांनी त्यांची अँम्बेसॅडर गाडी दुरुस्त केली. तसे दुरुस्त होऊन बरेच दिवस झाले परंतू आज अवकाश मिळाला मग उचलली लेखणी आणि चालवली कागदावर “नॉन स्टॉप” जशी टापोटाप रस्त्यावर अँम्बेसॅडर चालते राजेशाही थाटात. मला अजूनही तो दिवस आठवतो. काका सहकुटुंब आमच्या घरी पेढे घेवून आले होते. कशाचे पेढे विचारल्यावर बाहेर उभी असलेली अँम्बेसॅडर दाखवली. लहानपणापासून त्यांना खाकी पँट आणि पांढरा शर्ट याच एका पोशाखात पाहिले होते या वैशिष्ट्यासह आता अजून एक वैशिष्ट्य जोडल्या गेले ते म्हणजे अँम्बेसॅडरचे. कुठेही जाणे असले मग ते जगन्नाथपुरी, रतलाम, व्दारका असो किंवा मुंबई, अष्टविनायक यात्रा असो किंवा जवळपासचे एखादे खेडे असो काकांची अँम्बेसॅडर ‘फिक्स’. काकांच्या अशा वैशिष्ट्यांसारखी पूर्वी अनेक व्यक्तींची अशी काही वैशिष्ट्ये असत त्यांच्या त्या वैशिष्ट्यामुळे ती व्यक्ती ओळखली जात असे. कुणी वेत बाळगत,कुणी उंच टोपी घालीत कुणी धोतराचा एक टोक हातात पकडून चालत असे तर कुणी मुठीत विडी पकडून विडी ओढत असे.अशा नाना लोकांच्या लकबी असत, नाना त-हा असत.काकांचे वैशिष्ट्य म्हणजे खाकी पँट आणि पांढरा शर्ट आणि अँम्बेसॅडर कार.सध्याची जी अँम्बेसॅडर आहे ती काकांची तशी दुसरी अँम्बेसॅडर, 7859. पूर्वी बलदेव सारथी होता आणि आता गावंडे. काळाच्या ओघात 7859 वृद्धत्वाकडे झुकली परंतू ती सुरु Condition मध्ये काकांनी ठेवली होती. भाजीत भाजी जशी नेहमी मेथीची असते तसेच गाडीत गाडी म्हणजे अँम्बेसॅडर असा खाकी पँटवाल्या काकांचा खाक्या. परिवार आणि मित्र मंडळीनी अनेकदा नवीन गाडी घेण्याचे सुचवले परंतू कुणाचे ऐकतील आणि तसे करतील हा काकांचा स्वभाव नव्हे.“ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे” याप्रमाणे. काकांनी पैसा खर्च केला आणि त्यांची गाडी सजवली.तीला नवी कोरी बनवून सर्वांसमोर पेश केले. अँम्बेसॅडरची वैशिष्ट्ये सुद्धा अनेक, सर्वाना घेऊन जाणारी, मजबूत अशी ही राजा गाडी खरेच तिच्या प्रमाणेच अनेक वैशिष्ट्ये असणा-या काकांसारख्या राजा माणसाला, कित्येकांना पोटापाण्याला लावणा-या, तरूण वयात पत्नीची कठीण Open Heart शस्त्रक्रिया करवून आणणा-या, या ही वयात तरुणांना लाजवेल या उत्साहात आनंद मठ, शाळा, इतर खाते वह्यांची कार्ये, कोर्टाची कामे करणा-या, अनेकांची काळजी मनात बाळगणा-या, गरीबांना मदतीचा हात देणा-या, निव्वळ पैस्यासाठी संस्था उभी करणा-यांच्या काळात स्वत:चे घर सोडून शाळा उभारणा-या काकांना ज्या प्रमाणे अँम्बेसॅडर कधी घाटात खचत नाही त्यापमाणे स्वत:चे मनोबल खचू न देणा-या खंबीर माणसाला शोभणारी आहे. ज्याप्रमाणे ट्रकवर “पापा दी गड्डी” असे लिहिले असते तसे कोणत्याही अँम्बेसॅडरला पहिले की वाटते की ये तो हमारे काका दी गड्डी है !................हमारे काका दी गड्डी !

Article written in year 2016 about Respected Ex-Headmistress Wanmala Ane madam of A.K..National Highschool Khamgaon


ति.स्व अणें मॅडम,
                   शि.सा.न.
केवळ मॅडम न लिहिता अणें मॅडम लिहिले, कारण तुम्ही त्याच नावाने जास्त लोकप्रिय. सोशल मिडीयाच्या माध्यमामुळे पुनश्च आपल्या संपर्कात येण्याचे भाग्य लाभले.आम्हा सर्वाना खूप अभिमान आहे की तुमच्या सारख्या मुख्याध्यापिका असताना आम्ही अ.खि, नॅशनल हायस्कूल चे विद्यार्थी होतो. शिस्त काय असते,मुख्याध्यापकाचा दरारा कसा असतो,आदरयुक्त भीती कशी असते,प्रसंगी कठोर आणि प्रसंगी मृदू कसे व्हावे,हे सर्व आम्हाला तुमच्या कारकिर्दीत समजले. संस्कार हे वरिष्ठांच्या वागणुकीतून आपसूकच होत असतात. तसे तुमच्यामुळे आम्हा अनेक विद्यार्थ्यांमध्ये झाले.आताच्या अनुदानित शाळांमधून मात्र हे सर्व हद्दपारच झालं मॅडम ! मी १९८४ मध्ये आपण मुख्याध्यापिका असतांना शाळेत प्रवेश घेतला होता.वर्ग ५ वा ई मराठी माध्यम. शाळा सुरु होऊन काही दिवस होत नाही तो तुमच्या कार्यालयात जाण्याचा योग आलाच.योग चांगल्या कारणाने आला नव्हता त्यामुळे मनात भीती होती.एका मुलाला मी व आनंद चितलांगे याने मारले होते म्हणून आम्हाला आपल्या कार्यालायात नेण्यात आले.लहान वय असल्याने वरीष्ठांसमोर कसे उभे राहावे ते पण कळत नव्हते,मी आपला दोन्ही हात कमरेवर ठेवून आपल्याशी बोलत होतो.तुम्ही दरडावून सरळ उभे राहण्यास सांगितले,आम्हाला चांगली ‘समज’ दिली.तुमच्या धाकाने पुन्हा आम्ही तसे कृत्य करण्यास धजावलो नाही.वर्ग सहावीत मी मॉनीटर झाल्यावर सर्व वर्गांच्या मॉनीटर सभेत तुम्ही आम्हाला उद्बोधन केले.तेंव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती,तुम्ही म्हणाल्या “आपल्याला सतवंतसिंग, बेअंतसिंग बनायचे नाही आहे चांगल्या वागणुकीने नाव कमवायचे आहे.” तुमचा तो संदेश अजूनही स्मरणात आहे मॅडम.त्यानंतर चंद्रिका केनिया शाळेत आल्या होत्या तेंव्हा तो कार्यक्रम तुम्ही किती शिस्तीत पार पाडला होता.आम्ही वर्ग दहावीत असताना एके दिवशी तुमच्या लक्षात नव्हते की तो ‘सिव्हील ड्रेस” चा दिवस आहे तुम्ही एकेका मुलाला घरी पाठवण्यास सुरुवात केली परंतू एकाची सुद्धा सांगण्याचे हिम्मत झाली नव्हती.नंतर कुणी तरी तुम्हाला आठवण करून दिली तेंव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना प्रेमाने परत बोलावले.असे कितीतरी किस्से अनेक विद्यार्थ्यांच्या कायमस्वरुपी आठवणीत आहेत.
                 संस्थाचालक,सहकारी शिक्षकवृंद,विद्यार्थी सर्वाना तुमची आदरयुक्त भीती असायची.अ.खि, नॅशनल हायस्कूल म्हणजे पालक डोळे झाकून त्यांच्या पाल्यांना प्रवेशीत करायचे.आता खंत आहे की फार कमी शाळांत अणें मॅडम,तत्कालीन न्यू ईरा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. शंकरराव तायडे सर यांसारखे मुख्याध्यापक राहिले आहेत.”विद्यार्थी ना शिक्षा करू नका” अशा फतव्यामुळे ते ‘सैराट’ झाले आहेत.निरनिराळ्या शैक्षणिक नसलेल्या कामकाजात शिक्षक,मुख्याध्यापक व्यस्त झाले आहेत.असो ! 
                आम्हाला मात्र तुमच्यासह तुमचे सहकारी शिक्षक श्री काळे सर, श्री संगारे सर , श्री पुणतांबेकर सर , लिखिते मॅडम, एम आर देशमुख सर , शर्मा सर, गळगटे सर  व इतरही अनेक असे शिक्षक श्री नागडा, श्री कोरडे यांसारखे कार्यालयीन कर्मचारी लाभले हे आम्ही आमचे भाग्य समजतो. तुम्ही सर्व आजही आम्हा विद्यार्थ्यांच्या स्मरणात आहात. आम्ही आमच्या पाल्यांना आणि विद्यार्थ्यांना तुमच्या बाबत सांगत असतो.याप्रसंगी संत कबीराचा दोहा आठवतो
सब धरती कागज करू , लेखनी सब वनराय
सात समुद्र की मसी करू , गुरु गुण लिखा ना जाय
त्यामुळे येथे पत्रास विराम देतो. काही चुकले असल्यास क्षमस्व.
तुम्हास सुख समृद्धी, आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना 
तुमचा विद्यार्थी 
विनय विजय वरणगांवकर,खामगांव