२३/०५/२०१९

After the victory of BJP and NDA in LS 2019 Elections under the leadership of PM Modi and Amit Shah


चौकीदार थोर आहे
     
बहुप्रतिक्षित असलेला लोकसभा निवडणूक 2019 चा निकाल अखेर लागला. तत्पूर्वी “एक्झिट पोल” मधून भाजपा व “एन डी ए” यांनाच सत्ता मिळेल असे भाकीत वर्तवल्या गेले होते. विरोधकांचे “ई व्ही एम” रडगाणे सुरूच होते. शरद पवारांसारखे मोठे नेते हिंसेची भाषा करीत होते, हार झाली तर लोकशाही वरचा विश्वास उडेल अशी वक्तव्ये करीत होते. आता सुप्रिया सुळे ह्या विजयी झाल्या आता तरी त्यांचा “ई व्ही एम” वर विश्वास बसला आहे की नाही ? निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीस राहुल गांधी यांनी “चौकीदार चोर है” करून मोदींविरोधात मोठा कुप्रचार आरंभिला होता. राफेल प्रकरणाचा गवगवा केला होता. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावर ज्या सावरकरांची माफीवीर म्हणून संभावना राहुल करतात त्याच राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाकडे एक नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाचे  पहिल्या माफीपात्राने समाधान झाले नाही म्हणून दोन वेळा माफी मागावी लागली. मोदींनी काहीच केले नाही अशी ओरड विरोधक जरी सतत करीत असले तरी उज्वला योजना, मुद्रा योजना , आयुष्यमान भारत , गावा-गावात वीज, रस्ते विकास , स्वच्छ गंगा यांसारख्या योजना जनतेपर्यंत पोहोचल्या होत्या व त्यांचा लाभ सुद्धा अनेकांना मिळत आहे. जरी सहिष्णू म्हणून आपली ओळख असली तरी अन्याय करणा-यां विरोधात जशास तसे उत्तर भारत देऊ शकतो असा नवीन , सक्षम, मजबूत भारताच्या निर्मितीकडे मोदींनी पाऊल टाकले. अंतरिक्षात मिसाईल सोडून उपग्रह निकामी करून भारताने उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात जगात दबदबा निर्माण केला. भारताच्या बदललेल्या राजकारणाने अजहर मसूद ला सुद्धा जागतिक आतंकवादी म्हणून गेल्या महिन्यात घोषित करण्यात आले. या सर्व गोष्टी जनता बघत होती. तरीही काही तथाकथित मिडीयावाले , बुद्धीजीवी मोदी सरकार पुन्हा येणार नाही, भाजपाच्या कमी जागा येतील ,
मोदी लाट नाही याचा पुनरुचार करीतच होते. परंतू जसे-जसे कल येत गेले तसे तसे या मंडळीना आपण चुकलो असल्याचे कळले हे एका वृत्तचित्रवाहिनीवर स्पष्टपणे कबूल करण्यात आले. मोदी हेच देशासाठी योग्य आहे हे जनतेने जाणले म्हणूनच त्यांना जनतेने पुनश्च कौल दिला. 9 राज्यात भाजपा ला स्पष्टपणे कौल मिळाला आहे. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी “आता आणखी जबाबदारी वाढली आहे, अधिक जोमाने कामे करावी लागतील” असे वक्तव्य केले आहे. खरेच आहे जनतेने भाजपा व मित्र पक्षांची केलेली निवड ही आगामी सरकारला सार्थ करून दाखवावी लागणार आहे. विरोधकांनी सुद्धा कुठे चुकले याची पडताळणी करणे जरुरी आहे. अमेठीचा परंपरागत गड राहुल गांधी यांना राखता आला नाही, अशोक चव्हाण सारखे दिग्गज नेते यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. दिग्विजयसिंग पडले, सुशीलकुमार शिंदे सुद्धा पराभूत झाले. विरोधकांनी आत्मपरीक्षण करणे जरुरी आहे, विकासाचे राजकारण करणे जरुरी आहे , राज्यातील नेत्यांना केंद्रीय नेतृत्वाने पुढे आणणे जरुरी आहे. भारतीय राजकारण आता बदलत आहे नवीन तरुण मतदार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या तरुणांना आपला देश आपले नेतृत्व हे कणखर , सक्षम असे हवे आहे. लेचेपेचे काहीही बरळणारे, कुटुंबाच्या पुण्याईवर पुढे आलेले नेते त्यांना नकोत. याची सुद्धा जाण नेत्यांनी ठेवायला हवी. शिवाय मोदींची खूपच तुच्छ शब्दात , प्रसंगी शिव्या देऊन केलेली संभावना दुस-याला, उच्चपद्स्थांना मान देण्या-या , आदर करण्या-या अस्सल भारतीयांना कधीच रुचणार नाही. विरोधकांनी मोदींना शिव्यांची लाखोली वाहिली. “चौकीदार चोर है” असे म्हणून भंडावून सोडले. मोदींनी मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आपली वाटचाल सुरूच ठेवली. व्यस्त कार्यक्रम , देशाची जबाबदारी , प्रचार सभा सर्वांना हाताळत आपल्या पक्षाची व पूर्वी प्रंचड टीका करणा-या सहकारी पक्षातील काही पक्षांची यशाकडे वाटचाल कायम करण्याचे  प्रयत्न सुरु ठेवले. आजच्या या निवडणूक निकालानंतर मोदींनी हेच सिद्ध केले की चोर नसून देशाचा हा “चौकीदार थोर आहे”.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा