१६/०५/२०१९

Article in memory of Ice Candy , its hawker and related things


आईस्कांडी
आईssssस्कांडी वाला” अशी आरोळी ऐकली की, स्कूटरचे चाक असलेली तीन डब्बे असलेली एक लाकडाची छोटीशी रंगीत लोटगाडी घेऊन आलेल्या त्या फेरीवाल्या जवळ 10,20,50 पैसे घेऊन मुले गोळा होत असत. एक चपटी लाकडी काडी किंवा बांबूच्या छोट्या कामटी पासून बनवलेली काडी असलेल्या छोट्या बर्फाला रंग दिलेली आईस कांडी मुलांना मिळत असे. लाल ,पिवळ्या हिरव्या रंगाची ती कुल्फी असे. लाकडी झाकण उघडून त्यातून तो कुल्फीवाला कुल्फी काढी व मुलांच्या हाती सोपवी.50 पैस्यांची आईस कांडी घेणा-या मुलाचा मोठा मान असे. 10, 20 पैसे वाले त्याच्याकडे व त्याच्या आईस कांडी कडे कुतूहलाने पहात. “आईस कांडी” खरे तर दोन इंग्रजी शब्द यातील “आईस” जसा आहे तसाच राहिला “कँडी” चे मात्र कांडी झाले व हे शब्द उच्चारतांना दोन्ही जोडून “आईस्कांडी” असे उच्चारण सर्व करीत असत. उन्हाळ्यात आईस कांडी मिळणे हिच मोठी गोष्ट होती. ती मिळाली की लहान मुले खुश. “आईस कांडी खाऊ नको रे त्यात अळ्या असतात“ अशी एक अफवा अधूम मधून पसरत असे . कदाचित ज्यांना ती मिळत नसे ते ती अफवा हळूवार पसरवून देत अशी शंका आज मनात येते. खरोखर त्यात अळ्या असत का नाही देव जाणे परंतू आईssssस्कांडी वाल्याची विक्री मात्र चांगली होत असे. हळू-हळू बदल झाला मोठी आईस कांडी, मटका कुल्फी  ह्या काळाच्या ओघात लुप्त झाल्या. कदाचित ग्रामीण भागात त्या मिळतही असतील परंतू शहरातून त्या गेल्या व मलई कुल्फी आली. विविध कंपन्यांचे नाना फ्लेवरचे आईस्क्रीम आले. फॅमिली पॅक आले. कुटुंबातील लोक आपल्या
आपल्या आवडीचे फ्लेवर चाखू लागले.आईssssस्कांडी वाला” ही गल्लोगल्ली ऐकू येणारी आरोळी मात्र ऐकू येईनाशी झाली. आता अमूल , दिनशॉ, वाडीलाल , नॅचरल अशा कितीतरी कंपन्यांचे

आईस्क्रीम शहरात व खोडोपाडी सुद्धा उपलब्ध होत आहे. नाना प्रकारची सरबते मिळत आहेत. यांच्या सर्वांच्या भाउगर्दीत ऊसाचा रस आजही तग धरून आहे आईस कांडी मात्र आपला बचाव करू शकली नाही. लोकांची आवड आता झपाट्याने बदलत आहे. जाहिराती, ब्रँड यांना लोक भुलत आहेत परंतू जे साधे आहे, चांगले आहे, ज्याची जाहिरात नाही त्याला आता खराब समजले जात आहे. ज्या आईस कांडीत पूर्वी अळ्या आहे अशी अफवा अधून मधून पसरत असे व त्या कारणास्तव प्रसंगी ती नाकारली सुद्धा जात असे. आज आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या अनेक आईस्क्रीमवर ”यात वनस्पती तेलाचा वापर केला आहे” अशी स्पष्ट सूचना दिली असते. अनेक ठिकाणी अन्न व औषधी प्रशासनाने जास्त प्रमाणात “डालडा” असलेल्या आईस्क्रीम केंद्रांवर धाडी टाकल्या आहेत. आकर्षक म्हणून आपण काय खात आहोत याचे भान ग्राहकाने ठेवणे जरुरी आहे. आज जनतेजवळ पैसा चांगला खुळखुळतो आहे. क्रयशक्ती वाढली आहे. परंतू आपण काय खातो याकडे बारकाईने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. कालच नागपूरला वडा सांबारच्या थाळीत चक्क पाल निघाली. आपल्या व आपल्या मुलांच्या प्रकृतीला जपा. योग्य ते निवडा. पूर्वी 10,20,50 पैस्यांची आईस कांडी घेणारे आज बक्कळ कमावत आहेत परंतू आज दिसायला जरी चांगले असले , महागडे असल्रे तरी आजच्या अन्नात ,खाद्य पदार्थात भेसळ मात्र जास्त आहे. आईस्क्रीम म्हणून चक्क डालडा पोटात जातो आहे. साधा बर्फ व रंग यांचा वापर करून बनवलेली ती आईस्कांडी आजच्या भेसळयुक्त , डालडायुक्त आईस्क्रीम पेक्षा निश्चितच कितीतरी पटीने चांगली होती. परवा महागडा चोकोबार घेतांना सहज आईस्कांडी, आईssssस्कांडी वाला, त्याची गाडी हे सर्व चित्र डोळ्यासमोर तराळले. चाखत तर तो ब्रँडेड चोकोबार होतो परंतू तोंडात मात्र चव घोळत होती त्याच 10,20,50 पैस्यांच्या आईस्कांडीची. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा