राम का गुणगान करीये
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना असलेली
राम नामाची किंबहुना ‘जय श्रीराम’ या घोषणेची अॅलर्जी उभ्या देशाने पाहिली. जय
श्रीराम घोषणा दिल्यावर गाडी थांबवून जनतेवर रागावणे असले प्रकार सर्वानी पाहिले व
त्यावर टीका , वात्रटिका आणि विडंबन सुद्धा झाले. त्यानंतर लोकसभेत सदस्य शपथ घेत
असतांना सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी जय
श्रीराम असा उद्घोष केला होता. त्यानंतरही बरीच चर्चा झाली, वाद झाले त्या
उद्घोषास प्रत्युत्तर म्हणून अल्ला हू अकबर ही सुद्धा घोषणा दिल्या गेली. संसदेत
अशा धार्मिक घोषणा देणे अयोग्य असल्याचे मत नवनीत कौर यांनी प्रतिपादन केले होते. रामाच्या
या देशात कपिल सिब्बल सारखे लोक राम अस्तित्वातच नव्हता अशी भाषा करतात , आता आपल्याच देशात जय श्रीराम अशी घोषणा दिली तर गहजब होत आहे हेच मुळात आश्चर्यकारक
आहे. इंडोनेशिया या मुस्लिम बहुल देशात आजही प्रभू रामचंद्र आदरणीय आहे , जेथे
रामलीला सारखे कार्यक्रम आजही होतात. रामाला ते आपला पूर्वज मानतात. याउलट प्रभू रामचंद्रांच्याच भारत देशात
मात्र ममता बॅनर्जी , कपिल सिब्बल आदी लोकांना मात्र रामाप्रती प्रेम, आत्मीयता, आदर मुळीच नाही. भारतात राम
हा सर्वात आदरणीय असलेला असा देव आहे. त्याच्या अस्तित्वाच्या खुणा अयोध्या तसेच
इतरही ठिकाणी सापडल्याचे दाखले आजही मिळतात.
इराक मध्ये सुद्धा नुकतीच राम व
हनुमंत यांची भित्तीचित्रे सापडली आहेत. तुलसीदास, रामदास
स्वामी, कबीर इत्यादी अनेक संतांनी रामाप्रती अनेक श्लोक , ओव्या , काव्ये केली आहेत. आजही रामाचे गुणगान, तसेच भल्या पहाटे रामाची भजने गायली जातात. राम हा आदरणीय, वंदनीय , आदर्श असल्याचे जाणूनच डॉ बाबासाहेब
आंबेडकरांनी संविधानात रामाच्या चित्राचा समावेश केला होता. आज मात्र धूर्त
राजकारणासाठी तमाम भारतीयांच्या हृदयात असलेल्या श्रीरामचंद्रांच्या नावाची
अॅलर्जी काही राजकारण्यांना झाली आहे. यांना रामाचे
नांव घेऊन दुष्कृत्ये करणारे, जय श्रीराम घोषणा देत मारहाण करणारे हिंदू वाटतात परंतू बहुतांश दहशतवादी हे पाकीस्तानातील असूनही हल्ले
, बॉम्बस्फोट करणा-यांना मात्र धर्म नसतो असे वाटते. हे कसे काय ? हजारो , लाखो
वर्षांची परंपरा असलेल्या या देशात इथलेच लोक आपल्याच देवी देवतांच्या विरोधात मते
प्रकट करतात हे या देशाचे दुर्भाग्य आहे. रामाच्या नावाचा या देशातील कुणालाही
काहीही त्रास व्हायला नको. प्रत्येक देशात त्या-त्या ठिकाणचे महापुरुष , देवी-देवता यांचा आदर, मान राखला जातो परंतू आपल्याच देशातील काही लोकांमुळे आपण मात्र
त्याला अपवाद आहोत. स्वार्थासाठी आपले लोक आपल्याच आदर्श असलेल्या थोर पुरुषांचा ,
देवी देवतांचा मान राखत नाही. अशा लोकांना भीमसेन जोशी यांनी गायलेल्या
रामाप्रतीच्या सर्वोत्तम भजनाच्या ओळींचा आधार घेऊन हेच सांगावेसे वाटते की ,
“राम का गुणगान करीये,
राम प्रभूकी भद्रताका , सभ्यताका
ध्यान धरीये “
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा