०४/०७/२०१९

Article on, Rahul Gandhi says he is no longer Congress chief, urges CWC toto elect successor

मनधरणी व्यर्थ
राहुल गांधी यांनी अध्यक्षपदावर कायम राहावे अशी विनंती राजस्थानचे मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी केली होती.राहूलच पक्षाचे नेतृत्व करू शकतात असे त्यांनी व्टीट केले होते. त्यांची विनंती राहुल गांधी यांनी सोमवारी फेटाळून लावली. त्यानंतर कमलनाथ यांच्या नेतृत्वात काँग्रेस मुख्यमंत्र्यानी राहुल गांधी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. परंतू राहुल गांधी यांच्यावर तीळमात्रही परिणाम झाला नाही.आता काँग्रेस जन उपोषण सुद्धा करणार आहे. राहुल गांधीनी अध्यक्ष पदावर कायम राहावे यासाठी काँग्रेस पदाधिका-यांचे राजीनामा सत्र पूर्वीच सुरु झाले आहे. हे सर्व होऊनही अखेर राहुल त्यांच्या निर्णयावर कायम राहिले व त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्विकारत काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा अधिकृत असा चार पानांचा राजीनामा दिला व तसे व्टीटरवर सुद्धा जाहीर केले. प्रियंका गांधी यांनी “काही लोकांकडेच धैर्य असते” असे वक्तव्य या राजीनाम्याबाबत केले आहे. ज्यावेळी राहुल यांनी अध्यक्षपदी न राहण्याची मनीषा जाहीर केली होती. त्यावेळी पासून काँग्रेस नेते त्यांची मनधरणी करीत होते. खुद्द पक्षाध्यक्ष स्वतः गांधी घराण्या बाहेरील पक्षाध्यक्ष निवडावा अशी भावना व्यक्त करतात तरीही काँग्रेस नेते राहुल यांना सोडायला तयार होत नव्हते हे त्यांचे नेत्यावरील प्रेम आहे की घराणेशाहीचे लांगूलचालन ? भिष्माने जेंव्हा हस्तिनापूरच्या गादीवर बसणार नाही अशी अशी प्रतिज्ञा केल्यावर कुरु घराण्यातील कुणीही किंवा इतर मंत्रीगणांनी भिष्मानेच गादीवर बसावे असा अट्टाहास केला नव्हता. अर्थात येथे राहुल गांधी यांची तुलना भीष्माशी करण्याचा कोणताही प्रयत्न नाही. व ती होवू सुद्धा शकत नाही. भिष्म जरी सत्तेपासून दूर राहिले तरी ते आजीवन हस्तिनापूरशी एकनिष्ठ राहिले. राहुल व त्यांच्या नेत्यांचे पाक व चीन प्रेम हे भारतीयांपासून काही लपून राहिले नाही. नेहरूंचा पणतू म्हणून त्यांना काँग्रेस अध्यक्षपद मिळाले होते परंतू त्यांच्या अध्यक्षपदावर येण्यामुळे व त्यांनी प्रियंकांना निवडणुकीची जबाबदारी सोपवल्यामुळे काहीही फरक पडला नाही. प्रियंका गांधी व इंदिरा गांधी या दोघींमधील नाकच तेवढे सारखे असल्याचे सिद्ध झाले. राहुल गांधींनी स्वत:च्या क्षमता ओळखूनच अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याबद्दल ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. परंतू काँग्रेसवासियांना मात्र गांधी घराण्याची इतकी सवय पडली आहे की गांधी घराण्याच्या आधाराशिवाय पक्षाला मुळी उभारीच देता येणार नाही असे त्यांना अजूनही वाटते. काँग्रेस पक्षाने स्वत:ची शक्ती ओळखणे जरुरी आहे. गांधी घराण्याव्यतिरीक्त काँग्रेस मध्ये कितीतरी महान, दूरदृष्टीचे नेते होऊन गेले. परंतू त्यांचे कर्तुत्वच गांधी घराण्याने व त्यांचे लांगूलचालन करणा-या नेत्यांनी जनतेसमोर मुळी येउच दिले नाही. गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, लालबहादूर शास्त्री,सरदार पटेल, अगदी अलीकडच्या काळातील माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव व इतरही अनेक नेत्यांच्या नावांचा उल्लेख करता येईल. अशा व इतर अनेक कर्तुत्ववान नेत्यांचे कार्य केवळ गांधी घराण्याच्या उदो-उदो केल्याने झाकोळले गेले. पूर्वीही तेच होते व आताही तेच आहे. दस्तूरखुद्द  राहुल गांधींची इच्छा नसतांना त्यांनीच अध्यक्ष पदावर राहावे हा बालहट्ट काँग्रेस नेते का करीत होते ? त्यांचा स्वत:च्या कार्यक्षमतेवर काही विश्वासच उरला नाही का ? ते आत्मविश्वासहीन झाले आहेत का ? असा प्रश्न देशातील जनतेला पडला आहे. काँग्रेस नेत्यांच्या पराकोटीच्या मनधरणी नंतरही राहुल गांधीनी आता राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार सर्वात जेष्ठ नेत्याकडे आता अध्यक्षपदाची जबाबदारी येईल. ज्या कुणाकडे ती येईल त्याने आत्मविश्वासाने पक्षाची धुरा खांद्यावर घ्यावी , पक्षाला बळकट करावे.  हे न करता काँग्रेस नेते जर गांधी घराण्याचेच गुणगान करत राहतील , त्यांचीच मनधरणी करत राहतील , तर कदाचित रिमोट ने कामकाज होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. तसे केले करतील तर काँग्रेस अधिकच रसातळाला जाण्याची शक्यता आहे. परंतू गांधी घराण्याशिवाय काँग्रेसचे गाडे पुढे हाकलेच जाऊ शकत नाही अशी ठाम मानसिकता झालेल्या नेत्यांना हे कोण सांगणार ? राहुल त्यांच्या निर्णयावर कायम राहिल्याने काँग्रेस नेत्यांची राजीनामा , उपोषण याव्दारे पक्षनिष्ठतेच्या नावाने सुरु असलेली पराकोटीची मनधरणी मात्र व्यर्थ गेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा