१८/०७/२०१९

Article on Kulbhushan Jadhav ICJ verdict and Lashkar chief Hafiz Saeed arrested in Pakistan

कुलभूषण फाशी स्थागिती , व हाफिज ला अटक 
काल भारतवासियांना दोन सुखदायक अशी वृत्ते मिळाली. पहिले वृत्त होते दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईद ला झालेली अटक आणि दुसरे वृत्त म्हणजे कुलभूषण जाधवला पाकीस्तानने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय  न्यायालयाने दिलेली स्थगिती. ही दोन्ही वृत्ते जेंव्हा माध्यमांवर झळकली तेंव्हा नागरिकांनी आनंद व्यक्त करणे सुरु केले. लाखो व्टीट झाले , लोकांचे व्हॉटस अॅप स्टेट्स बदलले. जल्लोष झाला. यातील हाफिज सईदला झालेली अटक हा पाकिस्तानचा केवळ एक दिखावा असू शकतो. नरेंद्र मोदी सरकारने पहिल्या वेळेस निवडून आल्या नंतर दहशतवादा विरोधात रणशिंग फुंकले होते. त्यामुळे जगात दहशतवादा विरोधात एक वातावरण निर्माण झाले. पाकीस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला त्यामुळेच मुंबईवरील हल्ल्याच्या या सूत्रधारास पाकिस्तानने अटक केली व त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. त्यामुळे त्याला आर्थिक मदतीसाठी दहशतवादा विरोधात ठोस पाऊल उचलणे गरजेचे झाले होते. अखेर आंतरराष्ट्रीय दबावामुळे व आर्थिक संकटामुळे का होईना आता हाफिज गजाआड झाला आहे. परंतू भविष्यात पुन्हा पाकिस्तान मधून दहशतवादाला खतपाणी मिळणारच नाही याची काही शाश्वती नाही.
     पाकीस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधवच्या फाशीला दिलेल्या स्थगितीमुळे आणखी एक जबर हादरा मिळाला आहे. हेरगिरीच्या आरोपावरून पाकीस्तानने भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना तुरुंगात डांबून ठेवले होते व 2017 मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुद्धा सुनावली होती. यात पाकिस्तान कडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन सुद्धा झाले होते. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकेस्तानला कुलभूषण यांना दिलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सरन्यायाधीश अब्दुल्कावी अहमद युसुफ यांनी दिले आहे. या प्रकरणात कुलभूषण यांची बाजू प्रख्यात कायदे तज्ञ हरीश साळवे यांनी मांडली. हरीश साळवे यांनी या खटल्याचे शुल्क केवळ एक रुपया घेतले ही एक विशेष बाब आहे. या प्रकरणात भारताच्या बाजूने 15 मते पडली. कुलभूषण यांना जेंव्हा अटक झाली होती त्याची बातमी पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तांना न देऊन व्हिएन्ना करार मोडला होता. कुलभूषण प्रकरणात पाकिस्तानच्या खोटारडेपणाचे पितळ चांगलेच उघडे पडले.पाकिस्तानने कुलभूषण हेर होते हे सिद्ध करण्यासाठी मोठा कांगावा केला परंतू शेवटी ICJ ने भारताची बाजू ग्राह्य ठरवून कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली. आपल्या भारतात रांचीच्या न्यायालयाने नुकताच समाज माध्यमांवर धार्मिक अवमान जनक भाष्य केल्याप्रकरणी रिचा भारती प्रकरणात कुराण वाटप करण्याचा आदेश दिला होता. प्रंचड टीका, जनक्षोभ यांमुळे तो त्यांनी आता मागे घेतला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा कुलभूषण यांना दिलेला न्याय पाहून , वाचून रांचीच्या न्यायालयाने सुद्धा नि:पक्ष, निर्भीड न्यायदान करण्याचा आदर्श घ्यावा. हाफिजला झालेली अटक व कुलभूषण फाशीला मिळालेली स्थगिती यांमुळे भारत जागतिक पातळीवर मजबूत होत असल्याचे सिद्ध झाले आहे. “असहिष्णुता वाढली”, “येथे राहण्यास भीती वाटते” असे म्हणणा-यांनी यातून जरा बोध घ्यावा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा