२२/०७/२०१९

Article on the occasion of Lokmanya Tilak Birth 163rd Anniversary

काँग्रेसला हवे “लोकमान्य” नेतृत्व
     23 जुलै म्हणजे टिळकांची 163 वी जयंती. टिळक म्हटले की स्मरण होते ते “भारतीय असंतोषाचे जनक”. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी मिळवणारच” असे इंग्रजांना ठणकावून सांगणा-या  टिळकांनी इंग्रजांविरुद्ध यल्गार पुकारला. रत्नागिरीतील “चिखली” गावात गंगाधरराव टिळक यांच्या घरी केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक हे “कमळ” उमलले. कोकणातून पुण्यात आल्यावर टिळकांनी बी. ए. केले व नंतर एल.एल.बी. केले. परंतू साधा सरळ पेशा हवा म्हणून टिळकांनी वकीली करण्या ऐवजी शिक्षकी पेशा पत्करला. पुढे पत्रकारिता केली. “आपले राष्ट्र म्हणजे एक परिवार आहे व या परिवारासाठी कार्य करायला हवे केवळ स्वत:च्याच परिवारासाठी नव्हे” असे त्यांचे मत होते. राष्ट्रासाठी कार्य व्हावे, आधुनिक शिक्षण भारतीय विद्यार्थ्यांना मिळावे या विचारातून त्यांनी त्यांच्या समविचारी मित्रांना घेऊन न्यू इंग्लिश हायस्कूल ,डेक्कन एज्युकेशन सोसायटी व त्या अंतर्गत फर्गसन कॉलेज सुरु केले. ज्यातून अनेक प्रज्ञावंत निर्माण झाले व होत आहेत. लोक एकत्रित व्हावे, स्वातंत्र्याची भावना वृद्धिंगत व्हावी म्हणून सार्वजनिक गणशोत्सव, शिवजयंती असे उत्सव टिळकांनी सुरु केले. प्रखर बुद्धिमान असलेल्या टिळकांनी “गीता रहस्य”,“ओरायन” सारखे ग्रंथ लिहिले. गोपाळ गणेश आगरकर व टिळक यांचे “प्रथम स्वातंत्र्य की प्रथम समाज सुधारणा” यावर मतभेद होते तरीही त्यांची पक्की मैत्री होती. टिळकांच्या जहाल विचारातून प्रेरित होऊन चाफेकर बंधू पेटून उठले व त्यांनी रँडची हत्या केली. टिळकांना तरुणांना क्रांती मार्गाकडे वळवण्याच्या आरोपाखाली कारावास भोगावा लागला व पुढे प्रफुल्लचंद चाकी व खुदिराम बोस यांनी किंग्जफोर्ड या न्यायाधीशावर बॉम्ब फेकला आणि त्या प्रकरणात टिळकांनी या दोघांची बाजू आपल्या वृत्तपत्रातून मांडली म्हणून मंडालेचा कारावास झाला. या नंतर टिळक परत आले त्यांना मधुमेहाची व्याधी जडली होती. परंतू तरीही ते पुनश्च भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये सक्रीय झाले. “लाल-बाल-पाल” ही जहालमतवादी त्रयी जनमानसांत लोकप्रिय होती. टिळकांनी पक्ष संगठन, पक्ष बांधणी सुरु केली . होमरूल लीग चळवळ, स्वदेशी चळवळ सुरु केली. टिळक खेडो-पाडी हिंडले ,शेतक-यांना स्वराज्यासाठी एकत्र करणे सुरु केले. ते रशियन राज्यक्रांती ने प्रभावीत झालेले होते. भारतातून इंग्रजांना त्वरीत हाकलायचे असेल तर काँग्रेसने जनमानसात आपला प्रभाव वाढवायला हवा, लोकांना प्रखर राष्ट्रवादी बनवायला हवे असा त्यांचा आग्रह होता. होमरूल लीगच्या अंतर्गत त्यांनी हजारो लोकांना एकत्रित आणले. भारताला मराठा साम्राज्या सारखे बनवायचे आहे का? यावर जेथे सर्वांना समान न्याय असेल असे राष्ट्र आम्हाला उभे करायचे आहे असे त्यांचे उत्तर होते. हिंदीला राष्ट्रभाषा बनवावी अशी संकल्पना टिळकांनीच सर्वप्रथम मांडली होती. तत्कालीन काळात टिळकांनी घेतलेल्या भूमिकेंवरून आजही त्यांच्यावर टीका होते. परंतू त्या भूमिकांमुळे टिळकांनी पुकारलेला स्वराज्याचा लढा, लोकांचे एकत्रीकरण, यांचे महत्व अजिबात कमी होत नाही. कारण अनेक नेत्यांच्या अनेक भूमिका ह्या आता अतर्क्य वाटतात. परंतू “चांगले तेवढे घ्यावे जे पटत नसेल ते त्यागावे” या पद्धतीचे अनुसरण करायला हवे. आजच्या काँग्रेस पक्षाची स्थिती पाहिली तर कणखर नेतृत्वाच्या अभावापोटी पक्ष दिशाहीन झालेला आहे. या पक्षाला पूर्वस्थितीत आणायचे असेल तर ज्याप्रमाणे ब्रिटीशकालीन भारतात टिळकांनी जनसामान्यांचे संगठन केले. पक्षाला उभारी दिली. लोकांना एकत्र आणून ते “लोकमान्य” झाले. त्याचप्रमाणे सद्यस्थितीनुसार जर काँग्रेसने घराणेशाही बाजूला सारून पक्षातील सर्वमान्य,कणखर,देशहितैषी,टिळकांसारखे लोकमान्य असे नेतृत्व शोधून,असे नेतृत्व पुढे आणले तर कदाचित काँग्रेसला पुनश्च उभारी मिळू शकेल. काँग्रेसने जर असे केले तर सद्यस्थितीत लोकशाहीत आवश्यक असलेला विरोधी पक्ष आपले स्थान निर्माण करू शकेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा