२८/११/२०१९

All the best to new Allied Government of different ideology in Maharashtra

नवीन सरकारला शुभेच्छा 
काही का होवो ना जनतेला शुभेच्छा देणे क्रमप्राप्तच
आहे ना ! कारण शेवटी सरकारच गाडा हाकीत असते. कुण्या का पक्षाचे असो ना , सरकार यथायोग्य , सुरळीत , स्थिरतेने चालावे व सरकारच्या काळात विकास व्हावा हीच नागरीकांची अपेक्षा असते. महाराष्ट्रात येन केन प्रकारेण शेवटी सरकार तयार झाले. गेल्या महिन्याभरा पासून सत्ताप्राप्तीसाठी होत असलेला तमाशा महाराष्ट्राने व देशाने पहिला. विदेशी बाईचे नेतृत्व नाकारून नवीन पक्ष स्थापन करणा-या जाणत्या राजांनी पुढे राजकीय लाभासाठी पुनश्च त्याच विदेशी बाईचे नेतृत्व असलेल्या पक्षासोबत आघाडी बनवून सत्ता सुद्धा उपभोगली. याच बाईंवर  व त्यांच्या पक्षावर ज्यांनी सभिनय पुरेपूर टीका केली, आपल्या भाषणातून वेळोवेळी त्यांचावर जहरीली टीका केली. त्यांच्या पिढीने सुद्धा आता त्याच बाईंशी राजकीय सलगी केली आहे. कुणी याला राजकीय गरज म्हणेल , कुणी हुशारी म्हणेल , कुणी कमळाचा वारू रोखण्यासाठी केलेली तडजोड म्हणेल. “जाणत्या राजानी” , “हाताच्या पंजाचा” हुशारीने उपयोग करून “वाघाला” बरोबर पकडले आहे. परंतू हे सरकार तयार झाले , कार्यान्वीत झाले की कदाचित वाघाची घुसमट , धुसफूस सुरू होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. कर्ज माफी ,दहा रुपयात जेवण , सरकारी कर्ज , तिजोरीतील गंगाजळी सहकारी पक्षांना सांभाळून घेणे अशा कसरती तसेच काही निर्णयांमुळे वेळेवर उद्भवणा-या अडचणी यांचा सामना या सरकारला करावाच लागणार आहे. समन्वय समिती या सरकार मधे राहील अशी शक्यता आहे. किंबहुना ती ठेवावीच लागेल. गत सरकाच्या योजना, विकास कामे यांबाबत सरकार सकारात्मक राहीले तर या सरकारची विश्वासार्हता अधिक वाढेल. 
 या नवीनच व अनपेक्षित आघाडीमुळे जरी सत्ता मिळाली असली तरी विचारसरणीत प्रचंड तफावत असल्याने तिन्ही पक्षात निश्चितच काही कार्यकर्ते, नेते नाराज सुध्दा असतील. संजय निरूपम सारख्यांनी तसे बोलून सुध्दा दाखवले.  नवीन सरकारची तिहेरी  ही कसरत जनतेचे मनोरंजन करणारी सुध्दा असेल. कुमारस्वामी देवेगौडा यांच्या सारखी प्रचिती नव्या मुख्यमंत्र्यांना न येवो म्हणजे मिळवले. सरकार स्थिर राहो, पुनश्च निवडणूक घेण्याचे काम न पडता विनाकारण सरकारी पैसा खर्च न होवो, कर्मचा-यांवर पुनश्च निवडणूकांचा ताण न येवो, कर्जमाफी द्या परंतू या राज्यातील  सर्व क्षेत्रातील प्रामणिक करदाते व मध्यम वर्गाकडे सुध्दा लक्ष दया यासाठी नवीन सरकारला भव्य शपथविधीच्या अनुषंगाने शुभेच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा