२५/११/२०१९

राजकारण गेलं चुलीत, an article about Maharashtra political scenario after state election 2019

राजकारण गेलं चुलीत
     आत्माराम सावंत लिखित उपरोक्त शीर्षकाच्या कथेचे व निळू फुले , राम नगरकर , तद्नंतर कुलदीप पवार अभिनीत नाटकाची विशेषत: शीर्षकाची गत एक महिन्यापासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडी व शनिवारी सकाळी अचानक झालेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या राउतांच्या भाषेत रात्रीच्या काळोखात तर शेलारांच्या भाषेत रामप्रहरी झालेल्या शपथविधी नंतर प्रकर्षाने आठवण येत आहे. हे नाटक काही पाहण्यात आले नाही किंवा पुस्तक सुद्धा वाचले नाही. परंतू महाराष्ट्रात घडणा-या या राजकीय भूकंप म्हणा किंवा नाट्य म्हणा यामुळे चुलीत गेलं,चुलीत जा असे म्हणायला काही वाव राहिला नाही. कारण चुली तर आता राहिल्या नाहीत उज्वला योजनेमुळे कोट्यावधी महिला आता चुली ऐवजी गॅॅस वापरतात. परंतू तरीही हे राजकारणात जे काही घडते आहे ते सर्व चुलीत जावे असेच महाराष्ट्र वासीयांना वाटते आहे. "दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है" असे राजकीय पक्षांत , आघाड्यांत , युतीत चित्र आहे. शिवसेनेने बाळासाहेबांच्या कट्टर हिंदुत्वाच्या शिवसेनेचे तत्व वळकटीला बांधून अगदी विरुद्ध विचारसरणीच्या पक्षांबरोबर घरोबा केला आहे. महाराष्ट्र वासीयांना शिवसेनेने हा मोठा धक्का दिला आहे. महाशिवआघाडीची महाविकासआघाडी झाली. शिव अर्थात छत्रपती शिवाजी राजांच्या नावाला दुर सारतांना एरवी शिवाजी महाराजांविषयी अपार प्रेम प्रकट करणा-या शिवसेनेला काहीही कसे वाटले नाही ! तसेच काकांना सोडून पुतण्या ज्यांनी काकांचे बोट धरून राजकारणाचे धडे घेतले आहे त्यांच्या छावणीत दाखल झाला आहे. राजकारणात त्यातही महाराष्ट्राच्या राजकारणात हे जे काही घडते आहे ते प्रथमच घडते आहे.
सत्तेसाठी आसुसलेलेपण , लाभाच्या, मलाईदार खात्यांसाठी चालेली रस्सीखेच या सर्वांनी राजकारण्यांची प्रतिमा निश्चितच खराब झाली आहे. ज्यात भ्रष्टाचार करता येईल अशी खाती आपल्याकडे असावीत म्हणून मांडलेल्या तमाशाने जनतेसमोर आपले लोकप्रतिनिधी केवळ आणि केवळ स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी उघड- उघड "मलाईदार" म्हणजेच भ्रष्टाचार करता येईल अशा खात्यांंच्या वाटाघाटी करतांना यांना काहीच वाटत कसे नाही? तुम्हाला जनतेची सेवा करायची असे तर घ्या ना कोणतेही खाते. शेतक-यांचा मोठा कळवळा हे दाखवतात परंतू ज्याप्रमाणे वेळेप्रसंगी कर्मचारी आपले एक दिवसाचे वेतन आपत्तीग्रस्तांना देतात तसे आमदार त्यांचे एक दिवसाचे वेतन आपत्तीग्रस्तांना देतांनाचे अभावानेच दिसते. सध्याच्या राज्यातील सत्तास्थापनेच्या चढाओढीत,आमदार फुटू नये म्हणून त्यांना हॉटेलात ठेवण्यावर करोडोंची उधळण होत आहे. येतो कुठून एवढा पैसा? शेतक-यांना मदतीच्या वेळी का नाही निघत हा पैसा? गेल्या काही दिवसात यांचे राजकारण पाहून जनता विस्मयचकीत, हैराण झाली आहे.एकीकडे  राजकारण गलिच्छ झाले असे म्हणायचे आणि करायचे मात्र तसेच. विरोधात बसू म्हणायचे आणि अभद्र आघाड्या करण्यात पुढाकार घ्यायचा.घोटाळ्यांत दोषींवर कारवाई करू असे म्हणायचे आणि त्या दोषींनाच सत्तेतील वाटेकरी बनवायचे. फाईल नस्ती करायच्या, वाघ म्हणवून घ्यायचे आणि सत्तेसाठी लाचार बनून याच्या, त्याच्या मागे फिरायाचे , जिभ काय सैल सोडायची. शेतक-यांच्या सेवेचा मोठा आव आणून त्यांना भेटी देण्याचा सपाटा लावायचा प्रत्यक्षात मदत मात्र काही नाही द्यायची. यांच्या दौ-यांमुळे शासकीय यंत्रणा किती वेठीस लागते याचा काही विचार नाही. अधिका-यांच्या बदल्यांंत ढवळाढवळ करणे स्वत:च्या खुर्च्या मात्र टिकवून ठेवणे.अशा यांच्या नाना त-हा आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात 24 ऑक्टोबर ला विधानसभा निवडणूक निकालांपासून राजकीय पक्ष,राजकारणी यांच्या सतत बदलणा-या भूमिका, वक्तव्ये , अभद्र आघाड्या, पक्षांना मतदारांनी दिलेल्या जनादेशाची अवहेलना असा राजकारणाचा हा तमाशा पाहून रोजंदारीवर जगणारे , बेरोजगार , सामान्य मतदार जे इमाने इतबारे मतदान करण्यास जातात यांना मात्र राजकारण गेले चुलीत असेच म्हणावेसे वाटत असेल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा