१९/१२/२०१९

Article about old songs related to home and wish of a bride and bridegroom of their new home .

ये बनायेंगे एक आशियाँ
ज सकाळी “वर्कआऊट” करीत असतांना एक होलगा पक्षी चोचीत काडी घेऊन बसलेला दिसला. तो उडून जवळच्याच एका झाडावर गेला तिथे त्याची मादी होती आणि त्यांचा आशियाँ अर्थात घरटे निर्माण होत होते. होलग्याच्या त्या जोडीला घरटे बांधतांना पाहून “दो पंछी दो तिनके कहो लेके चले है कहाँ“ हे गीत आठवले. काही जुने चित्रपट विशेष उल्लेखनीय जरी  नसले , त्यात आघाडीचे नायक-नायिका जरी नसले तरी त्या चित्रपटातील गीते मात्र सुमधुर असत. परीक्षित सहानी आणि राखी यांच्या “तपस्या” या चित्रपटातील हे गीत त्याच प्रकारातील. स्वत:चे घर व्हावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यातही नवपरिणीत जोडपे असेल तर स्वत:चे छोटेखानी का असेना परंतू एक टुमदार घर,एक आशियाँ असावा अशी त्यांची मनीषा असते. हीच मनीषा पक्षांच्या रूपकाने कवीने “दो पंछी दो तिनके” या गीतात व्यक्त केली आहे. “वो तो अपनेही धून मे गाये” म्हणत आपल्याच धुंदीत गात “मंजिल के मतवाले देखो छुने चले आसमाँ“ असे म्हणत आपली ही घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी मग ते आकाशाला सुद्धा गवसणी घालण्यास तयार असतात. “एक फुलोभरी हो डाली , और उसपर हो बसेरा” या घरट्यासाठीची जी फांदी आहे ती फुलांनी भरलेली असावी अर्थात घरात हसणारे,
खेळणारे एक मुल सुद्धा असावे ही सुप्त इच्छा सुद्धा कुठेतरी दडलेली असते. आपली ही स्वप्ने पूर्ण व्हावीत असे कुणाला नाही वाटत आणि म्हणून “ये सपना सच होगा, कह रही धड्कनो की जुबान” असे दोघांनी मिळून पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्याची आशा सुद्धा ते हृदयाशी बाळगून असतात. त्याला व तीला दोघांना सुद्धा कुठेतरी स्पेस मिळावी म्हणून हे घराचे स्वप्न असते. या स्पेससाठी मग भाड्याच्या घरात किंवा कुटुंबातील अनेक सदस्यांसह चाळीतील घरात राहणा-या कुटुंबातील ती दोघे घरौंदातील अमोल पालेकर व झरिना वहाबच्या रुपात “दो दिवाने शहरमे , रातमे या दोपहरमे आबोदाना धुंडते है एक आशियाना धुंडते है” असे म्हणत घराच्या शोधात असतात. “पिया का घर" चित्रपटात चाळीतील जया भादुरी आणि तीचा पती अनिल धवन यांची घुसमट "...उसे अपनालो जो भी जीवन की रीत है |" असे किशोर कुमारच्या आवाजात  व्यक्त होतांना खूप सुरेख चित्रित केली आहे. खेड्यातील मोठ्या घरात राहिलेली ती “पिया का घर है , रानी हुं मै“ म्हणत चाळीतील त्या 'पार्टीशन' च्या घरात गुण्या गोविंदाने राहत  त्याला समजून घेतांना दाखवली आहे. साथ-साथ सिनेमात याच शहरातील त्यांच्या साध्या घराबद्दल फारूख शेख आणि दीप्ती नवल “ये तेरा घर ये मेरा घर” म्हणत घराबाबत व्यक्त होतात. त्यांना त्यांचे ते घर "ये घर बहोत हसीन है"  या ओळींप्रमाणे "हसीन" वाटत असते. 
त्यांचे ते घर इतरांनी त्यांच्याच नजरेने पाहावे असे त्यांना वाटत असते. या घरात जाण्यास जरी फुलांचे ताटवे नसले “ना फुल जैसे रास्ते बने नही इसके वास्ते“ , चांदणे नाही , खुले आंगण नाही तरीही “हमारे घर ना आयेगी कभी खुशी उधार की” असे त्यांना वाटत असते.
     जुन्या चित्रपटातील ही घराभोवती फिरणारी गीते, कथानक, आपल्यातील वाटावे असे ते अमोल पालेकर, अनिल धवन, फारुख शेख , झरीना वहाब , दीप्ती नवल सारखे अभिनेते, बासू चॅटर्जी , ऋषिकेश मुखर्जी यांसारखे दिग्दर्शक आता लुप्त झाले आहेत. होम लोन देणा-या बँका , कंपन्या अशा सुविधा उपलब्ध झाल्याने “ अब घर मिलना हो गया आसान” असे झाले आहे. आता भली मोठी पॅकेज कमावणारी ती नवपरिणीत दोघे दोन दिशांना व आप-आपल्या कामात अतिव्यस्त असतात. “फुलोभरी डाली” वरचे फुल कोमेजलेले भासत असते. 2 BHK , 3 BHK चे ते घर सणासुदीच्या दिवसांत कधी "...बनाएंगे एक आशियाँ " असे स्वप्न पाहात बांधलेले ते घर रिकामे-रिकामे आणि निव्वळ एक “ईट पत्थरोंका घर” असे वाटत असते. ते घर "घर असावे घरा सारखे.. " या कवितेतील ओळींप्रमाणे नेहमी आनंदी , माणसांची रेलचेल असलेला एक आशियाँ बनून राहायला नको का ?    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा