१८/१२/२०१९

Maharashtra ruling party leader seen in a modern look in Nagpur winter assembly

पुन्हा सुट-बुट 

     कुणी कोणते कपडे घालावे हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. आवड असते. परंतू आपल्या भारतात अनेक वेळा कुणी काय घालावे यावरून वाद उपस्थित झाले आहेत. भारतात नेत्यांचा पोशाख हा नेहमी कुर्ता जॅकीट असा असतो. नेता झाला की सर्व लोकप्रतिनिधी याच पोशाखात दिसायला लागतात. असे नेते क्वचित प्रसंगी इतर पोशाखात दिसले की वेगळे वाटते. यंदाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात तसेच झाले. अनेक नेते विविध पोशाखात आलेले दिसले. कुणी जीन्स पँट, कुणी सुट तर कुणी स्टाईलीश कॅप घातलेले असे दिसले. यातील बहुतांश नेते हे शेतक-यांचे सरकार म्हणवणा-या सरकार मधील आहेत. सभागृहात येतांना नेहमी सफेद कुर्त्यात दिसणारे नेते विविध फॅशनेबल पोशाखात असे येत होते जणू काही पुरुषांचा फॅशन शो आहे की काय ? एकीकडे महात्मा गांधींचे गोडवे गायचे तर 
दुसरीकडे शेतक-यांच्या हिताची भाषा बोलत ऊंची कपड्यांत कामकाजासाठी यायचे. सद्यस्थितीत राज्य सरकारात सहकारी पक्ष असलेल्यांनी व त्यांच्या नेत्यांनी 2014 मध्ये जेंव्हा पंतप्रधान हे सुटा-बुटात आले असता “सुट-बुट वाली सरकार” म्हणून बरेच हिणवले होते, हे सरकार सामान्य माणसाचे, शेतक-यांचे नसून सुटा बुटातील सरकार आहे , उद्योगपतींचे सरकार आहे अशी टीका केली होती. वृत्तचित्रवाहिन्यांनी तेंव्हा त्या बातम्या तिखट मीठ लाऊन प्रसारित केल्या होत्या. आता मात्र वृत्तचित्रवाहिन्या या सत्ताधारी पक्षातील नेत्यांना सुटा-बुटात आल्याचे पाहून त्यांच्या बातम्या अशा पद्धतीने दाखवीत आहेत की जणू काही या नेत्यांनी शेतक-यांना सरसकट कर्जमाफी दिली.महाराष्ट्र राज्य सरकारचे नेते,आमदार नागपुरातील बोच-या थंडीचे कारण दाखवत सुट-बुट मध्ये अधिवेशनासाठी येत आहे. मान्य आहे थंडी आहे तरीही आपण पुर्वी याच सुटा-बुटा वरून गदारोळ माजवला होता,शेतक-यांप्रती प्रेमाचा खोटा कळवळा दाखवला होता याचे या नेत्यांना विस्मरण झालेले दिसते. तसेच ज्या महात्मा गांधीचे आदर्श हे नेते दाखवत असतात त्या महात्मा गांधीनी भारतातील गरीब,शेतकरी यांना पाहून आयुष्यभर साधी राहणी अंगीकारली होती. सावरकर, सावरकरांची देशभक्ती, साहित्य, अस्पृश्यता निवारणाचे कार्य हे काहीही जाणून न घेता वृथा वल्गना करणा-या यांच्या नेत्यांनी जरा आता स्वत:च्या सहकारी पक्षांना सुटा-बुटात न मिरवता शेतक-यांसाठी लवकर कसे कामास लागतं येईल हे सांगण्याची थोडी तसदी घायावी हीच रास्त अपेक्षा शेतकरी व जनता लाऊन बसली आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा