१३/०४/२०२०

Actress Lalita Pawar remembered again by Ramayan Serial Manthara role

“मंथरा”च्या निमित्ताने ललिता पवारांचे स्मरण 
1987 मध्ये दूरदर्शनवर झळकलेल्या व तुफान लोकप्रियता मिळवणा-या चित्रपटसृष्टीतील दिग्गज, आंखे , आरजू , चरस , बगावत यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांचे निर्माता दिग्दर्शक रामानंद सागर यांची रामायण ही मालिका सध्या पुन:प्रक्षेपित होत आहे व त्यामुळे चर्चेत आली आहे. त्यासोबतच पुन्हा एकदा चर्चेत आले त्यातील कलाकार. प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारणारा अरुण गोविल, सीतेची भूमिका साकारणारी दीपिका , रावण–अरविंद त्रिवेदी. या अनेक कलाकारंची चर्चा सध्या होत आहे. समाज माध्यमांवर त्यांची चित्रे, व्हिडीओ, मुलाखती झळकत आहेत. यातील अनेक कलावंत आता हयात नाहीत.रामायणात भूमिका साकारणा-या  कलाकारांच्या गर्दीत काही मराठी कलाकार सुद्धा होते जयश्री गडकर-कौसल्या, बाळ धुरी- दशरथ, संजय जोग-भरत आणि मंथरा- ललिता पवार.

“पुनी पुनी कितनी हि सुने सुनाये ,
जीय की प्यास बुझात ना बुझाये”

अर्थात कितीही वेळा सांगा अथवा ऐका परंतू तरीही अंतरात्म्याची तहान काही मिटत नाही अशा रामायण या वाल्मिकी रचित ग्रंथात सर्वात प्रथम कळ फिरवणारी स्त्री म्हणजे ‘मंथरा’. महाराणी कैकयी सोबत बालपणापासून असलेली ही दासी. कैकयीच्या विवाहोपरांत अयोध्येत येते व आपल्या राणीच्या पुत्रासाठी, भरतासाठी रामाला वनवासात धाडण्याचा वर कैकयीला दशरथाला मागण्यास सांगते आणि पुढे सर्व रामायण घडते. नवीन पिढी आता रामायण मालिका पहात आहे त्यांना सुद्धा ललिता पवार यांनी वठवलेली मंथरेची भूमिका नक्कीच आवडली असले परंतू मंथरा साकारणा-या ललिता पवार यांच्याविषयी मात्र त्यांना माहिती नसेल. रामायण मालिकेच्या कलाकारांच्या निवडीच्या वेळी मंथरेच्या भूमिकेसाठी रामानंद सागर यांनी डोळे लावून ललिता पवार या प्रख्यात अभिनेत्रीची निवड केली असेल हे मात्र निश्चित. कारण क्ज्जास , खाष्ट , कुटील अशा भूमिका करण्यात ललिता पवार यांना तोड नव्हती. रामाला वनवासात पाठवतांना कावेबाज स्त्रीचा अभिनय उत्कृष्ट करणा-या ललिता पवार यांनी राम वनवासातून आल्यावर पश्चाताप दग्ध झालेली मंथरा सुद्धा त्याच ताकदीने साकारली आहे. रामानंद सागर क्लॅपर बॉय पासून कारकीर्द सुरु करणारे लेखक, दिग्दर्शक. त्यांच्याच समकालीन म्हणजे 1944 पासून अभिनेत्री म्हणून कारकीर्द सुरु करणा-
या ललिता पवार. रामशास्त्री या पहिल्याच चित्रपटात आनंदीबाई ही नकारात्मक भूमिका त्यांनी वठवली होती. पुढे त्यांना तशाच भूमिका त्यांना मिळत गेल्या. त्याचे कारणही तसेच आहे एका चित्रपटात शूटिंग दरम्यान सह कलावंतानी मारलेल्या थप्पडीने त्यांचा डोळा दुखावला व कायमचा अधू झाला त्यामुळे त्या क्ज्जास सासू , खलनायिका , नकारात्मक अशा भूमिका साकार करू लागल्या व त्या भूमिका त्यांनी यशस्वीपणे वठवल्या. जंगली मधील कधीही न हसणारी  आई , “दादी अम्मा दादी अम्मा मान जावो” असे नातवंड विनवणी करूनही लवकर राग न सोडणारी घराना चित्रपटातील आजी तसेच अनाडी, श्री 420, नसीब मधली मिसेस गोम्स, आनंद मधली प्रेमळ नर्स अशा वात्सल्यपूर्ण स्त्रीच्या भूमिका सुद्धा ललिता पवार यांनी त्याच ताकदीने साकारल्या. परंतू स्त्री नकारात्मक भूमिकेत दाखवायची असल्यास निर्माता, दिग्दर्शक प्रथम ललिता पवार यांच्याच नावाला प्राधान्य देत असत. त्यामुळेच रामानंद सागर यांनी त्यांना रामायण मालिकेत मंथरेची भूमिका दिली.1961 च्या संपूर्ण रामायण या चित्रपटात सुद्धा ललिता पवार यांनी मंथरेची भूमिका वठवली होती. बालकलाकार,नायिका, सहाय्यक अभिनेत्री अशा भूमिका साकारणा-या ललिता पवार यांची चित्रपट कारकीर्द मोठी आहे. रामायण मालिके नंतर मात्र त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. वृद्धापकाळ सुद्धा आला त्यातच कर्करोगाने ग्रासले. जीवनाच्या अखेरच्या काळात त्या पुण्याला होत्या. 1998 मध्ये त्या वारल्या तेंव्हा त्याचे वृत्त उशिरा कळले. अनेक दिग्गजांनी त्यांच्या समवेत काम केले होते परंतू असे म्हणतात की त्यांच्या अंतिम यात्रेत चित्रपट सृष्टीतील कुणीही नव्हते. आज 18 एप्रिल हा ललिता पवार यांचा जन्मदिवस शिवाय रामायण मालिका पाहतांना त्यांनी साकारलेल्या मंथराच्या भूमिकेमुळे त्यांचे स्मरण झाले त्यासाठी हा लेखन प्रपंच. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा