१०/०४/२०२०

Article about behavior of leaders

शूssss बोलू नका बरं, मार बसेल ! 


पूर्वी लहान मुले ऐकत नसले,  किंवा  काही हट्ट करीत असले तर त्यांना बागुलबुवा किंवा बुवा किंवा पकडणारे लोक यांची भीती दाख-वली जात असे. आता सोशल मिडीयावर पोष्ट करणा-यांना सुद्धा पोष्ट करण्याआधी आप्तस्वकीय, “काही पोष्ट करू नको बाबा मार बसेल“ अशी सूचना करू लागतील. कारण आपल्या भारतातील अनेक लोकप्रतिनिधींच्या रागाचा पारा  खूप लवकर चढतो. उठ-सुठ संविधान, अहिंसा, थोर नेते,  समाजसुधारक यांची नावे घेणा-या या नेत्यांना त्यांच्या विरुद्ध कुणी थोडे जरी बोलले किंवा लिहिले की संताप अनावर होतो. रागाच्या भरात मग हे त्यांची वक्तव्ये , त्यांनी नियुक्त झाल्यावर घेतलेल्या शपथा वगैरे सर्व विसरतात आणि त्यांना अशोभनीय अशी कृत्ये करतात. अनेकदा अशी प्रकरणे देशात व आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्रात घडल्याचे जनतेने अनुभवले आहे. जनतेला मारठोक , अधिका-यांना , कर्मचा-यांना मारणे अशी कृत्ये` कितीतरीवेळा घडल्याची उदाहरणे देता येतील. लोकशाही,संविधान हे शब्द वारंवार उच्चारायचे आणि त्याच्या अगदी उलट वागायचे अशी यांची त-हा असते. मारहाणीसारखे कृत्य करतांना हे वेळ-काळ सुद्धा पाहत नाही. आपला देश,` आपले राज्य कोणत्या परिस्थितीत असते आणि आपण काय कृत्ये करतो , काय वक्तव्ये करतो याचा जराही विचार हि मंडळी करीत नाही. अर्थात सर्वच लोकप्रतिनिधी असे असतात असे नाही. यातील काहीच लोक असे असतात. परंतू यांच्या अशा वागण्याने सर्वच लोकप्रतिनिधी बदनाम होत असतात. निवडणुकीच्या वेळी गोड-गोड बोलायचे , आपली मतांची बँक सांभाळण्यासाठी लांगूलचालन करायचे, त्यासाठी कोणत्याही स्तराला जायचे हे योग्य नव्हे. नेत्याच्या विरोधात कुणी काही टिपण्णी करीत असेल तर त्यातून त्या नेत्याने काहीतरी शिकायला पाहिजे, आत्मपरीक्षण करायला पाहिजे. परंतू तसे न करता हे नेते विरोधात पोष्ट करणारा अमुक -अमुक संघटनेचा होता, अमुक-अमुक पक्षाचा होता असा जावाईशोध लावण्याचा व जनतेची दिशाभूल करण्याची  व  वोटबँक सांभाळण्याची सोय करीत असतात. सोशल माध्यमांवर कितीतरी लोक व्यक्त होत असतात त्याकडे नेत्यांनी लक्ष न देता आपल्या कामकाजाकडे लक्ष दिले पाहिजे. मागील काही वर्षात महाराष्ट्राने असे काही नेते अनुभवले आहे की ज्यांच्यावर काही नेटीझन्सनी सोशल मिडीयावर अतिशय हीन पातळीची टीका, टिप्पणी असणा-या पोष्ट केल्या होत्या. परंतू त्या नेत्याने त्यावर व्यक्त होणे टाळून आपल्या कामकाजावर लक्ष दिले. पदावर असतांना मोगलाई प्रमाणे मारठोक करणे हे कितपत योग्य आहे ? लोकप्रतिनिधींनी त्यांच्या वागणूकीचे अवलोकन करणे अत्यंत जरुरी आहे. येन केन प्रकारेण सत्ता मिळवायची , सत्ताकेंद्रीत राजकारण करायचे , सत्ता मिळाल्यावर युं करू , त्युं करू अशा बाता मारायच्या , संविधान , लोकशाही , अहिंसा , समाजसुधारकांचे दाखले द्यायचे आणि जरा कुणी काही बोलले की वरील सर्व बाबींच्या अगदी विरोधी प्रदर्शन करायचे. आज-कालच्या नवीन पिढीतील लोकप्रतिनिधींना राग फार लवकर येतो. कोणी काही बोलले,लिहिले की हे पूर्वीच्या राजकारण्यांप्रमाणे संयमित, संतुलित न राहता क्रोधाने पेटून उठतात. म्हणून शूsss काही बोलू नका विरोधात पोष्ट करू नका मार बसेल बरं ! अशी जाणीवच तर हे लोकप्रतिनिधी करून देत नाहीत ना असे वाटते. तसेच सोशल मिडीयावर व इतरत्र कुठेही लेखन , पोष्ट करणा-यांनी सुद्धा कुणाच्याही बाबतीत 
हीन दर्जाचे, जातीवाचक , देहयष्टीवाचक, वैयक्तिक जीवनाबाबत लेखन न करण्याचा नियम सुद्धा पाळणे जरुरी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा