२२/०५/२०२०

Water shortage and careless employees of local governing bodies

सर्व गाव टँकर घेते तर मग कशाला हवा पाणी पुरवठा विभाग ?
पाणी प्रश्न हा खामगांवकरांच्या पाचवीलाच पुजला आहे. कोर्ट परिसरात तर नेहमीच नळ येत नाही सतत काही ना काही अडचण असतेच. आता तर रस्ता दुरुस्तीचे कारणच मिळाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत व कोरोना मुळे सरकार सतत हात धुवा असे आवाहन करीत असूनही 15 - 15 दिवस नळ येत नाही. नळाला पाणी येत नसल्यामुळे नागरिकांच्या डोळ्यात पाणी यायची वेळ आली आहे. नागरिकांचे हजारो रुपये पाण्यावर खर्च होत आहेत. हे सांगितल्यावर, “टँकर तर सर्व गावच घेते” , “टँकर घेता तर नळ कनेक्शन बंद करण्याचा अर्ज करा” असे उत्तर मिळते. म्हणजे कहरच आहे. नागरिक करदाते असतात , त्यांच्या करातून कमर्चारी वेतन व इतर शासकीय खर्च शासन करीत असते. नागरिकांना सुविधा पुरवणे हे स्थानिक प्रशासनाचे कर्तव्यच आहे. रस्ता बांधकाम , पाईप लाईन फुटणे हे सर्व समजून घेण्या इतके नागरिक सुज्ञ आहेत. परंतू सतत अशा अडचणी येत असतील तर नागरिक उद्विग्न होतात , कुणीही होईलच. ज्याचे दु:ख त्यालाच कळते. नळ येत नाही अडचण मांडाली तर नळ कनेक्शन बंद करण्याचा उलटा सल्ला मिळतो. वा रे प्रशासन ! हि काय तऱ्हा ? कर्मचा-यांनी नागरिकांना असे बोलणे म्हणजे यांची नागरीकांप्रती काय भावना आहे , हे शासकीय कर्मचारी अर्थात जनतेचे सेवक असून त्याच जनतेशी योग्यप्रकारे बोलत नाही. अनेक भागात हजारो लिटर पाणी वाया जाते , काही भागांत मीटरच्या नवीन व जुन्या अशा दोन्ही जलवाहिन्यांतून पाणी पुरवठा होतो. बालाजी प्लॉट मधील कुणीही राहत नसलेल्या एका घरातील मीटरच्या नळातून सर्व पाणी वाया जाते , अशी कित्येक उदाहरणे आहेत. काही भागात लोक रस्त्यावर पाणी सोडून देतात इतका वेळ नळ सोडतात, काहींनी अवैध कनेक्शन , काहींनी थेट मुख्य जलवाहिनीतून कनेक्शन घेतलेले आहेत तर दुसरीकडे  मात्र काही भागातील नागरिकांना पाणी मिळत नाही किंवा अगदीच अत्यल्प पाणी पुरवठा केला जातो आणि 
त्यांना वरील प्रमाणे उत्तरे मिळतात. प्रामाणिकपणे कर भरणा-या नागरीकांची अडचण समजून न घेता त्यांना वरील प्रकारची उत्तरे देणे म्हणजे स्वत:वरील जबाबदारी झटकून देणेच होय. धरणात पाणी आहे तरीही नागरिकांंना पाण्याचा त्रास आहे. नवीन वाढीव पाणी पुरवठा योजना कुठे अडकली आहे देव जाणे? दिवाबत्ती , आरोग्य , पाणी पुरवठा , शिक्षण इ. सर्व नगर परिषदेची कार्ये आहेत व ती करण्यासाठी नियुक्त कर्मचा-यांची तरतूद असते. परंतू तेच कर्मचारी जेंव्हा नागरिकांकडे लक्ष देत नाहीत पाणी पुरवठा ठप्प झाला असता पाण्याबाबत विचारणा केली की , नळ कमी व उशिरा येत असल्याने पाण्यासाठी टँकर घ्यावा लागतो अशी व्यथा मांडली की , “टँकर तर सर्व गावच घेते” , “टँकर घेता  तर नळ कनेक्शन बंद करण्याचा अर्ज करा” अशी अजब उत्तरे नागरीकांना मिळतात. अशी उत्तरे मिळत असतील तर नागरीकांनी कुठे जावे ? आणि टँकर तर सर्व गावच घेते असे खुद्द न.प.कर्मचारीच म्हणतात तर मग कशाला हवा तो पाणी पुरवठा विभाग व कशाला हव्या स्थानिक स्वराज्य संस्था ?
ता. क. -- योगायोग असा की लेख पूर्ण लिहिला व आज ब-याच दिवसांनी पाणी आले , पाणी पुरवठा असाच सुरळीत राहो हीच ईश्वराजवळ प्रार्थना ( ईश्वरा शिवाय जनतेला दुसरा कोण वाली आहे ? )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा