२९/०७/२०२०

Article about the interviews of political leaders- Part 2

पुनश्च मुलाखत
आज ज्यांचे सरकार असते त्यांचीच वृत्तपत्रे ,  त्यांचाच मिडीया असतो मग काय सर्व काही लहान मुलांच्या खेळासारखे सुरु होते. मी हे प्रश्न विचारेल , किंवा हेच प्रश्न विचारा असे आधीच ठरवून मग मुलाखत-मुलाखत हा खेळ सुरु होतो. या विषयावर मागील लेख होता. पहिली मुलाखत शिळी होत नाही तो परवा दुसरी अशीच एक मुलाखत संपन्न झाली झाली. महाराष्ट्रात कोरोना धुमाकूळ घालत आहे , मुंबई मध्ये सर्वात जास्त रुग्ण आहेत. देशात तर सरकारी कोविड रुग्णालयांची हालत खराब आहे परंतू मुलाखतींचा निव्वळ खेळ सुरू असलेल्या महाराष्ट्रात कोविडग्रस्तांना जिथे विलग करून ठेवले जाते त्या ठिकाणच्या कोविड बाधितांची मुलाखत घ्या म्हणा जाऊन, त्यांना विचारा त्यांची काय स्थिती आहे ती. आपलेच प्रमुख, आपलेच सहकारी यांना काय गुलगुळीत प्रश्न विचारता ! कोविड बाधितांना जिथे ठेवले आहे तिथे निर्जंतुकीकरण होत नाही, जेवण धड नसते , प्रसाधन गृहांची परिस्थिती तर अतिशय खराब आहे. हे रुग्ण बहुतांश गरीब आहेत त्यांना कुणी वाली नाही. आधीच गरीबी , लॉकडाऊनमुळे, जनता कर्फ्यू आदींमुळे त्यांचे खायचे वांदे झाले आहेत. त्यांना कुणी विचारत नाही तर दुसरीकडे हायजेनिक वातावरणात राहणा-याकोरोनात घराच्या  बाहेरही न पडणा-यांच्या मुलाखती काय घेतल्या जातात, त्यांना डॉक्टरांपेक्षाही जास्त ज्ञान असल्याच्या वल्गना काय केल्या जातात. साखरे बाबतच्या प्रश्नाचे  हास्यास्पद उत्तर.काय चाललय तरी काय या राज्यात? स्वत: शासकीय पूजेस जाणे दुसा-याला आभासी भूमीपूजन करण्याचा सल्ला देणे( हिंदूहृदयसम्राटांना स्वर्गात काय वाटत असेल), कुणी गाडीचे सुकाणू आपल्या हातात असल्याचे चित्र माध्यमांवर प्रसारीत करणे. यांच्या या खेळ खंडोब्याला पाहून कुणी म्हणणार नाही की महाराष्ट्रावर सध्या चीनी कोरोना विषाणूचे संकट आहे म्हणून. मागील लेखात पूर्वीची पत्रकारीता आणि सद्यस्थितीतील पत्रकारीता यांची तुलना केली होती. आज ज्यांचा मिडीया त्यांचेच सरकार असते मग काय मिडीया हाताशी घेऊन लहान मुलांच्या खेळासारखे सुरु होते. प्रश्न उत्तरे आधीच माहीत असतात मग मुलाखत-मुलाखत हा खेळ सुरु होतो. राज्यात कोरोनाच्या काळात आर्थिक संकटाच्या काळात सरकारच्या चुका, अकार्यक्षमता यांवरुन जनतेचे लक्ष उडवण्यासाठी म्हणून हे असे मुलाखतींचे खेळ खेळले जातात. राज्यात सध्या कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही , एकाचा निर्णय दूसरा रद्द करतो तर काही धार्मिक निर्णयांसाठी मुरलेले राजकारणी बरोबर मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवतात. सरकारने हे ध्यानात घ्यावे की आपल्याच लोकांना मुलाखती देण्यापेक्षा प्रथम राज्याच्या प्राथमिक बाबींकडे लक्ष द्यावे. कोरोंना विषाणूचे संकट तर आहेच परंतू लोकांना त्यांच्या गरजा सुद्धा भागवायच्या आहेत , शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला आहे. ग्रामीण भागात तुमच्या ऑनलाइन शिक्षणाचा फज्जा उडाला आहे अनेक मुलांकडे स्मार्ट फोन नाही, महाविद्यालयीन परीक्षांचा घोळ आहेच , व्यापा-यांचे उत्पन्न घटले आहे , तुमच्या सरकारचा तीनचाकी अ‍ॅटो चांगला चालला आहे असे तुम्ही म्हणता. परंतू खरोखर जे गरीब अ‍ॅटोवाले आहेत त्यांचा रोजगार ठप्प आहे , राज्य परीवहन मंडळ ठप्प आहे , तुम्ही गणपतीसाठी चाकरमान्यांना कोकणात जाऊ देऊ म्हणता परंतू तिथले गावकरी वेगळीच मागणी करीत आहेत , कोणातील वादळग्रस्त अद्याप त्रस्तच आहेत आणखी कितीतरी प्रश्न आहे जे तुमच्या या "तु मुझे सुना मै तुझे सुनाऊ" सारख्या मुलाखतींनी सुटणार नाहीत त्यासाठी तुम्हाला गांभीर्याने विचार करून एक-एक प्रश्न हाताळावा लागेल जेणेकरून तुमचे व या सरकारचे अधिक हसे होणार नाही. जय महाराष्ट्र !

२१/०७/२०२०

Article About New Consumer Rights Protection Act in India


ग्राहक संरक्षण कायद्याच्या निमित्ताने 
काल देशभरात नवीन ग्राहक संरक्षण कायदा लागू करण्यात आला. या निमित्ताने ग्राहकांनी व सरकारनी बिंदुमाधव जोशी या द्रष्ट्या नेत्याचे स्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे. सरकार “जागो ग्राहक जागो “असे वारंवार म्हणत असूनही निद्रिस्त असलेल्या ग्राहकांना हे सांगावे लागेल की भारतातील ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदुमाधव जोशी यांच्या लढ्यातून लोकाग्रहातून 24 डिसेंबर 1986 रोजी भारतीय संसदेने ग्राहक हक्क कायदा पारीत केला होता. 1974 पासून बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहक संघटन करण्यास सुरुवात केली होती. अखिल भारतीय ग्राहक पंचायत स्थापन करण्यात आली आणि या आद्य ग्राहक संघटनेच्या बिंदुमाधव जोशी यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या मोठ्या लढ्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा लागू झाला. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना सुरक्षा , उत्पादन माहिती , निवड तक्रार निवारण आणि ग्राहक शिक्षण असे अधिकार प्राप्त झाले. पुढे ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच स्थापन झाले. 2004 मध्ये जिल्हा स्तरावर ग्राहक संरक्षण परिषद स्थापन करण्यात आल्या. 15 सप्टे 2011 पासून ग्राहकांसाठी स्वतंत्र हेल्प लाईन कार्यरत आहे. हे सर्व असल्यावर नवीन ग्राहक संरक्षण कायदा का बनवावा लागला ? याचा विचार होणे , या कायद्यात नवीन बाबी कोणत्या आहेत यावर चर्चा होणे अत्यावश्यक आहे. आज बाजारपेठांचे स्वरूप बदलले आहे, डिजिटल व्यवहार होत आहेत. विक्रेता व ग्राहक यांचा थेट संबध येत नाही. या अशा आधुनिक बाजारपेठेत ग्राहकांची फसवणूक होण्याच्या शक्यता विचारात घेऊन हा नवीन कायदा बनवला आहे. हे नक्कीच स्तुत्य आहे. परंतू ज्यासाठी हे होत आहे तो ग्राहक मात्र या बाबतीत अत्यंत उदासीन आहे. या जुन्याच कायद्यात काही नवीन बाबींचा अंतर्भाव केला आहे. जानेवारी 2020 मध्येच लागू होणा-या या कायद्यात आभासी व्यवहारांमध्ये कंपन्यांना ग्राहक हित जोपासावे लागणार आहे , दिशाभूल करणा-या जाहिराती (उदा सध्या सुरु असलेल्या Anty Bacteria पंखा किंवा कोरोना साठी असलेल्या प्रतिकार शक्ती वाढवणा-या वस्तूंच्या जाहिराती ) देणा-या कंपन्यांवर कारवाई होणार आहे. नवीन ग्राहक न्यायालये आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ग्राहक संरक्षण प्राधिकरण सुद्धा निर्माण केले आहेत या प्राधिकरणात ग्राहक माल खरेदी करण्यापूर्वी वस्तूच्या गुणवत्ते बद्दल तक्रार करू शकणार आहे. अशा या नवीन कायद्यातील ठळक असणार आहे. आता गरज आहे ती ग्राहकांनी त्यांच्यासाठी असलेल्या कायद्याचे भान ठेवण्याची व प्रसंगी त्याचा आधार घेण्याची.
जाता- जाता – कोरोना काळात मास्क , सॅनिटायझर, प्रतिकार शक्ती वाढवणारी औषधे व तत्सम इतर वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. ग्राहकांच्या निकडीच्या काळातही अव्वाच्या सव्वा दराने ही विक्री होत आहे. तरी ग्राहकांनी या वस्तूंच्या दराची पडताळणी करून त्या घ्याव्या , पावती घ्यावी.

१७/०७/२०२०

What could be Sant Gadbe baba's message to people if he is alive in this Corona pandemic. An article about this


मायबापहो तुम्हाले किती खेप सांगा लागन ?
संत गाडगे बाबा यांची आज आठवण होत आहे. किती तळमळीने ते व-हाडी भाषेत लोकांना स्वच्छतेचे महत्व सांगत. कीर्तनासाठी गाडगे बाबांना काही तामझाम लागत नसे टाळ म्हणून हाती दोन दगड घेऊन गाडगे बाबा कुठेही एखाद्या चौकात किंवा मंदीरात उभे राहून कीर्तन सुरू करून देत. हळू-हळू लोक जमा होत व कीर्तन रंगत असे. स्वच्छतेचे महत्व सांगून हाती खराटा घेऊन गाडगेबाबा गावाची स्वच्छता स्वत:  करीत. मायबाप हो, भुकेल्याले अन्न द्या, पोराईले शिकवा असे ते सांगत.
      आजच्या कोरोंना संकटात गाडगेबाबा असते तर त्यांनी गर्दी करणा-या , शारीरीक दूरी न पाळणा-या लोकांची अस्सल व-हाडी भाषेत चांगलीच खरडपट्टी काढली असती. कायले बाहीर निंघतो , कोरोनाले भेत नायी का बे ? तीन महिन्यापासून तुले सारे जग सांगून रायले की बाबा हात धुयी , बाहीर काम अशीन तरच निंगजो पन तू कायी ऐकत नायी लेका. बाया , पोट्टे-सोट्टे नीरा गर्दी करून रायले. लोकाइले कोरोंना बाधा होऊ रायली तरी तुम्हाले समजत कस नाही राजेहो, तुम्हाले तोंडाले पट्टी बांधायला सांगले , तुमी काही बांधत ना. कालेजातले शिकेल-सवरेल पोट्टे रस्त्याईवर पच-पच पिचका-या मारते, काय लावले तुमीनं बे ? कधी सरकार लॉकडाउन करते , तर कधी राजकारनी लोक जनता कर्फ्यू का काय होय ते करते अन मंग ते झालं की तुमी सारे राजेहो लागे निंगता बाहेर . खेटू-खेटू फिरता , गर्दीत घुसता , हाफिसात जाता , यकान मले सांगल की ते म्हतारे-कोतारे बी लय बाहीर निंघतात म्हने, 100 रु भरायले , व्याजाच नुकसान होईन म्हणून पोस्टात जात्यात , बँकेत जात्यात लायनीत खेटू-खेटू उभे रायतात. या म्हाता-या-कोता-याइलेच तर लय धोका असते राजेहो या चीनी रोगाचा बापा. पन काय करावं आता ? तुमी काय ऐकता बापा कुनाच्या बापाचं ? या रोगाले तो कर्फ्यू होय का ते लॉकडाऊन होय ते तर जरूरी हायेच पन तुमी बी सुधरा नं ! लय झुबंड करु नका , यकमेकाइले खेटू-खेटू उभे नका रावू , रस्त्यावर तुमच्या थोबाडातून पिचका-या मारत नका जावू बापहो. हा कोरोंना चीनी होय बापा याचा काय भरवसा कोनाले कसा लागन त. तो काय सांगून येते बापा , तुमी सोताले लयच शायने समजू नका तुम्हाले हात जोडतो बापा. पुना हा चीनी रोग असा होय बापा की सोताले तर होतेच अन लगे आपल्या संग बाकीचायले बी होते. मंग व्हावं लागते न बापा ते कारंटाईन का काय होय म्हनतात ते , खाव लागते कायी बी , तठी काय घरच्या सारख मिळत का तुमाले,घरी त लय नखरे करता तुमच्या कारभारणीच्या म्होरं. चीनी कोरोंना विषाणूमुळे सारा घोर झाला राजेहो, माह म्हटलं तुमी ऐकाता का नायी मायबापहो काय मालूम पन आपल्या घरच्याईसाठी , लेकराईसाठी तरी ऐका. तो अमिताभ अन लागे आणखी काई नट- नट्या , नेते मंडळी बी सुटली नायी बापा या रोगाच्या तावडीतून मंग आपन कोन आहोत बापा ? आजलोक तुमाले लय मोठ-मोठ्या लोकाईन , त्या आरोग्य संघटनेवाल्याईच बी सांगून झालं. आता तुम्हाले आणखी किती खेप सांगा लागन मायबापहो ? संत गाडगे बाबा असते तर असेच म्हणाले नसते का ?

१५/०७/२०२०

Article about the interviews of political leaders


मुलाखत-मुलाखतचा खेळ     
पूर्वी मुले घरी अनेक खेळ खेळायची. यात चोर–पोलीस , काडेपेट्यांना दोरा बांधून फोन करणे व त्यावर बोलणे हे व इतर काही तत्सम खेळ असत.परंतू आज-काल लहान मुले मोठ्यांसारखी वागतात अन मोठी माणसे बरेचवेळा लहान मुलांसारखी वागतात आणि अजब असे काही करतात. सत्ता असली की मग अनेक गोष्टी सहज शक्य होतात. मग ती राजकीय सत्ता असो किंवा लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभामुळे हाताशी आलेली शक्ती असो. राजकीय सत्ताप्राप्ती झाली की मग एखाद्या जुन्या पिढीतील सदगृहस्थाने समाजासाठी  कष्ट सहन करून लोकशाहीचा हा चौथा आधारस्तंभ बळकट करण्यासाठी स्थापन केलेल्या वृत्तपत्रावर अधिकार करता येतो. तसेच एकट्याच्या बळावर, लेखणीच्या ताकदीवर राजकीय पक्ष उभारून सत्ताप्राप्ती सुद्धा करता येते. सत्तेतून वृत्तपत्र आणि वृत्तपत्राव्दारे सत्ता मिळवणारे असे पक्ष पुढे सत्तेचे वाटेकरी होतात. यातील वृत्तपत्राच्या जोरावर पक्ष उभारलेले मग आपल्या दिवंगत, प्रचंड लोकमान्यता लाभलेल्या दिवंगत नेत्याच्या सर्व आदर्श , तसेच विचारसरणीस तिलांजली देऊन सत्ता उपभोगतात. अशांना मग आपले विचार , आपली मते , आपले कार्य (?) , जनतेसाठी , विकासासाठी एकत्र आल्याचा दिखावा करण्यासाठी स्वत:चीच मुखपत्रे असतात. मग हे कधी स्वत:च्याच प्रमुखांची मुलाखत घेतात तर कधी आपल्या सहकारी पक्षाच्या सर्वेसर्वा असलेल्यांच्या मुलाखती घेतात.पूर्वीच्या आदर्श पत्रकारीतेमुळे सरकारवर एकप्रकारचा वचक राहत असे आणि सरकारने घेतलेले निर्णय, भ्रष्टाचार इत्यादी बाबत जाब विचारला जात असे. आजकाल अतिशय खालच्या पातळीत लेख लिहून रोखठोक असल्याचा आव आणला जातो. दुस-यांवर टीका करतांना स्वत:च्या पूर्वीच्या भूमिका आदींकडे साफ डोळेझाक केली जाते. पदरमोड करून देशासाठी , या देशाने जनतेच्या हितासाठी कार्य करणारे अनेक आदर्श असे पत्रकार, संपादक आज निव्वळ कार्पोरेट स्वरूप प्राप्त झालेल्या या क्षेत्रात होऊन गेले आहेत. आज सुद्धा काही असे सन्मानीय पत्रकार, संपादक आहेत. परंतू दिवसागणिक ही संख्या घटत आहे. इंग्रज सरकारला सुद्धा जाब विचारणारी टिळक , आगरकर यांची पत्रकारिता तसेच स्वातंत्र्योत्तर काळात आचार्य अत्रे यांची पत्रकारिता या देशाने , महाराष्ट्राने पाहिली आहे. आज ज्यांचे सरकार असते त्यांचीच वृत्तपत्रे , त्यांचाच मिडीया असतो मग काय सर्व काही लहान मुलांच्या खेळासारखे सुरु होते. मी हे प्रश्न विचारेल , किंवा हेच प्रश्न विचारा असे आधीच ठरवून मग मुलाखत-मुलाखत हा खेळ सुरु होतो. त्यातील वक्तव्यांवर आगामी काळातील भुमिकेबाबत चर्वण केले जाते. मुलाखतीच्या या खेळातून राज्यात कोरोनाच्या काळात , आर्थिक संकटाच्या काळात , एक काय बोलतो तर दुसरा काय बोलतो , एक बदल्या करतो दुसरा रद्द करतो या खेळ-खंडोब्याकडे सुद्धा जनतेचे लक्ष असते याचे भान हा मुलाखत-मुलाखत खेळ करणा-यांनी ठेवावे. अर्थात त्यांनी मुलाखती घेऊ नये असे मुळीच नाही. पत्रकार म्हणून त्यांचा तो अधिकार आहे परंतू एखाद्याने असे काही मोठे कार्य करावे , विकास करावा , विधायक कार्य करावे , जनहिताचे कार्य करावे की आपल्याच माणसाने मुलाखत घेण्याऐवजी आपल्याच देशाच्या एखाद्या इतर राज्यातील किंवा विदेशातील कुणीतरी त्या कार्याची दखल घेऊन मुलाखतीसाठी आले तर तशी मुलाखत ही निश्चितच जास्त प्रभावी वाटेल. 

१०/०७/२०२०

Article about Gangster Vikas Dubey of UP and Kanpur Encounter

भ्रष्ट यंत्रणेतून झालेला विकास

विकास कार्य म्हटले की त्यात भ्रष्टाचार 
हा आलाच. परंतू कानपूर , उत्तरप्रदेशात सुद्धा भ्रष्ट यंत्रणेतून मोठा विकास झाला होता. हा विकास म्हणजे विकास दुबे हा कुख्यात गुंड. कालच याल उज्जैन येथील महाकाल मंदिरात एका सुरक्षा रक्षकाने व स्थानिक नागरिकाने पोलिसांना खबर देऊन पकडून दिले.तदनंतर त्याला उत्तरप्रदेशात नेत असतांना गाडीला अपघात झाला. पोलिसाची रिव्हॉल्व्हर घेऊन विकास दुबे पळून जात असतांना त्याला स्वाधीन होण्याची सूचना दिल्यानंतरही तो थांबला नाही मग पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि तो यमसदनी गेला. त्याला यमसदनी धाडण्याच्या मागे सुद्धा अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. तो जीवंत राहिला असता तर त्याच्याशी संबंध असलेल्या अनेकांची नांवे उजेडात आली असती. काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशात पाच वर्षात 30 हत्या, अनेक गुन्हे केलेल्या व नुकत्याच केलेल्या आठ पोलिसांच्या हत्येनंतर विकास दुबे या गुंडाचे नांव चर्चेत आले. अनेक पोलीस त्याच्या संपर्कात होते. तसेच विविध राजकीय पक्षातील नेत्यांशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते. समाजातील गुंड, समाजकंटक यांची माहिती काढण्यासाठी  ज्याप्रमाणे पोलिसांचे खबरे असतात त्याच पोलिस विभागाच्या खबरी काढण्यासाठी या विकास दुबेने पोलिसांमधूनच आपले खबरे तयार केले होते. त्याच्या बातम्या जशा पोलिसांना मिळत होत्या त्याचप्रमाणे पोलिस त्याच्या विरोधात काय पवित्रा घेत आहेत याच्या खबरी सुद्धा त्याला मिळत होत्या. आता प्रश्न हा उपस्थित होतो की पोलिसांच्या हत्या करण्यास धजावणारा , पोलिसांनाच आपल्या हाताशी धरणारा विकास दुबे सारखा मोठा गुंड तयारच कसा होऊ शकतो ? भ्रष्ट यंत्रणा असल्यानेच हे असे होऊ शकते. तसे पाहिले तर आपली व्यवस्था इतकी सक्षम आहे की पोलिसांना त्यांच्या हद्दीत होणा-या सर्व
घडामोडींची बित्तंबातमी ठाऊक होत असते. पोलिसांनी कधी  मनावर घेतले तर मंदिरासमोरील चप्पल सुद्धा चोरीला जाऊ शकत नाही अशा आशयाचा एक संवाद सिंघम सिनेमात आहे. मग असे असल्यावरही गुंड , अनेकांच्या हत्या करणारा विकास निर्माण होण्याचे कारण निश्चितच भ्रष्टाचार हेच असल्याचे सिद्ध होते. एखादा गुंड कायद्याचे रक्षण करणा-यांनाच आपले लक्ष्य बनवून त्यांच्या हत्या करेपर्यंत आपली यंत्रणा काय करीत असते? अनेकदा पोलिस कार्यवाहीसाठी तयार असतात परंतू मध्येच कुणाचा दबाब येतो आणि तसे होत नाही कारण गुंड पोसणारे अनेक नेते या लोकशाहीत आहेत. मग हेच गुंड त्याच नेत्यांना सुद्धा डोईजड होऊ लागतात.  समाजातील चित्र हे चित्रपटातून दिसत असते असे म्हणतात याचप्रमाणे वास्तव चित्रपटात पोलीस कसे आपल्या मागे पुढे करतात हे गुंड म्हणतो त्यावर त्याचा सहकारी तुझ्या मागे पुढे करणारे पोलीस हे तुझ्यावर भ्रष्ट नेत्यांचा वरदहस्त आहे म्हणून हतबल असे सांगतो. अगदी असेच विकास दुबे बाबत होते.  
    उत्तरप्रदेशातील सध्याचे सरकार हे गुंडशाहीच्या विरोधात सुरुवातीपासूनच उभे ठाकले आहे परंतू आपल्या देशात नोकरशाही आणि आपले जनप्रतिनिधी हे गुंड प्रवृतीच्या लोकांपासून अलिप्त कसे ठेवता येतील ? याचे संशोधन होऊन यंत्रणेत गुंडांचा अंतर्भाव होणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत जरुरी आहे. अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले कित्येक लोकप्रतिनिधी आपल्या देशात आहेत. भ्रष्ट यंत्रणेतून निर्माण झालेल्या या विकासासारखे कितीतरी गुंड प्रत्येक राज्यात आहे. हे चित्र लवकर नष्ट होणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा गुंडांशी संबंध असलेल्या नेत्यांची, गंभीर गुन्हे दाखल असलेल्या नेत्यांची संख्या वाढत जाईल व आपल्या लोकशाहीला ते अत्यंत हानिकारक ठरेल.

०८/०७/२०२०

Article about India′s ′Made in China′ boycott campaign after Sonam Wangchuk appeal- Part 4

देशाचे हीरो आणि हीरोची भूमिका   
(ड्रॅगनचा बॉयकॉट आवश्यकच भाग 4)
चीनला लाल चीन्यांनो खबरदार म्हणतआपल्या परीने चीनी वस्तूंचा त्याग करून  त्याच्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे. ही भूमिका तर घ्यायचीच आहे तसेच अनेकांनी तशी भूमिका घेतली सुद्धा आहे. चीनची विस्तारवादी भूमिका जगापासून लपून राहिली नाही. भारतात व्यापार करून अब्जावधी रुपये कमावून भारताशीच सीमावाद उकरून काढून तसेच पाकिस्तान , नेपाळसारख्या देशांना अर्थसत्तेच्या जोरावर मांडलिक बनवून त्यांना सुद्धा भारताविरुद्ध चिथावणी देत आहे. चीन कधी डोकलाम तर कधी लडाख चीन सीमेवर आपले सैन्य तैनात करीत असतो. आपल्या हद्दीत चीनी सैनिक घुसत असतात. यामुळेच लडाख मध्ये आपल्या 20 जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. चीनशी उद्भवलेल्या युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढला या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लडाखचा दौरा केला. आम्ही मुरलीधर श्रीकृष्णाला तर मानतो परंतू वेळे प्रसंगी आम्हाला सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्णाचे रूप सुद्धा आठवते, विस्तारवादाचे युग संपले आहे आता विकासवादाचे युग आहे. हे सांगत त्यांनी चीनकडे अंगुली निर्देश केला आहे तरीही भारतातील काही नेते पंतप्रधानांनी चीनचे नाव घेतले नाही अशी वृथा ओरड करीत आहेत. लडाखच्या जमिनीवर गवत सुद्धा उगवत नाही म्हणून भारतमातेच्या लडाख सारख्या एका अंगाला याच नेत्याचे पणजोबा निरुपयोगी जमिन समजत होते व तेंव्हा चीनने त्याचा पुरेपूर फायदा उचलून अक्साई चीनवर ताबा मिळवला. या घटनेचे सोयीस्कर विस्मरण या नेत्यांना होते किंवा विस्मरण झाल्याचा देखावा करणे त्यांना एखाद्या अभिनेत्यापेक्षा सुद्धा चांगले जमते. चीनचा घुसखोरीचा प्रयत्न, तसेच आपल्या 20 सैनिकांच्या हौतात्म्यामुळे चीनी वस्तूंचा त्याग करण्याचे आवाहन झाले , अनेक नागरीकांनी तसे केले , भारत सरकारने सुद्धा चीन संबंधीत अनेक बाबींवर बंदी घातली हे आपण या चीन विषयक लेख मालिकेत पाहिलेच आहे. अनेक व्यापा-यांनी, उद्योजकांनी सुद्धा चीनशी झालेले करार रद्द केले. यातच एक मोठे नांव आहे हीरो कंपनीचे. हीरो कंपनीने चीनला सायकलच्या सुट्या भागांच्या मागणीचे 900 करोड रुपयाचे कंत्राट दिले होते. ते आता हीरो कंपनीने रद्द केले आहे. आपल्या अनेक कृतींमुळे तसेच एकही इंच भूमी चीनला देणार नाही असे ठाम प्रतिपादन करणारे , देशावरील संकटाच्या प्रसंगी जवानांना पाठबळ देणारे , जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी सीमेवर जाणारे पंतप्रधान तसेच अत्यंत बिकट परिस्थितीत सीमेवर तैनात राहून देशाचे रक्षण करणारे आपले जवान हे जनतेला देशाच्या हीरोप्रमाणे वाटतात. सीमेवर रक्षण करणारे जवान आणि या जवानांचे मनोबल वाढवणारी या देशातील चीनी वस्तूंचा बहिष्कार करणारी जनता व 900 करोड रुपयांचे चीन सोबतचे कंत्राट रद्द करण्याची हीरो कंपनीची भूमिका यांमुळे आगामी काळात चीन नक्कीच वठवणीवर येईल. चीन वस्तूंवरील बहिष्कार जनतेने जर टिकवून ठेवला व निर्मिती आणि उद्योगाचा ध्यास घेतला, आत्मनिर्भरतेचा वसा घेतला तर आगामी काळात भारत आणखी प्रगती करेल व चीनच्या बरोबरीत येईल गरज आहे फक्त देशप्रेमाची. प्रखर देशभक्तीच्या भावनेने या देशातील सर्वानांच आपआपले कार्य अत्यंत निष्ठापूर्वक करावे लागेल मग तो नोकरदार वर्ग असो वा व्यापारी, स्त्री असो वा पुरुष , नेता असो वा कार्यकर्ता.  

०१/०७/२०२०

Article about India′s ′Made in China′ boycott campaign after Sonam Wangchuk appeal- Part 3

लाल चीन्यांनो खबरदार 
(ड्रॅगनचा बॉयकॉट आवश्यकच भाग 3)
मागील भागापासून पुढे ....
प्रखर राष्ट्रप्रेमाचे तेल घालत राहून चीनच्या जवानांशी झालेल्या झटापटीत 20 जवानांच्या हौतात्म्यामुळे  चीनी वस्तूंच्या बहिष्काराची ही जी ज्योत पेटली आहे ती आपल्याला तेवतच ठेवावी लागणार आहे. चीन हा कसा धोकादायक देश आहे याचा अंदाज आपल्या देशातील थोर नेते स्वातंत्र्यवीर सावरकर , सरदार पटेल यांनी ओळखला होता शिवाय एका जुन्या मराठी चित्रपटात सवाल-जवाब असलेल्या लावणीत राक्षस कुठे राहतात ? या प्रश्नाचे उत्तर नटी “चीन” असे देते. शिवाय सध्या माध्यमांवर 
"च्याऊ अन माऊ आपलेच भाऊ , जमिनीचा थोडासा भाग त्याला देऊ , आपसातला तंटा मिटवून घेऊ...आम्हाला म्हणतो मागे सारा ...डॉ कोटणीस दिला मराठ्यांनी जरा हाय काय त्याची लाज त्याला
लामा-लामातला वाद, तिबेट घशात घातला, नेफा असे सर्व मुद्दे दादांनी त्यात अगदी समर्पक घेतले आहेत. तसेच 
"लाल चीन्यांनो खबरदार...लाल चीन्यांनी मायभूमीवर आज घातला डाका हो....इथले त्यांचे हेर हेरुनी चारा त्यांना धुळखडे" अशा आशयपूर्ण ओळी असलेला दादा कोंडके यांचा चीनबाबतचा पोवाडा सुद्धा ‘व्हायरल’ होत आहे. मग प्रश्न हा आहे की देशातील थोर नेते , सिनेसृष्टीतील गीतकार अशा अनेकांना , तसेच सामान्यजनांना चीन हा धोकादायक देश आहे हे माहित असूनही चीन या विस्तारवादी देशापासून सावध पवित्रा स्वातंत्र्योत्तर काळात का घेतल्या गेला नाही ? चीनची सीमा आपल्या देशाला पूर्वी लागून नव्हती तिबेटवर अनधिकृतरित्या कब्जा मिळवून चीन आपल्याला येऊन भिडला. हाच चीन आता खुल्या आर्थिक धोरणामुळे आपली बाजारपेठ काबीज करून , आपल्या येथून मोठा नफा मिळवून आपल्याशीच वाद उकरून काढत आहे व सतत कुरापती काढतच असतो. आपल्या देशात कित्येक महान लोक , अभ्यासक , ज्ञानी , पंडीत , ऋषी-मुनी होऊन गेले. त्यांची शिकवण आपण विसरलो आर्य चाणक्य यांचे अर्थशास्त्र , राजनीती व त्यातील कुटनिती विसरलो. परंतू याच कुटनीतीचा वापर करून चीन मात्र ‘सुपर पॉवर’ बनण्याकडे  घोडदौड  करीत आहे. येन केन प्रकारेण प्रगत देशातून चीनने मोठी आर्थिक ताकद उभारली आहे. या अर्थसत्तेचा वापर स्वत:च्या देशातील नागरिकांसाठी न करता चीनने अनेक अप्रगत देशांना कर्ज देऊन त्यांना आपले मांडलिक केले आहे. नेपाळला चीनी भाषा शाळांतून शिकवा , चीनी संस्कृतीचा प्रसार करा असे आवाहन चीनने केले आहे. आपल्याशी सीमावाद उकरून काढत अरेरावी करणारा व पूर्वी हिंदू राष्ट्र बिरूद मिरवणारा नेपाळ आता ड्रॅगनच्या तोंडात गेला आहेच घशात जाण्यास वेळ लागणार नाही. श्रीलंकेतील बेट विकासाच्या नावावर ताब्यात घेत चीनने तिथे आपले सैनिक नेले. श्रीलंकेने चीनचा धोका ओळखून ते बेट भारताला सुपूर्द करण्याची तयारी दर्शवली होती. ते आपण घेऊ शकलो नाही. परंतू यावरून श्रीलंका सरकारचा चीनपेक्षा भारतावर अधिक विश्वास असल्याचे स्पष्ट झाले. कम्युनिझममुळे आम्ही प्रगत झालो असे दर्शवत अप्रगत देशांना कम्युनिझमकडे वळवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. परंतू चीनमध्ये कामगारांच्या श्रमाला मात्र काहीच किंमत नाही. तिथे मानवाधिकाराचा, माणुसकीचा जराही लवलेश नाही. अशा या “चायनीज व्हायरस” निर्मात्या चीनच्या वस्तूंचा आता समस्त भारतवासियांनी त्याग करायला हवाच. सरकारने 59 अॅपवर बंदी घातली आहे. तत्पूर्वी कित्येकांनी आपल्या मोबाईल मधून अॅप काढून टाकले होतेच. नितीन गडकरी यांनी सुद्धा रस्ते बांधणीतील चीन सोबतचे सर्व करार रद्द केले आहेत. BSNL, MTNL यांनी सुद्धा चीन सोबतचे करार रद्द केले आहे. चीन ने सुद्धा आपल्या ई-पेपर वर बंदी आणली आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की राखी , फ्रेन्डशिप बँड यांसारख्या वस्तू सुद्धा आपण चीन कडून आयात करतो ! व त्यांची येथे सर्रास खरेदी-विक्री होते. या वस्तू निर्मितीसाठी काय फार मोठे तंत्रज्ञान लागते काय की त्या चीन मधून आणाव्या लागतात? राखी , मैत्री दिवस यांत आकर्षक राखीपेक्षा आवश्यक असते ती भावना. राखी एक साधा लाल धागा असला तरी चालतो. गणपतीसमोर चीनी लायटिंगच्या ऐवजी आपला साधा दिवा सुद्धा चालतो. या गोष्टींचे आपण आता आवर्जून भान ठेवायला हवे. जसे आपण कोरोना या चायनीज व्हायरस मुळे घराबाहेर पडतांना आठवणीने मास्क लावतो तसेच वस्तू खरेदी करतांना सुद्धा सर्वानी ती वस्तू कुठे निर्मित झाली आहे हे आता अवश्य पहावे मगच ती विकत घ्यावी. विस्तारवादी चीन हा आपल्यासाठी सर्वात धोकादायक आहे. हे आपण 1962 प्रमाणे दुर्लक्षिले तर एक-एक प्रदेश गिळंकृत करणारा चीन आपला भूप्रदेश बळकावू शकतो. लडाखचा भाग असलेला अक्साई चीन तर त्यांच्या ताब्यात नेहरू पंतप्रधान असतांनाच गेला होता.आता त्याची पुनरावृत्ती होणार नाही तरीही अखंड सावध असावे. विस्तारवादी , अनेक देशांना गिळंकृत करणारा , कुरापती , कोरोना व्हायरसच्या या जनकाला म्हणजेच चीनला लाल चीन्यांनो खबरदार म्हणत, आपल्या परीने चीनी वस्तूंचा त्याग करून त्याच्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे.
पुढील भागात चीन विषयी आणखी काही....
क्रमश: