२३/०९/२०२०

Article about current situation of education in Maharashtra

ऑनलाईन शिक्षण कितपत परीणामकारक ?

#Chinisevirus कोरोना जगात पसरला. मार्च

2020 पासून शाळा , महाविद्यालये बंद आहेत.
 शालेय   महाविद्यालयीन परीक्षा वैद्यकीय व अभियांत्रीकी प्रवेश परीक्षा  या सर्व विषयांवरून वादंग निर्माण झाले. काही मुद्दे सुटले काहींवर   अद्याप 
मतभेद आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण  सुरु 
राहावे यासाठी ऑनलाईन शिक्षण हा तोडगा काढण्यात आला. अनेक पालकांनी यासाठी नवीन स्मार्टफोन घेतले यात ग्रामिण भागातील आर्थिक परिस्थिती ठीक नसलेल्या पालकांचा सुद्धा समावेश आहे. विद्यार्थी शाळेत येतच नसल्याने त्यांचे शुल्क कसे वसूल होणार ? याची चिंता खाजगी विनाअनुदानीत इंग्रजी शाळेच्या संस्थाचालकांना लागली. मग या शाळांनी त्यांच्या निर्णयानुसार दिवसातील दीड - दोन  तास ऑनलाईन शिक्षण असा पर्याय  शोधून काढला. तद्नंतर विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क मागणी सुरु केली. या शाळा स्वयंअर्थसहाय्यित असल्याने त्यांची मागणी अगदीच चुकीची आहे असेही म्हणता येणार नाही. त्या शाळांना सुद्धा त्यांचे खर्च लागू आहेतच. काही शाळांनी शिक्षकांच्या वेतनाला  कात्री लावली आहे. जे शिक्षक कोरोनापुर्वी शाळेसाठी झटतात , शाळेच्या वेळेपेक्षा जास्त कार्य करतात आता त्यांच्या या कार्याला साफ विसरून कोरोना सारख्या संकटाच्या काळात त्यांना कमी वेतनावर भागवावे लागत आहे. अनेक शिक्षक असे आहेत की जे केवळ वेतनावर निर्भर असतात. अशा कितीतरी समस्या निर्माण झाल्या आहेत. कित्येक अनुदानित शाळा ग्रामीण भागात आहेत तिथे नेटवर्कच मिळत नाही. यासाठी  एक ग्रामिण भागातील अभ्यासू मुलगी वैद्यकीय परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी म्हणून डोंगरावर झोपडी बांधून त्यात अभ्यास करण्यासाठी जाते असे वृत्त प्रकाशित झाले होते. ग्रामीण भागातील अनेक मुलांकडे स्मार्टफोन नाहीत, त्यांच्या शिक्षणाची काय स्थिती आहे ? याचा आढावा शिक्षण खाते घेत आहे की नाही ? अशा विद्यार्थ्यांना नसेल ऑनलाईन शिक्षण तर त्यांना #Basicphone वर गृहपाठ पाठवता येतो , तो पाठवला जात आहे की नाही ? ऑनलाईन शिक्षणाच्या वर्गात सर्व मुले हजर असतात किती नाही ? त्यांची नोंद करून त्याची तपासणी होणार आहे किंवा नाही ? अनेक अनुदानित शाळांनी अद्याप ऑनलाईन शिक्षण अजूनही सुरूच केले नाही. ज्या शाळांचे सुरूच  ऑनलाईन शिक्षण सुरु आहे त्यात अनेक अडथळे येतच आहेत, नेटवर्क अडचण,  काही व्रात्य विद्यार्थी गडबड  करतात, त्यांच्या गडबडीमुळे  शैक्षणिक #Whatsapp गृप मधील शिक्षक , पालकांत गैरसमज होऊन त्याचा उहापोह होत राहतो. अनेक विद्यार्थी गैरहजर असतात , मोबाईल मुळे भावंडात भांडणे होत आहेत. काही आत्महत्या सुद्धा झाल्या आहेत. आपण ज्या ग्रामिण भागातील मुलांवर विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न करतो त्यांना तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा उपयोगच होत नाही , विद्यार्थ्यांचे लेखन कमी झाले आहे. पालकांना विद्यार्थ्यांजवळ पूर्णवेळ बसणे शक्य नसते त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण करतो की इतर अॅप सुरु करतो  याकडे नीट लक्ष देता येत नाही, नवीन सरकार आल्यापासून सतत विद्युत पुरवठा खंडीत होत असतो त्यामुळे मोबाईल पुर्णपणे चार्ज करता येत नाही. आपला पाल्य मोबाईल सतत वापरतांना दिसतो त्यामुळे जरी तो त्याचे शैक्षणिक कार्य करीत असला तरी पालकांना तो इतर काही बघत आहे का असा संशय मनी वृथा दाटतो. किंवा तसे घडत असण्याची शक्यता सुद्धा असते. प्रत्यक्ष संभाषण हे फोन वरील संभाषण किंवा मेसेजेस यांपेक्षा नेहमीच सरस व आकलनक्षम असते. तसेच शिक्षणाचे आहे. प्रत्यक्ष शिक्षण हेच सर्वोत्तम असल्याचे पाश्चात्य शिक्षण तज्ञांनी सुद्धा म्हटले आहे. अभ्यास करतांना जी एकाग्रता असावी लागती ती ऑनलाईन शिक्षणात साध्य होत नाही,  या प्रकारे शिक्षण घेतांना इतर अॅप , नोटीफिकेशन्स हे विद्यार्थ्याचे चित्त विचलित करीत असतात. आता कोरोनामुळे हे शिक्षण जरी ऑनलाईन पद्धतीने होत असले तरी ते परिणामकारक आहे का ? हे तपासणे अत्यावश्यक आहे. शिक्षण क्षेत्रात कार्य करीत असल्याने शिक्षण पद्धती जवळून पाहत आहे. अनेक शिक्षकांना सुद्धा याबाबत विचारणा केली असता ते सुद्धा या ऑनलाईन शिक्षणाबाबत नाखुश आहेत. ही परिस्थिती जरी कोरोना आपत्ती मुळे निर्माण झाली असली तरी. सरकारने वरील सर्व बाबींवर विशेष तज्ञांची समिती बसवून ऑनलाईन शिक्षण कितपत परीणामकारक आहे हे तपासावे व कोरोनात्तर काळात ऑनलाईन शिक्षण मुळे शिक्षणाचा झालेला खेळ खंडोबा कसा भरून काढता येईल याचे सुद्धा नियोजन आताच करून ठेवणे जरुरी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा