२९/०९/२०२०

Singing Legend SP Balasubrahmanyam Passes Away. Article elaborate about him



पदुमनीलाचा अस्त 
रवा एस.पी.च्या दु:खद निधनाची वार्ता रसिकांच्या मनाला चटका लावून गेली. तद्नंतर त्याने स्वत:च त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचा शेअर केलेला व्हिडीओ पाहून आणखीनच खेद वाटला. दक्षिण भारतातून एस.पी. बालसुब्रह्मण्यम    जेंव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झाला त्यावेळी आम्ही अगदीच शाळकरी होतो. परंतू त्या काळात एस.पी.चे “हे राजू , हे डॅडी “ हे बालगीत गाजले होते. बाल्यावस्थेत असल्याने बाप-लेकाचे ते बालगीत बाल मनाला भावून गेले होते. चित्रपटात राजूचे बाबा जितेंद्र या अभिनेत्यासाठी दिलेला तो मधुर आवाज कायमचा कानात बसला. तेंव्हा एस.पी चे नांव काही माहित नव्हते परंतू तो मधुर , प्रेमरस पूर्ण आवाज मात्र सहज ओळखू यायला लागला. पुढे किशोरवयात “तेरे मेरे बिचमे कैसा है ये बंधन” या गीतातील चित्रपटातील नायक कमल हसनला हिंदी येत नसल्याने “I dont know what you say“ या ओळी  व  एक दुजे के लिये मधील इतर गीते , “ये वक्त ना खो जाये“ , “ मौसम का तकाजा है” अशी प्रेमगीते ऐकल्यावर एस.पी.चा आवाज अधिकच भावला. सुरुवातीच्या काळात हिंदीत कमल हसन,
जितेंद्र यांच्यासाठी एस.पी.ने बरीच गीते गायली. दोघांनाही त्याचा आवाज चपखल बसला. मोहम्मद रफीच्या निधनानंतर रोमँटिक गाण्यासाठी एस.पी ला संगीतकार पसंती देवू लागले. एस.पी स्वत: रफीं चा प्रचंड चाहता होता. रफींप्रमाणेच तो उत्कृष्ट गायक व सज्जन व विनम्र होता. जितेंद्र श्रीदेवीच्या काळात मात्र एस.पी.ची गीते काही काळ कमी ऐकू आली. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला “मैने प्यार किया” चित्रपटातील गाण्यातून “दिल दिवाना” ही साद देऊन एस.पी.ने पुनश्च रसिकांची माने जिंकली. “मेरे रंगमे रंगनेवाली“ अशा गीतांनंतर “आया है राजा” असे म्हणत गायकांचा राजा असलेल्या एस.पी.ची घोडदौड पुन्हा सुरु झाली.“सुन बेलीया, शुक्रिया,मेहरबानी “ , “साथिया तुने क्या किया” , ए . आर. रहमानने संगीतबद्ध केलेली मधुर गीते अशी एकापेक्षा एक सरस गीते गाणा-या एस.पी.च्या नावावर हिंदी , तमिळ , मल्याळी व इतर  १६ भाषांत गीते गाण्याचे अनेक विक्रम नोंदवल्या गेले. काही चित्रपटात सुद्धा तो दिसला आहे. परंतू एखाद्या व्यक्तीच्या यशाचे मोजमाप हे काही निव्वळ आकडेवारीवर केले जाऊ नये तर ते त्याच्या सामाजिक जाणीव, त्याची वागणूक, त्याची कार्ये यावर सुद्धा केले गेले पाहिजे. एस.पी.या बाबतीत सुद्धा अग्रेसर होता. मनुष्य हा कितीही मोठा का होईना जमिनीशी जुळलेला असावा, अध्यात्माशी आपल्या धर्माप्रती व धार्मिक रितीरिवाज , परंपरा, संस्कृती , दानशूरता यांच्याप्रती आदर बाळगणारा, उगीचच आधुनिकता न दाखवणारा असावा. एस.पी. आपल्या हिंदू धर्माविषयी असाच जागरूक व  आदर बाळगणारा , धर्माच्या परंपरा पाळणारा होता. दाक्षिणात्य हे तसेही धर्मनिष्ठ व परंपरा पाळणारे, मातृभाषेवर प्रेम करणारे असल्याने ते संस्कार एस.पी. मध्ये रुजलेले होते. चांगले वाईट लोक सर्वच क्षेत्रात असतात परंतू चित्रपटसृष्टीत काय-काय होते आहे हे आपण पाहतच आहोत. अंमली पदार्थ विषय सध्या ऐरणीवर आहे. यापूर्वीही  #MeToo सारखे विषय चर्चिल्या गेले आहेत. परंतू असे असले तरी अनेक चांगले सामजिक भान असलेले कलावंत सुद्धा याच चित्रपटसृष्टीने दिले आहेत. एस.पी.त्यातलाच एक होता. एस.पी.च्या निधनानंतर त्याने पूर्वीच केलेल्या कार्याबाबतचे एक वृत्त झळकले. आपले नेल्लोर येथील वडिलोपार्जीत घर कांची मठाला वेद पाठशाळेसाठी त्याने दान केले. नवीन पिढीला हे शिकण्यासारखे आहे. गायन क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित करणारा , पद्मश्री , पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त, अनेक कलावंतांना एस.पी.ने आपल्या आवाजाच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहचवले यात शिकार करणा-या , मद्यपान करून आपल्या गाडीखाली पदपथावरील गरीबांना चिरडणा-या बाष्कळ विनोद व सुमार अभिनय असलेल्या अभिनेत्याचा सुद्धा समावेश आहे.नुकतेच एस.पी. ने रजनीकांतसाठी एक गीत गायले होते , आपली प्रकृती चांगली असल्याचा व्हिडिओ प्रसारित केला होता आणि अचानक तो गेला. त्याच्या मधुर गीतांनी त्याने करोडो रसिकांना मंत्रमुग्ध केले म्हणूनच त्याला पदुमनीला अर्थात गाणी गुणगुणणारा चंद्र अशी उपाधी त्याला लोकांनी प्रेमाने दिली  होती. हा गाणी गुणगुणणारा चंद्र आता लयाला गेला आहे परंतू आपल्या गाण्यांनी हा चंद्र रसिकांच्या मनात मात्र पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे कायम प्रकाशमान राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा