०३/०९/२०२०

Letter to Hon Minister Nitin Gadkari about worst condition of National Highway

 नितीन गडकरी  साहेबांना अनाहूत पत्र
मा. महोदय,
आपणास सविनय प्रणाम 
पत्र लिहिण्यास कारण की त्या दिवशी अमरावतीला 
गेलो होतो. हा मार्ग म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 
(आता नवीन नावे व नंबर दिली गेली आहेत) या राष्ट्रीय पथाने 



मार्गक्रमण करीत असतांना आपण खड्ड्यातून जात आहोत 
की रस्त्याने हा प्रश्न पडत होता. विशेषत: खामगांव ते मूर्तीजापूर तर जीव मुठीत धरून जावे लागते. 
अकोल्याचा वळण रस्ता व मूर्तीजापूर ते अमरावती या 
पट्ट्यांमध्ये येणा-या प्रत्येक पूलांजवळ रस्ता अतिशय  निकामी झाला आहे , मोठे-मोठे खड्डे असल्यामुळे वाहन चालवतांना दिवसा तर होतोच होतो परंतू रात्री अतिशय त्रास होतो. गाड्या, टायर लवकर खराब होतात शिवाय या भल्यामोठ्या खड्ड्यातून गेल्याने मानदुखी, पाठदुखी  सारख्या शारीरीक 
व्याधी सुद्धा जडतात. असे सर्व चित्र आहे, महोदय, आपण 
संपूर्ण भारतातील रस्त्यांची कामे झपाट्याने करीत आहात, 
हे निश्चितच अभिनंदनीय आहे. मुंबई –पुणे एक्स्प्रेस हायवे 
उत्तम तसेच वेळेत पूर्ण केल्याबद्दल दिवंगत बाळासाहेब 
ठाकरे यांनी सुद्धा आपले कौतुक केले होते. आपल्या 
कामांमुळे आपणास रोडकरी असे संबोधले जाते. 2014 निवडणूकीच्या निमित्ताने आपण खामगांवला जाहीर सभेत म्हटले होते की “मी स्वप्ने दाखवत नाही, करुन दाखवतो” तसे आपण करता सुद्धा, आपण म्हटल्याप्रमाणे खामगांव शहरातून जाणारा हाच उपरोक्त महामार्ग पुर्णत्वास जात आहे , शेगांव-खामगांव हा रस्ता सुद्धा उत्तम झाला आहे. परंतू अमरावती ते खामगांव व खामगांवच्या पुढेही खांदेशात सुद्धा या रस्त्याची अवस्था अतिशय खराब आहे. बुलडाणा जिल्ह्यात असे गमतीने म्हटले जाते की विकासाबाबत देशात काहीही जाहीर झाले किंवा 
कोणतीही योजना आली की सर्वात शेवटी बुलढाण्याचा नंबर लागतो. सर्वदूर रोड होत आहेत परंतू खामगांव ते अमरावती या रस्त्याची अवस्था गेल्या कित्येक वर्षांपासून जशी आहे तशीच म्हणजे अत्यंत खराब आहे. याच रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे मात्र तत्परतेने कापल्या गेली.हीच तत्परता रस्ता बनवण्यात का नाही दाखवली जात ? सरकार वाहन धारकांकडून रोड टॅक्स घेते तर रस्ते सुद्धा उत्कृष्ट असलेच पाहिजे. आपण लोकप्रिय आहात , आपली स्मरणशक्ती दांडगी आहे, आकडेवा-या आपल्या मुखोद्गत असतात , आपल्या कक्षात आपण “"American roads are not  good because America is rich, but America is rich because American roads are good,"  हे जॉन एफ केनेडी यांचे वाक्य सुद्धा लावले आहे आपण तसा प्रयत्न सुद्धा करीत आहात. परंतू आमच्या अमरावती बुलडाणा  अकोलाजळगांव या जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामाकडे सुद्धा लक्ष घालावे  अशी या चार जिल्ह्यातील जनतेतर्फे आपणास नम्र व कळकळीची विनंती. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा