२१/१०/२०२०

Article about statements of Sashi Tharur and Farooq Abdullah

कंगना विरोधात राष्ट्रद्रोहाची याचिका, शशी,फारुख यांच्या वक्तव्यांचे काय?

भारतात देशविरोधी भूमिका घेण्या-यांची मुळीच वानवा नाही. 

आपल्या देशाच्या इतिहासात अनेक देशद्रोही , देशविरोधी वक्तव्ये करणारे लोक होऊन गेलेत.परंतू स्वातंत्र्यानंतर देशविरोधकांच्या या शृंखलेत स्वातंत्र्योत्तर काळात “देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आमचे योगदान होते” अशी शेखी सतत  मिरवणा-या व दिर्घकाळ सत्ता उपभोगणा-यांच्या विचारसरणीतील अनेक नेत्यांचा समावेश झाला. आपल्याच देशातील इतर राजकीय पक्षांचा व 2014 पासून मोदी व त्यांच्या सरकारचा विरोध करता-करता अनेक नेते कुर्मगतीने देशविरोधीच होत जात असल्याचे चित्र देश पहातच आहे. मणिशंकर अय्यर हे यात आघाडीवर आहे. या महाशयांनी पाकीस्तानात जाऊन देशविरोधी वक्तव्ये केली होती. 2018 मध्ये मला पाकीस्तानातून प्रेम व भारतातून व्देष मिळतो असे वक्तव्य केले होते. मोदींना हटवण्यासाठी आम्हाला मदत करा अशी याचना ज्या पाकीस्तानला स्वत:ची , स्वत:च्या जनतेची मदत करता येत नाही त्या पाकड्यांना याच महाशयांनी केली होती. डोकलामच्या वेळी राहुल गांधी यांनी चिनच्या दूतावासात भेट दिली होती. चिन मधील कम्युनिस्ट पक्षाशी काँग्रेसने पक्षीय समझौता केल्याचे वृत्त सुद्धा झळकले होते. राहुल गांधी, मणिशंकर अय्यर यांच्यासारखेच स्वत:ला मोठे विद्वान समजणारे , इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारे परंतू आयुष्यातील बहुतांश काळ विदेशात व्यतीत केल्याने भारताला न ओळखणारे , सुनंदा पुष्कर या दिल्लीच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये गूढरित्या मृत्यू झालेल्या सुस्वरूप महिलेचे पती असलेले काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सुद्धा परवा पाकिस्तानात भारतविरोधी गरळ ओकलीच. कोरोना विरोधी लढा पाकिस्तानने भारतापेक्षा चांगला दिला, मोदी सरकार मुस्लिमांवर अत्याचार करीत आहे अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली. लाहोर महोत्सवात आभासी पद्धतीने बोलतांना त्यांनी उपरोक्त उद्गार काढले होते. याच शशी थरूर यांनी 2016 मध्ये “भगतसिंग म्हणजे तत्कालीन कन्हैय्याकुमार” असे वक्तव्य करून वाद ओढवला होता. काँग्रेस नेत्यांप्रमाणेच काश्मीर मधील नॅशनल कॉन्फरंसचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी सुद्धा काश्मीर मध्ये पुनश्च 370 कलम लागू करण्यासाठी चीनची मदत घ्यावी अशा वल्गना केल्या आहेत. असे हे भारतातील नेते. यांना काय म्हणावे ? पाकीस्तान किंवा चिन येथील नेते भारतात येऊन अशा वल्गना कधी करतात का ? भारतातील प्रगल्भ लोकशाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा पुरेपूर फायदा हे संधीसाधू लोक करून स्वत:च्या राजकीय पोळ्या शेकत असतात. नजरकैदेतून फारुख अब्दुल्ला नुकतेच मोकळे झाले , ईडी ची चौकशी , काश्मीर मधील बंद पडत चाललेली राजकीय दुकानदारी यांमुळे त्यांना अस्वस्थ वाटत आहे. कंगना राणावत चित्रपटसृष्टीतील चुकीच्या बाबींवर प्रकाश टाकते , व्टीट  करते यांमुळे धार्मिक व्देश वाढतो आहे असा आरोप करीत तिच्या विरोधात वांद्रे येथील कोर्टात साहिल अशरफली सय्यद यांनी याचिका दाखल केली. या तक्रारीत कंगनाची बहिण रंगोली हिला सुद्धा समाविष्ट केले आहे. या देशात धार्मिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये यापूर्वी अनेकवेळा अनेकांनी व अनेक धर्मियांनी केली आहेत. अकबरउद्दीन ओवैसी , झाकीर नाईक व इतर अनेक ज्यांनी अशी वक्तव्ये केली आहेत त्यावेळी आता कंगना विरोधात याचिका करणारे हे साहिल महाशय कुठे होते ? साहिल महोदय आपणास खरेच आपल्या देशाचा , देशातील धार्मिक सलोख्याचा कळवळा असेल , आपणास देशात धार्मिक शांतता हवी असेल , देश व देशहित याची आपणास खरोखरच काळजी असेल तर आपण शत्रूराष्ट्राची तारीफ करणा-या व स्वत:च्या देशाची निर्भत्सना करणा-या शशी थरूर व ज्या चीनने आपल्यावर आक्रमणे केली , नुकतेच आपल्या जवानांना मारले त्या चीनची मदत 370 कलम पुन्हा लागू करण्यास घेऊ इच्छिणा-या , काश्मिरी लोकांना भारतीय म्हणून राहण्यापेक्षा चीनच्या अधिपत्याखाली रहायला आवडेल अशी वल्गना करणा-या फारुख अब्दुल्ला यांच्या विरोधात सुद्धा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी याचिका करावी असे वाटत नाही का ?  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा