०५/११/२०२०

Problems in the heart of the city area of Khamgaon

मध्यवस्तीतील उपेक्षित वॉर्ड

जिजामाता रोड खामगांव शहरातील मध्य वस्तीतील भाग,  न्यायालय, जि.प. बांधकाम विभागपंचायत समिती  उपनिबंधक कार्यालय ,   नझुल कार्यालय , प्रशासकीय ईमारत , विदर्भ साहित्य संघांचे साहित्यिक , सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी असलेले कोल्हटकर स्मारक , न्यायधीश निवासस्थाने , सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता यांचे निवासस्थान , राजीव गांधी उद्यान व हुतात्म्यांच्या स्मरणार्थ बांधलेला जयस्तंभ , बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती बँक, तलाठी कार्यालय , विद्युत कर्मचा-यांच्या संघटनेचे कार्यालय अशी सर्व कार्यालये व ईमारती असलेला हा परिसर नांदुरा रोडला लागून आहे. या परिसराच्या पलीकडे सुद्धा एलआयसी तसेच अनके बँका आहेत. असा हा खामगांव शहरातील मध्यवर्ती भाग , अनेक सरकारी कार्यालयांचा म्हणजेच महत्वाचा असा भाग आहे परंतू स्थानिक प्रशासनाचे मात्र या भागाकडे अक्षम्य असे दुर्लक्ष आहे. या भागाच्या अनेक समस्या आहेत. पाणी , नाल्या , रस्ते ,पथदिवे इत्यादी परंतू स्थानिक प्रशासन डोळे बंद करून बसले आहे. त्यातील काही समस्यांबाबत अनेकदा बोलणे झाले परंतू त्या समस्यांचे काही निराकरण झाले नाही. या भागातील जेष्ठ नागरीकांनी सुद्धा या समस्यांबाबत पाठपुरावा केला परंतू स्थिती “जैसे थे” च आहे. या समस्या पुढील प्रमाणे आहेत.

     नुकताच नांदुरा रोड रुंद झाला , रस्त्याच्या मध्ये दिवे लागले , त्याचे कौतुक झाले व सुरु आहे. हा रस्ता रुंद झाला हे चांगलेच झाले. याच रस्त्याला विविध रहिवासी भागातून जोडणारे जे “अॅप्रोच रोड” आहेत ते सर्व पूर्ण झाले आहेत परंतू भूविकास बँकेच्या शेजारून जिजामाता रोड परिसरात जाणा-या रस्त्याचे व पंचायत समिती जवळून न्यायाधीश निवासस्थानांकडे जाणा-या या  अॅप्रोच रोडचे अद्याप डांबरीकरण झालेले नाही. तसेच उर्वरीत रस्ता सुद्धा खराब झाला आहे.

परिसरातील रस्त्यांची दुरवस्था आहे. उपनिबंधक कार्यालय ते कोर्टाकडे जाणारा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा होता व तूर्तास खराब झाला आहे.

पाण्याची समस्या या भागात नेहमीच भेडसावत असते , धरणात पाणी मुबलक असूनही पाणी पुरवठा अनियमित व अल्पवेळ असतो.


          परिसरात एक पक्क्या पाण्याची विहीर आहे परंतू ती अस्वच्छ असते. परिसरातील नागरिक वेळोवेळी ही विहीर स्वच्छ करीत असतात. या विहिरीतून पाणी पुरवठा करता येऊ शकतो परंतू स्थानिक प्रशासन याबाबत उदासीन आहे. असा पुरवठा शहरात काही विहिरीतून केला जातो. परंतु जिजामाता रोड भागात मात्र या विहिरीतून पाणी पुरवठा का नाही करता येऊ शकत ?

     याच भागातील कोर्टाला लागून असलेल्या अग्रवाल यांच्या इमारती समोर गेल्या कित्येक वर्षांपासून पथ दिवा मंजूर झाला आहे परंतु तो अद्याप लावला नाही.तसेच पूर्वी कोल्हटकर स्मारक जवळ एक मर्क्युरी लाईट होता आता तिथे आता एकही पथ दिवा नाही त्यामुळे रात्री तिकडे काही बेकायदेशीर कृत्ये घडत असतात.

      या भागातील मोकळी जागा सुद्धा अतिशय खराब आहे, या जागेच्या मागील भागात नाली नसल्याने तेथून मोठी दुर्गंधी पसरते

जिजामाता मार्ग हा शहरातील एक मध्यवर्ती भाग असूनही व या भागात प्रामाणिक करदाते असूनही या भागाची उपेक्षा होत आहे. या भागातील उपरोक्त सर्व समस्यांचे त्वरित निराकरण व्हावे अशी या भागातील महिला व सर्व नागरिकांची आंतरिक इच्छा आहे. तेंव्हा मुख्याधिकारी व संबंधित विभाग व निर्वाची पदाधिकारी यांनी लक्ष घालावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा