२५/११/२०२०

Article about the fort Ashwathhamagiri (Asirgarh) near Burhanpur known as "Gateway to Deccan" in history

 भेट “दक्षिण भारताच्या दरवाजा”ची 

"पुर्वी “दख्खन का दरवाजा” म्हणून प्रसिध्द असलेला आसिरगढ व इतर पुरातन वास्तू सुद्धा कुणास ठाऊक कुणाच्या शापाने आपले गतवैभव हरवून केवळ भग्नावशेशरूपाने उभ्या आहेत. अश्वत्थामाच्या जखमेला तरी कुणी तेल देत असेल परंतू या प्राचीन वास्तूंना त्यांच्या तोडफोडीमुळे झालेल्या जखमांना डागडुजीरुपी तेल देण्यास शासनाला वेळ नाही त्याउपर त्यांना आणखी भग्न करून , क्षती पोहचवून त्या जखमा पूर्वीपेक्षा अधिक चिघळवणारी बेशिस्त तरुणाई या देशात आहे. इतिहासाची साक्ष देणा-या या पुरातन वास्तूंना असेच अश्वत्थामाप्रमाणे चिरकाल आपली जखम बरी होण्याच्या प्रतिक्षेत राहावे लागेल काय ?" 


    भारतात पाहण्यासारखे खुप काही आहे. परंतू कुठे पर्यटनास जायचे असल्यास जाण्यासाठी म्हणुन नेमके ठिकाण आठवतच नाही. बरेचदा आपल्या जवळच्या एखाद्या प्राचीन , ऐतिहासिक स्थळाचा आपणास विसर पडून आपण इतर ठिकाणी पर्यटनास जातो आणि जवळचे ठिकाण राहून जाते. यंदाच्या दिवाळीत सहकुटुंब कुठे जावे हा प्रश्न पडला असता महाभारतात ज्याचा अश्वत्थामागिरी म्हणून उल्लेख आहे त्या आसिरगढ किल्ल्याचे एकदम स्मरण झाले. 

'अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः। कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥'

या सप्त चिरंजीवांपैकी एक असा द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा याच ठिकाणी नित्यनेमाने शंकराच्या पुजेसाठी येत असलेल्याचे बोलले जात असलेल्या किल्ल्याबाबत कुटुंबियांना सांगितले सर्वानी “शिक्का मोहरतब” केले आणि 23 नोव्हें 2020 रोजी सकाळीच आसिरगढ किल्ल्याकडे निघालो. हा किल्ला खामगांव-इंदोर या मार्गावर ब-हाणपूरच्या पुढे 15-20 किमी अंतरावर आहे. खामगांवहून हा किल्ला पहायला जायचे असल्यास मलकापूर व जळगांव-जामोद मार्गे जाता येते. जळगांव जामोद मार्गे गेल्यास घाटातील निसर्ग सौंदर्य अनुभवता येते. आम्ही याच दुस-या मार्गास पसंती दिली व मार्गक्रमण सुरु केले. सातपुडा पर्वताच्या रांगांतून मोटारीतून सुखाने जात असतांना याच पर्वतरांगा ओलांडून अहमदशहा अब्दाली या परकीय आक्रमकास रोखण्यासाठी म्हणून पानिपतच्या लढाईसाठी आपल्या बाजार बुणग्यांसह निघालेल्या सदाशिवरावभाऊ पेशवे व त्यांच्या सैन्यास किती त्रास सहन करावा लागला असेल हा विचार मनात येत होता. भल्यामोठ्या त्या सातपुड्याच्या चढावरून हत्ती , तोफा नेण्यास भाऊंच्या सैन्याची मोठी दमछाक झाली होती. याच विचारात मग्न असतांना मोटारीने घाट पार केला. आम्ही मध्यप्रदेश या भारताच्या मध्यभागातील निसर्गाने समृद्ध असलेल्या राज्यात दाखल झालो. एका ठिकाणी चहापान केल्यावर थोड्याच वेळात ऐतिहासिक काळातील मोठी व्यापारपेठ असलेल्या व संभाजी राजांनी दोनवेळा लुटलेल्या ब-हाणपूरच्या वेशीवर दाखल झालो. हातमाग, सोने इ अनेक वस्तूंचा व्यापार करण्यास देश विदेशातील व्यापारी ज्या गावात येत असत त्या गावातून आमची मोटार जात होती. रस्त्याच्या शेजारी असलेली परकोटाची भली मोठी भिंत ब-हाणपूरच्या गतवैभवाची साक्ष देत होती.    ब-हाणपूर येथेही प्रेक्षणीय अशी अनेक ठिकाणे आहेत परंतू आमचे प्रथम प्राधान्य हे आसिरगढ किल्ल्यास होते. ब-हाणपूर सोडल्यावर थोड्याच वेळात भव्य असा आसिरगढ आमच्या दृष्टीस पडला. या किल्ल्याच्या जवळच नेपानगर हे कागदाच्या कारखान्यासाठी वसलेले निसर्गसमृद्ध गांव आहे. त्या वळणावर नेेेपानगर येथील काही मित्रांचे स्मरण झाले. एव्हाना आमची मोटार किल्ल्याचा रस्ता चढू लागली होती. बिकट वाट पार करून आमची मोटार किल्ल्यावर पोहोचली. किल्ल्याची माहिती देणारा फलक दिसला व समोर पायरस्त्याने येेण्याचे किल्ल्याचे प्रवेशव्दार दिसते. थोड्या पाय-या चढल्यावर अरुंद वाट असलेला मुख्य दरवाजा आहे व पाय-या चढतांना उजव्या बाजूने प्राचीन शिलालेख तसेच नवीन फलक आहेत. मुख्य दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याचा नकाशा आपल्याला दिसतो. डाव्या बाजूने किल्ल्यात गेल्यास एका महालाचे भग्नावशेष दिसतात. पुढे एक मस्जिद आहे. तेथून पुढे भला मोठा तलाव , व त्यापुढे गेल्यावर एक शिव मंदिर आहे , मंदिरात जाताच नंदीची सुबक मुर्ती लक्ष वेधून घेते, सूर्याची किरणे पिंडीवर पडतील अशी रचना असलेले हेच ते चिरंजीव अश्वत्थामा पुजेसाठी येत असलेले मंदिर आहे. याच मंदिरात दररोज भल्या पहाटे अश्वत्थामा शंकराच्या पिंडीवर  पुष्प अर्पण करून जात असल्याचे मानले जाते. कितीही लवकर किल्ल्यावर गेलो तरी पुजा झालेली असते. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने सुद्धा याबाबत “स्टोरी” दिली आहे. येेथे महाकाय अशा पुरुषाच्या दर्शनाने बेशुद्ध झालेल्या लोकांच्या गोष्टी सुद्धा सांगितल्या जातात. या मंदिरात नतमस्तक होऊन आम्ही पुढे गेलो. थोड्या अंतरावर इंग्रजांनी बांधलेल्या तुरुंगाचे अवशेष आहेत. या तुरुंगात अनेक क्रांतिकारकांना कैद केले होते ज्यांचे नांव सुद्धा आता आपल्याला ज्ञात नाही. तीन स्तरात असलेल्या या किल्ल्याकडे पर्यटन विभाग व पुरातत्व विभाग यांचे दुर्लक्ष आहे. अनेक शिलालेख विद्रुप केले आहेत, स्वत:ची नांवे कोरलेली आहेत, पडझड झालेली आहे ती पाहून वाईट वाटले. चर्च व इंग्रजांच्या कबरी सुद्धा येथे आहेत.  परकोट आसिरगढ, कमरगढ व मलयगढ असे या किल्ल्याचे तीन स्तर आहेत. तीन तासांनी किल्ल्या बाहेर आलो, मोटारीत बसलो. परतीचा प्रवास सुरु झाला. नित्यनेमाने पुजा , सकाळ संध्याकाळ संध्या करणारे , नामस्मरण करणारे माझे आजोबा एकदा भल्या पहाटेच या किल्ल्यावर अश्वत्थामाचे दर्शन व्हावे या आशेने गेल्याचे त्यांनीच मला सांगितल्याचे स्मरण झाले. ते पोहोचल्यावर पुजा झालेली होती. आज तो किल्ला पाहिल्यावर समाधान वाटत होते. पांडव कुळाचा नाश व्हावा म्हणून अभिमन्यू पत्नी उत्तरा हीच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडणा-या अश्वत्थामाच्या कपाळावर जन्मता:च असलेला मणी भगवान श्रीकृष्णाने त्यास दंड म्हणून काढून घेतला आणि "तू आपली जखम घेऊन मरणाची प्रतीक्षा करीत फिरत राहशील" असा शाप दिला होता. अश्वत्थामा जसा त्याच्या कपाळावरील जखम घेऊन मण्याच्या वैभवाच्या आठवणीत जखमेसाठी तेल मागत फिरत आहे त्याचप्रमाणे भारतातील पूर्वी “दख्खन का दरवाजा” म्हणून प्रसिध्द असलेला आसिरगढ व इतर पुरातन वास्तू सुद्धा कुणास ठाऊक कुणाच्या शापाने आपले गतवैभव हरवून केवळ भग्नावशेशरूपाने उभ्या आहेत. अश्वत्थामाच्या जखमेला तरी कुणी तेल देत असेल परंतू या प्राचीन वास्तूंना त्यांच्या तोडफोडीमुळे झालेल्या जखमांना डागडुजीरुपी तेल देण्यास शासनाला वेळ नाही  त्याउपर त्यांना आणखी भग्न करून , क्षती पोहचवून त्या जखमा पूर्वीपेक्षा अधिक चिघळवणारी बेशिस्त तरुणाई या देशात आहे. इतिहासाची साक्ष देणा-या या पुरातन वास्तूंना असेच अश्वत्थामाप्रमाणे चिरकाल आपली जखम बरी होण्याच्या प्रतिक्षेत राहावे लागेल काय? असा प्रश्न परतीच्या प्रवासात मनात घोळत होता. 

१२/११/२०२०

Citizen should take precaution while celebrating Diwali 2020 in Corona Pandemic

दिवाळीत ढिलाई नकोच

"दिवाळी हा आपला मोठा सण आहेच , तो साजरा व्हायलाच पाहिजे. आपल्या खरेदीमुळे फेरीवाले , रस्त्यावर लहान-सहान व्यवसाय करणारे यांच्या घरी सुद्धा दिवे लागणार  आहेत. परंतू हे सर्व करतांना कोरोनाचे  सावट अजून आहे याचे भान सर्वानी ठेवावे , काही देशात कोरोनाच्या लाटा पुन्हा आल्या आहेत हे जाणून घ्यावे व पक्षभेद , मतभेद वैचारिक भिन्नता , हे सर्व विसरून आपल्या देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या तमाम जनतेला कळकळीने केलेले “जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही “ हे आवाहन ध्यानात ठेऊन आपला सामाजिक वावर करावा हीच या लेखाव्दारे कळकळीची विनंती.सर्वांना ही दिवाळी सुख समृद्धीची , आनंदाची , आरोग्य व भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना."         

ध्या दिवाळी या हिंदूंच्या सर्वात महत्वाच्या सणाची धूम सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे बाजारपेठा सजल्या आहेत . पणत्या , लक्ष्मीच्या मुर्त्या , विद्युत दिव्यांच्या माळा , दिवाळी निमित्ताच्या फराळाची दुकाने थाटली आहेत. यंदाची दिवाळी हि कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा धुमाकूळ थोडा कमी झालेला दिसून येत आहे. परंतू जशी लॉकडाऊन मध्ये सुट देण्यास सुरुवात झाली तसा लोकांचा कोरोनाचे, सार्वजनिक स्वच्छतेचे , भौतिक दुरतेचे काहीही नियम न पाळता मुक्त वावर सुरु झाला. अनेक शहरातील दिवाळीची खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करीत असलेली चित्रे प्रसिद्ध झाली. त्यावरून कोरोना विषाणूला रोखण्यासाठी शारीरिक दूरता पाळावी हे लोक साफ विसरून गेले आहेत हे स्पष्ट झाले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जागतिक स्तरावर जे निकष सांगण्यात आले आहेत त्यांचा तसेच भारत सरकार व राज्य सरकारनी याच विषयाशी संबंधीत ज्या काही सूचना वेळोवेळी केल्या , दूरदर्शनवर जाहिराती केल्या , भले मोठे फलक लावले , पत्रके छापली या सर्वांकडे नागरिक साफ कानाडोळा करीत आहेत. लोक गेल्या काही महिन्यांपासून बंदिस्तासारखे जीवन व्यतीत करीत होते. अनलॉक सुरु झाल्यापासून लोक सैराट झाल्यासारखे वावरू लागले. “कुछ नही होता” , “काय का कोरोना” असे संवाद ऐकू येऊ लागले. परंतू कोविड 19 ज्यांनी भोगला आहे त्यांना त्याचे गांभिर्य माहित आहे. मृत्यूच्या दोन दिवस आधी स्वत:ची तब्येत ठणठणीत असल्याचे सांगून त्याचा व्हिडीओ प्रसारित करणा-या प्रख्यात गायक एस.पी.बालसुब्र्ह्मण्यमचे कोरोनामुळे निधन झाले. कोरोनाची भीषणता अनेकांनी अनुभवली आहे. कोरोनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात माझी स्वत:ची कोरोना प्रादुर्भाव झालेल्या भागात ड्युटी लागली होती त्यावेळी कोरोना बाधिताशी संपर्क आल्याने एका कुटुंबास होम क्वारंटाइन करण्यात आले होते. तेंव्हा त्या कुटुंबाची मनस्थिती , त्यांचे ते मजुरी सोडून घरात बंदिस्त होणे , त्यामुळे निर्माण होणारा ताण-तणाव , शेजा-या-पाजा-यांनी त्यांना केलेली मदत , त्यामुळे रोग तर भयंकर आहेच परंतू त्यामुळे होणारे इतर परीणाम सुद्धा भयावह असतात हे जवळून पाहिले. त्यानंतर माझ्या जवळच्या मित्राला कोविड-19 झाला होता . त्याचे अनुभव कथन मी ऐकले आहे, विलगीकरणात झालेली त्याची मनस्थिती , जीवनाबाबतच्या त्याच्या पूर्वीच्या व कोरोनामुळे विलगीत झाल्यानंतरच्या दुष्टीकोनात झालेला बदल, आपत्तीत त्याच्या कुटुंबाची , त्याच्या लहानग्यांची , वयोवृद्ध वडीलांची त्याला कशी व्यवस्था करावी लागली, हे सर्व त्याचे अनुभव अंगावर शहारे आणणारे  होते व ते ऐकल्यावर कोरोनाची भीषणता अधिक चांगल्याप्रकारे कळली. दिवाळी हा आपला मोठा सण आहेच , तो साजरा व्हायलाच पाहिजे. आपल्या खरेदीमुळे फेरीवाले , रस्त्यावर लहान-सहान व्यवसाय करणारे यांच्या घरी सुद्धा दिवे लागणार आहेत. परंतू हे सर्व करतांना कोरोनाचे सावट अजून आहे याचे भान सर्वानी ठेवावे , काही देशात कोरोनाच्या लाटा पुन्हा आल्या आहेत हे जाणून घ्यावे व पक्षभेद , मतभेद वैचारिक भिन्नता , हे सर्व विसरून आपल्या देशाचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या तमाम जनतेला कळकळीने केलेले “जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही “ हे आवाहन ध्यानात ठेऊन आपला सामाजिक वावर करावा हीच या लेखाव्दारे कळकळीची विनंती.

         सर्वांना ही दिवाळी सुख समृद्धीची , आनंदाची , आरोग्य व भरभराटीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 

०७/११/२०२०

Home cleaning on the occasion of Hindu Festival Diwali and nostalgic memories

दिवाळी सफाई आणि ऑडीओ कॅसेट्स 

 “आली माझ्या घरी हे दिवाळी, सप्त रंगात न्हाउनी आली“ सर्व संगीत स्वरात न्हाऊन गेले. संगीताची आवड असलेले तिर्थरूप उद्गारले “ खूप छान वाजतो रे हा टेप रेकॉर्ड अजून, हप्त्यांवर घेतला होता. खरेच जुने ते सोने“ घर आवरण्याचा प्रचंड कंटाळा आलेला मी त्या घर साफ-सफाई मुळे मिळालेल्या आनंदाने व संगीताच्या जादूने प्रसन्न झालो होतो. थकवा फटाक्याच्या धुराप्रमाणे क्षणात लांब गेला होता.

दरवर्षी दिवाळी आली की घरोघरी सुरु होते ती रंगरंगोटी , आवर-सावर. प्रत्येक घरी गृहिणी  या  कामाच्या लगबगीत असतात व त्यांचे पतीदेव त्या कामातून कसे निसटता येईल याच्या विचारात असतात.  परवा सकाळीच सौ ने “अहो” अशी हाक दिली. दिवाळी येते आहे हे लक्षात आल्याने तिच्या “अहो” या आरोळीला ओळखून मी “हो उद्या पासून आवरू” असे म्हणून त्वरीत उत्तर दिले. व तो दिवस मी धकवला.  तिला मात्र सुखद आश्चर्य वाटले. दुस-या दिवशी सकाळीच “मग केंव्हा लागायचे घर आवरायला  हातात झाडू?”  घेऊन तिचा प्रश्न असल्याने आता वेळ मारून नेणे जमणार नाही हे लक्षात आले आणि “मला न आता  जरा बाहेर महत्वाच्या कामाला जायचे आहे “ दुपारी करू म्हणून मी बाहेर पडलो. ”दुपारी नक्की ना ?”  आता हातातली झाडणी हनुमानाच्या गदे प्रमाणे खांद्यावर आली होती. आता  घर आवरावे लागेलच दुपारी  या विचाराच्या तंद्रीत मी माझ्या गंतव्य स्थानाकडे निघालो. दस-याला गाड्या धुण्याच्या मागे काय लॉजिक असते ?  या माध्यमांवर फिरलेल्या संदेशाची आठवण झाली. तसेच दिवाळीला घर का आवरतात ?  याचा विचार करू लागलो. लक्ष्मीपूजन असल्याने व लक्ष्मीला स्वच्छता आवडत असल्याने ही प्रथा पडली असावी.  पुर्वी घरे ही कुडाची असत म्हणून ती चांगली शाकारून घेण्यासाठी व त्या कच्च्या घराची देखभाल व्हावी असा या आवरा-सावरीचा हेतू असावा. आमच्या लहानपणी सर्व सामान घराच्या बाहेर काढून घर साफ होत असे व सामान सुमान सुद्धा. आजही बरेच ठिकाणी असे होते परंतू आता ही प्रथा कमी-कमी होत आहे.  एव्हाना माझे गंतव्य स्थान आले होते , कार्य उरकून मी परत घराकडे  येऊ लागलो. आता मात्र घरी गेल्यावर काही टाळा-टाळ करता येणार नाही हे जाणून होतो शिवाय सौ. च्या त्या खांद्यावर  झाडणी घेत बोलण्याचा आविर्भावाचे स्मरण झाले. घरी पोहोचल्यावर भोजनांती आवर-सावर सुरु केली. “हे काढा, हे असे ठेवा, ते तसे नाही असे ठेवा , तिथले जाळे-जळमटे काढा” या सूचनांचे पालन करीत  साफ-सफाई सुरु झाली. दरवर्षी वस्तू काढा व परत ठेवा हेच असते. या वर्षी


काही  फेकून द्यावे म्हणून ठरवले  परंतू फेकावे असे काही सामान सुद्धा नव्हते. एक पेटी उघडली “फेका बर त्या सर्व कॅसेट्स” पेटीतील 100-125 ऑडीओ कॅसेट्स पाहून सौ उद्गारली.  गाण्यांची आवड असल्याने तीचे ते वाक्य कानावर पडले असूनही माझ्या मनाला 30 वर्षापूर्वीच्या काळात जाण्यास  वेळ लागला नाही. "रिव्हर्स", "फॉरवर्ड" , कॅसेट मधील टेप बाहेर आली की पेन/पेन्सिल ने गुंडाळणे सर्व आठवू लागले.संगीताची आवड तीलाही आहे परंतू त्या कॅसेट्स काहीही उपयोगात नसल्याने तीचे तसे म्हणणे होते.  त्या पेटीत फिलिप्सचा कॅसेट्स प्लेयर सुद्धा निघाला. सौ दुस-या कामात मग्न होती , मी एक-एक कॅसेट न्याहाळू लागलो. पेन ड्राइव्ह ,मोबाईल,ब्ल्यू टूथ स्पीकर ई. अनेक अशी अत्याधुनिक साधने आता उपलब्ध आहेत. या काळात त्या ऑडीओ कॅसेट्स म्हणजे बाबा आदमच्या जमान्यातील म्हणता येतील अशा. कदाचित त्या वाजतही असाव्यात. सौ चे “फेका बर त्या सर्व कॅसेट्स” हे बरोबरही वाटत होते परंतू रफी, किशोर, मुकेश , लता , आशा  यांची तसेच जुन्या नट नट्यांची आकर्षक चित्रे असलेल्या त्या कॅसेट्स फेकण्याचे मन होत नव्हते . मोह म्हणतात तो हाच. कॅसेट्स पहाता पहाता “व.पु” , “पु.ल.” यांच्या कथाकथन असलेल्या कॅसेट्स सुद्धा दिसल्या “सु” , “प्रिमियर पासेस” या कथा कानात घुमू लागल्या , मुलांना दाखवल्या म्हटले ऐकाल रे या कथा. आपण “यु ट्युब“ वर शोधू. सौ इतर आवर-सावर करण्यात मग्न झाली. खरेच आता त्या कॅसेट्स मुक्या झाल्या होत्या , टाकाऊ होत्या , त्यांना काही मुल्य नव्हते परंतू जुन्या गीतांचा तो खजिना, बिस्मिल्ला खानची सनई , शास्त्रीय संगीत , कथा कथन , नरवीर बाजीप्रभूच्या पराक्रमाचा पोवाडा , योगासने सराव असा तो अमुल्य संग्रह पहाण्यात मी दंग असल्याचे पाहून अर्धे अधिक काम पूर्ण करून सौ चे लक्ष माझ्याकडे गेले , मी मोबाईल वर कॅसेट्स चे फोटो काढत होतो . तीला दाखवले “ ठेवा त्या कॅसेट्स , अन ठेवा बर ती पेटी लवकर “  सौ म्हणाली. मला त्या कॅसेट्स फेकाव्या असे वाटत नाही हे जाणून तीने तसे म्हटले होते. मी काही कॅसेट्स वरच ठेवल्या व उर्वरीत पेटीत व्यवस्थित रचून ठेवल्या, टेपरेकॉर्डर दुरुस्तीला घेऊन गेलो, कारागीर हसला म्हणाला “काय साहेब, कोणत्या जमान्यात आहे ? फेका आता हे“ माझी टेपरेकॉर्डर दुरुस्त करण्याची कितपत इच्छा आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने असे म्हटले. “खर्च किती येईल” मी . कारागिराला वाटले जाऊ द्या कुठे डोके लावता “दोन दिवसांनी या” तो म्हणाला. आयताच गि-हाईक आला आहे पैसे चांगले मिळतील असे त्याला वाटले असावे असे मला वाटले. टेप दुरुस्त झाला. “साहेब पैसे नको” तो म्हणाला , मला आश्चर्य वाटले. मी म्हटले “का रे बाबा “ आपल्या दुकानातला “रेकॉर्ड प्लेयर दाखवत तो म्हणाला “मी सुद्धा हा अजून फेकला नाही, वाजतो हा” आवर–सावर संपली होती,  मी उजळलेले घर पाहून सुखावलो नहोतो. सौ ने चहाचा कप हाती दिला मी मुलांना हाक मारली एका कॅसेट्स वरचे लेबल न पाहता टेपरेकॉर्डर वर कॅसेट् लावली व उद्गारलो “ऐका” मुळे उत्कंठतेने पाहू लागली आणि गाणे लागले , गाणे होते , “आली माझ्या घरी हे दिवाळी, सप्त रंगात न्हाउनी आली“ सर्व संगीत स्वरात न्हाऊन गेले. संगीताची आवड असलेले तिर्थरूप उद्गारले “ खूप छान वाजतो रे अजून, हप्त्यांवर घेतला होता. खरेच जुने ते सोने“ घर आवरण्याचा प्रचंड कंटाळा आलेला मी त्या घर साफ-सफाई मुळे मिळालेल्या आनंदाने व संगीताच्या जादूने प्रसन्न झालो होतो. थकवा फटाक्याच्या धुराप्रमाणे क्षणात लांब गेला होता. 

०५/११/२०२०

Problems in the heart of the city area of Khamgaon

मध्यवस्तीतील उपेक्षित वॉर्ड

जिजामाता रोड खामगांव शहरातील मध्य वस्तीतील भाग,  न्यायालय, जि.प. बांधकाम विभागपंचायत समिती  उपनिबंधक कार्यालय ,   नझुल कार्यालय , प्रशासकीय ईमारत , विदर्भ साहित्य संघांचे साहित्यिक , सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी असलेले कोल्हटकर स्मारक , न्यायधीश निवासस्थाने , सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता यांचे निवासस्थान , राजीव गांधी उद्यान व हुतात्म्यांच्या स्मरणार्थ बांधलेला जयस्तंभ , बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती बँक, तलाठी कार्यालय , विद्युत कर्मचा-यांच्या संघटनेचे कार्यालय अशी सर्व कार्यालये व ईमारती असलेला हा परिसर नांदुरा रोडला लागून आहे. या परिसराच्या पलीकडे सुद्धा एलआयसी तसेच अनके बँका आहेत. असा हा खामगांव शहरातील मध्यवर्ती भाग , अनेक सरकारी कार्यालयांचा म्हणजेच महत्वाचा असा भाग आहे परंतू स्थानिक प्रशासनाचे मात्र या भागाकडे अक्षम्य असे दुर्लक्ष आहे. या भागाच्या अनेक समस्या आहेत. पाणी , नाल्या , रस्ते ,पथदिवे इत्यादी परंतू स्थानिक प्रशासन डोळे बंद करून बसले आहे. त्यातील काही समस्यांबाबत अनेकदा बोलणे झाले परंतू त्या समस्यांचे काही निराकरण झाले नाही. या भागातील जेष्ठ नागरीकांनी सुद्धा या समस्यांबाबत पाठपुरावा केला परंतू स्थिती “जैसे थे” च आहे. या समस्या पुढील प्रमाणे आहेत.

     नुकताच नांदुरा रोड रुंद झाला , रस्त्याच्या मध्ये दिवे लागले , त्याचे कौतुक झाले व सुरु आहे. हा रस्ता रुंद झाला हे चांगलेच झाले. याच रस्त्याला विविध रहिवासी भागातून जोडणारे जे “अॅप्रोच रोड” आहेत ते सर्व पूर्ण झाले आहेत परंतू भूविकास बँकेच्या शेजारून जिजामाता रोड परिसरात जाणा-या रस्त्याचे व पंचायत समिती जवळून न्यायाधीश निवासस्थानांकडे जाणा-या या  अॅप्रोच रोडचे अद्याप डांबरीकरण झालेले नाही. तसेच उर्वरीत रस्ता सुद्धा खराब झाला आहे.

परिसरातील रस्त्यांची दुरवस्था आहे. उपनिबंधक कार्यालय ते कोर्टाकडे जाणारा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा होता व तूर्तास खराब झाला आहे.

पाण्याची समस्या या भागात नेहमीच भेडसावत असते , धरणात पाणी मुबलक असूनही पाणी पुरवठा अनियमित व अल्पवेळ असतो.


          परिसरात एक पक्क्या पाण्याची विहीर आहे परंतू ती अस्वच्छ असते. परिसरातील नागरिक वेळोवेळी ही विहीर स्वच्छ करीत असतात. या विहिरीतून पाणी पुरवठा करता येऊ शकतो परंतू स्थानिक प्रशासन याबाबत उदासीन आहे. असा पुरवठा शहरात काही विहिरीतून केला जातो. परंतु जिजामाता रोड भागात मात्र या विहिरीतून पाणी पुरवठा का नाही करता येऊ शकत ?

     याच भागातील कोर्टाला लागून असलेल्या अग्रवाल यांच्या इमारती समोर गेल्या कित्येक वर्षांपासून पथ दिवा मंजूर झाला आहे परंतु तो अद्याप लावला नाही.तसेच पूर्वी कोल्हटकर स्मारक जवळ एक मर्क्युरी लाईट होता आता तिथे आता एकही पथ दिवा नाही त्यामुळे रात्री तिकडे काही बेकायदेशीर कृत्ये घडत असतात.

      या भागातील मोकळी जागा सुद्धा अतिशय खराब आहे, या जागेच्या मागील भागात नाली नसल्याने तेथून मोठी दुर्गंधी पसरते

जिजामाता मार्ग हा शहरातील एक मध्यवर्ती भाग असूनही व या भागात प्रामाणिक करदाते असूनही या भागाची उपेक्षा होत आहे. या भागातील उपरोक्त सर्व समस्यांचे त्वरित निराकरण व्हावे अशी या भागातील महिला व सर्व नागरिकांची आंतरिक इच्छा आहे. तेंव्हा मुख्याधिकारी व संबंधित विभाग व निर्वाची पदाधिकारी यांनी लक्ष घालावे.