३१/१२/२०२०

Series of articles about old buildings, gardens etc of Khamgaon City - Part 4

 खामगांवची शान असलेली आताची भकास स्थाने , भाग-4

जि.प. कनिष्ठ महाविद्यालय

जुने फोटो कनिष्ठ महाविद्यालय इमारत म्हणजे पुर्वी वसतिगृह होते.

कनिष्ठ महाविद्यालय इमारतीच्या वरच्या मजल्याच्या भाग


"...इमारतीचा वरचा मजला आपल्या गतदिवसांच्या प्रतीक्षेत समोरच्या वाळलेल्या वृक्षराजींना पहात आपली शेवटची घटका भरत आली की काय अशा मरणासन्न अवस्थेत असलेल्या जर्जर माणसाप्रमाणे झालेला दिसतो. एक फोटो काढल्यावर मी त्या इमारतीकडे पाहत उभा होतो एक मनुष्य तिथून जात होता."काय पाहता सर?" तो म्हणाला "संत ज्ञानेश्वर,पु.ल. देशपांडे, गदिमा , कुसुमाग्रज, तर्कतीर्थ, अण्णाभाऊ साठे यांच्या महाराष्ट्रातील मराठी शाळेची दुर्दशा". असे ऊत्तर मी दिल्यावर तो पण  "ऊंsss" करत निघुन गेला..."

    खामगांव शहरातून शेगांव नाका ते सुटाळा म्हणजेच नांदुरा रोड या राष्ट्रीय महामार्गाने नांदु-याकडे जातांना उजव्या बाजूने शैक्षणिक केंद्रे, शासकीय इमारती आहेत. त्या तुलनेत डाव्या बाजूने खाजगी मालमत्ता जास्त आहेत परंंतु आयकर , बी एस एन एल , डाकघर , पोलीस स्टेशन, दस्तूर रतनजी ग्रंथालय, वन विभाग कार्यालय इत्यादी कार्यालये आहेत. नांदू-याकडे जातांना उजव्या बाजूने मात्र खामगांव शहराचे वैभव दाखवणा-या इमारती आहेत. शेगांव कडून सुरु केल्यास सरकारी दवाखाना , रेल्वे स्टेशन , जी एस टी कार्यालय , एस डी. ओ ऑफिस म्हणजे आताची प्रशासकीय इमारत , पंचायत समिती , केला हिंदी हायस्कूल , न्यायालय , जि.प. हायस्कुल म्हणजे पुर्वाश्रमीचे शासकीय विद्यालय , अंजुमन हायस्कूल , गो.से.महाविद्यालय यांसारखी काही खाजगी शैक्षणिक केंद्रे , काही सरकारी शैक्षणिक केंद्रे व सरकारी कार्यालये या मार्गावर दिमाखात उभी आहेत. अगदी काही वर्षे अगोदर या रस्त्याने जातांना या इमारती ठळक पणे दृष्टीस पडत. व या इमारती येणा-या जाणा-यांचे लक्ष वेधून घेत. यातील खाजगी इमारती व्यवस्थित उभ्या आहेत परंतू सरकारी इमारती मात्र दुरावस्थेत आहेत. यातीलच एक इमारत म्हणजे जि.प.कनिष्ठ महाविद्यालय.

      नांदुरा रोडवर कोर्टाला लागून प्रशस्त अशा जागेत शासकीय शाळा सुरु झाली. ही शाळा पुर्वी गव्हर्नमेंट हायस्कुल म्हणून ओळखली जात असे नंतर येथे काही काळ वसतिगृह सुद्धा होते. पुढे या शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आल्या आणि या जि.प.शाळा म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. लाल रंग, कौलारू छत , समोर बगीचा त्या बगीच्यात पिण्याच्या पाण्याची टाकी अशी ही जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दक्षिणमुखी दुमजली इमारत तशीच भव्य व कौलारू. या दुमजली इमारतीच्या बाजूला एक विहीर आतल्या भागात विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह , या इमारतीच्या पाठीमागे काही खोल्या. पटांगणावर असंख्य विद्यार्थी , त्यांच्या सायकली. आतील बाजूने या शाळेची भिंत अतिशय कमी उंचीची असल्याने त्यावर कनिष्ठ महाविद्याल्यातील मुले  बसलेली, असे या जि.प. शाळेचे आनंददायी चित्र दिसत असे. कोर्ट व मुलांच्या शाळेच्या मध्ये जि.प. मुलींची शाळा आहे. पुर्वी मुलींची शाळा कनिष्ठ महाविद्यालयाच्या याच इमारतीत भरत असे , असे काही जुने विद्यार्थी सांगतात. परंतू जसे जसे इंग्रजी माध्यमांच्या स्वयंअर्थसहायित शाळांचे लोण खामगांवात आले तसे तसे अनुदानित व जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या घटू लागली. हे चित्र सर्व दूर आहे. अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा या राजकारणी लोकांच्या असल्याने त्यांना जि.प. व अनुदानित शाळांची काय काळजी असेल. या शाळा ओस पडू लागल्या. तसेच खामगांवातील या शाळेचे सुद्धा होत आहे. कनिष्ठ महाविद्यालय बंद पडल्याने ही इमारत धुळ खात पडली होती. आता खालच्या मजल्यावर जि. प. बांधकाम विभागाचे कार्यालय असल्याने हा मजला ब-या अवस्थेत आहे. वरचा माजला मोडकळीस येत आहे. दोन महिन्यापूर्वी येथील मुख्याध्यापकांना भेटण्यासाठी म्हणून गेलो होते. त्यांचे कार्यालय पाहून खूप समाधान वाटले. माजी मुख्याध्यापकांच्या नावाचा फलक , राष्ट्रपुरुषांचे आकर्षक फोटो व इतर टापटीप पाहून आपण जि.प. शाळेत असल्याचे वाटत नव्हते. कनिष्ठ महाविद्यालय जरी भकास झाले असले तरी हायस्कूलच्या इमारतीचा कायापालट झालेला दिसला म्हणून सरांशी संवाद साधला तर पुढील अनेक बाबी कळल्या. त्या चांगल्या बाबींवर येथे प्रकाश टाकणे औचित्याचे ठरेल.   

    सध्या जि.प. शाळेचे मुख्याध्यापक जी.डी. इंगळे हे आहेत. शाळेप्रती तळमळ, प्रेम असल्याने यांनी या शाळेला त्यांच्या अंगच्या कलात्मक दृष्टीने खूप चांगले रूप दिले आहे. हास्कूलच्या इमारतीत प्रवेश करतांनाच इंगळे सरांच्या कलात्मक दृष्टीने साकारलेले सिमेंट काँक्री चे भारत व महाराष्ट्र असे आकर्षक नकाशे दिसतात. सरांनी शासनाकडे पाठपुरावा करून 23 लक्ष रुपये हायस्कूलच्या इमारतीसाठी मंजूर करून आणले होते परंतू ती रक्कम #Covid19 च्या संकटामुळे कमी झाली तरीही 7 ते 8 लक्ष रुपयात सरांनी शाळेची रंगरंगोटी सारखी अनेक कामे करून घेतली. या कामांमुळे सध्या हायस्कूलची इमारत आकर्षक दिसत आहे. निधी व इतर तत्सम कार्यात सरांना जि.प. बांधकाम विभागीय आयुक्त श्री जोशी साहेब, जि.प.बांधकाम विभागचे बुलडाणा येथील अधिकारी आर. बी. परदेशी साहेब, जि.प.बांधकाम विभाग खामगांव येथील अधिकारी गुडधे साहेब, शाखा अभियंता श्री अभय कुळकर्णी साहेब, लिपिक श्री सारंग कुळकर्णी , कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. मैदान विकसित करण्याचा सुद्धा सरांचा मानस आहे. सरांनी स्वत:ही आर्थिक झीज सोसली आहे. परंतू शाळेसाठी केल्याचे समाधान त्यांच्या चेह-यावर झळकते. याप्रकारे अनुदानित व जि.प.शिक्षकांनी कार्य केले तर या शाळा निश्चितच टिकून राहतील ही आशा वाटते.

    परंतू जि.प. कनिष्ठ महाविद्यालयाची ती इमारत पाहून मला जशी खंत वाटत होती तशीच सरांना पण नेहमी खंत वाटते. ही इमारत सुद्धा चांगली करण्याचा त्यांचा निश्चय आहे परंतू त्यांना कितपत सहकार्य शासनाकडून मिळेल यात शंका आहे.

     येथील कनिष्ठ महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी हे विविध पदांवर कार्यरत आहेत. तरीही इंग्रजी माध्यमाचे पालक व विद्यार्थ्यांचे आकर्षण, शासनाची या जि.प. शाळां व अनुदानीत शाळांप्रतीची उदासीनता यामुळे या शाळा ओस पडत चालल्या आहेत. तसेच या कनिष्ठ महाविद्यालयाचे झाले. इमारतीचा वरचा मजला आपल्या गतदिवसांच्या प्रतीक्षेत समोरच्या वाळलेल्या वृक्षराजींना पहात आपली शेवटची घटका भरत आली की काय अशा मरणासन्न अवस्थेत असलेल्या जर्जर माणसाप्रमाणे झालेला दिसतो. एक फोटो काढल्यावर मी त्या इमारतीकडे पाहत उभा होतो एक मनुष्य तिथून जात होता."काय पाहता सर?" तो म्हणाला "संत ज्ञानेश्वर,पु.ल. देशपांडे, गदिमा , कुसुमाग्रज, तर्कतीर्थ, अण्णाभाऊ साठे यांच्या महाराष्ट्रातील मराठी शाळेची दुर्दशा". असे ऊत्तर मी दिल्यावर तो पण  "ऊंsss" करत निघुन गेला. त्या व्यक्तीने जरी मला नकारात्मक प्रतिसाद दिला तरी इंगळे सरांनी जि.प. हायस्कूलला जसे प्रयत्न पुर्वक चांगले स्वरूप दिले तसेच त्यांना जि.प. कनिष्ठ महाविद्यालची ही भकास पडलेली इमारत पुनश्च सुंदर करण्यात सुद्धा यश मिळेलच असा सकारात्मक विचार मनात घेऊन मी निघालो.

क्रमश:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा