०७/०१/२०२१

Series of articles about old buildings, gardens etc of Khamgaon City - Part 5

 खामगांवची शान असलेली आताची भकास स्थाने , भाग-

निमवाडी

     "....निमवाडीतील मित्रांच्या चर्चाकडूनिंबाच्या छायेतील निवांतासाठी सायकलवर टांग मारून पुढे गाड्या आल्यावर पेट्रोल खर्च करून चहानाश्त्यासाठी गावातून निमवाडीत जाणे, ”वो जिंदगीमे कल क्या बनेगा” अशी तरुणांची ध्येये, मित्रांनी पाहिलेली स्वप्ने,प्रेम कहाण्या,या हॉटेल मध्ये मुली क्वचितच येत. पण आमच्या एका मित्राने (नांवाचा उल्लेख मुद्दाम टाळला) एकदा त्याला भावलेल्या एका मुलीला या हॉटेल वरील पो-याला सांगून तिच्या टेबलवर चहा पाठवला होता. असे कितीतरी किस्से आहेत. 
आज निमवाडीतील झाडे , सावली, सकाळची वर्दळ लुप्त झाली आहे.
तसे या स्थानाबद्दल "निमवाडीची रया आणि कडुनिंबांची छाया गेली" या शिर्षकाखाली दोन वर्षांपुर्वी लेख लिहिला होता. हे स्थान सुद्धा चांगले होते म्हणून याचा सुद्धा समावेश या लेखमालिकेत करावासा वाटला.तरीही कालानुरूप काही बदल केले आहेत."

निमवाडी पुर्वीची

निमवाडी रस्ता रुंदीकरणावेळची 
कडुनिंब नसलेली आताची निमवाडी

याच मोकळ्या जागेतील हॉटेलवर पुर्वी गर्द छायेत अनेक लोक चहा , नाश्त्याचा आस्वाद निवांतपणे घेत असत.

    आजचे हे ठिकाण म्हणजे सुद्धा खामगांव शहराची शान वगैरे नव्हते. परंतू विद्यार्थी , कर्मचारी , कामगार यांच्या असलेल्या वर्दळीमुळे याला मित्रत्वाच्या , मानवी संबंधांच्या आपुलकीच्या ओलाव्यामुळे या ठिकाणाला शान होती असे नक्कीच म्हणता येईल. तेथील वृक्ष विपुलतेमुळे हे ठिकाण एक आल्हाददायक असे ठिकाण होते. 

    खामगांव शहर म्हटले की पंचक्रोशीतील कित्येकांना जी.एस.कॉलेज हमखास आठवतेच. खामगांव पंचक्रोशीतील या कॉलेजच्या लगतच सुटाळा ग्रामपंचायत हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर निमवाडी नावाचा परीसर आहे. अगदी आता दोन-तीन वर्षांपूर्वी कडुनिंबाच्या गर्द,थंडगार छायने आच्छादित असा हा एक छोटासा भाग होता. होय ! होताच. येथील भले मोठे कडुनिंबाचे वृक्ष वाटसरूंना सावलीचा दिलासा देत. कडुनिंबांच्या अनेक झाडांमुळे या परिसराला निमवाडी हे नांव पडले होते. याच परिसरात कडुनिंबाच्या छायेत एक झोपडीवजा उपहारगृह होते. आता ते नाही. हे उपहारगृह म्हणजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा ठिय्या होता. जी.एस. कॉलेज मधील गेल्या कित्येक वर्षातील विद्यार्थ्यांचा हाच कट्टा होता. या हॉटेलला नांव होते की नाही माहित नाही कारण पाटी काही कधी दिसली नाही. तासिका बुडवून येथील चहाइतर पदार्थ यांवर गप्पांसोबत ताव मारला जात असे. क्वचित प्रसंगी काही महाभाग धुरांच्या रेषाही हवेत काढत. समोर भट्टीत्यामागे बनियान टोपी वाले चालक-मालक त्यांच्या मागे काचेचे दोन कपाट, त्यात शेव, चिवडा , शंकरपाळे असत. काउंटर म्हणजे एक टेबल त्यावर एक ताट चील्लरचे तर दुसरे बालुशाहीचे असे. कुडाच्या भिंतीवर अनेक देवी देवतांचे फोटोलाकडाचे बाकटेबलएक छोटा टी.व्ही. ज्याकडे कुणाचे लक्ष नसे पण तरीही तो सुरु असे.  कोप-यात कांदे व इतर साहित्य पडलेले, एखाद-दोन खाटा. या उपहारगृहाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे याला दरवाजा नव्हता, रात्री पडदे टाकून हे बंद होत असे. अशा या उपहारगृहात फावल्या वेळात प्राध्यापककर्मचारीवृंद सुद्धा येत. प्राध्यापक किंवा इतर कर्मचारी उपहारगृहात आल्यावर व्यत्यय नको म्हणून धुरांच्या रेषा काढणा-यांसाठी मागील बाजूस कडुनिंबाच्या सावलीतच दोन बाकड्यांची पर्यावरणपूरक अशी खुली केबिनसुद्धा होती. निमवाडीतील हे उपहारगृह एकांतात असल्याने खामगावातील अनेक मित्र मंडळी कडूनिंबाच्या छायेतील या निवांत ठिकाणाचा आधार घेत होते. परंतू हळू-हळू शहर वाढले , रस्ते रुंद होऊ लागली, वाहनांची संख्या वाढल्याने रुंद रस्त्यांची गरज अत्यावश्यक झाली. परंतू वृक्ष लागवड व संगोपन सुद्धा जरुरी आहे. नवीन रस्त्यांच्या कडेला सुद्धा वृक्ष लावली जात आहेत. त्यांचे संगोपन मात्र झाले पाहिजे. सरकारच्या भरवश्यावर न राहता प्रत्येकाने वृक्ष लागवड संगोपन करण्याचा वसा घ्यावा. आपल्या पुर्वजांनी वृक्षे लावलीत्यांचे संगोपन केले त्यामुळे आपल्याला फळे, छाया मिळाली. आपण आपल्या पुढील पिढीसाठी काय ठेवणार आहोत दोन-चार प्लॉट किंवा शहरात एखादा मोठा फ्लॅॅट , बँक बॅॅलन्स ? हे सुद्धा अगदी नकोच असेही नाही परंतू वृक्ष लागवड व पर्यावरण रक्षणासाठी आपण निदान खारीचा वाट तरी उचलला पाहीजे. 

    खामगावातील याच निमवाडीतून जाणा-या महामार्गाचे सुद्धा आता रुंदीकरण झाले. निमवाडी, सुटाळ्यातील मूकनिशस्त्रकडूनिंब या रुंदीकरणाचे बळी झाले. निरपराधसदैव दुस-यांना काही ना काही देणा-या या कडूनिंबांच्या व इतर अनेक वृक्षांवर यांत्रिक करवती कराकरा फिरल्या आणि बघता-बघता ती शेकडो वर्षे जुनी, भली मोठी झाडे एका पाठोपाठ एक धारातीर्थी पडली. कुणास ठाऊक का परंतू निरपराध,निशस्त्रांवर गोळीबार झालेले जालियानवाला बाग आठवलेत्यांना मारणारा जनरल डायर आठवला. त्याने बेछूटपणे माणसांवर गोळीबार केला. आज त्याचप्रमाणे सर्वत्रच बेछूटपणे वृक्ष कापली जात आहेत. आज निमवाडीतील हिरवळ, दिवसाची वर्दळ लुप्त झाली आहे. रात्री मात्र वर्दळ असते. मन हेलावलेगतकाळात गेलेनिमवाडीतील मित्र मंडळींच्या बैठकाचर्चाकडूनिंबाच्या छायेतील निवांतासाठी सायकलवर टांग मारून, गाड्या आल्यावर पेट्रोल खर्च करून चहानाश्त्यासाठी गावातून निमवाडीत जाणे, ”वो जिंदगीमे कल क्या बनेगाअशी तरुणांची ध्येये, मित्रांनी  पाहिलेली स्वप्ने , प्रेम कहाण्या, 80-90 च्या काळापर्यंत खामगांवात मुला-मुलींची मैत्री नसायची. बोलणे सुद्धा अगदी माफक असे. तसे या हॉटेल मध्ये मुली क्वचितच येत. आमच्या एका मित्राने (नांवाचा उल्लेख मुद्दाम टाळला) त्याला भावलेल्या एका मुलीला हॉटेल वरील पो-याला सांगून तिच्या टेबलवर चहा पाठवला होता. कारण तेंव्हा थेट सोबत चहा प्यायला घेऊन जाणे शक्य नव्हते किंवा "चल चहाला" असे म्हणण्यापर्यंत त्या मित्राचीच काय कुणाचीही बिशाद नव्हती. या ठिकाणी मुलेच मुलांचा पत्रलेखनाचा पिरेड घेत असत. ती कोणती असत हे काय सांगणे लगे ? कॉलेजच्या निवडणुका असल्या की, निमवाडीच्या हॉटेलात उत्साही उमेदवार व त्याचा कंपू "अपने को जिताना रे पोट्टो" म्हणत चहा पाजत असे व कचो-या खिलवत असे. चहाला कुणी प्रायोजक नसला की TTMM (तुझे तू माझे मी) असा खर्च करणे किंवा काटाकाटी अंतर्गत चहापानाचा कार्यक्रम होत असे.हा काटाकाटी खेळ कागदावर अंक लिहून एक एक जण नंबर सांगत असे व ते एक मित्र काटत (खोडत) असे.शेवटी ज्याने नंबर सांगितला परंतू सर्व नंबर काटले गेलेले असले की बिल ज्याचा नंबर कटला नाही त्याला भरावे लागे, चहाची उधारी व त्या गमती सुद्धा खूप घडायच्या. TTMM , काटाकाटी चा शोध कुणी लावला कुणास ठाऊक परंतू खिशात पैसे कमी असल्याने त्यांचा शोध लागला असावा. तेंव्हा पॉकेटमनी सुद्धा एखाद्यालाच मिळत असे तो ही मोठ्या मुश्कीलने. कडुनिंबाच्या जशा अनेक निंबोळ्या पडतात तशा अनेक आठवणी येत होत्या पण त्या कडुनिंबाप्रमाणे कडु नसून मधुर  होत्या.

   दोन वर्षांपूर्वी जेंव्हा निमवाडीतील वृक्ष तोडले तेंव्हा त्या ठिकाणी गेलो होतो. सोबतीला बालपणीपासूनचा सहपाठी मित्र विशाल देशमुख होता. मित्र मंडळीच्या गलक्यात निमवाडीत जाणारे आम्ही यावेळी मात्र दोघेच होतो. नेहमी हिरवेगारदाट वृक्ष पाहिलेल्या व आता उजाड, भकास झालेल्या त्या जागेची छायाचित्रे टिपण्याची काही ईच्छा होत नव्हती. तरीही कसे-बसे काढलेच. नेहमी सुरु असणारे उपहारगृह सुद्धा बंद होते. उजाड,पुर्वी नैसर्गिक छायारम्य वातावरण असलेल्या निवांत निमवाडीतून चहा नाश्ता व त्याहीपेक्षा जास्त आनंददायी अशा पुनश्च रिक्रियेट करणा-या गप्पा यांनी ताजे-तवाने होऊन आम्ही परतत असू. यावेळी मात्र आम्हाला तिथे चहा घ्यायला जागाच नव्हती, सावलीचा पत्ताच नव्हता, पुर्वीच्या निमवाडीच्या स्मृती घेऊन आम्ही तिथून काढता पाय घेतला.

    आज निमवाडीतून जातांना गुळगुळीत रस्ता आहे .नवीन व्यक्तीला येथून जातांना चांगलेच वाटेल. परंतू वर्ष 2018 पुर्वी येथे चहा , नाश्त्यासाठी गेलेल्या किंवा येथुन गेलेल्या वाटसरूंना जिथे कधी भले मोठे कडुनिंब , दाट सावली , सुखद नैसर्गिक थंडावा होता ते सर्व हरवलेले हे ठीकाण भकासच नाही का वाटणार ? 

(धुम्रपान आरोग्यास घातक व जीवघेणे आहे)

क्रमश:

३ टिप्पण्या: