२५/०२/२०२१

An article about the childhood stories of Post Mortem house

चिरफाड बंगला

आता हे स्थान पुर्वीच्या ठिकाणी नाही पण का कोण जाणे, खामगांवातील भकास स्थानांचा विचार करतांना माझ्या डोळ्यासमोर हे जुने स्थान कित्येकदा आले पण अशी स्थाने ही कोणत्याच शहराची शान नसतातच म्हणूनच नुकत्याच संपुष्टात आलेल्या लेख मालिकेत या स्थानाचा अंतर्भाव केला नाही. मृत्यू अंतिम सत्य आहे. कविने “मौत तू एक कविता है” असे जरी म्हटले असले तरी मृत्यू व तत्संबंधीत बाबी या भकासच नाही का वाटंंत. हा लेख वाचतांना कदाचित काहींना ब-यावाईट, कटू प्रसंगाचे स्मरण होईल असे वाटले तेंव्हा त्यांना कुठेही दुखवण्याचा व वेदना देण्याचा मुळीच हेतू नाही हे जाणावे. असे झालेच तर त्यांनी क्षमा करावी. जेंव्हा आपण दुस-याचे अश्रू पुसू शकत नाही तेंव्हा निदान त्याच्या डोळ्यात अश्रू येतील  असे तरी काही करू नये हे ज्ञात आहे. केवळ एक स्थान व उपयोगातून निघून गेलेला शब्द म्हणून हा लेख लिहिला आहे.

संग्रहीत चित्र 

    भुतांचा वास असलेल्या टॉकीज बाबत मागील लेख लिहिल्यानंतर डोक्यात ब-याच वेळ भुतप्रेतादी खुप विचार आले. त्यातूनच चिरफाड बंगला आठवला. "चिरफाड बंगला" खुप दिवसानंतर वाचला असेल ना हा शब्द ? इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु झाल्यापासून व त्यांचे स्तोम अगदी ग्रामिण भागापर्यंत पोहचल्यापासून अनेक मराठी शब्दांचा प्रयोग होणे बंदच झाले. त्यातलाच हा एक शब्द या शब्दातील बंगला हा शब्द सुद्धा हिंदी भाषेतून आलेला असावा. तसेच हिंदी व मराठी या बहिणीच असल्याने चिरफाड या शब्दातील चिर व फाड हे दोन्ही शब्द हिंदी व मराठी भाषेत उपयोगात आणले जातात. बंगल्यासाठी मराठीत वाडा हा शब्द प्रचलित होता. लहानपणी केंव्हातरी कुणाच्या मुखातून चिरफाड बंगला हा शब्द कानी पडल्याचे स्मरते. कोणत्या घटनेबाबत त्यांनी हा शब्दप्रयोग केला होता ती घटना काही आता लक्षात नाही परंतू हा शब्द काहीतरी वेगळा वाटला व म्हणूनच तो लक्षात राहिला. “चिरफाड बंगला“ म्हटल्यावर एक मोठे दोन मजली , आजूबाजूला ऐसपैस जागा असलेल्या घराचे चित्र माझ्या डोळ्यासमोर तरळले होते. चिरफाड काय ? कशाची चिरफाड ? हे बालवयात काही समजले नव्हते. परंतू पुढे या शब्दाचा अर्थ समजला. रेल्वे लाईनच्या पलीकडे जयपूर लांडे या गावाकडे जाणा-या जुन्या रस्त्यावर हा बंगला असल्याचे व तिथे अपघाती मृत्यू झालेल्यांच्या मृत शरीराची चिरफाड केली जाते व मृत्यू कशामुळे झाला याचे निदान केले जाते असे कळले. पुढे चिरफाड बंगल्याचे समानार्थी असे “शवविच्छेदन गृह”, इंग्रजीतील “पोस्टमार्टम हाऊस” या शब्दांची सुद्धा शब्दसंग्रहात भर पडली. कधीतरी एकदा हा चिरफाड बंगला पहिल्यांदा पाहीला , अर्थात बाहेरूनच आणि लहानपणी या बंगल्याचे जे चित्र माझ्या डोळ्यासमोर तरळले होते ते साफ बदलून गेले. बंगला कसला एक छोटी तीन, चार पाय-या असलेली कौलारू खोली होती ती. 35-40 वर्षांपुर्वीच्या खामगांवात रेल्वे लाईनच्या पलीकडे फार मोठी वस्ती म्हणून नव्हती. जयपूर लांडे नाक्याच्या पलीकडे त्यावेळी डाव्या बाजूने एक जुने घर होते व त्या समोर आमचे मित्र रोहणकार बंधू यांनी घर बांधले होते. रोहणकार व आणखी बोटावर मोजता येतील अशी काही घरे होती. समन्वय नगर , झिया कॉलनी , क्रीडा संकुल त्याच्या आजूबाजूची वस्ती हे काही नव्हते त्या काळातील ही गोष्ट. आमचे घर हे समन्वय नगरच्या समोरच्या भागात परंतू रेल्वेलाईनच्या पश्चिमेकडील भागात असल्याने समन्वय नगराचा काही भाग आम्हाला दिसतो पण चिरफाड बंगला मात्र दृष्टीस पडत नसे. एखाद्या वेळी एखादी रुग्णवाहिका काळीज चिरणारा भेसूर सायरन वाजवत या भागात आली की नागरिकांत चर्चा होऊ लागे. मुलांच्या चर्चा काही औरच असत. “रात्री चिरफाड बंगल्यातून आवाज येतात बर !” , “अरे रात्री तिथे कोणी नसते पण लाईट लागतो व बंद होतो” , “एकदा मुडदा उठून बसला तर सर्व पळून गेले होते” , “अरे बाबा रात्री तिकडून कोणी नाही जात तू पण नको जात जाऊ” एखादा मुलगा सर्वांवर कुरघोडी म्हणून “अबे मला खिडकीतून कुणी तरी हात दाखवला होता” , "अरे एकदा मी तिकडून येत होतो तर माझ्या मागून कुणी तरी चालत होते, मागे पाहिले तर एक काळे कपडे घातलेला माणूस हवेत उडून गेला." अशा थापा ठोकून देई. याच थापा मग आणखी तिखट-मीठ लाऊन पुढे सांगितल्या जात असत. अशा स्वरूपाच्या त्या चर्चा असत.तिथल्या कर्मचा-याबाबत सुद्धा एकप्रकारचे भय लहान मुलांना वाटत असे किंवा मोठी मुले त्यांना घाबरवून देत असत. पण आम्हाला इंग्रजीत "Ghost Nonsense" हा पाठ होता. भुते नाही तर भीती माणसाला मारते असा त्याचा मतितार्थ होता. या धड्यामुळे वरील भाकडकथा या निव्वळ थापाच असल्याचे जाणवत असे.

    चिरफाड बंगल्याची उपयोगिता त्याकाळात कमी होती. आज वाढलेले वाहनांचे प्रमाण व त्यामुळे होणारे अपघात , भौतिक सुखांचे वाढलेले प्रचंड आकर्षण, अनावश्यक गरजा, ताण-तणाव, नैराश्य यांमुळे वाढलेले आत्महत्यांचे प्रमाण , वाढता हिंसाचार , शहरांतील टोळीयुद्ध , रोज होणा-या हत्या , सामुहिक हत्या हे जुन्या काळापेक्षा निश्चितच वाढलेले आहे. पुर्वी क्वचितच ऐकू येणारे ते भेसूर भोंगे नित्याचेच झाले आहेत. त्यातले भेसूरपण सुद्धा आता तितकेसे जाणवत नाही. लहानपणी पाहिलेल्या त्या चिरफाड बंगल्याचे स्थान त्याच्या आजूबाजूस वसाहत वाढल्यावर बदलले. चिरफाड बंगल्याचे स्थान भकास नसून चांगले असावे असे काही म्हणायचे नाही तथापी या अशा स्थानाची मुळी आवश्यकताच पडायला नको असे मात्र वाटते. कुणाचाही असा मृत्यू होऊ नये की ज्याचे कारण शोधण्याचे, निदान करण्याचे काम त्याच्या मरणोपरांत पडावे. परंतू असे या झपाट्याने बदलणा-या जगात , बदलत्या नैतिक मूल्याच्या काळात , मानवता , आध्यात्मिक वाचन लोप पावत जात असलेल्या काळात , भौतिक सुखासाठी एकमेकांचे खून पाडल्या जाणा-या , मोबाईल फोनसाठी  आत्महत्या  होणा-या , पूर्वीपेक्षाही वाढलेल्या जातीयवादाच्या या काळात मॉब लिंचिंग, ऑनर किलिंगच्या काळात हे घडू शकेल का ? या जगतात शांतता , सौहार्दता जो पर्यंत प्रस्थापित होणार नाही तो पर्यंत हे चिरफाड बंगले असेच राहतील का ? असे प्रश्न , अशा विचारांची चिरफाड डोक्यात होऊ लागली होती. तेवढ्यात एक रुग्णवाहिका तोच भेसूर आवाज घोंघावत वेगात जात असल्याचा आवाज माझ्या कानी आला. नुकत्याच डोक्यात येऊन गेलेल्या चिरफाड बंगला , अकाली, अपघाती  झालेले मृत्यू या विचारांमुळे आपल्या भारतीय संस्कृतीने दिलेला उपनिषदातील सर्वांच्या आरोग्यासाठीचा  

"सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दु:खभागभवेत " 

हा मंत्र आठवला आपसूकच सर्वांच्या कल्याणासाठी असलेला तो प्रार्थनारुपी मंत्र मनातल्या मनात म्हटल्या गेला व मी टाईप करणे थांबवले.

1 टिप्पणी: