०४/०३/२०२१

Article about society support to misdoing by politicians

 धोकादायक पायंडा पडण्याची शक्यता

मागे एका अतिरेक्याच्या अंत्यविधीच्या वेळी मुंबईत मोठा जमाव गोळा झाला होता. देशविरोधी , अनेकांच्या हत्येचे पातक असलेल्याच्या मागे त्याचा समाज कसा काय उभा राहू शकतो किंवा एकत्रित येऊ शकतो ? गुंड जामिनावर सुटला की त्याची मिरवणूक निघते. एखाद्या व्यक्तीच्या संशयास्पद मृत्यूची सुई ज्याच्यावर येऊन थांबते त्याच्याही पाठीशी त्याचा समाज कसा काय उभा राहू शकतो? कायदेशीर प्रक्रियेने जर तो आरोपी निर्दोष आढळला तद्नंतर जर समाजाने त्याचे गुणगान केले , समर्थन केले तर ते समजू शकते.

गुन्हे हे अनादी अनंत काळा पासून घडत आले आहेत. काल परत्वे नियम , कायदे बदलत गेले व त्यानुसार शिक्षा सुद्धा बदलत गेल्या. शिवाजी महाराजांनी रांझाच्या पाटलाने बलात्कार केला म्हणून त्याचा चौरंगा केला होता. अशी शिक्षा आता होणे शक्य नाही. जरी तेंव्हा राजेशाही असली तरी रांझाच्या त्या आरोपीच्या मागे तेंव्हा त्याच्या समाजातील  कुणी उभे राहिले नव्हते. पुतण्याच्या हत्येच्या आरोपाखाली स्वत:च्याच पालनहाराला अर्थात रघुनाथरावांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा रामशास्त्री प्रभूणे यांनी ठोठावल्यावर रघुनाथरावाच्या समाजाने प्रभुणे यांना सल्ले दिले नव्हते. मात्र या झाल्या आपल्या गौरवशाली अशा ऐतिहासिक गोष्टी. एक म्हण आहे पुराणातील वानगी (वांगी नव्हे) पुराणातच. पुराणातील कितीही चांगले दाखले आपल्यासाठी असले तरी त्यातून शिकणारे , आदर्श घेणारे फार थोडे असतात. सद्य स्थितीतील राज्याच्या राजकारणात ही म्हण तंतोतंत लागू पडते हे आपल्याला काही लोकप्रतिनिधींच्या प्रतापावरून दिसूनच येत आहे. कुणी एखाद्याने काही टिप्पणी केली तर त्याला मारझोड करणे,  मेसेज फॉरवर्ड केला तर ठोकणे , काहींचे माहिलांशी नाव जोडले जाणे अशी एका पाठोपाठ एक प्रकरणे सुरूच आहेत. लोकशाहीचा पुरेपूर दुरुपयोग घेणे आता आपल्या देशात सुरु झाले आहे. म्हणूनच मागे एका अतिरेक्याच्या अंत्यविधीच्या वेळी मुंबईत मोठा जमाव गोळा झाला होता. देशविरोधी , अनेकांच्या हत्येचे पातक असलेल्याच्या मागे त्याचा समाज कसा काय उभा राहू शकतो किंवा एकत्रित येऊ शकतो ? गुंड जामिनावर सुटला की त्याची मिरवणूक निघते. एखाद्या व्यक्तीच्या संशयास्पद मृत्यूची सुई ज्याच्यावर येऊन थांबते त्याच्याही पाठीशी त्याचा समाज कसा काय उभा राहू शकतो? कायदेशीर प्रक्रियेने जर तो आरोपी निर्दोष आढळला तद्नंतर जर समाजाने त्याचे गुणगान केले , समर्थन केले तर ते समजू शकते परंतू त्याचे निर्दोषत्व सिद्ध होण्याच्या आधीच केवळ तो आमचा नेता आहे आमच्या समाजाचा आहे म्हणून दबाव आणणे हे कितपत योग्य आहे ? एखाद्या आरोपीच्या मागे उभे राहणे हे संवैधानिक आहे का ? लोकशाहीत समाजाचा आधार घेऊन विविध पदे प्राप्त केली जातात, राजकारणाच्या पाय-या चढल्या जातात, बंगले, तरण तलावा सारख्या सुविधा असलेले बंगले बांधले जातात , शेकडो एकर जमिनी खरेदी होतात व मोठी मालमत्ता प्राप्त केली जाते व नंतर त्याच समाजाला सत्ता व अर्थसत्तेव्दारे आपल्या दावणीला बांधले जाते. हे कसे काय होते ? राजकारणी लोक त्यांच्या स्वत:च्या जातीचा, समाजाचा आपल्या सत्ताप्राप्ती व तद्नंतर आपली दुष्कृत्ये लपवण्यासाठी  पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. हे सध्याच्या राजकारणावरून दिसून येत आहे. निवडणूकीत प्रतिज्ञापत्र सादर करतांना सर्रास खोटी माहिती सादर केली जाते ते उघडकीस आल्यावरही कुणी काहीही बोलत नाही. एखाद्यावर आरोप झाल्यावर त्याच्यावर कारवाईची मागणी करणा-यांना सुद्धा इशारे दिले जातात. हे काय चालले आहे ? हे सर्व कशामुळे होते आहे तर अद्यापही आपल्या स्वार्थासाठी राजकारण्यांनीच टिकवून ठेवलेली जाती व्यवस्था , वर्गवारी. आपल्या मतपेढ्या बळकट करण्यासाठी राजकारण्यांनी जातीवाचक संघटना , विविध समाजांच्या संघटना, विविध जातींची समाज भवने इ. जातीभेद कायम राहील अशा अनेक गोष्टी निर्माण केल्या. शाळकरी मुलांना अगदी बालवयातच जात माहित होते. याच जातिभेदाचा फायदा हे राजकारणी आपल्या पोळ्या शेकण्यासाठी करतात व भोळा भाबडा समाज त्यांच्या मागे उभा ठाकतो. भारताला या जातिव्यवस्थेचा गंभीर परिणाम भविष्यात नक्कीच भोगावा लागेल असे आता वाटू लागले आहे. अगदी सुरुवातीपासूनच आरोपीच्या मागे उभे राहणे म्हणजे पुढील कायदेशीर बाबी , न्यायालयीन प्रक्रिया यावर सुद्धा त्याचा हमखास प्रभाव पडेल. यत्कदाचीत एखादा आरोपी यातून गुन्हा असतांनाही सहीसलामत सुटला तर त्याचा फायदा भविष्यात तत्सम कृत्य करणा-याला सुद्धा घेता येऊ शकेल. या सर्व बाबींचा समस्त सुज्ञ व सुशिक्षित जनतेनी, अधिकारी वर्गानी , हुशार व देशहितैषी राजकारण्यांनी विचार केला पाहिजे. आता असा विचार होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सरकारने या बाबतीत गांभीर्याने विचार करणे जरुरी आहे. अर्थात तसा होईल की नाही सांगता येत नाही याचे कारण सुद्धा वरील बाबींवरून लक्षात आलेच असेल. आपले राज्य , आपला देश यांचे भविष्य उज्वल झाले पाहिजे. आगामी पिढ्यांनी आपल्याला द्रष्टे , विकासाभिमुख , सच्चे देशप्रेमी म्हणून ओळखले पाहिजे असा विचार राजकारणी लोकांच्या मनात येतो की नाही देव जाणे. जनतेने नीरक्षीरविवेक बुध्दी जागृत ठेवावी. कुणाची पाठराखण करावी व कुणाची नाही याचा विचार तमाम जनतेने करायला हवा. अन्यथा धोकादायक पायंडा पडण्याची शक्यता आहे व त्याचे गंभीर परिणाम आपल्या देशाला व आगामी पिढ्यांना भोगावे लागतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा