२४/०३/२०२१

Article on sad demise of a friend due to Covid-19

 दिनुचे_जाणे 

सर्व मित्रपरिवार व कुटुंबियांना धक्का देणारी, वेदना देणारी बातमी म्हणजे दिनुच्या जाण्याची. माझ्या भाच्याने मला जेंव्हा त्याच्या निधनाचा मेसेज केला तेंव्हा मला मोठा धक्का बसला , दु:ख झाले. दिनु म्हणजे खामगांव डाक विभागात कार्यरत दिनेश बोडखे #DineshBodkhe . दिनुच्या आणि आमच्या परिवाराचा 40 किंवा त्याहुनही अधिक वर्षांपासूनचा परिचय. लहानपणी माझी व दिनुची फारशी मैत्री नव्हती. आमची मैत्री फार उशीरा झाली. तसा तो माझ्या काकांचा मित्र. दोघांच्या वयात मोठे अंतर असले तरी दृढ मैत्री होती. काकांबद्दल त्याला फार आदर होता. दिनुचे वैशिष्ट्य म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्व , चांगले संवाद कौशल्य , अनेकांशी मैत्री , कोणतेही काम यशस्वीतीकडे नेण्याचे कौशल्य, गाड्या चालवण्याची , प्रवास करण्याची प्रचंड आवड. राहणीमान एकदम टापटीप, डोळ्यावर गॉगल , पायात बुट, ड्रेस , राहणे अगदी एखाद्या हिरो सारखे होते. पोस्टाने त्याच्या उल्लेखनीय कामकाजाचा प्रमाणपत्र देऊन गौरव सुद्धा केला होता. दिनु सर्वांच्या मदतीस तत्पर असे. एकदा मला अकोट पोस्ट ऑफिस मध्ये महत्वाचे काम होते. लवकर पोहोचणे आवश्यक होते. दिनु म्हणे “चल न बे मै हुं ”. त्याने बरोबर दोन्ही ऑफिसमध्ये बोलणे केले व त्याच्या आवडत्या MAX 100 गाडीवर आम्ही अकोटला गेलो होतो. येण्यास रात्र झाली होती. तेंव्हा मोबाईलचे आगमन झाले नव्हते. बाईक वर किशोरकुमार , अमित कुमारची गाणी म्हणत आम्ही आलो होतो.तो   गाडी एकदम condition मध्ये ठेवत असे. नंतर त्याने बुलेट पण घेतली होती. हिंदी गाणी, प्रवास, ड्रायव्हिंग हे त्याचे व माझे समान आवडीचे विषय. त्याला भेटले की खुप गप्पा व अनेक किस्से तो सांगत असे. माझ्या काकांच्या मृत्यूनंतर त्याच्या व माझ्या भेटी गाठी कमी झाल्या. मला एक दिवस त्याची आठवण आली मी लगेच पोष्टात गेलो. "Good Morning , बोलो बॉस , कसा काय इकडे , काय काम आहे?" तो म्हणाला. "अरे फक्त तुलाच भेटायला आलो , काही काम नाही" असे मी म्हटल्यावर त्याला खूप आनंद झाला होता. त्याला केंव्हाही भेटलो की तो Good Morning म्हणत असे. खुप गप्पा-टप्पा झाल्यावर मी निघायला लागलो तर “अबे बस” तो अनेकदा असा आदेश दिल्यासारखा बोलत असे. मग आणखी थोड्यावेळ बसलो होतो. त्यानंतर मागच्या वर्षी माझ्या भाच्याला पोस्टाचे कॉल लेटर आले, भाचा बाहेरगावी होता तेंव्हा दिनुने ते पत्र त्याच्या पर्यंत पोहचवण्याची शक्कल काढून खूप मदत केली होती. त्यानंतर सर्व प्रक्रिया पार पडून भाचा पोष्टात रुजू झाला. आता काही दिवसांपुर्वी कोर्टासमोर आम्ही समोरा-समोर आलो. तो त्याच्या कार मध्ये मी बाईकवर मग आमचे फक्त स्माईल झाले होते. मला काय माहित हीच आमची दोन मिनिटांची भेट शेवटची भेट असेल. त्याचे व माझे अनेक मित्र common आहेत त्यामुळे अनेकांचे फोन आले , सर्वच त्याच्या जाण्याने शोकसागरात बुडाल्याचे जाणवले. दिनु अचानकपणे प्रवासाला जात असे. फोन केला की अरे मी इकडे आहे , मी गाडीत आहे असे उत्तर येई , कधी कार मधून सुसाट वेगाने जातांनाचा व्हीडीओ येई. त्याच्या या अशा अचानक प्रवासाला जाण्याचे अनेकदा आश्चर्य वाटे. आज सुद्धा अंतिम प्रवासाला जातांना त्याने तसेच केले. कोरोना विषाणूची लागण व त्याचे शरीरात मोठ्या प्रमाणात संक्रमित झाल्याने दिनु गेला. दिनुचे हे असे अचानक जाणे त्याच्या परिवारास समस्त मित्र परिवाराला मोठ्या वेदना व धक्का देऊन गेले. या धक्क्यातून सावरण्यास ईश्वर त्याच्या कुटुंबियांना बळ देवो. दिनुलाही शब्दरुपी श्रद्धांजली अर्पण 🙏



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा