२५/०३/२०२१

Common mans views on 100 Crore extortion allegation by ex COP, Mumbai

 हे त कुबेरच असतीन भाऊ


इकास गिकास रायला न बे बाजूले अन याईचा तर सोताचाच इकास चालू असते गड्या. म्या तेच म्हनतो की सायीच याईच्या कडे इतल्या झकास गाड्या , अन हे मोठाले घर , ह्या जमिनी, कसच काय जमते ? सायीच आपन शेतीत घाम गायतो , आपल्याले कधी पीक येते तर कधी नाय , ना पिकाले भाव भेटते , लाख भर रुपये बी नायी पायले राजा म्या आजलोक अन हे सायीच शंभर करोड ऐकून त माये डोयेच फिरले न गड्या.

माझा एक खेड्यातील मित्र मला परवा संध्याकाळी घराजवळच फिरत असतांना भेटला. राम-राम झाल्यावर, थोडेफार ख्याली-खुशाली , राजकारण असे बोलणे झाले. मग तो म्हणाला "शंभर कोटी घेतात मंजे हे त कुबेरच असतीन भाऊ." तो बोलत होता मी ऐकत होतो. "अनिल भाऊ देशमुख याईच्यावर म्हने त्या परमवीरसिंगन लेटरबॉम्ब टाकला. म्या त अचंबितच झालो गड्या. कस काय करत असतीन हे जुगाड बे ? अरे याईले लेका निवडून देते लोक , कायच्यासाठी रे ? तो इकास गिकास रायला न बे बाजूले अन याईचा तर सोताचाच इकास चालू असते गड्या. म्या तेच म्हनतो की सायीच याईच्या कडे इतल्या झकास गाड्या , अन हे मोठाले घर , ह्या जमिनी, कसच काय जमते ? सायीच आपन शेतीत घाम गायतो , आपल्याले कधी पीक येते तर कधी नाय , ना पिकाले भाव भेटते , लाख भर रुपये बी नायी पायले राजा म्या आजलोक अन हे सायीच शंभर करोड ऐकून त माये डोयेच फिरले न गड्या. आमची बायडी म्हने पाय न जमते क्या तुमाले घुसा न राजकारनात. आता इले काय सांगता किती सतरंज्या उचला लागतात. काई काई त नीरा सतरंज्या उचलत रायतात अन हे पुढारी यायच्याच घरचा एखांदा पुढ करतात वक्तावर मंग आपल्या सारखा बसते न बोंबलत. फिरत रायते नीरा भैकान्यावानी मंग. ते म्हने मंग याईच जुगाड कसं काय जमते मंग ? मी म्हनल राजकारनात कायले जायचं व हा असा पैसा कमवायले का ? ते जाऊ दे तू च्या आन बर. तीनं च्या आनला गड्या मले त कपाची दांडी फुटेल . मी म्हनल च्या मारी आपल्या कडे च्याले कप नायी , सा-याइचे पोर लगे इंग्रजी शाळेत जातात आपल्या पोराईले झेड पी त जा लागते , त्याईले कपडे नायी , बायकोले साड्या नायी अन हे त करोडो त खेळून रायले न बे सांग न मले कायी गड्या." त्याचे बोलणे सुरुच होते मी निरुत्तर होऊन ऐकून राहिलो होतो. मान डोलवत होतो. "अरे बाबा आता काय बोलणार. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही." मी उत्तरलो . "शानपन चालत नायी मंग आपन काय असच दलीनदरीत राह्याच अन याईनं श्यानशौक क-याचे का ? तो. मी पुन्हा गप्प. तो बोलतच होता , रागात होता ,वाड-वडीलां पासून गरीबीत जीवन जगलेला तो भ्रष्टाचार , खंडणी वसुलीच्या या बातम्या ऐकून वैतागला होता. त्याच्या मनातील पूर्ण भडास निघू द्यावी म्हणून मी केवळ शांतपणे त्याचे ऐकत होतो. "तू काऊन कायी बोलत नायी गड्या ?" तो म्हणाला. “अरे बाबा काय बोलणार तुला आठवते का आपण लहान होतो तेंव्हा हर्षद मेहताने पंतप्रधान नरसिंहराव यांना 1 करोड रु असलेली सुटकेस दिली होती. अरे भ्रष्टाचाराचे अशी कितीतरी उदाहरणे आपल्या देशात आहेत क्वचितच काही नेत्यांना शिक्षा झाली आहे. आता या शंभर करोड वसुली प्रकरणात सचिन वाझे हा जो आरोपी आहे हा निलंबित होता. तरी त्याला पुन्हा पोलीस खात्यात आणले गेले. तो मर्जीतला होता, एखादा सामान्य कर्मचारी होऊ दे बर निलंबित त्याला कोणी विचारत नाही. देशहीत कमी आणि स्वहित जास्त असे हे आताचे राजकारण आहे बाबा.” मी पुन्हा उत्तरलो. "पन लेका आपल्याले जे निवडून देतात त्या मतदाराईची काय गत आहे , त्याईची हालत कशी हाय याचा कायी इचार याईन करायले पायजे का नायी ? नीरा पैस्याच्या मागे लागून रायले न बे. अठी लेका मानूस गरीबीन परेशान त्यात हा करोना इषाणू , सॅॅनीटायझरच्या बाटल्या, मास्क यातच पैसा चालला अन हे या महामारीत बी करोडो कमाऊन रायले. बाबासाहेबाच , शाहू , फुले , सारख्या सा-याच मोठ्या लोकाईचे नांव घेऊ-घेऊ बंगले बांधून रायले , त्याची दुरुस्ती बी सरकारी पैस्यात करू रायले. कुटी घेऊन जानार बे इतल सारंं ? सायीच आपल्याले अडाणी मानसाले हे समजते याईच्या डोक्यात कुटून हे पैश्याच भुत घुसते काय ठाव?" त्याची ती उद्विग्नता , नैराश्य, नेत्यांचा थाट-माट, पैसा अन जनतेची गरीबी हे पाहून तो जे बोलत होता ते बोलणे अगदी सत्य होते पण करणार काय ? या देशात असे कितीतरी गरीब लोक आहेत बिचारे इमानदारीने जीवन व्यतीत करीत आहेत. मध्यमवर्गीय कराचा भरणा करीत आहे. परवा तर एका भिकारी स्त्रीने विद्युत बील भरले. ही बातमी ऐकून तर मला त्या भिकारी स्त्री बद्दल आदर निर्माण झाला. कुठे सरकारी निवासस्थान सोडायला सांगितल्या वर तिथे तोडफोड करणारे, विद्युत बिले थकवणारे हे नेते अन कुठे ती भिकारी स्त्री. शेवटी मी त्याला म्हटले "जाऊ दे बाबा काय करणार ?" तो म्हणाला "बर गड्या जाऊ दे " वर बोट दाखवून तो म्हणाला " पन हे भ्रष्टाचारान कुबेर होयेल हाय , हा पैसा पचत नायी , देव बरोबर करते , भरतेच न पापाचा घडा कधीना कधी, चाल जातो गड्या आता, उद्या बुडा बुडीले लस साठी आनतो सरकारी दावखान्यात" असे म्हणून तो जाऊ लागला व मी अनितीने पैसे कमावणारे  भ्रष्ट नेते, नोकरशहा व गरीबीत सुद्धा नितीने राहणारे लोक यांचा विचार करत घराकडे जाऊ लागलो.

1 टिप्पणी:

  1. अत्यंत मार्मिक लेख आहे. जनसामान्यांना हे समजायला पाहिजे की का एखाद्या गरीबचा सज्जन मुलगा उमेदवार म्हणून निवडून द्यावा!
    ह्या हरामखोरांनाची मक्तेदारी मोडीत काढून दाखविली पाहिजे.
    जातीवाद मोडून काढला पाहिजे.

    उत्तर द्याहटवा