२०/०५/२०२१

This article is written in Oct 2016 as a letter to a most desceplined and famous Headmistress Aney madam of Khamgaon

एक पत्र एका आदर्श मुख्याध्यापिकेस

6 मे गुरुवार रोजी "आमच्या बाई" हा आमच्या बालवाडीच्या शिक्षिके बाबत  लेख लिहितांना सुप्रसिद्ध ,शिस्तप्रिय अशा अणे  मॅॅडम यांची आठवण झाली. अणे मॅॅडम ह्या खामगांव शहर व परीसरातील गावांत एक शिस्तीच्या मुख्याध्यापिका म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या काळात अनके पालक आपल्या मुलांचा प्रवेश  डोळे लाऊन नॅॅशनल हायस्कूलमध्ये करीत यांत अणे  मॅॅडम या नावाचा मोठा वाटा होता. त्यांच्या कारकिर्दीत अ.खि. नॅॅशनल हायस्कूलचा नावलौकिक वृद्धिंगत झाला होता. वर्ष 2016 मध्ये अणे  मॅॅडम यांना  फेसबुकवर एक पत्र लिहिले होते त्या पत्राची आठवण झाली व ते सुद्धा प्रसिद्ध करावेसे वाटले. 

ति.स्व अणे मॅडम,

शि.सा.न

केवळ मॅडम न लिहिता अणे मॅडम लिहिले, कारण तुम्ही त्याच नावाने जास्त लोकप्रिय. सोशल मिडीयाच्या माध्यमामुळे पुनश्च आपल्या संपर्कात येण्याचे भाग्य लाभले. आम्हा सर्वाना खूप अभिमान आहे की तुमच्या सारख्या मुख्याध्यापिका असताना आम्ही अ.खि, नॅशनल हायस्कूलचे विद्यार्थी होतो. शिस्त काय असते, मुख्याध्यापकाचा दरारा कसा असतो,आदरयुक्त भिती कशी असते, प्रसंगी कठोर आणि प्रसंगी मृदू कसे व्हावे, हे सर्व आम्हाला तुमच्या कारकिर्दीत समजले. संस्कार हे वरिष्ठांच्या वागणुकीतून आपसूकच होत असतात. तसे तुमच्यामुळे आम्हा अनेक विद्यार्थ्यांमध्ये झाले. आताच्या अनुदानित शाळांमधून मात्र हे सर्व हद्दपारच झालं मॅडम. मी 1984 मध्ये आपण मुख्याध्यापिका असतांना शाळेत प्रवेश घेतला होता. वर्ग 5 वा ई मराठी माध्यम. शाळा सुरु होऊन काही दिवस होत नाही तो तुमच्या कार्यालयात जाण्याचा योग आलाच. योग चांगल्या कारणाने आला नव्हता त्यामुळे मनात भीती होती. एका मुलाला मी व आनंद चितलांगे याने मारले होते म्हणून आम्हाला आपल्या कार्यालयात नेण्यात आले. लहान वय असल्याने वरीष्ठांसमोर कसे उभे राहावे ते पण कळत नव्हते, मी आपला दोन्ही हात कमरेवर ठेवून आपल्याशी बोलत होतो. तुम्ही दरडावून सरळ उभे राहण्यास सांगितले, आम्हाला चांगली ‘समज’ दिली. तुमच्या धाकाने पुन्हा आम्ही तसे कृत्य करण्यास धजावलो नाही. वर्ग सहावीत मी मॉनिटर झाल्यावर सर्व वर्गांच्या मॉनीटर सभेत तुम्ही आम्हाला उद्बोधन केले. तेंव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती, तुम्ही म्हणाल्या “आपल्याला सतवंतसिंग, बेअंतसिंग बनायचे नाही तर चांगल्या वागणुकीने नाव कमवायचे आहे.” तुमचा तो संदेश अजूनही स्मरणात आहे मॅडम. त्यानंतर चंद्रिका केनिया शाळेत आल्या होत्या तेंव्हा तो कार्यक्रम तुम्ही किती शिस्तीत पार पाडला होता. आम्ही वर्ग दहावीत असताना तुमच्या लक्षात नव्हते की ‘सिव्हील ड्रेस” चा दिवस आहे तुम्ही एकेका मुलाला घरी पाठवण्यास सुरुवात केली परंतू एकाची सुद्धा सांगण्याची हिम्मत झाली नव्हती. नंतर कुणी तरी तुम्हाला आठवण करून दिली तेंव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना प्रेमाने परत बोलावले. असे कितीतरी किस्से अनेक विद्यार्थ्यांच्या कायमस्वरुपी आठवणीत आहेत. 

     संस्थाचालक, सहकारी शिक्षकवृंद, विद्यार्थी सर्वाना तुमची आदरयुक्त भीती असायची. अ.खि. नॅशनल हायस्कूल म्हणजे पालक डोळे झाकून त्यांच्या पाल्यांना प्रवेशीत करायचे. आता खंत आहे की फार कमी शाळांत अणे मॅडम, तत्कालीन न्यू ईरा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.शंकरराव तायडे सर यांसारखे मुख्याध्यापक राहिले आहेत. ”विद्यार्थ्यांना शिक्षा करू नका” अशा फतव्यामुळे विद्यार्थी ‘सैराट’ झाले आहेत. निरनिराळ्या शैक्षणिक नसलेल्या कामकाजात शिक्षक, मुख्याध्यापक व्यस्त झाले आहेत. असो! 

आम्हाला मात्र तुमच्यासह तुमचे सहकारी शिक्षक श्री काळे सर, श्री संगारे सर , श्री पुणतांबेकर सर , लिखिते मॅडम, एम आर देशमुख सर (👈Click to read), शर्मा सर, गळगटे सर असे शिक्षक श्री नागडा, श्री कोरडे यांसारखे कार्यालयीन कर्मचारी लाभले हे आम्ही आमचे भाग्य समजतो. तुम्ही सर्व आजही आम्हा विद्यार्थ्यांच्या स्मरणात आहात. आम्ही आमच्या पाल्यांना आणि विद्यार्थ्यांना तुमच्याबाबत सांगत असतो. याप्रसंगी संत कबीराचा दोहा आठवतो

सब धरती कागज करू , लेखनी सब वनराय

सात समुद्र की मसी करू , गुरु गुण लिखा ना जाय

त्यामुळे येथे पत्रास विराम देतो. काही चुकले असल्यास क्षमस्व.

तुम्हास सुख समृद्धी, आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना 

तुमचा विद्यार्थी 

विनय विजय वरणगांवकर, खामगांव

1/10/2016

१३/०५/२०२१

Article about Dev Anand's musical hit movie Tere Mere Sapne, 1971 , which was dedicated to Doctors and medical workers.

 तेरे मेरे सपने  



   तेरे मेरे सपने या वैद्यकीय पेशास समर्पित चित्रपटाचे स्मरण झाले. भारतातील गरीब रुग्णांना सहाय्य करणारे या चित्रपटातील डॉ आनंद सारखे अनेक डॉक्टर या देशात तयार व्हावेत , त्यांना शासनाचे,जनतेचे सहकार्य मिळावे,पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळाव्यात,त्या अभावी कुणी तडफडून मरू नये हेच या देशातील जनतेचे अर्थात तुमचे आमचे म्हणजेच तेरे मेरे सपने नाहीत का ?

     वर्ष 2013 पासून दर गुरुवारी नित्य नेमाने लिहित आहे. सुरुवातीला काय लिहिणार ?,  कसे लिहिणार ? , विषय काय घ्यायचे ? असे प्रश्न पडायचे. परंतू एवढ्या मोठ्या जगतात कितीतरी घटना घडतात , काही प्रेरणादायी गोष्टी असतात , राजकारण तर आहेच , चित्रपट , गाणी असे कितीतरी विषय आहेत की ज्यावर लिहिता येऊ शकते व तसे लिहू लागलो व बघता-बघता शेेेकडो लेख लिहिले. या गुरुवारचे म्हणायचे तर काल पर्यंत काही विषय डोक्यात नव्हता परंतू काल , इस्त्रायल मधील युद्धजन्य स्थिती,  संजय गायकवाड यांचे देव देवळात बंद आहे, तुम्ही मांसाहार करा असे हिंदूंना उद्बोधन करीत केलेले वक्तव्य , आमदार रणजीत कांबळे यांनी वैद्यकीय अधिका-यास केलेली शिवीगाळ असे अनेक विषय डोक्यात घोळू लागले. पत्रकार नागरिक यांनी एखादी समस्या मांडली , त्या समस्येचा पाठपुरावा केला तर लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांना आवडत नाही व त्यामुळे घडलेले अनेक मुस्कटदाबीचे किस्से सर्वश्रुत आहेतच पण वर लिहिल्या प्रमाणे हे लोकप्रतिनिधी मात्र काहीही बोलतील ते चालते, यांच्या विरोधात किंवा नोकरशहांच्या विरोधात काही लिहिले , बोलले की मग मात्र यांचा तीळपापड होतो. शिवाय या अशा घटनांवर किती लिहिणार आणि किती बोलणार ? शीर्षक वाचून वाचकांना समस्या , राजकारण हे काय वाचत आहोत असा प्रश्न पडला असेल म्हणून आता आजच्या विषयाकडे येतो.  

नेत्यांची वक्तव्ये , समस्या , कोरोना , जागतिक घडामोडी या विचारात असतांनाच जुन्या एका चित्रपटाची बातमी वाचनात आली. 13 मे रोजी या चित्रपटाच्या प्रदर्शनास 50 वर्षे झाली. हा चित्रपट म्हणजे नवकेतनचा “तेरे मेरे सपने” . सध्या कोरोना काळात डॉक्टर , नर्सेस व सर्वच आरोग्य कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. हा चित्रपट म्हणजे एका डॉक्टरचीच कहाणी आहे. म्हणून याच विषयावर लिहिण्याचे नक्की केले शिवाय काल जागतिक रुग्ण सेविका दिन सुद्धा झाला म्हणून मग लिहू लागलो. तेरे मेरे सपने माझ्या जन्माच्याही आधी प्रदर्शित झालेला सिनेमा आहे परंतू जुन्या चित्रपटांची , गाण्यांची, सुमधुर संगीताची आवड असल्याने मी लिहिता झालो. खुप वर्षांपूर्वी एका कडक उन्हाळ्यातील दुपारी मी हा चित्रपट दुरदर्शनवर पाहिला होता. यातील कर्णसुखद अशा संगीताने व गीतांनी विदर्भातील रणरणत्या उन्हाळ्यातील त्या दुपारी मला सुखद गारवा मिळाला होता. एस.डी. बर्मन यांनी स्वरबद्ध केलीली एकापेक्षा एक अशी नीरज यांची अवीट मधुर गीते आज 2021 मध्येही तितकीच ताजी आहेत जितकी 1971 मध्ये होती. एका तरुण कन्येस अनुरूप असा जोडीदार मिळाल्यावर , अनुरागामुळे तीच्यात तिलाच जाणवलेला बदल व्यक्त करणारे “जैसे राधाने माला जपी श्यामकी” , नवीन जोडप्याच्या आजीवन सोबत राहण्याची भावना व्यक्त करणारे “हे मैने कसम ली” , नवपरिणीत जोडप्याच्या जीवनवेलीवर जेंव्हा एक फुल उमलणार असते तेंव्हा त्यांच्या मनातील विचार मांडणारे “जीवन की बगीयाँ महकेगी” अशा कवी गोपालदास नीरज या देव आनंदचेच “फाईंड” असलेल्या सुमधुर रचना रसिकांना कर्णतृप्तीचा आनंद देतात.     

 डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रास समर्पित असा हा विजय आनंद या प्रथितयश दिग्दर्शकाचा सिनेमा आहे. डॉक्टर झाल्यावर ग्रामीण भागात जाऊन तेथील गरीब रुग्णांना सेवा देण्याचे आदर्शवादी डॉ आनंद कुमार (देव आनंद) ठरवतो त्याच्या या निर्णयावर समाजाची प्रतिक्रिया , टोमणे हे अगदी मार्मिकपणे दाखवणारा हा सिनेमा आहे. एका कोळशाच्या खाणीलगतच्या गावात हा डॉक्टर सेवा देण्यास जातो. याच गावात डॉ प्रसाद हे 35 वर्षांपूर्वीच आलेले असतात त्यांच्याकडे डॉ. आनंद रुजू होतो. डॉ आनंदच्याही 35 वर्षे आधी या गावात आलेल्या डॉक्टरला परिस्थितीत काही विशेष बदल झालेला आहे असे वाटत नसल्याचे ते व्यक्त करतात. पुढे निशा (मुमताज) ही आनंदच्या जीवनात येते , अनेक रुग्ण , अपु-या वैद्यकीय व्यवस्था हे सर्व चित्र पाहून तो व्यथीत होतो, खेडेगावात रुग्णसेवेसाठी आलेल्या या डॉक्टरला त्याच्या पत्नीच्या अपघातास जबाबदार असलेला आरोपी जेंव्हा लाच देऊन सुटतो त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे  पुन्हा शहराकडे जावे लागते. या कथेत इतरही अनेक वळणे आहेत. पण सेवा म्हणून वैद्यकीय व्यवसायाकडे पाहण्याचा मुख्य संदेश देणारा हा सिनेमा आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनास काल 50 वर्षे पुर्ण झाली. हा चित्रपट ए. जे. क्रॉनीन यांच्या “सिटाडेल” या कथेवर आधारीत आहे. 

गतवर्षीपासून आपण कोरोना महामारीचा सामना करीत आहोत. 50 वर्षापुर्वीच्या अपु-या वैद्यकीय सुविधा , ग्रामीण रुग्णांचे होणारे हाल यावर भाष्य करणारा हा चित्रपट होता. चित्रपटात वैद्यकीय सुविधांची परिस्थिती 35 वर्षांपासून बदलेली नाही असा संवाद आहे. म्हणजे ती 35 व चित्रपट प्रदर्शित होऊन झालेली 50 अशा 85 वर्षांपासून आपण तिथेच आहोत का ? आज कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय सुविधा अपु-या पडत आहेत, रूग्णालये , ऑक्सिजन , औषधे यांचा आजही तुटवडा जाणवत आहेत, समाज कंटक त्यातही काळाबाजार करीत आहेत. म्हणूनच तेरे मेरे सपने या वैद्यकीय पेशास समर्पित चित्रपटाचे स्मरण झाले. भारतातील गरीब रुग्णांना सहाय्य करणा-या या चित्रपटातील डॉ आनंद सारखे अनेक डॉक्टर या देशात तयार व्हावेत , त्यांना शासनाचे व जनतेचे सहकार्य मिळावे , पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळाव्यात , त्या अभावी कुणी तडफडून मरू नये हेच या देशातील जनतेचे अर्थात तुमचे आमचे म्हणजेच तेरे मेरे सपने नाहीत का ?

०४/०५/२०२१

Article about the news published in international media about Corona Pandemic situation in India

आंतर्राष्ट्रीय माध्यमांनुसार आपले मत 

असावे का ?   

     आंतर्राष्ट्रीय माध्यमांनी जरी आज मा. पंतप्रधान यांना कोरोना परिस्थितीस जबाबदार धरले असले तरी कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी जनहित हेच सरकारचे प्राधान्य असते व त्यातही नेतृत्व जर कणखर , सक्षम असेल तर देश किती का मोठ्या संकटात असो त्यातून बाहेर येईलच असा विश्वास जनता बाळगून असते.

सध्या भारतात कोविडची दुसरी लाट आलेली आहे.  काही परदेशी वृत्तपत्रांनी दुस-या लाटेच्या गंभीर स्थितीस मोदी यांना जबाबदार धरले आहे.  पण भारतात हि लाट पसरण्यास मोदी एकटे जबाबदार ठरू शकत नाही. दुस-या लाटेच्या गंभीर परिणामास अनेक बाबी आहेत,  बेशिस्तपणा ही सुद्धा त्यातील महत्वाची बाब आहे. 

      गतवर्षी पासून चिनी विषाणूचा प्रादुर्भाव , लॉकडाऊन , ढासळलेल्या आरोग्य व्यवस्था , काळाबाजार या सर्वानी भारतच नव्हे तर संपूर्ण जग हादरून गेले आहे. दुस-या लाटेचा सामना करण्यास भारत मागे पडला अशी उक्ती अनेक लोक करीत आहेत व त्याचे सर्व खापर एकट्या मोदींच्या माथी फोडण्याचा प्रयत्न होत आहे. भारताने कोविड विषाणू आल्यानंतर लगेच लॉकडाऊन घोषित केले होते त्यास कारण म्हणजे संक्रमणाची भीती. त्यावेळी आपण कोविड विषाणूचा सामना करण्यास सज्ज झालेलो नव्हतो. त्यानंतर पिपिई कीट , औषधे , कोविड रुग्णालये आदी उभारण्यास तेंव्हा सरकारने गती दिली होती. तत्कालीन पहिल्या लाटेत , प्राणवायूचा स्तर घटण्याचे प्रमाण अत्यल्प होते , रेमडिसीवीर हे इंजेक्शन तेंव्हा इतके आवश्यक नव्हते जेवढे ते आज आवश्यक म्हणून सांगितले जात आहे. आजही अनेक डॉक्टर व जागतिक आरोग्य संघटनेने या इंजेक्शनचा वापर अत्यंत बिकट परिस्थिती असलेल्या रूग्णांसाठीच करण्याचे मत व्यक्त केले आहे. दुस-या लाटेत भारतातील दररोजची रुग्णसंख्या लाखोच्या घरात आहे, हजारो मृत्यू होत आहेत. पण त्यासोबतच भारतातील बरे होण्याचा दर सुद्धा इतर देशांच्या तुलनेत खूप चांगला आहे. काही नेत्यांनी इतर देशाला लस , ऑक्सिजन हे का पुरवले असा प्रश्न विचारला. आपल्या देशाला गरज असतांना इतरांना का पुरवठा करायचा ? परंतू आयात- निर्यात , विदेश धोरण या सर्व बाबी सुद्धा विचारात घेतल्या पाहिजे. शिवाय आपल्याला सुद्धा इतर देशांनी मदत पुरवली आहे. मग ती मदत आपण कशी स्विकारतो ? रशियाने आपल्याला स्पुटनिक लस दिली , इतर देशांनी सुद्धा मदत पुरवली ही मदत त्या-त्या देशांनी बडेजाव मिरवण्यासाठी केली असे म्हणता येणार नाही. मात्र पाकिस्तान सारख्या कुरापती देशाला , ज्या देशात आश्रित दहशतवाद्यांमुळे भारताला किती त्रास होतो , सीमेवरील सैनिकांचे, नागरिकांचे जीव हकनाक जातात त्यांना लस देण्यात घाई करण्याचे काहीही कारण नव्हते. भारतातील परिस्थितीला आंतर्राष्ट्रीय मिडीयाने नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले आहे. ज्या देशातील वृतपत्रे यांनी मोदी यांना जबाबदार धरले आहे त्या वृत्तपत्रांनी त्यांच्या देशातील विरोधी पक्षांची त्यांच्या देशातील सरकारच्या कोरोना परिस्थिती हाताळण्याबाबतची कामगिरी समाधानकारक आहे की नाही अशी वृत्ते दिली आहेत का ? देतात का ? तशी वृत्ते दिली असल्यास त्याचा उहापोह भारतातील माध्यमे , माध्यम प्रतिनिधी करतात का ? या बाबींवर सुद्धा विचार व्हायला पाहिजे. ढोबळ मानाने पाहू जाता आम्हा भारतीयांना विदेशातील लोकांनी , वृत्तपत्रांनी काही सांगितले की ते त्वरित स्विकारार्ह वाटते. या वृत्तपत्रांनी जरी मोदींना जबाबदार धरले असले हे एकवेळेस मान्य केले तरी बेशिस्त , भ्रष्ट , विभाजित भारतीय जनतेचे काय ? ही परदेशी माध्यमे मोदींकडे बोट दाखवतात यांना काय कल्पना की इथे विलगीत केलेले लोक बाहेर हिंडतात , इथले नेते आपल्या मुलांची लग्ने वेळेचे बंधन न पाळता , जास्त लोकांना बोलावून कोरोनाचे नियम डावलून गुपचूप उरकतात. गर्भश्रीमंत लोक सुद्धा त्यांच्या मुलांच्या लग्नात सर्व नियम डावलतात , विना मास्कचे फिरतात, रस्त्यावर पचापचा थुंकतात. भंडारे करतात, बनावट ई-पास बनवून फिरायला निघतात, काही हजारांचे इंजेक्शन लाखोत विकतात , रुग्णांच्या, मृतांच्या खिशातील पैसे चोरतात , काही सरकारी रुग्णालयातील डॉक्टर पैसे घेतात , तर काही बनावट डॉक्टर चक्क कोविड रुग्णालय उभे करतात , लस पुण्याच्या बाहेर जाऊ देणार नाही अशा धमक्या काही नेते देतात. अशा असंख्य चुका करणारे बेशिस्त नागरिक या देशात आहेत याची परदेशी मिडीयाला काय कल्पना ? महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका कोरोना काळातच घेतल्या गेल्या त्याने सुद्धा कोरोना संक्रमण झाले असेल याकडे कुणाचेही का लक्ष गेले नाही ? हे सर्व कटू सत्य आहे. उपरोक्त बेशिस्तपणा इतर देशात नाही , बेशिस्तपणा केला तर त्यास तिथे कडक कायदे आहे. इथे काही करायला गेले या संघटनेचा विरोध , त्या संघटनेचा विरोध , याची याचिका त्याची याचिका असे अनेक सोपस्कार असतात. 

     मोदींच्या दाढी, वेशभूषा या बद्दल सुद्धा बोलले जाते. एक तर मोदी वारंवार वेशभूषा बदलत नाही, त्यांना तेवढा वेळही नाही. कोरोना आल्यापासूनच त्यांनी दाढी वाढवली आहे. या देशाने तर दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रसंगी पाच वेळा पोशाख बदलणारे गृहमंत्री सुद्धा पाहिले आहे. 

     तसेच मोदींनी दुस-या लाटेत जबाबदारी राज्यांवर ढकलली असेही म्हटले जात आहे.परंतु भारतात संघराज्य पद्धती आहे .राज्यांना त्यांच्या राज्यात कायदा, आरोग्य इ सुविधा पुरवणे त्याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे, अधिकार आहे . त्यानुसार राज्यांनी सुद्धा त्यांच्या राज्यात कोरोना परिस्थिती हाताळणे अपेक्षित आहे की नाही की सर्व भार केंद्रावर सोपवायचा ?

    सध्या जरी परिस्थिती गंभीर असली तरी परदेशी माध्यमांच्या बातम्यांवर अनुसरून भाष्य करण्यापेक्षा या कोरोना संकटाचा सर्व पक्ष एकत्र येऊन , जनतेला विश्वासात घेऊन , माध्यमांनी सकारात्मक बातम्या देऊन या आपल्या मातृभूमीवर आलेल्या संकटास तोंड देणे हे आपल्या देशबांधवांकडून अपेक्षित आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेने या संकटात मोठे सेवाकार्य केले आहे.पण संघ आपल्या कार्याचा डंका पिटत नाही. इतरही अनेक संघटना व व्यक्ती सेवाकार्यात पुढाकार घेत आहे.        संपूर्ण जगावर आलेल्या या महामारीच्या संकटातून आपण तावून सुलाखून बाहेर निघणारच आहोत. मोदींवर सामान्य जनतेचा विश्वास आहे. मा. पंतप्रधान यांना जनतेच्या मनातील भावना बरोबर कळतात. आंतर्राष्ट्रीय माध्यमांनी जरी आज मा. पंतप्रधान यांना जबाबदार धरले असले तरी कोणत्याही पक्षाचे सरकार असेना जनहित हेच सरकारचे प्राधान्य असते व त्यातही नेतृत्व जर कणखर , सक्षम असेल तर देश किती का मोठ्या संकटात असो त्यातून बाहेर येईलच असा विश्वास जनता बाळगून असते.

०२/०५/२०२१

An article about a devoted nursery teacher Kulkarni Madam

आमच्या बाई

कुळकर्णी बाई

आजरोजीपावेतो शेकडो लेख लिहिले पण बाईं विषयी लिहायचे ठरवून सुद्धा लिहिणे मात्र झाले नाही. अणे मॅडम , एम. आर. देशमुख सर यांच्या विषयी लेख लिहितांना कुळकर्णी बाईंची आठवण कित्येकदा येऊन गेली पण योग काही आला नाही , प्रत्येक कार्याचा एक योग असतो तो आला की मग मात्र ते कार्य त्वरीत तडीस जाते. प्रसंगी विलंब होतो पण कार्य चांगले होते. कुळकर्णी बाई यांचे विषयी लिहिण्यास विलंब झाला खरा परंतू त्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन कार्यक्रमाच्या वेळी त्यांचेविषयी लिखाण झाल्याने मनास अत्यंत आनंद वाटतो आहे व त्यांच्याप्रती असलेली आदराची भावना योग्यवेळी प्रकट झाल्याने समाधान वाटते आहे.

होय बाईच ! त्या काळात शिक्षिकेला सर्व विद्यार्थी “बाई” असेच संबोधत. “मॅडम” हा शब्द इंग्रजीचे गारुड घरा-घरावर फिरल्यावर रूढ झाला. बाईंची आठवण येण्यास निमित्त घडले ते त्या दिवशी फेसबुकवर पाहिलेल्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या  पोस्टचे. ही पोस्ट होती  सर्वेश कुळकर्णीची त्याच्या आईचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा त्याने आयोजित केला आहे. सोबतच त्याने नवीन पिढीस उद्बोधक अशी माता-पित्या प्रती आदरभाव प्रकट करणारी चित्रफित सुद्धा जोडली होती. याच चित्रफितीत दिसल्या आमच्या बाई . सर्वेशची आई म्हणजे आमच्या “कुळकर्णी बाई“. ही पोस्ट मला भुतकाळात घेऊन गेली. 

     घराजवळच असल्याने मला टिळक स्मारक मंदिराच्या “नुतन बालक मंदिर” येथे दाखला दिला होता. आमच्या वेळेस ही बालवाडी टिळक स्मारकच्या मुख्य हॉल मध्येच भरत असे. टिळक स्मारक मंदिराचा लुक तेंव्हा आजच्या सारखा नव्हता. आता टिळक स्मारक मंदिर पूर्वीच्या तुलनेत खुप आकर्षक आहे. लोकमान्य टिळक हे महान राष्ट्रपुरुष या बालवाडीमुळेच आमच्या बालवयातच  आम्हाला परिचित झाले. जरी तेंव्हा आत्यंतिक बाल्यावस्थेत असलो तरी त्या बालवाडीच्या काही आठवणी अद्यापही मनात ताज्या आहेत. या बालवाडीत आम्हाला शिकवायला दोन बाई होत्या. तसेच त्याच ठिकाणी राहणा-या भिकाबाई शिंदे या मदतनीस होत्या. शिंदे कुटुंबीय व आमच्या परीवाराचे निकटचे संबंध मला नंतर माहित झाले. असो ! या बालक मंदिरात असलेल्या दुस-या बाईंचे नांव , आडनांव मात्र आता काही आठवत नाही. आठवतात फक्त कुळकर्णी बाईच. काही व्यक्ती त्यांचे गुण, सकारात्मक वृत्ती, ऊर्जा यांमुळे लोकांच्या चिरकाल स्मरणात राहतात. मला खात्री आहे की केवळ माझ्याच नाही तर माझ्याप्रमाणे नुतन बालक मंदिरात शिकलेल्या अनेक मुला-मुलींना सुद्धा कुळकर्णी बाई आठवतच असतील. कारण त्यांनीच आम्हाला “अ , आ , इ ,ई “ चे धडे दिले होते. माझ्या भावंडाना सुद्धा त्यांनीच शिकवले होते शिवाय त्यांच्याशी नंतर सुद्धा अनेकदा भेटी झाल्याचे स्मरते. हो पण कुळकर्णी बाईंचे नांव मात्र लक्षात नाही हे प्रांजळपणे कबूल करतो. साधी साडी , गळ्यात फक्त काळीपोत अशी अत्यंत साधी राहणी असलेल्या कुळकर्णी बाई नेहमी हसतमुख असायच्या. त्या आमच्या कडून गाणी म्हणवून घेत , बाराखडी शिकवण्यासाठी लाकडी ठोकळे द्यायच्या , एक नौका सुद्धा बालवाडीत खेळण्यासाठी आणून ठेवली होती तिचा “सी सॉ” सारखा उपयोग मुले करीत. नुतन बालक मंदिर म्हणजे कुलकर्णी बाई अशी ओळख त्यांनी त्यांची वागणूक, बालकांप्रतीचे त्यांचे प्रेम, कामावरील निष्ठा, पालकांशी आपुलकी व आदराने संवाद याने निर्माण केली होती. तेंव्हा या बालक मंदिराचे संचालक, संस्था हे कळण्याचे वय नव्हते पण नुतन बालक मंदिराचा नावलौकिक वाढण्यास कुळकर्णी बाईंचा "सिंहिणीचा" वाटा होता हे मात्र नक्की. कुळकर्णी बाई नेहमी पायीच फिरत असत. सिव्हील लाईन मध्ये एका छोट्याश्या घरात कुळकर्णी कुटुंब समाधानी वृत्तीने राहात असे. त्यांच्या घरात एक औदुंबर वृक्ष होता. आमचा शिकवणी आदीसाठी जाण्याचा रस्ता हा कुळकर्णी बाईंच्या घरासमोरूनच असल्याने बाई व त्यांची मुले नेहमी दिसतच असत. सर्वेश व सुवर्णा ही दोघी कुळकर्णी बाईंची दोन गुणी , सद्वर्तनी मुले. कुळकर्णी बाईचे पती सुद्धा आमचेकडे अनेकदा आले होते. ते सुद्धा अत्यंत साधे व मितभाषी होते. सुवर्णा व सर्वेश ही दोघे माझ्या दोन लहान बहिणींच्या सोबत होते. सर्वेश माझ्याहून खूप लहान , कुरळे केस असलेल्या लहानग्या, निरागस सर्वेशचा हसमुख चहेरा आजही आठवतो. सर्वेश अजूनही तसाच आहे. बालवयातील शिक्षकांचाच बालमनावर खूप प्रभाव पडतो , हे शिक्षकच असे असतात की ते आयुष्यभर लक्षात राहतात कारण साक्षरतेचे प्राथमिक धडे जरी अल्प वेतन असले तरी हेच शिक्षक मोठ्या मेहनतीने , बालकांसोबत बालकांसारखे होऊन गिरवून घेत असतात. प्रत्येकाच्या शैक्षणिक प्रगतीचा पाया म्हणजे हेच शिक्षक असतात. म्हणूनच ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना प्राथमिक शिक्षण देणारे त्यांचे शिक्षक आयुष्यभर लक्षात राहिले होते. कुळकर्णी बाई सुद्धा त्याचप्रकारातील शिक्षिका.कालांतराने कुळकर्णी कुटुंबीयांनी खामगांव सोडले. तत्पुर्वी कुळकर्णी बाईंचा त्यांच्या सद्वर्तणूक व चांगल्या तळमळीने, सचोटीने केलेल्या ज्ञानदानाच्या शैक्षणिक कार्याप्रित्यर्थ खामगांवात अनेकदा गौरव झाल्याचे स्मरते. खामगांव सोडल्यावर मग मात्र कुळकर्णी बाई व त्यांचे कुटुंबीय यांचेशी संपर्क तुटला. कुळकर्णी बाई कुठे गेल्या वगैरे काही माहित झाले नाही. आता काही वर्षापुर्वी फेसबुकच्या माध्यमातून सर्वेश संपर्कात आला. व त्यामुळेच कुळकर्णी बाईंच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याचे कळले. एखाद्या व्यक्तीने वयाची 81 वर्षे पूर्ण केली म्हणजे त्याचे जन्मल्यापासून एक हजारवेळ पुर्ण चंद्र पाहणे झालेले असते व म्हणून आपल्या संस्कृतीत हा सोहळा साजरा करीत असतात. माझ्या आजीच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या वेळी मला या  प्रथेबद्दल कळले होते. सर्वेशने हा कार्यक्रम करण्याचा एक चांगला निर्णय घेतला. नवीन पिढीस माता-पित्यांप्रती आदरभावना वृद्धिंगत करणारा असा हा सोहळा आहे. आज किती वर्षे झाली कुळकर्णी कुटुंबीयांना खामगांव सोडून परंतू स्मृती कायम आहे. आजरोजीपावेतो शेकडो लेख लिहिले पण बाईं विषयी लिहायचे ठरवून सुद्धा लिहिणे मात्र झाले नाही. अणे मॅडम , एम. आर. देशमुख सर यांच्या विषयी लेख लिहितांना कुळकर्णी बाईंची आठवण कित्येकदा प्रकर्षाने येऊन गेली पण योग काही आला नाही , प्रत्येक कार्याचा एक योग असतो तो आला की मग मात्र ते कार्य त्वरीत तडीस जाते. प्रसंगी विलंब होतो पण कार्य चांगले होते. कुळकर्णी बाई यांचे विषयी लिहिण्यास विलंब झाला खरा परंतू त्यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन कार्यक्रमाच्या वेळी त्यांचेविषयी लिखाण झाल्याने मनास अत्यंत आनंद वाटतो आहे व त्यांच्याप्रती असलेली आदराची भावना योग्यवेळी प्रकट झाल्याने समाधान वाटते आहे. बाई तुम्हाला साष्टांग नमस्कार व आरोग्यपुर्ण व उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा.