२९/०७/२०२१

An old article written in 2015 , on the occasion of Babasaaheb Purandare birthday

 जाणता माणूस

बाबासाहेब अभ्यासासाठी इंग्लंड मध्ये असतांना त्यांना तेंव्हा इंग्लंडला दुस-या

 महायुद्धात अग्रेसर ठेवणा-या विस्टन चर्चिल यांचा पुतळा कुठेही आढळून आला नाही. ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी चर्चिलचा पुतळा कुठेही नाही ?” असे त्यांच्या तेथील मित्र जोसेफ यांस विचारणा केली तेंव्हा जोसेफ याने मोठे मार्मिक उत्तर दिले. जोसेफ म्हणाला, “Whats the necessity ? Churchill is in our blood.” चर्चिल आमच्या रक्तात आहे. शिवाजी महाराजांचे केवळ पुतळेच असू नये तर शिवाजी महाराज आपल्या  नसानसांत असावे असा संदेश त्यांनी यातून दिला.

म्हणतात ना आरंभ चांगला तर अंत पण चांगला होतो. कोणत्याही गोष्टीची सुरुवात चांगली झाली की सर्व म्हणतात , “चला सुरुवात छान झाली” . खामगांवकरांची सुद्धा 2015 या वर्षाची सुरुवात छानच झाली. ही छान सुरुवात करून देण्यास निमित्त ठरले ते म्हणजे मा. भाऊसाहेब फुंडकर व सागरभाऊ फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नव्यानेच स्थापन झालेले “व्हिजन फाउंडेशन”. डॉ.श्री विशाल घुले यांच्या अध्यक्षतेखाली या संस्थेने “जाणता राजा” या आशिया खंडातील सर्वात मोठ्या व पहिल्या महानाट्याचा प्रयोग खामगांवात आयोजित केला. या महानाट्याच्या अनुषंगाने 12 जानेवारी रोजी स्थानिक कोल्हटकर स्मारक मंदिरात शिवचरित्र अभ्यासक शिवशाहीर आदरणीय बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन सुद्धा व्हिजन फाउंडेशन ने केले होते. खामगांवकरांसाठी हे व्याख्यान एक पर्वणीच ठरले. वर्षाच्या आरंभी “जाणता राजा” आणि मा. बाबासाहेबांचे व्याख्यान म्हणजे २०१५ ची सुरुवात चांगलीच झाली ना ! दि. 12 जानेवारी 2015 हा दिवस सर्वच श्रोत्यांना चिरकाल स्मरणीय असा ठरला कारण स्वामी विवेकानंद व मातोश्री जिजामाता यांची जयंती व त्याच दिवशी श्री बाबासाहेब पुरंदरे यांचे व्याख्यान. कार्यक्रमाला बरोबर सायंकाळी 6.30 वाजता सुरुवात झाली कारण बाबासाहेब हे वेळेला फार महत्व देतात. बाबासाहेब म्हणतात की, “ मी जी वेळ सांगितली आणि जर का त्यावेळेस आलो नाही तर समजा नक्कीच काही अपघात झाला” इतके ते वक्तशीर आहे. व्याख्यानात त्यांनी त्यांच्या समवेत त्यांचे मानसपुत्र श्री गणेश धालपे यांना सुद्धा सहभागी केले होते व या दोघांतील संवादातून श्रोत्यांसमोर शिवरायांच्या चरित्राचे नानाविध पैलू त्यांनी प्रकट केले. आपल्या अमोघ वक्तृत्वशैलीने बाबासाहेबांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले. सभागृहात नीरव शांतता होती. सर्व श्रोते अगदी कानांत प्राण आणून बाबासाहेबांचा शब्द न शब्द श्रवण करीत होते. सभागृह भारावल्यागत झाले होते. बाबासाहेबांनी अगदी सुरुवातीलाच स्पष्ट केले की मी तुम्हाला कोणतीही दंतकथा सांगणार नसून सगळी वस्तुस्थिती व खरा इतिहास सांगणार आहे. दोन किल्यांतील अंतर , शाहिस्तेखानाच्या फौजेची संख्या , त्यातील घोडदळाची संख्या , बहादूरखानाची हंबीरराव मोहिते यांनी केलेली फजिती, बहिर्जी नाईक हा कसा निष्णात हेर होता , महाराज सर्वांना कसे मान देत हे त्यांनी सोनोपंत डबीर या त्यांच्या सेवकाची महाराजांनी महाबळेश्वर येथे केलेली सुवर्णतुला व दानधर्म या कार्यक्रमाचे उदाहरण देऊन कथन केले. 

सोनोपंत डबीर हे वाशिमचे होते अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्याविषयी विशेष आपुलकी बाबासाहेबांनी असल्याचे सांगितले तसेच शिवरायांच्या एक पत्नी अंबिकाबाई या बुलडाणा जिल्ह्यातील करवंडच्या इंगळे कुटुंबियातील असल्याचे त्यांनी कथन केले. आजही करवंड गावात तत्कालीन इतिहासाची साक्ष देणा-या गढ्या पहावयास मिळतात. बाबासाहेब जेंव्हा या सर्व गोष्टी सांगत होते तेंव्हा आपल्याच घरातील आपले आजोबा जुन्या गोष्टी सांगत आहे असे श्रोत्यांना वाटत होते. त्यांच्या बोलण्यातून , त्यांच्या नजरेतून श्रोत्यांविषयी प्रेम, आपुलकी जाणवत होती. निव्वळ चरितार्थासाठी किंवा व्यावसायिक कार्यक्रम करणा-यांचे जसे व्याख्यान असते तसे हे व्याख्यान नक्कीच नव्हते. वयाच्या 93 व्या वर्षी तारखा , महाराजांची पत्रे , सैन्याची संख्या , किल्यांमधील अंतर व इतर अनेक बाबींचे स्मरण असणे हे ध्यास , अभ्यास , चिकाटी , प्रयत्नांची पराकाष्ठा यांशिवाय साध्य होत नाही. महाराज सिद्धी जौहरच्या वेढ्यातून भर पावसात निसटले म्हणून बाबासाहेबांनी सुद्धा त्याच वाटेने पावसातच जाऊन पाहिले आहे. आपल्या व्याख्यानात त्यांनी एक संस्मरणीय अशी घटना सांगितली.

बाबासाहेब अभ्यासासाठी इंग्लंड मध्ये असतांना त्यांना तेंव्हा इंग्लंडला दुस-या महायुद्धात अग्रेसर ठेवणा-या विस्टन चर्चिल यांचा पुतळा कुठेही आढळून आला नाही. ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी , चर्चिलचा पुतळा कुठेही नाही ?” असे त्यांच्या तेथील मित्र जोसेफ यांस विचारणा केली तेंव्हा जोसेफ याने मोठे मार्मिक उत्तर दिले. जोसेफ म्हणाला, “Whats the necessity ? Churchill is in our blood.” चर्चिल आमच्या रक्तात आहे. शिवाजी महाराजांचे केवळ पुतळेच असू नये तर शिवाजी महाराज आपल्या  नसानसांत असावे असा संदेश त्यांनी यातून दिला. आपल्या आयुष्याचे व आजही “फिट” असल्याचे रहस्य हे वक्तशीरपणा , शिस्त , सतत कार्यमग्नता आणि कोणतेही व्यसन नसणे यामध्ये आहे हे  सांगून शेवटी बाबासाहेबांनी तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. तसेच शिवाजी राजांबद्दल सर्वच “जाणत” असलेले “जाणता माणूस” मा. बाबासाहेब पुरंदरे याना याची देही याची डोळा पाहण्याची , त्यांची वाणी ऐकण्याची अनुभूती त्यांच्या खामगांवात येण्याने मिळाली व 2015 वर्षाचा चांगला आरंभ झाला हे मोठे भाग्यच म्हणावे लागेल.

२ टिप्पण्या: