२९/०७/२०२१

PART - 5 MAD, Suma

 वेडयांच्या विश्वात - भाग 5  

सुमा

सुमा ज्या भागात फिरत असे त्या भागाचे स्वरूप आता पालटले आहे. परंतू त्या भागातून गेलो की कधी-कधी मला खाऊ द्या हो मला खाऊ द्या हो ” या आर्त स्वरातील ओळी कानात घुमतात व डोळ्यासमोर गरीब सुमाचे ते करुण डोळे येतात.

👉मागील भागापासून पुढे..

मागील भागात पाहिलेल्या बावरी पेक्षा या लेखातील वेडी स्त्री खुप निराळी होती.  आजच्या भागातील स्त्री अतिशय दीन अशी, कुणालाही जिच्याकडे पाहून दया येईल अशी स्त्री होती. गावाच्या मध्य भागातून वाहणा-या नाल्यावरील पुलावरून जात असतांना “ मला खाऊ द्या हो मला खाऊ द्या हो “ असे गाणे म्हणत फिरणारी मोठा फ्रॉक घातलेली, एक वेणी घट्ट बांधलेली, रिबीन लावलेली ठेंगणी मुलगी अनेकांना दिसत असे. वयाने मोठी वाटत असून तिला एक झगा घालून दिलेला असे. झगा म्हणजे फ्रॉक हे इथे इंग्रजाळलेल्या व ग्रामीण भागातून शहरात/ विदेशात गेलेल्यांच्या पिढीसाठी नमूद करावे लागेल. अर्थात ते मराठी वाचन करीत असतील की नाही हा सुद्धा एक प्रश्नच आहे. त्या मुलीच्या गाण्याच्या त्या ओळी कित्येकदा ऐकू आल्या कारण ती खुप वेळा दिसायची त्यामुळेच त्या ओळी लक्षात राहिल्या. ती याच ओळी पुन्हा पुन्हा म्हणत राही. हे गाणे पुर्ण होते का हे कधी कळले नाही. कदाचित ते अंगाई गीत असावे, तिची आजी किंवा आई तिला निजवतांना ते म्हणत असेल व तेच त्या मुलीच्या लक्षात राहिले असेल. या ओळी म्हणत जाता जाता जरी नात्याने नसेल पण कुणी तरी दयाळू काका, मामा तिला खाऊसाठी पैसे देत असावा. त्याच नाल्याच्या काठावर पानठेला असलेला एक कनवाळू माणूस या मुलीला नेहमी खाऊ पिऊ घालत असे. खुप वर्षांपूर्वी याच भागातून जात असतांना ती मुलगी दिसली होती. तिला प्रथमच पाहत असतांना माझ्या पावलांची गती कमी झाली “अरे चल लवकर, सुमा आहे ती” आई म्हणाली. मग सुमा कित्येकवेळा दिसायची. काळानुसार प्रौढत्वाच्या खुणा तिच्या चेह-यावर दिसायला लागल्या होत्या परंतू खाऊसाठीची याचना मात्र सुरूच असायची. नंतर सुमा कधीच दिसली नाही. कुणाच्या तरी संसारवेलीवर फुललेले हे सुमा नावाचे पुष्प होते. पण हे पुष्प पुर्ण विकसित झाले नव्हते.  पुर्ण बौद्धिक विकास न झालेली ही मुलगी आहे हे त्या सुमाच्या परिवाराच्या लक्षात आल्यावर त्यांच्या दु:खाला पारावार राहिला नसेल. कित्येकदा अशी परिस्थिती येते की मानवाच्या हाती काहीच उपाय नसतो. कधी परिस्थिती बरोबर नसते तर कधी परिस्थिती चांगली असूनही दैव साथ देत नाही. प्रारब्ध सोबत घेऊन आलेला जीव त्यानुसार जगतो , आयुष्याची वाटचाल करतो. कधी कधी कुणी त्याच्या मदतीला येते , तर कधी केलेली मदत सुद्धा त्याच्या कामी येत नाही, कधी कुणाला त्याच्याशी काहीही सोयरसुतक नसते. अशा लोकांशी तसेच रस्त्याने येणा-या-जाणा-यांशी , गर्दीशी कुणाला काय घेण-देण असते ? त्यातही मानसिक अवस्था चांगली नसलेले सुमासारखे लोक कुणाच्या खिजगणतीत असणार ? आजकाल मात्र अनेक स्वयंसेवी संस्था , लोक अशा लोकांसाठी झोकून देऊन कार्य करीत आहेत. त्यांच्यामुळे अनेक मनोरुग्णांची मानसिक स्थिती सुधारत सुद्धा आहे ही निश्चितच एक दिलासा देणारी बाब आहे. सुमा ज्या भागात फिरत असे त्या भागाचे स्वरूप आता पालटले आहे. परंतू त्या भागातून गेलो की कधी-कधी मला खाऊ द्या हो मला खाऊ द्या हो ” या आर्त स्वरातील ओळी कानात घुमतात व डोळ्यासमोर गरीब सुमाचे ते करुण डोळे येतात.

                               क्रमश:

👉 या मालिकेतील लेखात आलेल्या व्यक्तींच्या मूळ नावाचा उल्लेख टाळलेला आहे. काल्पनिक नांवे वापरली आहेत. तरीही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे. 

     या मालिकेतील लेख हे केवळ माहितीस्तव आहे यातून कुणाच्या अथवा कुणाच्याही परिवाराच्या मानसिक स्वास्थ्याची अवहेलना करण्याचा हेतू नाही. कुणाचा अपमान करण्याचा किंवा कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही हे नम्र निवेदन. 
 


२ टिप्पण्या: