१५/०७/२०२१

PART - 3 MAD , Mahadu

वेडयांच्या विश्वात - भाग 3

महादू

सर्वात पहिल्यांदा तो दिसला. मोठे केस , दाढी वाढलेली, शर्टाच्या गुंड्या उघड्या एका हाताने आपली पँट सावरत एका हाताने दगड , वस्तू जमा करीत होता. मी त्याच्याकडे कित्येकदा निरखून पहायचो. तो खुप हुशार असल्याचे , त्याला गणितात गती असल्याचे व अति अभ्यासाने तो पागल झाला असल्याचे कुणीतरी सांगितले होते. ते खरे की खोटे काही माहित नाही. त्याला पाहतांना मात्र मला त्याच्या नजरेत खुप करूण भाव दिसत असत.

 👉मागील भागापासून पुढे....

मी पाहिलेले हे वेडे हिंसक नव्हते, बालपणापासून त्यांना पाहिले असल्याने त्यांच्या दशेची जाणीव होती. त्यांच्याप्रती सहानुभूती होती असे म्हणता येणार नाही कारण सहानुभूती म्हणजे सह+अनुभूती असे होय. “मला अमूक एकाप्रती सहानुभूती आहे” असे सहज म्हटल्या जाते परंतू प्रत्यक्षात तशी अनुभूती घेणे हे खूप कठीण आहे.

80 चे दशक होते, प्राथमिक शाळेत मला दाखल केले. शाळा घरापासून हाकेच्या अंतरावर. शाळेत जाऊ लागलो. तिसरी चौथीत असतांना सर्वात पहिल्यांदा तो दिसला. मोठे केस , दाढी वाढलेली, शर्टाच्या गुंड्या उघड्या एका हाताने आपली पँट सावरत एका हाताने दगड , वस्तू जमा करीत होता. माझ्या छोट्या पाऊलांनी भर-भर घर गाठले. मला भेदरलेला पाहून “काय झाले रे , घाबरला का ?” आई म्हणाली. मी त्या वेडयाबद्दल सांगितले “मी नाही जाणार शाळेत” मी. “अरे तो महादू आहे” तो कुणाला काही करत नाही , बोलत पण नाही , दगड जमा करतो पण कुणाला कधी मारत नाही, गरीब आहे तो" आईने समजावले. तरी दुस-या दिवशी भीत-भीतच शाळेत गेलो. येतांना एका मित्रासोबत येत होतो तो पुन्हा दिसला. आज मात्र माझी भीती थोडी कमी झाली होती. मग तो रोजच दिसे. कुणी त्याला भाकरी, भाजी देत असे. ती तो गुमान खायचा आणि पुन्हा त्याच दगड, काड्या काटक्या जमा करण्याच्या त्याच्या नादात लागून जायचा. हायस्कूलला गेल्यावर मी त्याच्याकडे कित्येकदा निरखून पहायचो. तो पुर्वी खुप हुशार असल्याचे , त्याला गणितात खुप गती असल्याचे व अति अभ्यासाने तो पागल झाला असल्याचे कुणीतरी सांगितले होते. ते खरे की खोटे काही माहित नाही. त्याला पाहतांना मला त्याच्या नजरेत खुप करूण भाव दिसत असे. काय असेल त्याचे पुर्ण नांव ? महादू वरुन त्याचे नांव महादेवच असावे. महादेव किती छान नांव  ? सर्वांपासून दूर राहणारा , जटा वाढलेला , अंगावर पुरेसे कपडे नसलेला अशा देवाचे देव महादेव यांचे नांव. महादू तर वेडा होता पण राहण्याच्या बाबतीत तो त्या कैलासाचा पती असलेल्या ख-या महादेवाप्रमाणेच होता. मग या महादू वर अशी परिस्थिती का आली असेल ? आजही त्याचा चेहरा , त्याच्या चेह-यावरील करुण भाव माझ्या डोळ्यासमोर स्पष्टपणे येत आहेत. महादू माझा कोणी नव्हता पण तो रोज दिसायचा आमच्या शेजारच्या घरासमोर ओटा होता तिथे तो बसायचा. ऊन, वारा, पाऊस महादू नेहमी रस्त्यावरच असे. मी त्याला ना कधी काही खायला दिले ना कधी त्याच्याशी बोललो पण कोण जाणे का महादू लक्षात राहिला. कदाचित मी सर्वात प्रथम पाहिलेला असा तो वेडा मनुष्य होता. पुढे मी शिक्षणात गर्क झालो, नवीन भागात रहायला गेलो. जुन्या घरी गेल्यावर क्वचित महादू दिसत असे. आता काहीसा थकलेला , केस पांढरे झालेला. एक दिवस जुन्या घरी गेलो तर महादू ज्या गोदामाच्या दरवाजातील कोप-यात बसत असे तिथे त्याचे तेच साहित्य दगड, काटक्या जमा केलेले दिसले, महादू मात्र नव्हता. गेला असेल इकडे-तकडे म्हणून मी दुर्लक्ष केले. पण नंतर त्याचे निधन झाल्याचे कळले. कुणी , कसे केले असतील त्याचे अंत्यसंस्कार ? असा प्रश्न मला पडला होता. कुणी म्हणे मुन्सिपाल्टीच्या माणसांनी त्याला उचलून नेले. मला वाईट वाटले. मानवी मनंच असे असते की गल्लीतील मुक्या जनावरांचा सुद्धा त्याला लळा लागतो मग पागल का असे ना महादू तर मनुष्य होता. आपल्या संत मंडळींचे सुद्धा मनुष्य व प्राणी यांच्याप्रतीच्या करुणा, दया, प्रेम , आपुलकी यांबाबतचे कित्येक दाखले आहेत. 

पुर्वी वेड्या लोकांना वेड्यांच्या इस्पितळाच्या माध्यमाने सरकारच आधार होते परंतु पुर्ण क्षमता झाली की इतर वेड्यांना मात्र रस्त्यांचाच आधार होता. आज मात्र अनेक खाजगी मनोविकार तज्ञ आहेत काही सेवाभावी डॉक्टर्स मानसिक रोग्यांना सेवा देत आहेत त्यामुळे मात्र बराच बदल होत आहे.

मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. मनुष्याची अशी स्थिती का होत असावी ? अति अभ्यासाने खरेच महादूच्या डोक्यावर परिणाम झाला असावा का ? त्याचे मन स्वास्थ्य का बिघडले असावे ? कुण्या एखाद्या घटनेने त्याच्यावर परिणाम झाला असावा ?

उन्मादो मातृदोषेण पितृदोषेण  मूर्खता ||
अर्थ -  जर माता किंवा पिता यांच्यात काही  वंशानुगत  अथवा  अन्य दोष असतील तर  मातृदोषामुळे संतती 
पागल  तर पितृदोषामुळे  संतती मूर्ख  होते.

असे उपरोक्त संस्कृत सुभाषितात म्हटले असले तरी ते सांप्रत काळात कुणाला पटेल असे वाटत नाही.  

 कदाचित महादू आता कुणाला आठवत सुद्धा नसेल. शेवटी पागलच तो. तो का कुणाच्या लक्षात राहील ? पण विसरण्याची शक्ती जरी मानवाला दिली असली तरी काही गोष्टी मानव आजन्म विसरत नाही. म्हणूनच आज इतकी वर्षे झाली,कितीतरी घडामोडी जीवनात घडल्या पण महादू व त्याचा तो करुण चेहरा कुणास ठाऊक का पण स्मरणात राहिला.

क्रमश:

👉 या मालिकेतील लेखात आलेल्या व्यक्तींच्या मूळ नावाचा उल्लेख टाळलेला आहे. काल्पनिक नांवे वापरली आहेत. तरीही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे. 

     या मालिकेतील लेख हे केवळ माहितीस्तव आहे यातून कुणाच्या अथवा कुणाच्याही परिवाराच्या मानसिक स्वास्थ्याची अवहेलना करण्याचा हेतू नाही. कुणाचा अपमान करण्याचा किंवा कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही हे नम्र निवेदन. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा