०५/०८/२०२१

PART - 6 MAD, MTDC

वेडयांच्या विश्वात - भाग 6

एम टी डी सी

माझा मित्र खोडकर होता “मोठ्याने MTDC म्हणून दाखव बरं" तो मला म्हणाला. मी त्याची आज्ञा शिरसावंद्य मानत “Msss Tsss Dsss Csss “ असे मोठ्याने म्हणालो. आणि त्याने मला तसे का म्हणायला लावले हे मला समजायला क्षणही लागला नाही. 

मागील भागापासून पुढे... 

बावरी वेडी होती पण ती कमी बोलत असे. सुमा कुणाशी काही बोलत नसे फक्त खाऊ च्या मागणीचे गीत गुणगुणत चहे-यावरील नैसर्गिक करूण भाव घेऊन फिरत असे. पण आजची कहाणी थोडी निराळी आहे. एम. टी. डी. सी. म्हणजे ते नाही जे तुमच्या मनात आले असेल. महाराष्ट्र टुरीझम विकास प्राधिकरणा बद्द्द्ल या लेखाचा काहीही एक संबंध नाही. "ये एम. टी. डी. सी. तो कोई और है |" बालपणी मी व माझे मित्र खेळत होतो. तेवढ्यात समोरून एक लुगडे नेसलेली सडपातळ बाई झप-झप पाऊले टाकत काही-बाही पुटपुटत चालली होती. तिचा चालण्याचा वेग एखाद्या हळू सायकल चालवणा-यास सुद्धा मागे टाकेल इतका गतिमान असावा, पळणे व चालणे या दोन क्रियांच्या मधील म्हणता येईल अशी तिची वेगवान चाल होती. माझा मित्र खोडकर होता “मोठ्याने MTDC म्हणून दाखव बरं" तो मला म्हणाला. मी त्याची आज्ञा शिरसावंद्य मानत “Msss... Tsss... Dsss... Csss... “ असे मोठ्याने म्हणालो आणि त्याने मला तसे का म्हणायला लावले हे मला समजायला क्षणही लागला नाही. MTDC तील D उच्चार करेतो अत्यंत गलीच्छ, अर्वाच्य शिव्या ती बाई द्यायला लागली. तिच्या शिव्यांची गती सुद्धा तिच्या चालण्याप्रमाणे तेज होती. त्या गलीच्छ, अर्वाच्य शिव्या मी पहिल्यांदाच ऐकत होतो. त्या शिव्यांचा अर्थ काय वगैरे चौथी-पाचवीत असलेल्या मला माहित सुद्धा नव्हते. पण त्या बाईचा क्रोध मात्र कळला. तिला MTDC म्हटले की ती चिडते व रागाने शिव्यांची लाखोली वाहते हे पण स्पष्ट झाले. शिव्या देऊन ती दिसेनाशी झाली. माझा मित्र माझ्याकडे  मोठ्या विजयी मुद्रेने पाहत हसत होता. त्या दिवशी नंतर ती बाई बरेचदा दिसायची मुले तिला चिडवायची. खरीखुरी MTDC म्हणजे पर्यटन विभाग हे कळण्यापुर्वी मला ही शिव्यांची सफर करवून आणणारी MTDC मात्र कळली. मी त्यानंतर तिला पुन्हा कधी MTDC म्हणण्याचे धैर्य केले नाही. विनाकारण कशाला कुणाच्या शिव्या ऐकून घ्यायच्या. 

     या बाईचे खरेखुरे नांव काय , कुठे राहायची , काय करायची हे कधी काहीच कळले नाही. MTDC म्हटल्यावर ती का चिडत असावी ? MTDC म्हटल्यावर चिडून शिव्या देणा-या या बाईबाबत कुणाला सांगितले तर हसण्यावारी तो विषय नेला जायचा पण MTDC म्हटल्याने इतका क्रोध का यावा की अत्यंत गलीच्छ शिव्यांचे वमन मुखातून व्हावे हे एक कोडेच राहून गेले. MTDC विभागामुळे किंवा तेथील कुण्या व्यक्ती कडून तिची फसवणूक झाली असेल का ? तिला मानसिक त्रास दिल्या गेला असेल का ? असे प्रश्न माझ्या मनात त्यानंतर खुप वर्षांनी उपस्थित झाले होते. शिव्यांची लाखोली वाहणा-या या MTDC चे पुढे काय झाले काही कळले नाही. जशी ती अचानक दिसली होती तशीच अचानक गायब झाली. सुमारे 35 वर्षांपुर्वी दिसणा-या या बाईला लोक आता विसरले सुद्धा असतील. 

     कनिष्ठ महाविद्यालयात गेल्यावर कुणी शिवी दिली तर आपण ती स्विकारायचीच नाही या आशयाची गौतम बुद्धांची गोष्ट वाचनात आली होती. एकदा एक व्यक्ती गौतम बुद्धांना खुप शिव्या देतो गौतम बुद्ध मात्र शांतच असतात. शेवटी तो व्यक्ती थकतो तो व आपले शिव्या देणे थांबवून बुद्ध देवाला प्रश्न विचारतो मी तुम्हाला एवढे अर्वाच्य बोललो तुम्ही मात्र काहीच बोलले नाही. तेंव्हा ते उत्तरतात , एखाद्याने आपल्याला काही वस्तू दिली व आपण ती स्विकारली नाही तर ती वस्तू देणा-याकडेच राहते ना ? त्याप्रमाणे तू मला ज्या शिव्या दिल्या मी त्यांचा स्विकारच केला नाही त्यामुळे तू दिलेल्या शिव्या परत तुझ्याकडेच राहिल्या. यानुसार कुणी शिव्या दिल्या तर आपल्याला त्याचे काही वाटले नाही पाहिजे, त्या शिव्यांचा आपण मुळी स्विकारच करू नये. असा त्या कहाणीचा मतितार्थ होता. अर्थात प्रत्यक्ष जीवनात याप्रमाणे आचरण करणे मात्र अत्यंत कठीण आहे. 

MTDC ला चिडवल्यावर ती शिव्या देत असे लोक त्या हसून ऐकत पण स्विकारीत मात्र नसत. MTDC तर वेडी होती पण मानसिक स्वास्थ्य चांगले असलेल्या माणसाने क्वचित प्रसंगी शिव्या दिल्या तर आपल्याला दु:ख होईल, क्रोध अनावर होईल आपण प्रतिक्रिया देण्यास प्रवृत्त होऊ पण त्या शिव्यांचा स्विकार न करून शांत राहणे शक्य होईल का ? तर याचे उत्तर बहुतांश नाहीच येईल अशी शक्यता आहे कारण आजकाल जगातून शांतरस लुप्त होत चालला आहे. माझा लेखन प्रपंच सुरु असतांनाच नेमके त्याचवेळी  रस्त्यावर दोन विद्यार्थी गलिच्छ भाषेत बोलत होते. ती वेडी स्त्री MTDC तर वेडेपणात शिव्या देत असे परंतू हल्ली सुज्ञ, सुशिक्षित म्हणवणारी तरुणाई वाक्यापरत गलिच्छ शब्दोच्चारण करते, शिव्या देते यांचा हा वेडेपणा कसा सरणार ? या विचारात मी गढून गेलो.

                                                 क्रमश:

👉 या मालिकेतील लेखात आलेल्या व्यक्तींच्या मूळ नावाचा उल्लेख टाळलेला आहे. काल्पनिक नांवे वापरली आहेत. तरीही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे. 

     या मालिकेतील लेख हे केवळ माहितीस्तव आहे यातून कुणाच्या अथवा कुणाच्याही परिवाराच्या मानसिक स्वास्थ्याची अवहेलना करण्याचा हेतू नाही. कुणाचा अपमान करण्याचा किंवा कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही हे नम्र निवेदन. 

७ टिप्पण्या: