११/११/२०२१

Part 2- Chakli, Food Culture of Khamgaon article series-Anand Bhuvan

 खामगांवची खाद्य संस्कृती भाग-2

'आनंद'दायी चकली

इंग्रजांच्या काळात सुरु झालेल्या या हॉटेल मध्ये चकली, बटाटा वडा, मिसळ असे पदार्थ उपलब्ध असत. पण चकली हा पदार्थ मात्र सर्वात जास्त लोकप्रिय होता. बटाटा वडा सुद्धा आहे परंतू पुर्वी येथील चकली जास्त प्रसिद्ध होती असे असल्याचे ऐकले आहे. तशी ती आजही आपली प्रसिद्धी टीकवून आहे.जाड , मोठी खमंग चकली, सोबत घट्ट दही अशी ताटली डोळ्यासमोर आली की तोंडातील ग्रंथी स्त्रवत असत.

मागील भागापासून पुढे

राजाभाऊंचे हॉटेल फिरते होते पण त्यांच्याही आधीपासून खामगांवात हॉटेल्स होती. अशाच काही हॉटेल्स व त्यातील प्रसिद्ध पदार्थांचा ऊहापोह येथून पुढे होणारच आहे. पण सुरुवातीला आठवत आहे तो पदार्थ म्हणजे चकली. वर्ष 2014 मध्ये “शताब्दी महोत्सव”  असा मजकूर असलेली एक पत्रिका घरी आलेली दिसली. त्वरीत प्रेषक म्हणून कोण पाहण्यासाठी दृष्टी पत्रिकेच्या तळाशी गेली, 'हॉटेल गोखले आनंद भुवन’ हे नांव दिसले. पत्रिका पाहिल्यावर आनंद भुवन संबंधित कित्येक आठवणी ताज्या झाल्या. वडा, चकली, मिसळ अनेक पदार्थ डोळ्यासमोर आले. आनंद भुवनची जुनी इमारत , त्यातील वस्तू अर्ध्या चड्डीतील वेटर नंतर शेजारची इमारत पडली म्हणून दक्षता म्हणून बांधण्यात आलेली आनंद भुवनची नवीन इमारत. अशा अनेक घटना स्मृतीपटलावर उमटत गेल्या. खामगांव व परिसरातील कित्येक लोकांच्या अनेकविध स्मृती या आनंद भुवनशी नक्कीच निगडीत असतील.

      30-32 वर्षांपुर्वीची घटना आहे माझी मावशी तेंव्हा नंदुरबार येथे राहत होती. मावशी व काका एक दिवस आमच्याकडे आले होते. मी चौथी-पाचवीत असेन. वडील ऑफिसला निघून घेले होते. आईने मला बासुंदी आणण्यास पाठवले. ती आणण्यासाठी म्हणून मी आनंद भुवन अल्पोपहार गृहात गेलो. कधी-कधी वडिलांसोबत चकली खाण्यासाठी म्हणून गेल्याचेही आठवते. आजही मला आनंद भुवनची जुनी इमारत व अंतर्गत रचना स्पष्टपणे आठवते. मुख्य दरवाजा एखाद्या घराच्या दरवाजासारखा होता. आत प्रवेश केल्यावर दोहो बाजूंनी संगमरवरी असलेल्या टेबलांच्या दोन रांगांच्या मधून काऊंटरकडे जावे लागायचे. आजही हेच टेबल आनंद भुवन मध्ये आहेत. डाव्या बाजूला पाण्याचा हौद,भांडे धुण्याची जागा होती. या हॉटेलच्या भिंतींवर सुंदर , दुर्मिळ म्हणू शकू असे देवी देवतांचे अनेक फोटो होते. त्यावेळी खामगांवात उपहारगृहे कमी होती. कुणाच्याही घरी पाहुणे आले, मित्र मंडळी आली की त्यांच्यासह आनंद भुवनची भेट ठरलेली असे नाहीतर इथला पदार्थ घरी जात असे. "गोखले यांचे आनंद भुवन" या विदर्भात ख्याती असलेल्या हॉटेलची धुरा खामगांवातील प्रतिष्ठीत नागरिक पांडुरंग पाटील यांच्या खांद्यावर होती. श्री पांडुरंग पाटील (पातकळ) हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील चापडगांवचे. ते नंतर खामगांवला स्थाईक झालेले. त्यांचेसह त्यांचे काही नातेवाईक सुद्धा खामगांवला स्थाईक झाले होते. सर्व कुटुंबीय हॉटेलसाठी झटत असे. श्री पांडुरंग पाटील यांचे पुत्र श्री जानकीराम पाटील हे व माझे वडील मित्र असल्याने व त्यांच्याशी घनिष्ट संबंध असल्याने आनंद भुवन या हॉटेलबद्दल एक आपुलकीची भावना मनामध्ये होती. श्री पांडुरंग पाटील हे स्वत: स्वच्छतेचे भोक्ते होते ते नेहमी पांढरा शुभ्र सदरा , पांढरे शुभ्र धोतर व काळी टोपी परिधान करित. लहानपणी त्यांना मी कित्येक वेळा पाहिले आहे. त्यांच्या घरासमोरच्या ओट्यावर ते खुर्ची घेऊन बसलेले असत. त्यांच्या हातात वेत असे. स्वत: स्वच्छ असल्याने ते हॉटेलच्या स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष देत असत. हॉटेल मधील कर्मचा-यांना पाटील परिवार स्वत:च्या परिवारा प्रमाणेच वागणूक देत असे. इंग्रजांच्या काळात सुरु झालेल्या या हॉटेल मध्ये चकली, बटाटा वडा, मिसळ असे पदार्थ उपलब्ध असत. पण चकली हा पदार्थ मात्र सर्वात जास्त लोकप्रिय होता. 

बटाटा वडा सुद्धा आहे परंतू पुर्वी येथील चकली जास्त प्रसिद्ध असल्याचे ऐकले आहे. जाड, मोठी खमंग चकली सोबत आनंद भुवनची विशिष्ट अशी चटणी अशी ताटली डोळ्यासमोर आली की, तोंडातील ग्रंथी स्त्रवत असत. पुढे आनंद भुवन मध्ये अनेक नवीन पदार्थांची भर पडली. असा किस्सा सुद्धा ऐकीवात आहे की पुर्वी या हॉटेलमध्ये नाश्ता झाल्यावरच प्रवासी बस निघत असे (तेंव्हा राज्य परिवहन महामंडळ नव्हते व खाजगी बसेस आनंद भुवन जवळून सुटत असत) स्वतंत्रता पुर्व काळात मुलगा हॉटेलमध्ये गेला की तो बिघडला असे समजले जात असे म्हणून मग हॉटेलला पडदा लावलेला असे. तसा तो आनंद भुवनला सुद्धा होता व बसण्याची व्यवस्था पाटावर असे , टेबल खुर्ची साहेबांमुळे आली. या हॉटेलवर आधारीत योगिनी जोगळेकर लिखित “सुहृद” नावाची एक लघु कादंबरी सुद्धा काही वर्षांपुर्वी प्रकाशित झाली होती. तसेच काही वर्षांपुर्वी प्रत्येक गावातील खाद्य संस्कृती बद्दल एक सदर लोकसत्ता मध्ये प्रकाशित झाले होते. त्यात सुद्धा आनंद भुवन वर विस्तृत माहिती देण्यात आली होती. 2014 मध्ये आनंद भुवन 100 वर्षांचे झाले. शताब्दी समारंभासाठी विविध गांवातून लोक आले होते. खामगांवचे भूषण असलेले हे हॉटेल 100 वर्षांपासून खवय्यांना आनंददायी असलेल्या चकली व इतर खाद्य पदार्थांची सेवा येथील कर्मचारी पाटील परिवाराच्या देखरेखीखाली ग्राहकांना देत आहेत. गतकाळात मित्र मंडळीसह गप्पांसोबत गरम चकलीचा स्वाद घेणा-या खामगांवातील व आज खामगांव सोडून इतरत्र स्थायिक झालेल्या अनेकांना आनंद भुवन व तेथील चकली , वड्याची चव यांची स्मृती कायम राहीलच.     

                                                   क्रमश:

१८ टिप्पण्या:

  1. लेख वाच्यानंतर आनंद भुवन चे चकली आणि बटाटेवडा डोळ्यासमोर आले

    उत्तर द्याहटवा
  2. खुप छान, सोप्या आणी सुंदर शब्दात आनंद भुवन 👍

    उत्तर द्याहटवा
  3. सुरेख वर्णन... आठवण खुप छान

    उत्तर द्याहटवा
  4. सुरेख वर्णन ... आठवणी जाग्या झाल्या...

    उत्तर द्याहटवा
  5. स्मृती जागृत झाल्या उत्कृष्ट लेख

    उत्तर द्याहटवा
  6. आठवणी जाग्या झाल्या अतिशय चविष्ट अजून चव जाणवते
    Unique taste unforgettable

    उत्तर द्याहटवा
  7. चकली मिळणारे हे एकमेव होटेल असावे.

    उत्तर द्याहटवा
  8. मला 1970 ते 1980 चा काळ आठवतो, त्या वेळी कोल्हटकर स्मारक मधे गाजलेली नाटक येत। बहुतांश वेळी चित्रपट कलावंत या नाटकातुन येत असत.ते देखील आनंद भवन मधे भेंट देत असत.
    मी स्वतः रमेश देव,हम किसी से कम नही फेम् तारिक,अशोक सराफ यांना तेथे आस्वाद घेताना प्रत्यक्ष पाहिले आहे.

    उत्तर द्याहटवा
  9. आनंद भुवनची जुन्या आठवणी ताज्या झाल्या👌👌👍👍

    उत्तर द्याहटवा