१५/११/२०२१

Article about sad demise of Eminent Historian Babasaheb Purandare

सह्याद्री हादरला महाराष्ट्र हळहळला

शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जाणण्यासाठी व तो घराघरात पोहोचवण्यासाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट त्यांची धडपड महाराष्ट्रवासियांच्या सदैव स्मरणात राहील. तसेच त्यांच्या बोलण्यातील माधुर्य , त्यांची शांत वृत्ती हे सुद्धा नेहमी प्रेरणादायी राहिल.

शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यावर कात्रज येथे झालेल्या सत्कार समारंभात बोलताना बाबासाहेब म्हणाले होते की, "शंभर वर्षे पूर्ण झाल्यावरच व शिवसृष्टी साकार झाल्यावरच मी जाईल" परंतु काळाने जुमानले नाही शिवाजी महाराज ज्याप्रमाणे शत्रूवर अचानक छापा घालीत त्याप्रमाणे काल काळाने बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर घाला घातला. कालपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. घरात पडल्यावर त्यांना न्यूमोनिया झाला व त्यांची प्रकृती खालावत गेली. आज कार्तिकी एकादशीला भल्या पहाटे त्यांचे निधन झाले. आपले संपूर्ण जीवन छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनाच्या अभ्यासामध्ये व्यतीत करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांनी राजा शिवछत्रपती तसेच महाराजांच्या विषयी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. राजा शिवछत्रपती या पुस्तकात त्यांना माहिती कुठून मिळाली याचे संदर्भ सुद्धा दिले आहेत. जाणता राजा हे त्यांचे शिवाजी महाराजांवरील महानाट्य जगभर गाजले आहे व त्याचे कित्येक प्रयोग झाले आहेत. 2015 या वर्षी बारा हजार पाचशे आसन क्षमता असलेल्या लंडन येथील वेंबले सभागृहात सुद्धा हे महानाट्य प्रदर्शित झाले. जा गोर्‍यांचा कावा सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी ओळखला होता व त्यांना कधीही डोके वर काढू दिले नव्हते, प्रसंगी तुरुंगातही टाकले होते त्याच गोर्‍यांच्या देशात जाणता राजा हे महानाट्य मोठ्या दिमाखात दाखविले गेले. छत्रपतींचे चरित्र जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या या महानाट्याचे वीस वर्षांपूर्वी अमेरीकेत सुद्धा प्रयोग झाले आहेत. आपण महाराष्ट्रीय अस्मिता व महाराष्ट्र राज्य सुसंस्कृत असल्याचा मोठा अभिमान बाळगत असतो परंतु जातिभेदासारखे कित्येक वादग्रस्त मुद्दे निव्वळ उगाळत बसतो. शिवाजी महाराजांच्या सूरत लुटी सारख्या घटना व त्यामुुळे शिवाजी महाराज यांच्या प्रती गुजराथी जनतेत असलेली भावना, गैरसमज , या सर्व समजुतींना बाजूला सारून गुजरात पर्यटन विभाग व बँक ऑफ बडोदा यांनी मात्र जाणता राजा हे महानाट्य लंडन येथे आयोजित केले होते. बाबासाहेब पुरंदरे यांना ज्यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे ठरले होतेे त्यावेळी अनेकांनी आक्षेप घेतला होता, नाके मुरडली होती त्यावेळी "महाराष्ट्र भूषण नव्हेे तर विश्वभुषण" असा एक लेख मी लिहिला होता. अमेरिका, इंग्लंड या देशात जाणता राजा महानाट्य आयोजित झाले इतरीही देशात होईल आणि मग कोणी विदेशी संस्था बाबासाहेबांना विश्वभुषण सारखा एखादा पुरस्कार देईल आणि मग आम्हा भारतीयांना महाराष्ट्रवासीयांना बाबासाहेबांच्या कार्याची महती कळेल असे बाबासाहेबांच्या पुरस्कारावर आक्षेप घेतला गेला होता म्हणून त्या लेखात लिहिले होते. कारण आपली सवयच आहे की, परकीयांनी काही सांगितले की मग आपल्याला ते पटतेे. शिवाजी महाराजांची किर्ती अनेक देशात पसरविणारे बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यामध्ये नाहीत. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी व कित्येकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक प्रकट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जाणण्यासाठी व तो घराघरात पोहोचवण्यासाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट त्यांची धडपड महाराष्ट्रवासियांच्या सदैव स्मरणात राहील. तसेच त्यांच्या बोलण्यातील माधुर्य , त्यांची शांत वृत्ती हे सुद्धा नेहमी प्रेरणादायी राहिल. त्यांच्याबाबत लिहिलेला "जाणता माणूस" हा लेख जेव्हा त्यांना भेट म्हणून दिला होता तेव्हा त्यांनी म्हटले होते की , "कुणी काहीही म्हणो आपण शांततेने आपले काम करीत जावे" आज बाबासाहेब आपल्यात नाही परंतु जाणता राजा, राजा शिवछत्रपती त्यांचे इतर अनेक ग्रंथ हे व लवकरच साकार होत असलेली शिवसृष्टी याद्वारे ते नेहमीच आपल्यामधे राहणार आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याने सह्याद्री हादरला असून महाराष्ट्र हळहळला आहे बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.



बाबासाहेब पुरंदरे यांचे बाबतचे लेख 👇

जाणता माणूस
https://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/07/an-old-article-written-in-2015-on.html
2 खरंच दुर्दैव !
https://vinayvarangaonkar.blogspot.com/2017/08/raj-thakre-speech-on-occasion-of-95th.html


४ टिप्पण्या: