१८/११/२०२१

Part 3- Pedha, Food Culture of Khamgaon article series- Ambika Hotel

खामगांवची खाद्य संस्कृती भाग-3

एक अनोखा पेढा

एकदा शाळेचा निकाल लागल्यावर वडील पेढे घेऊन आले होते. किती टक्के मिळाले याऐवजी उत्तीर्ण झाले म्हणजे पेढे आणणे हा त्यांच्या शिरस्ताच होता. मिळालेले यश साजरे करावे व पुढे जावे असे त्यांचे म्हणणे असते. त्यावेळचा तो पेढा पाहून मात्र आश्चर्य वाटले होते. खाकी रंगाचा तो भला मोठा, अनोखा पेढा पाहून आम्हा भावंडाना आश्चर्य वाटले होते. “हा कोणता पेढा ? “असे सहज उद्गार बाहेर पडले.

स्व. श्री हिराचंद वेलजी मैसेरी

मागील भागापासून पुढे 

बहुदा तिखट, चटपटीत पदार्थ हे जास्त लोकप्रिय असतात. आनंद भुवनची चकली ही त्यापैकीच एक होती. तिखट, चटपटीत पदार्थ जरी जास्त आवडत असले तरी गोड पदार्थांची महिमा सुद्धा अगाध आहे. आगामी दोन लेखात खामगांव शहरात प्रंचड लोकप्रिय झालेल्या दोन गोड पदार्थांबाबतची माहिती आहे. “साखरेचे खाणार त्याला देव देणार” अशी जुनी म्हण आहे पण काळ झपाट्याने बदलला , जीवनशैली बदलली , ताण-तणाव वाढले व आता “साखरेचे खाणार त्याला मधुमेह दणका देणार” अशी परिस्थिती आहे. भारतात सुद्धा मधुमेहींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण तरीही शरीराला सर्व रसांची आवश्यकता ही असतेच व म्हणूनच मधुर रसाचे सुद्धा महत्व आहेच. गोड पदार्थामध्ये सर्वात जुना पेढाच असावा. कारण दुधा पासून खवा व नंतर पेढा बनला असावा. परंतू त्या इतिहासात जाण्याऐवजी खामगांवातील एका अनोख्या पेढ्या बाबतच पाहूया नाहीतर पदार्थांच्या इतिहासात डोकावले तर रसगुल्ला या पदार्थाहून ओडीसा व पश्चिम बंगाल मध्ये जसे वाद आहेत तसा एखादा वाद न उदभवो.

      एकदा शाळेचा निकाल लागल्यावर वडील पेढे घेऊन आले होते. किती टक्के मिळाले याऐवजी उत्तीर्ण झाले म्हणजे पेढे आणणे हा त्यांच्या शिरस्ताच होता. मिळालेले यश साजरे करावे व पुढे जावे असे त्यांचे म्हणणे असते. त्यावेळचा तो पेढा पाहून मात्र आश्चर्य वाटले होते. खाकी रंगाचा तो भला मोठा अनोखा पेढा पाहून आम्हा भावंडाना आश्चर्य वाटले होते. “हा कोणता पेढा ? “असे सहज उद्गार बाहेर पडले. “हा अंबिकाचा पेढा आहे, शुुध्द खवे का कच्छ का पेढा" वडील उत्तरले. तेंव्हा अंबिका नावाचे हॉटेल माहित झाले.

सर्वांन तो मोठ्या आकाराचा पेढा खूप आवडला होता. त्यानंतर तो पेढा बरेचवेळा खाल्ला. मोहन टॉकीज (आता मोहन मॉल) समोर अंबिका हॉटेल आहे. या हॉटेल मध्ये नंतर अनेकदा गेलो. या हॉटेल मालकाचे आडनांव मैसेरी होते. मैसेरी कुटुंबीय आता शहा या आडनावाने सुद्धा ओळखले जाते. हिरासेठ मैसेरी वडीलांचे चांगले मित्र होते व त्यांचे आमच्या घरी येणेजाणे होते. अनेक बाबतीत ते माझ्या वडिलांचा सल्ला घेत. हिरासेठ यांच्या वडीलांनी म्हणजे वेलजीभाई मैसेरी यांनी हे हॉटेल सुरु केले होते. मैसेरी हे गुजराथी कुटुंब. सुस्वभावीपणा, टापटीप , स्वच्छता, व्यवसायिक कौशल्य अशी गुजराथी लोकांची वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच देश विदेशात कित्येक यशस्वी असे गुजराथी लोक आहेत. उपरोक्त वैशिष्ट्यां नुसार अंबिका हॉटेलचे सुद्धा स्वच्छता व टापटीप हे एक मोठे वैशिष्ट्य. या हॉटेलचे किचन सुद्धा खुप स्वच्छ असते. तेंव्हा हिरासेठ काका “खाने की चिजें अपने घर के लोग खुद बनाते" व “अपनेही हॉटेल मे लेडीज और  फॅमिली आती" असे ते अभिमानाने सांगत. आजही अंबिका हॉटेल म्हणजे खामगांव शहरातील अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींच्या सकाळच्या नाश्त्यासाठीचे आवडते ठिकाण आहे. हिरासेठ काकांना याचा मोठा अभिमान होता. पेढ्याप्रमाणे येथील उपवासाची बटाट्याची भाजी अप्रतिम असते व इतर पदार्थ सुद्धा चविष्ट असतात. खामगांवात दक्षिणात्य पदार्थ सर्वात प्रथम अंबिका हॉटेल मध्येच सुरु झाले अशी माहिती आहे. अंबिकाचा पेढा मात्र सर्वांनाच आवडत असे. कालांतराने या पेढ्याचा आकार कमी झाला. पण चव तीच होती. अस्सल खव्याचा हा पेढा होता. आता अस्सल खवा दुर्मिळ होत चालला आहे. गृहिणींनी एखाद्या वेळी शुद्ध दुध घरी आटवून अस्सल खव्याची चव स्वत: चाखावी व आपल्या मुलांना सुद्धा द्यावी म्हणजे त्यांना खरा खवा काय असतो हे कळेल. अर्थात हा न मागता दिलेला सल्ला आहे.

      वर्ष 2014 मध्ये आनंद भुवनच्या शताब्दी समारोहा बाबत लेख लिहिला होता तेंव्हा हिरासेठ काका म्हणाले होते “अपने अंबिका के बारेमे भी लिखो कुछ” पण त्यावेळी लिहिणे झाले नाही. हिरासेठ काका इहलोक सोडून गेले. आज हा लेख लिहितांना त्यांची आठवण होत आहे. ज्या हॉटेलसाठी त्यांनी आयुष्यभर मेहनत घेतली, झटत राहिले, मालक असूनही हॉटेलमधील अनेक कामे करायला त्यांनी कधीच मागेपुढे पाहीले नाही. दर रविवारी हॉटेल बंद ठेवत व त्या दिवशी दिवाळीत जशी साफसफाई करतात तसे हॉटेल साफ करीत. अंबिका हॉटेल बाबत लेख प्रकाशित झालेला पाहून त्यांना मोठा आनंद वाटला असता.  

                                                  क्रमश:

👉 नवनवीन व स्वादिष्ट पदार्थांच्या रेसिपी साठी नक्की बघा 👇

https://youtube.com/c/OnlyVeg

 रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल ला subscribe करायला विसरु नका 🙏

३ टिप्पण्या: