३०/०६/२०२२

Article about Shivsenas current situation

 ये तो होनाही था !

मी काही शिवसैनिक नाही व कधी नव्हतोही . हेच तत्व इतर पक्षांबाबत सुद्धा आहे. परंतू बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीच्या गारुडामुळे मला शिवसेना आवडायची , हो आवडायचीच. किशोरवयीन जीवनात प्रवेश केल्यावर शिवसेना, बाळासाहेब ठाकरे ही नांवे वाचनात यायला लागली, मुंबईमध्ये शिवसेना खुप प्रभावी आहे हे समजले. कालांतराने तरूणवयात दाखल झाल्यावर शिवसेना व भाजपा यांच्याबाबत अधिक माहिती मिळाली. कित्येक ठिकाणी शिवसेनेच्या फलकांवरील डरकाळी फोडणारा वाघ 

 माझे चित्त वेधून घेत असे. शिवसेनेचे मुखपत्र सामना व त्यातल्या रोखठोक भूमिका , बातम्या , व्यंगचित्रे ही पाहण्यात आली, एखादवेळी मार्मिक सुद्धा वाचण्यात येई. महाविद्यालयीन जीवनात असतांना भाजप,शिवसेना युतीला महाराष्ट्रात जनतेने कौल दिला, मनोहर जोशी हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले “माझ्या हाती रिमोट आहे” असे बाळासाहेब थेट सांगत. बाळासाहेबांची अशी बेधडक शैली , “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो” ही प्रत्येक भाषणात दिलेली हाक कुठेतरी प्रत्येकाच्या हृदयाला साद देत असे. पाकिस्तानला थेट आव्हान देणे, पाक सोबतच्या सामन्याच्या वेळी खेळपट्टी खोदणे आदी बाळासाहेबांच्या भूमिका या मनाला भावत असत. त्यांची ठाकरी शैली मोठमोठ्या सेलीब्रेटीसंह सामान्य जनतेला सुद्धा आवडत असे. तरुणांना संघर्ष, अन्याया विरुद्ध पेटून उठणे, बेधडकपणा, बिनधास्तपणा हे प्रिय असते. त्यामुळे त्याला तशा व्यक्ती आवडत असतात. अशा व्यक्तींमध्ये तो स्वत:ला पहात असतो. आमच्या महाविद्यालयीन जीवनात आम्ही तसे दोन व्यक्ती पाहिले आहे. एक व्यक्ती प्रत्यक्षात होता तो जाहीर व्यक्त होत असे व अन्याय, गरीब जनता, मराठी माणूस, हिंदू समाज यांच्या हिताच्या गोष्टी करीत असे, विरोधकांना शब्दाने ठोकून काढत असे. ( भलेही ते राजकारणासाठी का असेना, पण त्यात कुठेतरी खरेपण होते) तर दुसरा व्यक्ती आम्ही पडद्यावर पहात असू. दुसरा सिनेमात अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असे, खलनायकास ठोकून काढत असे. यातील पहिला व्यक्ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे तर दुसरा अमिताभ बच्चन. या दोघांनाही "न भूतो न भविष्यती" अशी लोकप्रियता व जनतेचे प्रेम प्राप्त झाले आहे. एवढे प्रेम की , मला आठवते माझ्या एका मित्राचा कट्टर शिवसैनिक असलेला चुलत भाऊ बाळासाहेबांचा व शिवसेनेचा एवढा प्रचंड चाहता होतो की तो म्हणत असे की ,     ”एकवेळ प्रत्यक्ष बाळासाहेब शिवसेना सोडतील पण मी नाही” आज तो हयात नाही. “मराठा तितुका मेळवावा , महाराष्ट्र धर्म वाढवावा” समर्थ रामदासांच्या या उक्तीप्रमाणे शिवरायांनी जसे मावळे जमवले होते तसेच शिवसैनिक बाळासाहेबांनी मिळवले होते. पण बाळासाहेब गेले उभा महाराष्ट्र हळहळला देश शोकसागरात बुडाला लोक आपले अश्रू रोखू शकले नाही. युती टिकवणारे प्रमोद महाजन , गोपीनाथ मुंडे गेले, बाळासाहेबांच्या हयातीतच छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे शिवसेना सोडून गेले. उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाची सर्व धुरा आली, 2019 मध्ये भाजप सेना युतीचा काडीमोड झाला आणि ज्या बाळासाहेबांनी आपले आयुष्य कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध करण्यात घालवले ,प्रसंगी अतिशय टोकाची टीका केली त्याच कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत बाळासाहेबांचा पुत्र उद्धव ठाकरे यांनी हातमिळवणी केली. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर झालेल्या फेसबुक लाईव्ह मध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की , “सत्तेसाठी लाचारी नको” मग 2019 साली जे केले ते काय होते ? उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये महा शिव आघाडी बनवली तिची महा विकास आघाडी कधी झाली हे सुद्धा ते विसरले. जेंव्हा मराठी माणूस, हिंदुत्व, देशहीत, पाकिस्तान विरोध अशी भूमिका घेणारी शिवसेना ही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लाऊन बसली त्याच क्षणी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक व जनता सुद्धा आश्चर्यचकीत,संभ्रमित झाली होती. त्यामुळेच हे सरकार टिकणार नाही असे सर्वांनाच वाटत होते पण कोरोनाने निभावून नेले. साधू हत्या, कंगना विरुद्ध अतिशय टोकाची भूमिका, दिशा सालीयानी, वाझे, मनसुख, नबाब, अनिल देशमुख, संजय राठोड, धनंजय मुंडे अशी अनेक प्रकरणे तसेच शिवसेनेतील केवळ दोन-तीन लोकांचे सल्ले घेणे, जेष्ठांना डावलणे, विचारधारेशी फारकत घेणे असे  या सरकारच्या काळात घडले या सर्वांबाबत सरकारची भूमिका जनतेला पटली नाही. संजय राऊत यांचे माध्यमांवर विशिष्ट अशा आविर्भावात व तो-यात बोलणे कुणालाही रुचत नसे, मुख्यमंत्री अत्यल्प काळ मंत्रालयात गेले, शिवसेना आमदार मंत्री यांना वेळ व निधी मिळत नव्हता उपरोक्त सर्व बाबी जनता पाहत होती आणि हे सरकार कार्यकाळ पुर्ण करणार नाही अशी खात्रीच जनतेला होती आणि शेवटी “ ये तो होनाही था” प्रमाणे तसेच झाले. विश्वासमताचा सामना करण्यापुर्वी मुख्यमंत्री महोदयांनी आग्रहाने मिळालेल्या आपल्या मुख्यमंत्री पदाचा त्याग केला. शेवटी काही तरी केल्यासारखे वाटावे, हिंदुत्व सोडले नाही असे वाटावे म्हणून संभाजीनगर,धाराशीव आणि  दि. बा. पाटील असे विमानतळाचे नामांतरण करून 2 वर्षे 7 महिन्यांचे मविआ सरकार कोसळले. बाळासाहेब गेले त्यावेळी अतीव दु:ख जनतेला झाले होते आज मविआ सरकार गेल्याबद्दल तर मुळीच नाही परंतू बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या , आपले पहिले अपत्य समजून वाढवलेल्या मराठी , हिंदुत्वाची भक्कम बाजू घेणा-या लढाऊ, "अरे आवाज कुणाचा?"      अशी घोषणा ठोकल्यावर "शिवसेनेचा" फक्त हेच उत्तर ओठावर येईल अशा शिवसेना या पक्षाची स्थिती पाहून जसे दु:ख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे निवर्तल्यावर झाले तसेच दु:ख होत आहे. शिवसेना यातून पुनश्च उभारी घेईल का? याचे उत्तर आता आगामी काळ देईल.

२३/०६/२०२२

Article about Eknath Shinde's Rebel in Shivsena, Eknath Shinde said I am "Balaasaheb's Shiv Sainik"

 धन्य धन्य “एकनाथा”...

बाळासाहेबांनी जनमानसाची नस अगदी बरोबर ओळखली, ती नस पकडण्यात दुर्दैवाने उद्धव ठाकरे तूर्तास तरी अपयशी ठरल्याचे चित्र दिसते आहे. आगामी काळात शिवसेनेची वाटचाल कशी राहील ? असा प्रश्न शिवसैनिक व जनतेला पडला आहे कारण एकनाथ शिंदे यांच्या खेळीने “धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी आमुचा माथा” म्हणत एक-एक आमदार एकनाथ शिंदे यांना चरण स्पर्श करीत गुवाहाटीत दाखल होत आहे.

परवा पासून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड गदारोळ सुरु आहे. विधान परीषद निवडणूक होत नाही तोच शिवसेना या बाळासाहेबांचा शब्द प्रमाण असलेल्या पक्षात मोठी बंडाळी झाली. सुरुवातीला एकनाथ शिंदे या जेष्ठ नेत्यासह 30 आमदार सुरतला भुर्र उडून गेले. ही आमदार संख्या वाढतच आहे व काही खासदार सुद्धा त्यांच्या संपर्कात आहेत. भावना गवळी यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. आमदार मुंबई सोडून जात असल्याचा मविआ सरकारला काहीच कसा सुगावा लागला नाही हे सुद्धा आश्चर्यच आहे. तशी या पक्षात यापुर्वीही बंडाळी झाली आहे. गणेश नाईक, छगन भुजबळ, नारायण राणे , राज ठाकरे यांनी शिवसेनाला जय महाराष्ट्र करीत वेगळी वाट धरली. परंतू एकनाथ शिंदे यांनी दिलेला झटका मात्र फार मोठा आहे. तिकडे अफगाणिस्थानात मोठा भूकंप झाला आणि इकडे शिंदे यांनी मोठा राजकीय भूकंप करून शिवसेना पक्षालाच मोठे खिंडार पाडले. या बंडानंतर अनेक मते मतांतरे व्यक्त झाली व होत आहेत. शिवसेना पक्षाचाच हा डाव असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे. शिवसेना पक्षाचाच हा डाव असल्याचे म्हणणे मात्र तितकेसे न पटणारे आहे कारण हीच खेळी खेळायची होती तर त्यांनी मविआ सरकारच का स्थापन केले असते ? शरद पवार यांच्या आग्रहाने मुख्यमंत्री झालो असे काल फेसबुक लाइव्हवर आपल्या जन संबोधनात उद्धव ठाकरे म्हणाले. तेंव्हा गटनेतेपदी एकनाथ शिंदे होते. जो गटनेता असतो तो मुख्यमंत्री पदाचा दावेदार असतो हे सर्वश्रुत आहे तरीही त्यांना डावलून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी शरद पवार व सोनिया गांधी यांच्या आग्रहास्तव कोणताही प्रशासकीय अनुभव नसतांना आरूढ झाले असे त्यांनी स्वत: काल सांगितले. कुणी विहिरीत उडी मार म्हणून म्हटले तर ती मारायची की नाही हे उडी मारणा-यानी ठरवायचे असते त्याने म्हटले म्हणून मी उडी मारली असे नसते. शिवाय ते मुख्यमंत्री झाले व आदित्य ठाकरे सुद्धा आमदार व नंतर कॅबिनेट मंत्री झाले, निवडणूकीत त्यांच्यासाठी वरळी मधील जागा सोडावी लागली होती. पक्षासाठी झटणा-या, सतरंज्या उचलणा-या, आंदोलने, सभा यांसाठी राबणा-या कार्यकर्त्यांना डावलून केवळ पक्षश्रेष्ठींचा नातू, मुलगा म्हणून थेट मोठ्या पदी वर्णी लावणे याने निष्ठावान कार्यकर्त्यांत कुठेतरी खदखद, असंतोष हा निर्माण होतच असतो व हे सर्व पक्षांसाठी लागू आहे. याच कारणामुळे गतवर्षी काँग्रेस पक्षात सुद्धा राहुल गांधी यांच्या नियुक्ती वरून गटबाजी झाली होती. त्याहीपूर्वी काँग्रेस पक्षात हे झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सुद्धा सर्व आलबेल आहे असे नाही. सकाळचा शपथविधी हा त्याचाच एक नमुना होता. इतरही पक्षात घराणेशाहीमुळे असंतोष/फुट पडल्याचे दाखले आहेत. इतिहासात सुद्धा अशी अनेक उदाहरणे आहेत. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस, सोनिया गांधी, शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली त्यांच्या पक्षातील घराणेशाहीवर कित्येकदा तीव्र आक्षेप घेतला त्यांच्याच शिवसेना पक्षातील आजच्या बंडाळीचे एक कारण घराणेशाही हे  सुद्धा आहे. घराणेशाहीचा, पुत्र मोहाचा पहिला आघात बाळासाहेबांच्या हयातीतच राज ठाकरे यांच्या शिवसेना सोडून जाण्याने झाला. तर यावेळी याच घराणेशाहीमुळे आदित्य ठाकरे यांना पक्षातील जेष्ठ नेत्यांपेक्षा जास्त महत्व प्राप्त झाले होते. आदित्य ठाकरे यांच्यावरच मोठ्या जबाबदा-या टाकणे, जेष्ठांना डावलणे, मुख्यमंत्र्यांचे पक्षातील मंडळीस वेळ न देणे, शिवसेनेची पुर्वीची कट्टर हिंदुत्वाची विचारधारा सुटणे, संजय राऊत यांची विनाकारणची वक्तव्ये व त्यांना मिळालेले आवाजवी महत्व, शिवसेना पक्षाचा जो स्वभाव बाळासाहेबांच्या कारकिर्दित होता तो स्वभाव सोडून पूर्वीच्या विरोधकांसोबत तडजोड करणे, मवाळ धोरण अंगीकारणे, पक्षातील आमदार, मंत्री यांच्याऐवजी आघाडीतील आमदार व मंत्री यांच्या कामांना प्राधान्य देणे, अशी काही या बंडाळीची कारणे आहेत. आज शिवसेना पक्षाची जी वाताहत होतांना दिसते आहे, एवढी वाताहत की पक्ष चिन्हा बाबत सुद्धा आता दावा होण्याची शक्यता आहे. हे शिवसैनिकांसाठी निश्चितच वेदनादायी आहे. परंतू ज्या क्षणी मविआ आघाडी स्थापन झाली होती त्याचवेळी शिवसेना पक्षाच्या भविष्याची चिंता शिवसैनिक व जनतेला निर्माण झाली होती. पक्ष स्थापनेपासून शिवसेना पक्षाची असलेली भूमिका, स्वभाववृत्ती, 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण, स्पष्ट व रोखठोकपणा या सर्वांचा त्याग करून एकदम कोलांटी उडी मारून उद्धव ठाकरे यांनी अनैसर्गिक आघाडी केली तेंव्हाच शिवसेना पक्षाच्या आगामी वाटचालीबद्दल अनेकांच्या मनात  शंकेची पाल चुकचुकली होती. शिवसेनेतील बंडाळीस घराणेशाही हे एक कारण निश्चितच दिसत आहे, काँग्रेस पक्षाने जसे एका कुटुंबातील एकालाच तिकीट दिले जाईल असा निर्णय त्यांच्या बैठकीत घेतला होता त्याप्रमाणे सर्व पक्षांनी सुद्धा असा विचार करणे जरुरी आहे. 

    हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या एका व्यंगचित्रकार असलेल्या कलाप्रेमी युवकाने शिवसेना हा पक्ष स्थापन केला, जातपात न पाहता मनोहर जोशी , सुधीर जोशी , छगन भुजबळ , आनंद दिघे , नारायण राणे इ लोकांना आपल्यासह घेतले व राजकारणात शिवसेना या पक्षाचे एक स्थान निर्माण केले. महाराष्ट्राबाहेर व महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फारशी वाढ न झालेल्या या पक्षाने जनमानसाची नस अगदी बरोबर ओळखली, ती नस पकडण्यात दुर्दैवाने उद्धव ठाकरे तूर्तास तरी अपयशी ठरल्याचे चित्र दिसते आहे. आगामी काळात , राजकारणात शिवसेनेची वाटचाल कशी राहील ? असा प्रश्न शिवसैनिक व जनतेला आता पडला आहे कारण एकनाथ शिंदे यांच्या खेळीने “धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी आमुचा माथा” म्हणत एक-एक आमदार एकनाथ शिंदे यांना चरण स्पर्श करीत गुवाहाटीत दाखल होत आहे.  

१४/०६/२०२२

Article about "I am not Savarkar I am Rahul Gandhi" banner in rally while Rahul Gandhi went for ED enquiry

तुम्ही सावरकर नाहीच !

तुम्ही सावरकर तर नाहीच व होऊ सुद्धा शकणार नाही कारण हजारो वर्षात एक सावरकर जन्म घेतो. सावरकर होण्यासाठी कष्ट, यातना सहन कराव्या लागतात, धैर्य अंगी बाणवावे लागते, मातृभूमीविषयी अतोनात प्रेम असावे लागते, त्याग , तपस्विता, तेज, तारुण्य , तळमळ हे सावरकरांचे अटलजींनी कथन केलेले गुण अंगी असावे लागतात...

नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र पंडीत नेहरू स्थापित असोसिएटेड जर्नल लिमिटेड नामक कंपनी  चालवले जात असे. या कंपनीस सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी यंग इंडिया लिमिटेड हि कंपनी स्थापन करून काबीज (Take over) केले व कंपनीच्या देशभरातील करोडो रुपयांच्या जमिनीचा गैरव्यवहार केला. या प्रकरणी राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. ईडी ला सामोरे जाताना राहुल गांधी हे मोठ्या लावाजाम्यासह चालत गेले. आपल्या समर्थकांसह ईडी चौकशीस जातांना या मोर्चाला त्यांनी सत्याग्रह म्हटले. याच प्रकरणात जमानतीवर असलेले राहुल व त्यांचे समर्थक यांचा आविर्भाव असा होता जणू काही  ते अत्यंत निरपराध व निरागस आहेत परंतू डाळीत काही न काही काळे असल्याशिवाय कुणालाही ईडी चौकशीस बोलवले जात नाही. या मोर्चात विविध फलक सुद्धा झळकवले गेले. यातील एका फलकावर "आय एम नॉट सावरकर आय एम राहुल गांधी" असे इंग्रजीत लिहिले होते. हे जे लिहिले होते ते बरोबरच आहे. सावरकर होणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. याच फलकाला अनुसरून राहुल गांधी यांना खालील मुद्द्यांन्वये सांगावेसे वाटते. 

1. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्वसामान्य घरातून आले होते तुमच्यासारखे तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्मले नव्हते. तुम्हाला तुमच्या बाल्यावस्थेपासून कधीही काहीही त्रास झाला नाही परंतु सावरकरांना त्यांच्या बालपणापासून आयुष्यभर अनेक संकटे, अनेक यातना यांचा सामना करावा लागला.

2. सावरकर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी विदेशात गेले तिथे ग्रंथलेखन केले भारताचा दबदबा दाखवून दिला याउलट तुम्ही मात्र कर्तृत्वाशिवाय कधी सुटी घालवायला तर कधी विविध कार्यप्रसंगी विदेशात जाऊन भारताविषयी अपमानजनक अशी वक्तव्ये केली आहेत.   

3. सावरकर हे भाषाप्रभू होते त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, काव्य केली, लावण्या लिहिल्या, शेरोशायरी लिहिली. तुम्हाला मात्र एकदा एके ठिकाणी साधा अभिप्राय लिहिणे सुद्धा जमले नव्हते.

4. सावरकरांची मालमत्ता जी जप्त झाली होती ती तुमच्या पणजोबांच्या काळात त्यांना परत देण्यास हरकत घेतली गेली होती आणि  तुम्हाला तर इतरांची मालमत्ता हडप केल्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावले जाते. सावरकरांनी देशाला सर्वस्व दिले आणि तुम्ही मात्र देशाचे लाटण्याचा प्रयत्न करीत आहात

5. सावरकरांना गांधी हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात डांबले गेले होते पण ते डगमगले नाही आणि त्या आरोपातून सहीसलामत बाहेर पडले. तुमच्यावर मात्र गैरव्यवहार करण्याचा आरोप झाल्यामुळे तुम्ही किती विचलीत झाले आहात हे तुमच्या कालच्या गतिविधीं वरून दिसून येते. याचाच अर्थ प्रकरणात तथ्य आहे व त्यामुळे भय निर्माण झाले आहे.

6. सावरकर आणि गांधीजी दोघांचीही विचारसरणी अत्यंत निराळी होती परंतू सावरकरांनी कधीही गांधीजींचा अपमान केला नाही तुम्ही मात्र तुमच्यावर आरोप झालेला असतांनाही  समर्थक बोलावले त्यांना सत्याग्रह हे नाव देऊन चौकशीला गेलात. तुमच्यावर गैरव्यवहाराचा ठपका असतांनाही तुमच्या मोर्चाला सत्याग्रह म्हणत तुम्ही गांधीजींचा सुद्धा अपमान करीत आहात.

    राहुलजी वरील सहा मुद्द्यांव्यतिरिक्त आणखीही इतर अनेक मुद्दे देता येतील ज्या व्दारे तुम्ही जे I am not Sawarkar म्हणता ते स्पष्ट होईल.

    राहुलजी तुम्ही कोणत्या उद्देशाने I am not Sawarkar म्हणता ते चांगलेच ठाऊक आहे. परंतू घाबरलो आहे असे दर्शवून अफजलखानास चकमा देण्यात शिवाजी महाराजांची जी दुरदृष्टी होती तशीच इंग्रजांना चकमा देण्याची सावरकरांची होती. परंतु  राहुलजी या देशाचा इतिहास तुम्हाला नीट ठाऊकच नाही व पुर्वग्रह दुषित अशी तुमची दृष्टी असल्याने तुम्हाला सावरकरांविषयी  आकस आहे.  तुम्ही सावरकर तर नाहीच व होऊ सुद्धा शकणार नाही कारण हजारो वर्षात एक सावरकर जन्म घेतो. सावरकर होण्यासाठी कष्ट, यातना सहन कराव्या लागतात, धैर्य अंगी बाणवावे लागते, मातृभूमीविषयी अतोनात प्रेम असावे लागते, त्याग , तपस्विता, तेज, तारुण्य , तळमळ हे सावरकरांचे अटलजींनी कथन केलेले गुण अंगी असावे लागतात. 

 "झालेत बहु , होतील बहु परी या सम हाच"  असे सावरकर होते. 

राहुलजी वरील सर्वार्थाने तुम्ही सावरकर नाहीच आणि म्हणून तुमच्या मोर्चात  "आय एम नॉट सावरकर आय एम राहुल गांधी" असा जो फलक होता तो योग्यच होता.

०९/०६/२०२२

Article about Subhash Desai statement in Aurangabad

विक्रमादित्याचे नांव घेण्यापेक्षा विकासाचा विक्रम सांगावा

मविआ सरकारने  खरोखर  अनेक विक्रम केले आहेत. त्यात वाझे प्रकरण अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे,अनिल परब, खोटी कागदपत्रे सादर करण्याचे प्रकरण अशा नाना विक्रमांचा समावेश आहे.

राज ठाकरे यांची सभा , त्यानंतर जल आक्रोश मोर्चा यानंतर संभाजीनगर येथे काल शिवसेनेची स्वाभिमान सभा संपन्न झाली. संभाजीनगर नामांतरण प्रश्न कसा निकाली काढावा हा संभ्रमच असल्याने संभाजी महाराज यांचा मोठा पुतळा तेवढा व्यासपीठावर ठेवण्यात आला होता. नामंतरणापेक्षा रोजगार, पाणी इ प्रश्न मोठे आहे असे अबू आझमी यांच्या वक्तव्याशी मिळते जुळते विधान मुख्यमंत्र्यानी केले. या सभेला उद्धव ठाकरे यांच्या आगमनापूर्वी काही नेत्यांनी संबोधित केले. यात उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा सुद्धा समावेश होता. सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहून सुभाष देसाई यांनी अत्यानंदीत होऊन आपल्या भाषणात शिवसेनेने शिवसेनेच्याच सभेला होणा-या गर्दीचा विक्रम मोडला असे म्हटले व या अनुषंगाने हिंदू चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य राजाच्या नावाचा विशेषण म्हणूूून सुद्धा उपयोग केला. पण हिंदूंच्या त्या चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्याने एकट्याने साम्राज्य प्रस्थापित केले होते त्यासाठी लाचारी , अभद्र आघाड्या केल्या नव्हत्या याचे देसाईंना स्मरण आहे की नाही देव जाणे. तसे पाहिले तर सभांना होणाऱ्या गर्दीचा विक्रम करण्यापेक्षा भारतीय राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षांच्या  विकास कामांचा विक्रम स्थापित करायला हवा व तो जाहीर सभांमधून सांगायला हवा. राजकीय पक्षांच्या सभा होतात त्यात कुरघोड्या ,टोमणे,एकमेकांवर टीका-टिपणी, शेेेलके शब्दप्रयोग हे करण्यापेक्षा आपल्या पक्षाने कोण-कोणती विकास कामे केली, समाजासाठी काय केले, कोणते उपक्रम राबवले जाहीरनाम्यातील वचने पूर्ण केली का? हे जनतेला सांगायला हवे. विक्रमादित्य राजाचा सुभाष देसाई यांनी केलेल्या उल्लेखामुळे विक्रमादित्य या भारतीय इतिहासातील एक थोर, अत्यंत उदार व न्यायप्रिय राजाचे स्मरण झाले. तो त्याच्या रत्नजडित सिंहासनावर बसून न्यायदान करीत असे. विक्रमादित्यानंतर त्याचा वंशज राजा भोज हा एकदा शिकारीला गेला असता त्याला जंगलात एक मुलगा एका उंच मातीच्या ढिगाऱ्यावर बसून त्याच्या मित्रांमधील तंटा सोडवत होता व उत्कृष्ट न्यायदान करत होता असे दृश्य दिसले. त्याला वाटले की एवढा लहान मुलगा इतके चांगले न्यायदान कसे करू शकतो? यात काही स्थान महात्म्य तर नाही ना? म्हणून त्याने तो मुलगा ज्या मातीच्या ढिगार्‍यावर बसून न्यायदान करीत असे तो मातीचा ढिगारा खोदून काढला. तेव्हा त्याला त्या ढिगाऱ्याखाली विक्रमादित्याचे सिंहासन सापडले. विक्रमादित्याच्या नि:पक्ष न्यायदानामुळे त्या सिंहासनास तेवढे पावित्र्य प्राप्त झाले होते. पुढे जेव्हा त्या सिंहासनावर राजा भोज आरूढ होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा उधार व न्यायप्रिय असलेल्या विक्रमादित्याच्या त्या सिंहासनावर बसण्यास त्याला  सिंहासनावरील प-या प्रकट होऊन तुझ्या मध्ये सुद्धा जर विक्रमादित्यासारखेच गुण असतील तर तू या सिंहासनावर बसण्याचा अधिकारी ठरशील असे राजा भोज यास म्हणतात. राजा भोज आत्मपरीक्षण करू लागतो. असे आत्मपरीक्षण सांप्रतकालीन नेत्यांनी सुद्धा करणे आवश्यक झाले आहे. सभेला झालेल्या गर्दीचा विक्रम या अनुषंगाने देसाईंनी विक्रमादित्याचा उल्लेख केला असे जरी असले तरी मविआ सरकारने मात्र खरोखर  अनेक विक्रम केले आहेत. त्यात वाझे प्रकरण अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे,अनिल परब, खोटी कागदपत्रे सादर करण्याचे प्रकरण अशा नाना विक्रमांचा समावेश आहे यात इतरही काही जणांचा समावेश आहे. यांच्याबाबत कारवाई करतांना नायप्रिय राजा विक्रमादित्याप्रमाणे त्वरित  व 
न्याय्य कारवाई का केली गेली नाही? कारवाई करतांना विलंब का झाला? निव्वळ न्यायी राजा विक्रमादित्याचे नांव घ्यायचे, विशेषण लावायचे परंतू कृती मात्र अगदी उलट. मविआ सरकार वरीलपैकी काही व्यक्तींवर केंद्र सरकार हे इडी, सीबीआयच्या माध्यमातून ही कारवाई हेतुपुरस्सर करत आहे असे जरी म्हणत असले तरी या सरकारमधील व्यक्तींची काही जुनी प्रकरणे मात्र निश्चितच आहेत, कारण काही दिवसांपुर्वी संजय राऊत सुद्धा "काही जुनी  प्रकरणे उकरून काढली जात आहेत" असे म्हणाले होते. याचाच अर्थ प्रकरणे आहेत. खंडणी, भ्रष्टाचार, अनैतिकता इ अनेक विक्रम करणा-या मविआ सरकार मधील नेत्यांच्या नावावर नोंदवले जात असतांना देसाई साहेबांनी केवळ सभेला झालेल्या गर्दीला हुरळून त्या गर्दीचा विक्रम सांगण्यापेक्षा व न्यायप्रिय, चक्रवर्ती हिंदू राजा विक्रमादित्यच्या नावाचा विशेषण म्हणून उपयोग न करता आपल्या विकास कामांचा विक्रम जनतेला सांगावा.