३०/०६/२०२२

Article about Shivsenas current situation

 ये तो होनाही था !

मी काही शिवसैनिक नाही व कधी नव्हतोही . हेच तत्व इतर पक्षांबाबत सुद्धा आहे. परंतू बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीच्या गारुडामुळे मला शिवसेना आवडायची , हो आवडायचीच. किशोरवयीन जीवनात प्रवेश केल्यावर शिवसेना, बाळासाहेब ठाकरे ही नांवे वाचनात यायला लागली, मुंबईमध्ये शिवसेना खुप प्रभावी आहे हे समजले. कालांतराने तरूणवयात दाखल झाल्यावर शिवसेना व भाजपा यांच्याबाबत अधिक माहिती मिळाली. कित्येक ठिकाणी शिवसेनेच्या फलकांवरील डरकाळी फोडणारा वाघ 

 माझे चित्त वेधून घेत असे. शिवसेनेचे मुखपत्र सामना व त्यातल्या रोखठोक भूमिका , बातम्या , व्यंगचित्रे ही पाहण्यात आली, एखादवेळी मार्मिक सुद्धा वाचण्यात येई. महाविद्यालयीन जीवनात असतांना भाजप,शिवसेना युतीला महाराष्ट्रात जनतेने कौल दिला, मनोहर जोशी हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले “माझ्या हाती रिमोट आहे” असे बाळासाहेब थेट सांगत. बाळासाहेबांची अशी बेधडक शैली , “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो” ही प्रत्येक भाषणात दिलेली हाक कुठेतरी प्रत्येकाच्या हृदयाला साद देत असे. पाकिस्तानला थेट आव्हान देणे, पाक सोबतच्या सामन्याच्या वेळी खेळपट्टी खोदणे आदी बाळासाहेबांच्या भूमिका या मनाला भावत असत. त्यांची ठाकरी शैली मोठमोठ्या सेलीब्रेटीसंह सामान्य जनतेला सुद्धा आवडत असे. तरुणांना संघर्ष, अन्याया विरुद्ध पेटून उठणे, बेधडकपणा, बिनधास्तपणा हे प्रिय असते. त्यामुळे त्याला तशा व्यक्ती आवडत असतात. अशा व्यक्तींमध्ये तो स्वत:ला पहात असतो. आमच्या महाविद्यालयीन जीवनात आम्ही तसे दोन व्यक्ती पाहिले आहे. एक व्यक्ती प्रत्यक्षात होता तो जाहीर व्यक्त होत असे व अन्याय, गरीब जनता, मराठी माणूस, हिंदू समाज यांच्या हिताच्या गोष्टी करीत असे, विरोधकांना शब्दाने ठोकून काढत असे. ( भलेही ते राजकारणासाठी का असेना, पण त्यात कुठेतरी खरेपण होते) तर दुसरा व्यक्ती आम्ही पडद्यावर पहात असू. दुसरा सिनेमात अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असे, खलनायकास ठोकून काढत असे. यातील पहिला व्यक्ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे तर दुसरा अमिताभ बच्चन. या दोघांनाही "न भूतो न भविष्यती" अशी लोकप्रियता व जनतेचे प्रेम प्राप्त झाले आहे. एवढे प्रेम की , मला आठवते माझ्या एका मित्राचा कट्टर शिवसैनिक असलेला चुलत भाऊ बाळासाहेबांचा व शिवसेनेचा एवढा प्रचंड चाहता होतो की तो म्हणत असे की ,     ”एकवेळ प्रत्यक्ष बाळासाहेब शिवसेना सोडतील पण मी नाही” आज तो हयात नाही. “मराठा तितुका मेळवावा , महाराष्ट्र धर्म वाढवावा” समर्थ रामदासांच्या या उक्तीप्रमाणे शिवरायांनी जसे मावळे जमवले होते तसेच शिवसैनिक बाळासाहेबांनी मिळवले होते. पण बाळासाहेब गेले उभा महाराष्ट्र हळहळला देश शोकसागरात बुडाला लोक आपले अश्रू रोखू शकले नाही. युती टिकवणारे प्रमोद महाजन , गोपीनाथ मुंडे गेले, बाळासाहेबांच्या हयातीतच छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे शिवसेना सोडून गेले. उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाची सर्व धुरा आली, 2019 मध्ये भाजप सेना युतीचा काडीमोड झाला आणि ज्या बाळासाहेबांनी आपले आयुष्य कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध करण्यात घालवले ,प्रसंगी अतिशय टोकाची टीका केली त्याच कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत बाळासाहेबांचा पुत्र उद्धव ठाकरे यांनी हातमिळवणी केली. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर झालेल्या फेसबुक लाईव्ह मध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की , “सत्तेसाठी लाचारी नको” मग 2019 साली जे केले ते काय होते ? उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये महा शिव आघाडी बनवली तिची महा विकास आघाडी कधी झाली हे सुद्धा ते विसरले. जेंव्हा मराठी माणूस, हिंदुत्व, देशहीत, पाकिस्तान विरोध अशी भूमिका घेणारी शिवसेना ही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लाऊन बसली त्याच क्षणी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक व जनता सुद्धा आश्चर्यचकीत,संभ्रमित झाली होती. त्यामुळेच हे सरकार टिकणार नाही असे सर्वांनाच वाटत होते पण कोरोनाने निभावून नेले. साधू हत्या, कंगना विरुद्ध अतिशय टोकाची भूमिका, दिशा सालीयानी, वाझे, मनसुख, नबाब, अनिल देशमुख, संजय राठोड, धनंजय मुंडे अशी अनेक प्रकरणे तसेच शिवसेनेतील केवळ दोन-तीन लोकांचे सल्ले घेणे, जेष्ठांना डावलणे, विचारधारेशी फारकत घेणे असे  या सरकारच्या काळात घडले या सर्वांबाबत सरकारची भूमिका जनतेला पटली नाही. संजय राऊत यांचे माध्यमांवर विशिष्ट अशा आविर्भावात व तो-यात बोलणे कुणालाही रुचत नसे, मुख्यमंत्री अत्यल्प काळ मंत्रालयात गेले, शिवसेना आमदार मंत्री यांना वेळ व निधी मिळत नव्हता उपरोक्त सर्व बाबी जनता पाहत होती आणि हे सरकार कार्यकाळ पुर्ण करणार नाही अशी खात्रीच जनतेला होती आणि शेवटी “ ये तो होनाही था” प्रमाणे तसेच झाले. विश्वासमताचा सामना करण्यापुर्वी मुख्यमंत्री महोदयांनी आग्रहाने मिळालेल्या आपल्या मुख्यमंत्री पदाचा त्याग केला. शेवटी काही तरी केल्यासारखे वाटावे, हिंदुत्व सोडले नाही असे वाटावे म्हणून संभाजीनगर,धाराशीव आणि  दि. बा. पाटील असे विमानतळाचे नामांतरण करून 2 वर्षे 7 महिन्यांचे मविआ सरकार कोसळले. बाळासाहेब गेले त्यावेळी अतीव दु:ख जनतेला झाले होते आज मविआ सरकार गेल्याबद्दल तर मुळीच नाही परंतू बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या , आपले पहिले अपत्य समजून वाढवलेल्या मराठी , हिंदुत्वाची भक्कम बाजू घेणा-या लढाऊ, "अरे आवाज कुणाचा?"      अशी घोषणा ठोकल्यावर "शिवसेनेचा" फक्त हेच उत्तर ओठावर येईल अशा शिवसेना या पक्षाची स्थिती पाहून जसे दु:ख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे निवर्तल्यावर झाले तसेच दु:ख होत आहे. शिवसेना यातून पुनश्च उभारी घेईल का? याचे उत्तर आता आगामी काळ देईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा