०७/०७/२०२२

Article about attacks on innocent and Indian Law

 सनदशीर मार्गाने विरोध करावा. 


भारतात नुकत्याच झालेल्या दोन निर्घुण हत्यांमध्ये एक समान धागा आहे जो सर्वश्रूत आहे. तर आणखी एक समानता आहे ती म्हणजे ज्यांच्यावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या दिवशी हल्ले झाले ती दोघे बेसावध होती , निशस्त्र होती. हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ले करून जनसामान्यात आपला धाक , भीती , दरारा प्रस्थापित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतू निशस्त्र, बेसावध , लहान मुले , स्त्री यांच्यावर शस्त्र चालवायचे नाही आणि सुर्यास्त झाल्यावर युद्ध न करण्याचा आपल्या अनादी अनंत काळापासून चालत आलेल्या भारतीय संस्कृतीत युद्धनीतीचा  दंडकच होता. या नियमामुळेच अर्जुनाने कर्णावर बाण सोडण्यास नकार दिला होता. परंतू ,”हे पार्था ज्याच्या जवळ शस्त्र नाही व म्हणून मी त्याला मारणार नाही असे तू म्हणतो तो अधर्मी आहे , त्याचा अधर्म तू विसरला का? “ असे भगवंताने स्पष्ट केल्यावर मग अर्जुनाने कर्णावर आपल्या गांडीवातून बाण सोडला होता. परंतू निशस्त्रास न मारण्याचा विचार आपल्या युद्धनीतीमुळेच धर्मप्रवण अर्जुनाने केला होता. याच युद्धनीतीमुळे  सुर्यास्त झाला युद्ध संपले आता आपला मृत्यू होणार नाही असा आनंद अभिमन्युला मारणा-या जयद्रथास झाला होता व तो लपलेला जयद्रथ समोर आला होता परंतू सुर्यास्त झालाच नव्हता, ती सुदर्शनधारीची लीला होती व अधर्मी जयद्रथास मारण्यात आले. अशी आपली युद्धनीती होती, शिवाजी महाराजांनी सुद्धा शत्रूच्या स्त्रीया , मुले आणि निशस्त्र यांना मारायचे नाही असे आदेश दिले होते. परंतू आपली युद्धनीती पार कोसळून टाकली ती परकीय आक्रमकांनी. बेसावध , निशस्त्रांवर हल्ले करणे, निर्घुण हत्या करणे, स्त्रीयांवर अत्याचार करणे हे सर्व आणले व तसाच प्रकार तशीच मानसिकता असलेल्यांकडून आजही आपल्या लोकशाही देशात देशांतर्गत युद्धे किंवा युद्धजन्य परिस्थिती नसतांनाही होतांना दिसतो. जरा कुणी व्यक्तिस्वातंत्र्यानुसार वक्तव्य केले की कर हल्ला , काप गळा हे काय चालले काय ? काय तालिबान आहे का ? आणि अशांनी  मात्र त्याच व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घेऊन काहीबाही बोललेले चालते , कुणाचाही अपमान केलेला चालतो हे कसे काय ? हे योग्य नव्हे. हल्लेखोरांनी त्यांना पटत नसलेल्या घटनांबाबत कायदेशीर रितीने लढावे , आपल्या देशात बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहका-यांनी अथक परीश्रमाने आपली घटना लिहिली आहे. आपला कायदा हा सर्वांना समदृष्टीने पाहतो. इथे काही इतर राष्ट्रांसारखी बेबंदशाही नाही येथील लोकशाही , येथील कायदा हा सर्वांना समान मानतो व जे योग्य आहे त्यानुसारच न्याय मिळतो तरी असमाधान असेल तर सुप्रीम कोर्टापर्यंत लढता येते. गुन्हेगारासाठी आपले न्यायालय रात्री अवेळी सुद्धा उघडले गेले आहे, एवढे असतांना अशी क्रुरता मुळीच योग्य नाही. आपल्या सर्वांना बालपणापासून शांततेची शिकवण दिली जाते त्या शिकवणीचे अनुसरण व्हावे. शस्त्र उगारायचे असेल तर ते आपल्या देशबांधवावर नव्हे. शस्त्रे चालवण्याची खुप इच्छा असेल तर सैन्यात जावे व  देशाच्या शत्रूवर शस्त्र चालवावे, पराक्रम गाजवावा, गौरव सुद्धा होतो. या देशाइतकी सुरक्षितता कुठेही नाही , अमेरिकेत गत काही दिवसात झालेले गोळीबार सर्वांनी पाहिले , इतर देशांत बाहेरून आलेल्यांना अगदीच दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते ते ही आपणास ठाऊक आहे , पदोपदी कसे कस्पटासमान लेखले जाते ते सुद्धा जगजाहीर आहे. मग आपल्याला जिथे चांगली वागणूक मिळते , जेथील कायदा सर्वांना समदृष्टीने  पाहतो  त्या देशात आपण सुद्धा सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या कराव्या , आपले म्हणणे मांडावे असे या हल्लेखोरांकडून अपेक्षित आहे. बेसावध, निशस्त्रास मारण्यात कसली आली शूरता ?   

1 टिप्पणी: