१९/०७/२०२२

Tribute article about singer #Bhupindersingh

"करोगे याद तो..." भाग 1 


...आज लिहतेवेळी मात्र छंदापेक्षाही  भूपेंद्रने गायलेल्या गीतांबद्दलचे प्रेमच अधिक होते. एव्हाना मला माझ्या दुुुखण्याचा विसर पडला होता, हा त्या सौ. ने दिलेल्या औषधाचा प्रभाव होता की स्मरण झालेल्या भूपेंद्रच्या त्या मधुर गीतांचा  ? ...

खरे तर काही करण्याच्या मनस्थितीत नाही. वातावरणात जरी सुखद गारठा असला तरी अंगात ताप आला आहे. आज सकाळी मोबाईल हाती घेतला आणि प्रख्यात गायक भूपेंद्र निवर्तल्याचे वृत्त वाचले. थोड्या वेळाने  भूपेंद्रविषयी लिहू लागलो. तसे पाहिले तर भूपेंद्र हा विस्मृतीत गेलेला गायक. विशी-तिशीतील तरुणांना ठाऊक असण्याची सुद्धा शाश्वती नाही, पण सिनेगीतांची आवड असणा-या रसिक श्रोत्यांना मात्र भूपेंद्र हमखासच  ठाऊक आहे. रफी, किशोर, मुकेश या त्रयींच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत गायक म्हणून दाखल होऊन आपला वेगळा ठसा उमटवणे म्हणजे सोपे नव्हते पण आपल्या पहाडी आवाजाने भूपेंद्रने तो ठसा उमटवला. मूळचे पंजाबी असलेले गिटार वादनात निष्णात भूपेंद्र हे खरे तर गजल गायक. त्याकाळच्या चित्रपट संगीतात गजलचा समावेश अल्पसा होता परंतू हकीकत या युद्धपटातील मदन मोहन यांनी स्वरबद्ध केलेले "हो के मजबूर मुझे उसने भुलाया होगा" हे गीत भूपेंद्र यांनी गायले व रसिकांना आपला परिचय करून दिला. तत्कालीन चित्रपटात भूपेंद्र पठडीतील गीते तितकीशी नसत तो काळ म्हणजे शम्मी, जितेंद्र यांचा याहू, मस्त बहारोका मै आशिक टाईप गाण्यांचा त्यामुळे भूपेंद्रला वाट बघावी लागली. तो पर्यंत त्याने काही ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. 1970 ते 80 च्या दशकात, समांतर सिनेमा काळात मात्र त्यांनी अनेक चित्रपट गीते गायली जी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. "नाम गुम जायेगा" , "किसी नजरको तेरा", "दिल ढुंढता है", "दो दिवाने शहरमे", "कभी किसिको मुकम्मल जंहा" अशी अनेक गीते भूपेंद्रने आपल्या मधुर गायनाने अजरामर करून टाकली आहेत. आजही भूपेंद्र यांची गीते आवडीने ऐकली परंतू या गीतांचा गायक भूपेंद्र आहे हे मात्र ऐकणा-यांपैकी अनेकांना माहित नसते. भूपेंद्रचा विषय निघाला की मला आठवते ते "दो दिवाने शहरमें" हे गीत शहराच्या गर्दीत घर शोधणा-या जोडप्याचे गीत. तसेच संजीवकुमारवर चित्रीत "दिल ढुंढता है" हे गीत. या दोन्ही गीतांची sad versions सुद्धा आहे ती दोन्ही भूपेंद्र यांनी अप्रतिम गायली आहेत. गजल म्हटले की शांत, संथ असा प्रकार. 60 च्या दशकात आकाशवाणीच्या माध्यमातून पुढे आलेला हा गायक 80 च्या दशकात डिस्को दाखल झाल्यावर या गोंगाटापासून स्वत: दूर झाला.  भूपेंद्रने गायलेल्या गीतांची संख्या अल्प असली तरी गायन , गीतांची गोडी ही अवीट. गुणवत्ता म्हणावी ती हीच, क्रिकेटर राहुल द्रविडसारखी भरवश्याची. सिनेमा चालो की ना चालो भूपेंद्रची गाणी गाजतीलच हा विश्वास संगीतकार निश्चितच बाळगत असतील अशा आवाजाचा तो धनी. "किती वेळ मोबाईल पाहताय ?, तब्येत बरी नाही ना तुमची, आराम करा" सौ.च्या या वाक्याने भूपेंद्र तंद्री भंग पावली. मी गोळ्या घेतल्या. मनातूूून भूपेंद्र जात नव्हता. पडल्या-पडल्या "करोगे याद तो" हे त्याचे आणखी एक गीत आठवले. लता दिदी निवर्तल्या त्यावेळी त्यांच्या "नाम गुम जायेगा चेहरा ये बदल जायेगा मेरी आवाजही पहचान है" या गीताच्या ओळी माध्यमांनी शीर्षक म्हणून वापरल्या होत्या. या गीतात भूपेंद्र त्यांचे सहगायक होते. या ओळी त्यांना सुद्धा समर्पक आहेत. भूपेंद्रची गीते मला आठवत होती, मी टाईप करीत होतो. एखादा छंद जडला की असेच होत असावे तहान, भूक, थंडी, तापादी विसरून मनुष्य आधी छंद जोपासणाल्या अधिक प्राधान्य देत असावा असा विचार सुद्धा उगीचच मनाला स्पर्शून गेला. पण आज लिहतेवेळी मात्र छंदापेक्षाही भूपेंद्रने गायलेल्या गीतांबद्दलचे प्रेमच अधिक होते. एव्हाना मला माझ्या दुुुखण्याचा विसर पडला होता, हा त्या सौ. ने दिलेल्या औषधाचा प्रभाव होता की स्मरण झालेल्या भूपेंद्रच्या त्या मधुर गीतांचा  ?  मी पुन्हा विचारात पडलो .

२ टिप्पण्या:

  1. खुप छान लिहिले आहे. भूपेंद्र या गायका विषयी ज्यांना माहीत नव्हते त्यांच्यासाठी खूप चांगली माहिती.

    उत्तर द्याहटवा