२१/०७/२०२२

Tribute article about singer #Bhupindersingh

भलेपणाला सोडू नको  

(करोगे याद तो  भाग 2 )


हे मराठी गीत ऐकतांना कुठेही एका परभाषिक व्यक्तीने ते गायल्याचे जाणवत नाही इतक्या लिलया रितीने भूपेंद्र यांनी हे गीत गायले आहे. हे गीत मानवी जीवनाशी निगडित अर्थपूर्ण असे आहे.

👉मागील भागापासून पुढे

त्यादिवशी बिघडलेले माझे स्वास्थ्य हे औषधाच्या प्रभावाने बरे झाले की भूपेंद्रच्या ऐकलेल्या गाण्यांनी या विचारात मी पडलो होतो आणि दुसऱ्याच दिवशी बालपणापासून संगीत शिकणाऱ्या आणि सद्यस्थितीत  बुलढाणा येथे शारदा संगीत विद्यालयच्या संचालक असलेल्या आमच्या मोठ्या वहिनी सौ नलिनी वरणगावकर यांची भेट झाली. त्यांनी माझा गायक भूपेंद्रवर आधारित करोगे याद तो या लेखाचा पहिला भाग वाचला होता त्यांनी लेख आवडल्याचे सांगितले."भाऊजी तुम्हाला भूपेंद्रचे मराठी गाणे माहित आहे का?" त्या म्हणाल्या. मी विचार करू लागलो पण मला काही ते आठवेना. "नाही" मी म्हणालो. गाणी, संगीत यांचे अफाट ज्ञान असलेल्या त्या म्हणाल्या, "थांबा मी तुम्हाला गाऊनच दाखवते आणि त्या भूपेंद्रच्या मराठी गाण्याच्या काही ओळी त्यांच्या सुरेल आवाजात गुणगुणायला लागल्या. त्यांनी सुरुवात करताच मला ते गीत आठवले. परंतु हे मराठी  गीत भूपेंद्र यांनी गायले असल्याचे माझ्या लक्षातच नव्हते. मी सुद्धा त्यावेळी हे गीत गुणगुणलो. नंतर निवांत क्षणी मी ते गाणे सर्च केले  आणि पूर्ण ऐकले. हे मराठी गीत ऐकतांना कुठेही एका परभाषिक व्यक्तीने ते गायल्याचे जाणवत नाही इतक्या लिलया रितीने भूपेंद्र यांनी हे गीत गायले आहे. हे गीत मानवी जीवनाशी निगडित अर्थपूर्ण असे आहे. हे गीत म्हणजे 

"अश्व नसे गज नसे पालखी, तेथे पायीच जाणे , 

भलेपणाला सोडू नको तू गा रे प्रभूचे गाणे"

वहीनींनी हे गाणे उद्गारल्या बरोबर मला आकाशवाणीच्या जळगांव केंद्राची आठवण झाली.  आकाशवाणीवर किती सुंदर कार्यक्रम प्रक्षेपित होत असत. आजही होत असतील परंतू आता आकाशवाणी पासून बरेच लोक दुरावले आहेत. आराधना हा सकाळी प्रक्षेपित होणारा भक्तिगीतांचा कार्यक्रम सुद्धा खूप श्रवणीय असे. या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात मी बालपणी कितीतरी वेळा हे गीत ऐकले होते. मानवी जीवन कसे असते , त्याचा प्रवास कसं असतो , जन्म घेतांना मानुष्य मोकळ्या हातांनी येत असतो बालपणी हाताच्या मुठी बांधून आलेला असतो व ओठी रडणे असते . पुढे  

इथे धरेवर राहून वेड्या , उभारील्या गर्वाच्या माड्या

 माझे ...माझे म्हणून जमविले ओझे केविलवाणे  

या ओळींतून मनुष्य या धरतीवर राहतो , परंतू सत्ता , पैसा , लौकिक ज्ञान प्राप्त झाल्यावर तो कशा गर्वाच्या  माडया उभारतो , निव्वळ जमवत राहतो जे काही स्वत:जवळ आहे त्याचे केविलवाणे ओझे तो वाहत असतो. असे शांताराम नांदगांवकर यांनी किती यथार्थ वर्णन केले आहे. आयुष्याच्या उत्तराधार्त , अंतिम क्षणी मात्र 

जा आता तू असा एकला , आलेल्या शोधीत पाऊला

मुठी मोकळ्या नाही कटीला , फडके जुने पुराणे 

यानुसार मोकळ्या हातांनी जावे लागते , जमवलेले काहीच सोबत नसते , कंबरेला जुने पुराणे वस्त्र सुद्धा नसते. असे हे भुपेंद्र यांनी उत्कृष्ट पद्धतीने , त्यांच्या शैलीने व धीर गंभीर आवाजात , रसाळपणे गायलेल्या गीताचे स्मरण वहिनींनी करून दिल्यावर हे गीत अनेकदा ऐकले. अनेकदा ऐकल्यावर शैलेन्द्र लिखित  "सजन रे झुठ मत बोलो खुदा के पास जाना है , न हाथी है न घोडा है  वंहा पैदल ही जाना है " हे गीत  "अश्व नसे , गज नसे" या गीताशी साधर्म्य साधणारे आहे हे जाणवले. मानवाने जीवन हे क्षणभंगूर आहे हे सदैव स्मरण ठेवल्यास व या गीतानुसार आपल्या आयुष्यात मार्गक्रमण केल्यास त्याला निश्चितच सुख , समाधान प्राप्त होऊ शकेल. भुपेंद्र यांना जरी त्या मानाने कमी प्रसिद्धी मिळाली असली तरी या गुणी गायकाची गाणी मात्र चिरकाल स्मरणात राहतील अशीच आहे. भुपेंद्र यांना श्रद्धांजली.  

हे गीत ऐका 👇

परवा स्वर्गवासी झालेल्या प्रख्यात गायक भूपेंद्र यांचे जीवन तत्वज्ञान विषयक मराठी गीत ऐकायचे आहे, लिंकवर क्लिक करा👇

https://youtu.be/YG8KdKdMRkU

४ टिप्पण्या:

  1. खुप छान लिहिले आहे. खरोखरच हे मराठी गीत त्यांनी गायले असावे यावर विश्वास बसत नाही.

    उत्तर द्याहटवा
  2. खास शास्त्रीय बेस असलेला व वेगळ्या धाटणीचा गायक भुपेंद्र सिंग यांच्या निधनाचे वृत्त वाचून वाईट वाटले ...
    दिल ढुंढता हैं फिर वही ,एक अकेला इस शहेर मे ,बिती ना बिताई रैना ,किसी नजर को तेरा इंतजार आज भी है ,हुजूर इस कदर भी ,नाम गुम जाएगा ,थोडीसी जमी,दो दिवाने शहर मे ,मिठे बोल.बोले बोले पायलिया........इ. हिंदी गाणी आणि ' हसलीस एकदा भिजल्या शारद राती ,आलीस सांज वेळी घेऊन स्वप्न माझे ,जीवनाच्या खिन्न वाटा ,अश्व नसे आज नसे पालखी......इ. मराठी गाणी गाऊन त्यांनी आपला एक वेगळा ठसा चित्रपट संगीतात उमटवला....
    या महान जेष्ठ गायकास ' भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
    सौ. मोहना तोंडगावकर

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. 👍, त्यांनी गायलेली इतर मराठी गाणी माहित नव्हती, माहितीसाठी धन्यवाद 🙏

      हटवा