२९/०९/२०२२

Article about Chagan Bhujbal Statement on Goddess Saraswati

भ्रष्ट नेत्यांचे फोटो सुद्धा कुठे झळकू नयेत.

देवी देवतांचे फोटो हटवण्याची मागणी जर रास्त समजली असेेे गृहीत धरले तर त्या अनुषंगाने जनतेने सुद्धा आता एक मागणी लावून धरायला हवी. ती मागणी म्हणजे भ्रष्ट राजकीय नेते, तुरुंगाची हवा खाऊन आलेले, जमानतीवर असलेले नेते यांचे फोटो हटवण्याची.

 परवा यशवंतराव चव्हाण सभागृह , मुंबई येथे छगन भुजबळ यांनी विद्येची आराध्य देवता म्हणून अनादी अनंत काळापासून मान्यता असलेल्या व भारत तसे अन्य अनेक देशात पूजल्या जाणा-या सरस्वती देवीचे फोटो शाळांतून काढून टाकावे असे विधान केले. कोणाला काय वाटेल ते आपल्या देशात बोलण्याचे स्वातंत्र्य आहे आणि या स्वातंत्र्याचा  पुरेपूर फायदा अनेक लोक उचलत असतात. राजकीय नेते याच स्वातंत्र्याचा उपयोग करून आपल्या मतपेढ्या राखत असतात व जनतेत दुही पसरवत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतून पुरस्कार केलेल्या समानतेची पायमल्ली करत असतात.  हिंदूच्या देवी, देवता , धार्मिक चाली रिती , पूजा पद्धती यांवर  तर अनेक राजकीय नेते सतत आघात करीत असतात. हे करतांना सुनियोजित पद्धतीने ते इतर धर्मियांना खुश करून आपल्याकडे सत्ता कशी टिकून राहील , आपले राजकीय अस्तित्त्व कसे टिकून राहील याची सोय ते करीत असतात.  भुजबळांनी सरस्वती मातेचा  फोटो हटवण्याचे विधान करतांना तीन टक्के लोकांना सरस्वती मातेने शिकवले असल्याची शक्यता असल्याचे विधान करून कोणता समाज त्यांना खुपतो हे स्पष्ट केले व सभागृहात उपस्थितांच्या मनात हेतुपुरस्सररीतीने दुही पेरण्याचे काम केले. भुजबळ ज्या तीन टक्के समाजाचा उल्लेख करतात त्या समाजाच्या किती शैक्षणिक संस्था आहेत किती इंजिनिअरिंग व मेडिकल कॉलेजेेस आहेत, हे सुद्धा त्यांनी सांगावे राजकीय नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांटया उड्या मारतात राजकीय प्रभावाने शिक्षण सम्राट बनतात व  जाती-जातीत तेढ पसरवण्याचे कार्य करतात. हिंदू समाजातील देवी देवता , वृक्ष पूजा , जल पूजा  हयांंत अनेक प्रतिकांची सुद्धा पूजा होत असते. निसर्गाप्रती सन्मान, सर्व समाजातील लोकांना रोजगार मिळावा अशा पद्धतीच्या या पूजा विधी आहेत. परंतू हिंदू समाजाला कसे फोडता येईल याकडेच कित्येक राजकीय नेत्यांचे लक्ष लागलेले असते. ज्या सावित्रीबाई फुले यांनी "काव्यफुले" या आपल्या कवितासंग्रहातील कवितेत शाळेला "सरस्वतीचा दरबार" असे संबोधले आहे त्याच सरस्वतीचे फोटो आपण हटवण्याची विनाकारण मागणी करता ? देवी देवतांचे फोटो महाराष्ट्रातील शाळांतून तुम्ही काढायची मागणी करता , ते काढले तरी अवघे जग व भारतातील इतर राज्ये येथील सरस्वतीचे फोटो व मुर्त्या तुम्हाला हटवणे शक्य आहे का ? तुम्हाला सरस्वती माता इतकीच जर का खुपत असेल तर ज्या इंडोनेशिया मध्ये तुमची 30 कोटींची कोळशाची खाण असल्याचे बोलले जाते त्या देशाला तुम्ही अमेरिकेत असलेल्या त्यांच्या दूतावासातील सरस्वतीची मूर्ती हटवण्याची मागणी नेटाने कराल का ?  तुमची देवी देवतांचे फोटो हटवण्याची मागणी जर रास्त समजली असेेे गृहीत धरले तर त्या अनुषंगाने जनतेने सुद्धा भ्रष्ट राजकीय नेते, तुरुंगाची हवा खाऊन आलेले, जमानतीवर असलेले नेते यांचे फोटो सुद्धा हटवायला हवेत देवी देवतांचे फोटो हटवण्याची मागणी जर रास्त समजली असेेे गृहीत धरले तर त्या अनुषंगाने जनतेने सुद्धा आता एक मागणी लावून धरायला हवी. ती मागणी म्हणजे भ्रष्ट राजकीय नेते, तुरुंगाची हवा खाऊन आलेले, जमानतीवर असलेले नेते यांचे फोटो हटवण्याची. या अशा लोकांचे फोटो दिवस निघताच माध्यमांवर, वृत्तवाहिन्यांवर, मोठमोठ्या होर्डिंग वर झळकत असतात. अशा भ्रष्ट नेत्यांचे हे फोटो पाहून सजा झालेल्या व सजा भोगत असलेल्या नेत्यांचा होणारा मान पाहून देशातील तमाम विद्यार्थी, बालक, युवक यांच्या मनावर काय परिणाम होत असेल? त्यांना तर वाटत असेल की दुष्कृत्ये करुनही जर फोटो झळकत असतील तर ते त्यांनी सुद्धा करायला काय हरकत आहे ? ही बाब तमाम सुज्ञ बुद्धिवाद्यांनी, विचारवंतांनी, जनतेनी लक्षात घ्यायला हवी. देवी देवतांनी तरी आदर्श प्रस्थापित केले आहेत किंवा तुम्ही जर त्यांना मानत नसाल तर देवी देवतांच्या आदर्शांच्या कथा सर्वश्रुत आहेत आहे असे म्हणू पण भ्रष्ट नेत्यांचेेे कोणते आदर्श आहेत?    देवी देवतांचे नाना आदर्श , त्यांनी घालून दिलेले आदर्श यांना समाजमान्यता आहे असे असूनही त्यांचे फोटो हटवण्याची मागणी होते तर मग देशातील जनतेने भ्रष्ट नेत्यांचे फोटो सुद्धा हटवण्याची मागणी आता लावून धरायला नको का?

✍️विनय वि.वरणगांवकर ©

२४/०९/२०२२

G S College, Khamgaon Celebrating 75 years (Platinum Jubilee), article about memories of G.S.College

"जी.एस." एक यादों की बारात

खरे तर यादों की बारात हे एका जुन्या गाजलेल्या चित्रपटाचे शीर्षक, या लेखाला हे शीर्षक देतांना  एखाद्या लग्नाच्या वरातीप्रमाणे आठवणींची प्रचंड गर्दी मनात झाली होती व म्हणून यादों की बारात चे स्मरण झाले व तेच शीर्षक या लेखाला द्यावेसे वाटले. ही आठवणींची गर्दी होण्याचे कारण म्हणजे त्या दिवशी व्हॉट्स अ‍ॅप वर आलेला कॉलेजने 75 वर्षे पुर्ण केल्याबद्दल आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याचा एक संदेश. संदेशात जुन्या विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन केले होते तसेच माजी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयीन जीवनातील त्यांच्या आठवणींबाबत लेख आमंत्रित केले होते. हा संदेश मी वाचला आणि माझ्या काही मित्रांना पुढे पाठवला. रात्री बिछान्यावर पडल्यावर मला त्या संदेशाची आठवण आली व टाईम मशीन प्रमाणे मी गतकाळात जाऊ लागलो. जी. एस. मधील अनेक किस्से मला स्मरू लागले. मला आठवले मी एस.एस.सी उत्तीर्ण झालो आजच्या पिढीसारखा शैक्षणिक awareness त्यावेळी नव्हता. त्यामुळे मित्रांनी म्हटले ,”अरे आपण जी.एस मध्ये प्रवेश घेऊ” मग काय “जिधर दोस्त उधर अपन”. या वयात दोस्ती म्हणजे सबकुछ असते. मग काय घेतला प्रवेश जी.एस. अर्थात गोविंदराम सक्सेरीया कॉलेज या बुलढाणा जिल्ह्यातील नावाजलेल्या महाविद्यालयात. गो.से. महाविद्यालय हे त्या काळापासून ते आजतायागत विदर्भात प्रसिद्ध असलेले असे कॉलेज आहे. विद्यार्थी वर्ग मात्र कॉलेजच्या लघु नावाचाच अधिक वापर करतो ते म्हणजे जी. एस. तसे तर माझे वडील , काका, जेष्ठ बंधू भगिनी यांच्याकडून मी लहानपणापासून जी.एस. बद्दल ऐकत आलो होतो. कारण आमच्या घरची सर्व जेष्ठ मंडळी ही जी. एस. मध्येच शिकलेली. आई, काकू या मात्र अपवाद कारण त्या त्यांच्या माहेरी शिकलेल्या. घरातील जेष्ठ मंडळी ही जी. एस चे विद्यार्थी असल्याने 1960, 70,80 च्या दशकातील जी. एस. मध्ये घडलेल्या अनेक घटना , तेथील प्राध्यापक , वसतीगृह , बटालियन , एन.सी.सी. आदींबाबत मी बाल्यावस्थेपासूनच ऐकत आलो होतो. त्यामुळे जी. एस कॉलेज म्हणजे भव्य-दिव्य असे वाटत असे, तसे ते आहे सुद्धा. येथील प्राणीशास्त्र विभागाच्या त्या भल्या मोठ्या खिडक्या याची साक्ष देतात. त्यामुळे इथेच शिक्षण घ्यावे असे कुठेतरी मनात पक्के बसून गेले होते त्यामुळे “जी एस मध्ये प्रवेश घेऊ” मित्राच्या तेंव्हाच्या त्या हाकेला त्वरीत होकार भरला होता. जी. एस. बद्दलच्या आठवणी लिहू गेल्यास अनेक आठवणी होतील त्यामुळे हा लेख प्रदीर्घ होण्याची शक्यता मला वाटत आहे. कारण यात आमच्या बॅचच्याही कितीतरी वर्षे आधी इथेच शिकलेल्या माझ्या वडीलधारी व जेष्ठ बंधू भगिनी या मंडळींकडून सांगितल्या गेलेल्या सर्वच नाही परंतू काही आठवणींचा सुद्धा समावेश या लेखात केला आहे किंबहुना तो केल्यावाचून राहवले नाही. 

Ex student and NCC Cadet of    G. S. College

        1960 च्या  दशकात आमचे तिर्थरूप जी.एस. चे विद्यार्थी होते. "एन. सी. सी. शिबीरादी असले  की आम्ही खिशात पु-या घेऊन जात असू, त्या काळात आजच्यासारखे पॅकिंग पदार्थ थोडी मिळत होते, मग परेड करता करता पु-या खात असू. एक मेजर माने म्हणून एन.सी.सी. अधिकारी होते, जितेंद्रचा फर्ज हा बॉण्डपट गाजला होता त्यातील "चाहे तू माने चाहे ना माने " हे गीत सुद्धा गाजले होते, यातील माने हा हिंदीतील शब्द मराठी माने अडनावाशी साधर्म्य साधत असल्याने मेजर माने यांना "चाहे तू माने चाहे ना माने" या गाण्याच्या चालीत "कॅप्टन माने, मेजर माने"  असे चिडवणे , इतिहासातील अनंगपाळाच्या हत्ती विषयी शिकल्यावर एकाजाडजूड सहपाठीस अनंगपाळाचा हत्ती असे चिडवणे", आमच्या स्नेहसंम्मेलनाच्या वेळेस पृथ्वीराज कपूर या अभिनेत्यास बोलावले होते.(आजच्या पिढिसाठी एक अनावश्यक परंतु द्यावासा वाटला असा Extra Shot पृथ्वीराज कपूर म्हणजे आताच्या रणवीर कपूर या नायकाचे पणजोबा)"  अशा कितीतरी आठवणी त्यांच्या कडून ऐकल्या आहेत.

तद्नंतर 70, 80 च्या दशकातील जेष्ठ बंधू व भगिनी यांच्या सुद्धा अनेक आठवणी आहेत. त्यातली एक ठळक म्हणजे 80 च्या दशकाच्या अखेरीस स्नेहसंमेलनास मुकेश खन्ना (महाभारत मालिकेत भीष्माची व शक्तिमान मध्ये शीर्षक भूमिका साकारणारा कलाकार) आला होता त्याच्या समोर कॉलेज मधील दोन गटात भांडणे झाली होती त्यावर तुमने तो मेरे सामने महाभारत शुरू कर दीअसे उद्गार त्यांनी काढले होते व भांडणे थांबली होती. पुर्वी सायकलने कॉलेजात येणारी मुले आता 80 च्या दशकात वाहनांनी येण्यास सुरुवात झाली होती , यातील काही बहाद्दर कॉलेजच्या व्हरांड्यातून स्कूटर चालवत असत. अशा कित्येक जुन्या आठवणी आहेत.   

आम्ही 90 च्या दशकात इथे शिकलो या दशकापर्यन्त खामगांवात मुले-मुली यांच्यात फार काही संभाषण किंवा मैत्री वगैरे हा प्रकार नव्हता परंतू त्यातही एक वेगळा गोडवा होता. कॉलेजच्या मैदानात एन.सी.सी. परेड होत असे एरवी कशीही परेड करणारी मुले, मुली व्हरांड्यात बसलेल्या असल्या की एकदम तालेवार चालत. ऑफिसर, अंडर ऑफिसर यांना “पैर उठाके मारो , एडी पे चलो “ अशा ऑर्डर देण्याचे काम पडत नसे. एन.सी.सी. च्या ड्रेसमध्ये कॉलेजात आले की आपली एक वेगळीच छाप पडते आहे असे या कॅडेटसला मनोमन वाटे. देसाई सर , सिंग सर यांच्या तासिकेच्या वेळी पुर्ण वर्ग भरलेला असे. इंग्रजीवर प्रभुत्व असलेले देसाई सर इंग्रजीतील एखादा कठीण शब्द सांगत व त्याचा अर्थ शोधून आणण्यास सांगत ते इंग्रजी अत्युत्कृष्ट शिकवतत्यांना पाश्चात्य शैली आवडत असे. सिंग सरांच्या तासिकेला तत्वज्ञानावर खूप छान चर्चा होत असे. "जिथे धूर आहे तिथे अग्नि आहे" असे सरांनी शिकवल्यावर मागे कुजबूज सुरू झाली , “काय आहे रे “ सर म्हणाले “सर मोटर सायकल मधून धूर येतो पण आग तर नसते“ अशी कोटी एका मुलाने केली वर्गात हशा पिकला सरांनी त्यावर मोटर सायकल मध्ये अग्नी कसा सुप्तरित्या दडलेला असतो हे सांगितले होते. 

जी. एस. मधील आठवणींबाबत लिहू जाता लेखन मर्यादेचे भान वेळोवेळी ठेवावे लागत आहे. इतक्या आठवणी की जणू यादो की बारातच. त्यात आम्ही म्हणजे सर्वच ठिकाणी स्पोर्ट ,एन.सी.सी., युथ फेस्टिव्हल , स्नेह संमेलन सा-याच इंव्हेंट मध्ये जात असू. कनिष्ठ महाविद्यालयातील आमची हँडबॉलची चमू म्हणजे राज्यस्तरावर जाणारी आजतायागतची एकमेव चमू , ध्यानचंदप्रमाणे आम्ही सुद्धा विना बुटाने सराव करायचो साहित्याची उपलब्धता कमी व घरून सुद्धा पैसे बेताचेच मिळत. पण कॉलेज झाल्यावर नोकरी चे दडपण येऊ लागल्यावर खेळही मागे पडला अन खेळात ध्यानचंदसारखे पुढे जाणेही. एन.सी.सी.च्या शिबीरात आमच्यापैकी काही मुले मांसाहारी होती ती मुले जाणून किचनकडे स्वत:ची डयुटी लाऊन घेत कारण काय? तर रात्री तिथे खायला उरलेले मटन व रस्सा प्यायला मिळायचा. हे गुपित आम्हाला उशिरा कळले अर्थात आम्हाला त्याचा उपयोगही नव्हता म्हणा. आमचा एक मुस्लिम मित्र लालबुंद गोरापान होता. तो एन. सी. सी. ड्रेस मध्ये पक्का "विलायती बाबू" दिसत असे धनंजय टाले या मित्राने त्यास "ब्रिटिश सोल्जर" अशी उपाधी दिली होती. त्या काळात पिंपळगांव राजा येथील अनेक मुस्लिम मुले आमच्या सोबत जी. एस. मध्ये होती. त्यातील रहबर, अशफाक, शेख शब्बीर, सलीम बेग आदी मुस्लिम मुलांशी आमची चांगली मैत्री जडली होती. आजही क्वचित काही भेटतात. जी.एस. ला जिल्हाभरातून मुले शिकायला येतात त्यामुळे जळगांव जामोद, नांदुरा, शेगांव, वरवट बकाल व इतर काही गांवे येथील मुलांशी मैत्री झाली व ती आजही टिकून आहे. नवीन आलेल्या प्राध्यापकांच्या गमती, नकला, गाणी, अशी खूप धम्माल होत असे. प्राचार्य जावंधीया सरांचा खुप दरारा होता. कित्येक आठवणी आहेत. इथे काही जणांचे जुळले तर काही नेहमीसाठी दुरावले.

अबके हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोमे मिले 

जिस तरह सुखे हुये फूल किताबोमे मिले 

याप्रमाणे अनेक जण आज दुरावले आहेत परंतू फेसबुक ,व्हॉट्स अ‍ॅप च्या कृपेने अनेक दोस्त पुन्हा भेटलेही आहेत त्यांची reunion सुद्धा होत आहे. विकासाभिमुख संस्था, कार्यकारिणी व प्राचार्य तसेच उच्चविद्याविभूषित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांमुळे आज आमचे जी. एस. कॉलेज खुप प्रगत झाले आहे त्याला  NAAC चे चांगले मानांकन सुद्धा प्राप्त झाले आहे जीम , तरण तलाव आहे , अनेक कोर्सेस आहेत. इथून जे विद्यार्थी शिकून गेले त्यांच्या मनात मात्र येथील आठवणी सदैव तेवत राहतील , शैक्षणिक व महाविद्यालयीन जीवन हे सर्वांना प्रिय असते म्हणून जी. एस. त्यांच्या सदैव स्मरणात राहील. हे विद्यार्थी आपआपल्या क्षेत्रात नांव काढत असतील त्यांना नवीन मित्र सुद्धा मिळाले असतील पण  

गुजरे हुये जमाने दुबारा नही आते, 

आते है नये लोग पुराने नही आते |    

अनेक माजी विद्यार्थी कॉलेजला 75 वर्ष होत आहेत म्हणून मेळाव्यास येतील. देश सुद्धा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे हा एक योगायोग आहे या मेळाव्याच्या निमित्ताने माझ्यासह अनेक माजी विद्यार्थ्याना येथील अनेक आठवणी येत असतील एक यादो की बारातच जणू आज प्रत्येकाच्या हृदयाच्या व्दारात आली आहे व आजीवन हृदयात राहणार आहे. 

   स्वतंत्रता प्राप्तीच्या पुर्वीच्या लोकांना शिक्षणाप्रति तळमळ होती , शिक्षणाचा दर्जा चांगला होता, नितीमुल्यांना महत्व होते, लोक शाळा कॉलेजसाठी राजीखुषीने करोडोच्या जागा दान देत. त्याच पिढीतील लोकांनी स्थापन केलेल्या आमच्या जी.एस. कॉलेजची वाटचाल अशीच प्रगतीपथावर होत राहो, प्रगतीचे शिखर हे महाविद्यालय गाठो हीच सदिच्छा.

✍️विनय वि.वरणगांवकर ©

१६/०९/२०२२

Article about Narendra Modi government and their schemes

 कार्यसिद्धीस नमो  

मोदी पंतप्रधान झाल्यानंतर केंद्र सरकारने आणलेल्या काही योजनांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न  येथे करीत आहे. कुणाला हा लेख एखाद्या अंधभक्ताने लिहिला आहे असेही वाटेल. परंतू जे काही आहे ते डोळसपणे मांडण्याचा हा प्रयत्न आहे. मोदी यांच्यापुर्वी सुद्धा अनेक लोककल्याणाच्या योजना येऊन गेल्या हे सुद्धा तितकेच खरे आहे.

आजचा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे कालच्या स्थानिक वृत्तपत्रात आमदार आकाश फुंडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे वृत्त. त्या वृत्ताच्या शीर्षकाने लक्ष वेधले व ते वृत्त वाचले.“राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्यात जनसेवेचा संकल्प घ्या” असे त्या वृत्ताचे शीर्षक होते. राष्ट्रनेता आणि राष्ट्रपिता या दोन शब्दांनी लेख लिहिण्यास प्रवृत्त झालो. राष्ट्रनेता नरेंद्र मोदी यांना उद्देशून होते तर राष्ट्रपिता म्हणजे महात्मा गांधी हे कोणालाही सांगण्याची आवश्यकता नाही. एकाच राज्यातून आलेले हे दोन व्यक्ती, एकाने स्वातंत्र्यपुर्व काळात जगाला आकर्षून सोडले तर दुस-यास स्वतंत्रताप्राप्तीच्या 70 वर्षानंतर जगभरात अफाट सन्मान,प्रेम व लोकप्रियता मिळाली.  लोकप्रिय नेत्यांच्या जागतिक यादीत स्थान मिळवले व भारत एक मजबूत राष्ट्र आहे हे जगाच्या निदर्शनास आणून दिले. मोदींच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने भाजपा हा सेवा पंधरवाडा साजरा करीत आहे. याच वृत्तामुळे मोदी पंतप्रधान झाल्यानंतर केंद्र सरकारने आणलेल्या काही योजनांचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न  येथे करीत आहे. कुणाला हा लेख एखाद्या अंधभक्ताने लिहिला आहे असेही वाटेल. परंतू जे काही आहे ते डोळसपणे मांडण्याचा हा प्रयत्न आहे. मोदी यांच्यापुर्वी सुद्धा अनेक लोककल्याणाच्या योजना येऊन गेल्या हे सुद्धा तितकेच खरे आहे. परंतू तरीही मोदी यांच्या कार्यकाळात आलेल्या पुढील योजना या देशातील सामान्यातील सामान्य माणसासाठी आहेत , त्याचा उदय व्हावा अशाच आहेत. "अंत्योदय" सत्यत्वात आणण्याचाच जणू मोदींनी चंग बांधल्याचे दिसत आहे.  मे 22 मध्ये मोदी यांच्या कार्यकाळास 8 वर्षे झाली व या काळात आपल्या अनेक योजनांद्वारे ते लोकप्रिय झाले, सलग दोन वेळा ते पंतप्रधानपदावर विराजमान झाले. त्यांनी प्रधान सेवक म्हणून हाती घेतलेले कार्य सिद्ध करून दाखवले आहे केले आहे. त्यांच्या कारकिर्दीत राबवलेल्या पुढील काही  योजना लोकप्रिय झाल्या व त्यांची आकडेवारी सुद्धा बोलकी आहे.

1. मोफत लसीकरण योजना- जगभरातील कोरोना महामारीमुळे संपुर्ण जगावर भय व मृत्यूचे सावट होते परंतु देशातच निर्माण केल्या गेलेल्या लसीच्या सहाय्याने लसीकरण करून कोरोना विरोधात महत्त्वाची भूमिका भार ताने व सक्षम नेतृत्वाने बजावली. जगातील सर्वात मोठी मोफत कोरोना लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरू केली शिवाय इतर अनेक देशांना लस सुद्धा पाठवली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार लसीकरण मोहिमेअंतर्गत आजपावेतो 192.52 कोटी डोस देण्यात आले आहेत.

2. स्टार्टअप इंडिया-  नरेंद्र मोदींनी स्टार्टअपला सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. भारत सरकार स्टार्टअप इंडिया नावाची मोहीम राबवत आहे. या स्टार्टअप मोहिमेचे जगभरातून कौतुक होत आहे. 2014 मध्ये देशात फक्त 300 ते 400 स्टार्टअप होतेआज या योजनेमुळे त्यांची संख्या 70 हजार झाली आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअपला प्रोत्साहन देणारा देश झाला आहे.   

3.मोफत रेशन योजना - कोरोना काळात नरेंद्र मोदी सरकारने मार्च 2020 मध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) ची घोषणा केली. कोरोना संकटामुळे आणि लॉकडाऊननंतर गरीबांना मोफत रेशन उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश होता. या योजनेस सप्टेंबर 2022 पर्यंत वाढ देण्यात आली आहे. 80 कोटी  रेशन कार्ड धारकांना 5 किलो गहू किंवा तांदूळ हे प्रती सदस्यास दिले जाते.

4.प्रधानमंत्री उज्ज्वला योजना - देशातील अनेक महिलांच्या डोळ्यात चुलीच्या धुरामुळे येणारे अश्रू पुसण्याचे काम या योजनेतून मोदी सरकारने केले आहे. या योजनेअंतर्गत गरीब महिलांना मोफत  गॅस कनेक्शन दिले जाते. वर्ष 2016 मध्ये ही योजना सुरू केली. पहिल्या वर्षी 2.2 कोटी लोकांनी कनेक्शन घेतले. मार्च 2020 पर्यंत वंचित कुटुंबांना 8 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट 7 सप्टेंबर 2019 रोजीच गाठल्या गेले. 

5.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी - आपल्या देशाच्या बळीराजासाठी आणलेली ही योजना आहे पीएम किसान योजना ही 100% निधी असलेली योजना आहे. ही योजना 2018 मध्ये सुरू झाली. यात सर्व शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची मदत केली जाते. या योजनेचा लाभ कुटुंबातील पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांनाच घेता येतो. निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यातच जमा केला जातो. वर्ष 2022 पावेतो 11,11,96,895 लोकांना लाभ झाला असल्याची माहिती आहे.

6. हर घर जल योजना - मोदी सरकारची ही एक महत्वाकांक्षी व आशादायी अशी योजना आहे. आज आपण पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष सर्वत्र पाहतो व धरणात विपुल पाणी असूनही वितरण व्यवस्था कोलमडलेली असते. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने 2020-21 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात जल जीवन मिशन म्हणजेच हर घर जल योजनेची घोषणा केली होती. देशातील सर्व घरांमध्ये पाईपलाइनद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करणे हा या योजनेचा उद्देश आहे. 2024 पर्यंत लक्ष्यपुर्ती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या योजनेवर सरकार 3.5 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. लोकांना घरपोच पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल, त्यांना पाण्यासाठी दूर जाण्याची गरज भासणार नाही, तसेच पाण्याच्या समस्येपासून पूर्णपणे सुटका होणार आहे.

     असेही निदर्शनात येते की, योजना चांगल्या असतात पण लोक त्यातून चुकीचे मार्ग, पळवाटा शोधतात असे मुळीच व्हायला नको यासाठी सुद्धा उपाययोजना करायला हव्यात. 
मोदी सरकारच्या योजनांपैकी या काही उपरोक्त योजना आहेत. या योजनांमध्ये सामन्यातील सामान्य माणसाचा विचार केला गेला आही. या देशात "अंत्योदय" व्हावा अर्थात समाजातील आर्थिकदृष्ट्या सर्वात खालच्या स्तरावर असलेल्या व्यक्तीपर्यन्त विकास पोहचावा असा विचार या योजनांमध्ये केला असल्याचे दिसते. आगामी काळात व आगामी सरकारने सुद्धा हाच विचार पुढे नेत गेल्यास देशाचे व येथील नागरीकांचे भवितव्य हे उज्वलच राहील अशी आशा आहे. मोदी देशहिताचे कार्य, योजना राबवत आहेत. देश व सामान्य नागरीक यांच्यासाठी केलेले कार्य सिद्ध  होतांना दिसत आहे म्हणून कार्यसिद्धीस
नमो असे म्हणावेसे वाटते.
(संदर्भ- विविध वृत्तपत्रात आलेली वृत्ते व आंतरजाल)
✍️विनय वि.वरणगांवकर ©

१५/०९/२०२२

Article about problem in Khamgaon

 ...आणि तो आला

तो येणार असल्यामुळे सकाळी लवकर उठलो तर तो येणार असल्याचे कळले परंतु त्याचे आगमन दोन तास उशिरानेच होणार होते. त्याच्या आगमनाचे नक्की झाल्यावर मी माझ्या परिचित व नातेवाईकांना सुद्धा तो येणार असल्याची बातमी दिली, त्यांना सुद्धा आनंद झाला आणि सर्वजण त्या तयारीमध्ये लागले.

तो बऱ्याच दिवसानंतर आज येणार होता त्याच्या आगमनाची प्रतीक्षा सर्वच नागरिक करत होते, नव्हे खामगावकर तर नेहमीच त्याच्या प्रतीक्षेत असतात. तो येणार असल्यामुळे सकाळी लवकर उठलो. त्याच्या आगमनाचा संदेश माझ्या भ्रमणध्वनीवर कोणी दिला आहे का? कोणाच्या स्टेटस वर आहे का? ते तपासले तर तो येणार असल्याचे कळले परंतु त्याचे आगमन दोन तास उशिरानेच होणार होते. त्याच्या आगमनाचे नक्की झाल्यावर मी माझ्या परिचित व नातेवाईकांना सुद्धा तो येणार असल्याची बातमी दिली, त्यांना सुद्धा आनंद झाला आणि सर्वजण त्या तयारीमध्ये लागले. कारण 15 दिवसांनी तो येणार होता. प्रत्येकाच्या घरातील कुटुंबीय त्याच्या येण्याने सुखावले होते. तो येणार असल्यामुळे शेजारी पाजा-यांनी सुद्धा एकमेकांना त्याच्या आगमनाची बातमी आवाज देऊन सांगितली. अशाप्रकारे तो आला आणि सर्वांना आनंद देऊन थोड्यावेळाने परत गेला सुद्धा. पुन्हा त्याचे आगमन अनिश्चितच होते बऱ्याच दिवसानंतर तो येऊन गेल्याने खामगावकर नागरिक थोडे शांत झाले होते. त्यांची चिंता काही दिवस का होईना थांबली होती. त्याच्या गच्छंतीनंतर सर्व नागरिक आपापल्या कामाला लागले. आज गुरुवार असल्यामुळे व माझ्या लेखनाचा दिवस असल्यामुळे मी लेखनाच्या विचारात मग्न झालो आज तो येऊन गेल्यामुळे त्याच्याबद्दलच लिहावे असे मनात आले आणि मग त्याबद्दलच लिहू लागलो. खरे तर त्याच्याबाबत व त्याच्या नेहमीच्या निदान खामगावात तरी दिर्घकाळाने होणाऱ्या आगमनाबाबत, विलंबाने होणाऱ्या आगमना बाबत मी कित्येकदा लिहिले आहे परंतु त्याची जी जुनी खोड आहे ती काहीही केल्या जातच नाही त्याला पाठवणारे जे कोणी लोक आहे, जी काही यंत्रणा आहे त्यांना सुद्धा त्याला पाठवण्यात नाना अडचणी येतात. त्याला सोडा, त्याला पाठवा असे सांगण्यासाठी या लोकांकडे कोणी गेल्यास हे लोक त्यांच्या स्वत:च्याच अडचणी कथन करतात, त्यामुळे त्याची ही विलंबाने येण्याची, दिर्घकाळानंतर येण्याची खोड नागरिकांच्या अंगवळणीस पडली आहे. अनेक खामगावकरांशी चर्चा केल्यावर असे पण निदर्शनास आले की त्याला मोठी शहरे आवडतात तिथे तो अगदी वेळेवर जातो तिथे त्याच्या जाण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी येत नाही. अगदी नित्यनेमाने तो मोठ्या शहरातील नागरिकांच्या घरी हजेरी लावत असतो मग खामगावातच त्याला येण्यास का विलंब होतो? का त्याची प्रतीक्षा खामगावकरांना नेहमी करावी लागते ? हा एक अभ्यासाचाच विषय झालाय आज तो पंधरा दिवसानंतर खामगावला आला होता, त्याच्या येण्यात होणाऱ्या अडचणी मात्र काही कर्तव्यदक्ष कर्मचारी नागरिकांना वारंवार देत होते या अडचणी जणू काही खामगावकरांच्या पाचवीलाच पूजल्या आहेत. त्याच्या संबंधित जे अधिकारी वर्ग आहे, जे कर्मचारी आहे त्यांना कित्येक नागरिकांनी तोंडी अर्ज केले, लेखी विनंती केल्या परंतु त्याच्या आगमनाची नेहमीच प्रतीक्षा करावी लागते. खरे तर तो ज्या ठिकाणाहून येतो ती ठिकाणे समृद्ध आहेत तरीही खामगावकर मात्र त्रस्त असतात. खामगाव एक विकसनशील शहर आहे तरीही खामगावात त्याचे येणे अनिश्चितच असते. आपला देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो परंतु खामगांवकर तरुणही त्याचे आगमन सुरळीत व्हावे म्हणून कोणताही प्रयत्न करताना दिसत नाही. त्यांना रॅली इत्यादी तत्सम गोष्टी करण्यातच जास्त स्वारस्य दिसते. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत देशांमध्ये कुठल्याही भागातील तरुण कोणत्याही प्रकारची रॅली आंदोलन मागण्या करताना दिसत नाही. मात्र हेच तरुण त्यांचे नेते, नेत्यांचे वाढदिवस इत्यादी अनेक गोष्टींच्या वेळेस मोठ्या जल्लोषात मोटरसायकल रॅली इत्यादी उपक्रम राबवतात. खामगावकर तरुणांनी एखाद्या वेळेस त्याच्या येण्यासाठी सुद्धा काहीतरी करायला नको का? 

     आज तो येऊन गेला, असाच तो सदैव येत राहो आणि त्याच्याशी संबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी या सर्वांनी त्याचे आगमन हे नियमित ठेवावे अशी हात जोडून विनंती. 

    ज्याच्या आगमनाच्या प्रतिक्षेत आज व नेहमीच, तिन्हीही ऋतूत, 12 महिने तेरा त्रिकाळ खामगांवकर असतात तो म्हणजे नळ.

(खरे तर नळाला पाणी येत असते. तरी बोली भाषेत नळ आला असेच म्हटले जाते. बोली बाषेनुसार लिखित लेख)

✍️विनय वि.वरणगांवकर ©

०८/०९/२०२२

Article on the incident of Industrialist Status Mestry car accident

 नजर हटी दुर्घटना घटी


सुसाट जाणा-या वाहनाचे स्पीडोमीटर नेत्यांनी सुद्धा जनतेला व्हिडिओद्वारे दाखवले आहे मग जनता सुद्धा त्यांचे अनुकरण करणार नाही का ?
परवा देशातील मोठे उदयोगपती , टाटा उद्योगसमूहाचे माजी अध्यक्ष तसेच शापूरजी पालोनजी या स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेल्या उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच उद्योग क्षेत्रात व संपूर्ण देशात  हळहळ पसरली.  पंतप्रधान  तसेच  इतर लोकप्रतिनिधींनी  शोक संवेदना व्यक्त केल्या. या घटनेनंतर काल नितीन गडकरी यांनी चार चाकी वाहनाच्या मागील सीटवर बसणाऱ्या व्यक्तीस सुद्धा सिट बेल्ट बांधणे बंधनकारक केले. वाहनचालकास सिट बेल्ट बांधणे हे पूर्वीपासूनच बंधनकारक होते आता वाहन चालक व इतरांनी सिट बेल्ट बांधला नाही तर तो दंडास पात्र ठरेल. नितीन गडकरी यांचा हा निर्णय योग्यच म्हणावा लागेल. परंतु निष्काळजीपणा कसा आवरणार ? आणि वाहनाची वेग मर्यादा कशी आवरणार ? वेगाने वाहन चालवणाऱ्यास दंडाची काही तरतूद आहे की नाही याची कल्पना नाही परंतु सर्वच वाहन चालकांनी आपल्या वाहनाचा वेग मर्यादित ठेवण्याबद्दलची जागरूकता समाजात पसरवणे अत्यंत आवश्यक आहे.  आज देशात  जवळपास  सर्वच महामार्ग  अतिशय  सुंदर बांधकाम झालेले आहेत  व त्यामुळे वाहन चालकास  वेगात वाहन चालवण्याची उत्साह येतो. एवढेच काय तर काही मंत्री व लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्यांच्या या महामार्गांवरुन सुसाट जाणा-या वाहनाचे स्पीडोमीटर जनतेला व्हिडिओद्वारे दाखवले आहे मग जनता सुद्धा त्यांचे अनुकरण करणार नाही का ? शिवाय  आज-काल  सर्वच महामार्गांच्या  आजूबाजूला  मोठमोठ्याला  अक्षरात मद्यालयांच्या पाट्या लावलेल्या दिसतात.  या पाट्यांमुळे  महामार्गावर मद्यपानाचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. मद्यपान करून वाहन चालवल्यानंतर सुद्धा अनेक अपघात झाल्याचे समोर आले आहे. सिट बेल्ट न बांधल्यामुळे झालेल्या मृत्यूचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे हे मान्य आहे परंतु वेग मर्यादेला आवर घालणे सुद्धा तितकेच जरुरी आहे. कितीही वेगाने गाडी चालवली  तरी  इप्सित स्थळी  पोहोचण्यास  केवळ पाच ते दहा मिनिटांचा फरक पडतो हे वाहन चालकाच्या ध्यानात कसे येत नाही ?  त्यामुळे  मर्यादित वेगाने वाहन चालवणे हे  नागरिकांना  शिकवले गेले पाहिजे. पुर्वी असे ऐकिवात होते की राज्य परिवहन महामंडळ  त्यांच्या बसेसचा वेग हा बांधून ठेवत असे. त्यामुळे विशिष्ट वेगापर्यंतच बस चालवता येत असे, बस चालकास  अत्यंत वेगाने बस नेता येत नव्हती.  मग  आज बाजारात अनेक अत्याधुनिक  चार चाकी वाहने उपलब्ध आहेत व यांची कमाल वेग मर्यादा खूप मोठी आहे तेव्हा सरकारने वाहन चालक कंपन्यांशी संवाद साधून तसेच तज्ञ लोकांची समिती नेमून वाहन निर्मिती करतानाच कमाल वेग हा आटोक्यात राहील एवढाच ठेवावा,  असे नाही का करता  करणार?  कमाल वेग जर  कमी झाला तर वाहन चालक अति वेगाने वाहन हाकूच शकणार नाही  व  अपघाताचे प्रमाण कमी होईल असे वाटते. वेगाने वाहन चालवण्यामुळे आज कितीतरी तरुण  मृत्युमुखी पडले आहेत  व कित्येक परिवार उध्वस्त झाले आहेत  सरकारने  याबाबत आवश्यक त्या उपाययोजना  लवकरात लवकर कराव्या.  सिट बेल्ट बांधणे  अनिवार्य करणे हे ठीक आहे परंतु सिट बेल्ट न बांधण्याचा जो निष्काळजीपणा जनतेमध्ये आहे तो कसा कमी करणार ? काही नेतेमंडळी सुद्धा सिट बेल्ट बांधण्याची  हयगय करतात. तेंव्हा उपरोक्त सर्वच बाबींवर विचार व्हावा असे वाटते. सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गांवर "नजर हटी दुर्घटना घटी" सारखी अनेक चांगली वाक्ये लिहिलेली असतात वाहन चालकांनी अशी वाक्ये सदैव ध्यानात ठेवावी व छोट्या स्वरूपात आप-आपल्या गाडीच्या  डॅशबोर्ड वर सुद्धा चिटकवून ठेवावी तरुण वाहन चालकांनी सुद्धा आपल्या वाहनाचा वेग मर्यादेत ठेवावा. सर्वात मोठा वेग हा  मनाचा असतो  आपल्या गाडीचा नव्हे  त्यामुळे  उगीच  बेदरकारपणे आपले वाहन  चालवून  मृत्यूला आमंत्रण देऊ नये. 
✍️विनय वि.वरणगांवकर ©

"गतीशी तुलना नसे" हा याच विषयावरील  व्हिडीओ पहा👇
https://youtu.be/I51g8oxzEMo

०१/०९/२०२२

Article about appointing teachers for various works.

 शिक्षक काय काय करणार?

निवडणूका , जन गणना इथपर्यंत ठीक आहे,  ते समजू शकतो त्यात देशाच्या कार्यात मदत आहे परंतू चाकरमान्यांची आवभगत करण्यासाठी शिक्षकाची नियुक्ती म्हणजे अति झाले.

काल समाज माध्यमांवर एक पत्र मोठ्या प्रमाणात प्रसारीत होत आहे. पंचायत समिती राजापूर यांनी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार राजापूर यांच्या सूचनांनुसार दिलेले हे पत्र आहे. या पत्रातील मायन्यानुसार गणपती उत्सवासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर व महाराष्ट्रातील इतर भागांतून चाकरमाने हे कोकणात येत असतात. त्यांचे स्वागत, त्यांना वाहन व्यवस्था, चहा-पाणी इत्यादींसाठी तलाठ्यांच्या सुचनांनुसार काम करायचे आहे. यासाठी शिक्षकांच्या यादया तयार झाल्या असून त्यांना पाठवण्यात सुद्धा आल्या आहेत. या पत्रांन्वये शिक्षकांना दिलेल्या वेळेत एस.टी. डेपो वर हजर राहून आलेल्या चाकरमान्यांचे स्वागत कराचे आहे. विशेष म्हणजे हे पत्र तातडीचे आहे. आता असाच कित्ता पुढेे राज्यभरात पालख्या वाऱ्या इतर सण इत्यादींच्या वेळेस सुद्धा शासन असाच कित्ता गिरवण्याची शक्यता नाकारता येत नाही व   पुन्हा शिक्षकांना वेठीस धरले जाईल.

आता मुद्दा हा आहे की शिक्षक हा नियुक्त झालेला असतो ते विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी त्याच्याकडून शिक्षणाव्यतिरिक्त आणखी कोणकोणती कामे सरकार करून घेणार आहे. निवडणूका , जन गणना इथपर्यंत ठीक आहे,  ते समजू शकतो त्यात देशाच्या कार्यात मदत आहे परंतू चाकरमान्यांची आवभगत करण्यासाठी शिक्षकाची नियुक्ती म्हणजे अति झाले. "अतिथी देवो भव" हे शिक्षकच शिकवत असतो हे मान्य आहे, ती आपल्या भारताची संस्कृतीच आहे. परंतू गणेशोत्सव साजरा करण्यासाठी त्यांच्या घरी येणा-या चाकरमान्यांची एवढी आवभगत कशासाठी? गणपती आपल्या सर्वांचीच इष्ट देवता आहे. परंतू त्याच्या उत्सवासाठी जाणा-यांनी त्यांच्या- त्यांच्या सोयीने जावे. त्यात शासकीय यंत्रणा कशासाठी जुंपायच्या ? तलाठी आवभगत करण्याच्या सूचना देण्यासाठी  डेपो वर जाणार मग त्याच्याकडे कामासाठी येणा-या जनतेला नाहक त्रास होणार. उगीच नवीन काही सुरू करायचे व भार वाहण्यासाठी शिक्षक वेठीस लावायचे. आज चहा पाणी  सुरू केले , उद्या जेवणावळी घालणे सुरू करतील , मग जातील शिक्षक वाढपी म्हणून. काय लावले काय ? भक्त , पाहुणे यांची आवभगत  करणे ही आपली संस्कृती आहे हे वर सांगीतलेच परंतू आपल्याकडचे लोक त्यांचा काय भरवसा चहा नाही भेटला तर शिक्षकांना " ए चहा आण रे लवकर" अशा आज्ञा देतील , अनुचित काही बोलण्याचाही नेम नाही. शासनाने वृथा नवीन काही पायंडे पाडणे बंद करावे व पायंडे घालायचेच असतील तर त्यासाठी मनुष्यबळाचा विचार आधीच करून ठेवावा विनाकारण शिक्षकांना वेठीस धरू नये. अनुदान देत नाही , नाना निकष लावतात , वेतनेतर अनुदान देत नाही , जुनी पेन्शन देत नाही, त्यांना शिक्षक त्याच्या समस्या आदी आठवत नाही ,  केसरकर जुन्या पेन्शन बाबत बोलताना शिक्षकांच्या पेन्शनची 2045 पर्यंतची आकडेवारी काढतात, त्यांनी आमदार खासदार यांना 2045 पर्यन्त काय काय सवलती , मानधन मिळते याची सुद्धा आकडेवारी सांगावी. तुम्हाला जसे पाहिजे असते , तसे किंवा त्यापेक्षा कमीच असे शिक्षकांना अपेक्षित नसावे का?  प्रगाढ गुरु परंपरा असलेल्या आपल्या देशात गुरुला कोणतीही कामे करण्यास भाग पाडले जाणे हे योग्य नाही. आमदार लोक किती हलक्या भाषेत बोलतात हे प्रशांत बंब यांची ध्वनीफित ऐकून जनतेला समजलेच आहे,  जनता सुद्धा जो त्यांच्या पाल्यांना शिक्षण देतो , त्यांना हिताच्या गोष्टी सांगतो त्या शिक्षकाकडे हल्ली सन्मानाने पाहत नाही. एकेकाळी ज्या भारतात गुरुला/शिक्षकाला मोठा सन्मान मिळत असे राजदरबारी सुद्धा त्याला राजाप्रमाणे आदर मिळत असे राजा सुद्धा त्याचे ऐकत असे अशा शिक्षकांना आज शासन वेठीस धरून कोणतीही कामे बहाल करत आहे  शिक्षणेतर विविध कार्य करून शिक्षक हे मानसिकरित्या त्रस्त झालेले आहेत त्यांचे जे ज्ञानदानाचे मुख्य कार्य आहे त्याच कार्याकडे शासनामुळेच त्यांना पूर्णपणे झोकून देऊन लक्ष देता येत नाही. शासनाची जर शिक्षकांप्रती अशीच भावना असेल तर शिक्षणाचा दर्जा हा घसरणारच शिक्षकाला त्याचे शैक्षणिक कार्य करू द्या आणि तुमच्या ज्या विनाकारणच्या योजना आहेत त्या योजना पूर्ण करण्यासाठी प्रवाशांना चहापाणी देण्यासाठी शिक्षकांच्या नियुक्ती करू नका हेच सांगण्यासाठी हा पत्र प्रपंच.

✍️विनय वि.वरणगांवकर ©