२३/०३/२०२३

Article about Lambretta , a old scooter.

 आठवण एका स्कूटरची


 स्कूटर म्हटली की तुम्हाला बजाजची आठवण येणार , परंतू ही स्कूटर बजाजच्याही कित्येक वर्षे आधीची अशी स्कूटर आहे. आजच्या पिढीतील अनेकांना ही स्कूटर व तीचे हे नांवही माहीत नसेल.  अनेकांना जुना काळ, Antic जुन्या गोष्टी , यांचे बाबत जिव्हाळा आहे . आजकालच्या use and throw च्या काळात त्यांच्या पूर्वीच्या पिढीने या वस्तूंची , वाहनांची जीवापाड घेतलेली काळजी त्यांनी पाहिलेली आहे.  त्यांना हे सारे हृदयस्पर्शी वाटते. त्यांचेसाठीच ही आठवण. 

    स्कूटर म्हटली की तुम्हाला बजाजची आठवण येणार , परंतू ही स्कूटर बजाजच्याही कित्येक वर्षे आधीची अशी स्कूटर आहे. आजच्या पिढीतील अनेकांना ही स्कूटर व तीचे नांवही माहीत नसेल. हे नांव आठवण्यास निमित्त घडले ते समाज माध्यमावर पाहिलेल्या एका जुन्या छायाचित्राचे. जेष्ठ अभिनेता धर्मेंद्र, माला सिन्हाचे कृष्ण धवल असे हे चित्र होते. हे चित्र पाहिले आणि स्कूटर या विषयाची एक किक बसली, अनेक आठवणींची ट्रॅफिक डोक्यात सुरू झाली. विचारांनी पिक अप घेतला. शाळकरी विद्यार्थी असतांना माझ्या काकांनी माझ्या मोठ्या भावासाठी एक वेगळीच स्कूटर आणली. तेंव्हा बजाजची स्कूटर चांगलीच जोरात होती. राजदूत ही मोटर सायकल सुद्धा होती. त्या काळात ही वेगळीच लांब आकाराची स्कूटर पाहून आम्हाला आश्चर्य वाटले होते. पुढे या स्कूटरचे नांव लॅम्बरेटा आहे असे कळले. आम्ही ती स्कूटर खूप न्याहाळत असू. 4 गियर, समोरच्या सिट खाली छोटासा टुल बॉक्स व त्याच्या दोन्ही बाजूला कॉक व चोक, हॅंडल हालवल्यावर केवळ समोरचे चाक हालत असे त्यावरील मडगार्ड स्थिर असे, ते बॉडीलाच जोडलेले असे. नंतर आलेल्या बजाज स्कूटरचे मात्र तसे नव्हते. लॅम्बरेटाचे इंजिन हे मधोमध होते म्हणजे चालक व मागे बसणा-याच्या सिटच्या खाली. त्यामध्ये दुरूस्ती किंवा देखभाल करायची असल्यास दोन्ही बाजूची पॅनल उघडावी लागत असत.  या पॅनलच्याच बाजूने गाडीलाच जोडलेले असे फुटरेस्ट होते. मागे स्टेपनी लावण्यासाठी जागा होती. मला तऱ आमच्या त्या लॅम्बरेटाचा नंबर सुद्धा अजून लक्षात आहे. MMA 7178 असा तो नंबर होता. आम्ही तिला 7178 असेच म्हणत असू. माझा भाऊ ती गाडी मोठी जोरात चालवत असे तो महाविद्यालयातून घरी आला की दुरूनच जोरात टीर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र असा हॉर्न वाजवत असे मग आम्ही लगेच फाटक उघडायला धावत असू व तो झोकात गाडी अंगणात आणून उभी करत असे. त्याच्या त्या अशा थाटात एन्ट्रीचा आम्हालाच मोठा आनंद होत असे. मग आम्ही सारे एकमेकांकडे पाहून दिलखुलास हसत असू. 


    मध्यंतरी सोशल माध्यमांवर अनेक लॅम्बरेटा स्कूटर असलेले असे एक चित्र झळकले होते त्यात नव्या को-या अशा कित्येक लॅम्बरेटा स्कूटर जतन करून ठेवलेल्या दिसत होत्या. एकदा शम्मी कपूरच्या एका जुन्या गाण्यात नायक व त्याचे मित्र हे लॅम्बरेटावर बसून जात आहेत असे चित्रण केलेले दिसले होते  तर सदाबहार देव आनंदच्या गाजलेल्या तेरे घर के सामने चित्रपटात नायिकेला भेटायला म्हणून नायक दिल्ली ते सिमला असा लॅम्बरेटा ने प्रवास करतो असे दाखवले होते. खरे तर हे सर्व जेंव्हा पाहिले होते तेंव्हाच लॅम्बरेटा बद्दल लिहायचा विचार मनात डोकावला होता परंतू लॅम्बरेटा जशी मागे पडली तसा तो विषय सुद्धा मागेच पडून गेला. परवा जेंव्हा पुन्हा धर्मेंद्र, माला सिन्हाचे लॅम्बरेटावरचे कृष्ण धवल चित्र पाहण्यात आल्यावर हा विषय कागदावर उतरवलाच. आमच्या बालपणी आमच्याकडे तर लॅम्बरेटा होतीच तशीच ती गांवातील काही प्राध्यापक वृंदांकडे सुद्धा होती. घन सर, लिमये सर, अणे सर, व्यापारी बालकीसनदासजी पुरवार उपाख्य श्रीमानजी व इतर काही लॅम्बरेटा तेंव्हा आमच्या गर्दीहीन शहरात दिमाखाने फिरत असत. त्यावेळी लॅम्बरेटा ब्रॅंड, तिची कंपनी कोणत्या देशात उत्पन्न होते याबाबत काहीही माहिती नव्हती व तसा विचारही कधी मनात आला नाही. आजच्या पिढीतील लहान मुलांना मात्र नवीन गाड्या त्यांचे उत्पादन करणारे देश व कंपन्या  मुखोद्गत असतात. जाहिरातीमुळे नवीन पिढी बरीच चतुरस्त्र झाली आहे. पुढे मात्र लॅम्बरेटा म्हणजे इटली देशात उत्पादन होणारी इनोसेंटी या कंपनीची गाडी असल्याचे वाचनात आले होते. इटली मधील मिलान मधील लॅम्बरेट या जिल्ह्याच्या नांवावरून या स्कूटरचे  लॅम्बरेटा असे नामकरण केले होते. मला मात्र  बालसुलभ वयात लॅम्बरेटा या गाडीच्या लांब आकारावरूनच  काहीतरी जुळवून लॅम्बरेटा असे नामकरण केले असावे असे उगीचच वाटत असे. फर्डीनांडो इनोसेंटी या गृहस्थाने 1922 मध्ये  इनोसेंटी ही कंपनी स्थापन केली होती आणि दुस-या महायुद्धानंतर  लॅम्बरेटा हे स्कूटर उत्पादन करण्याचे ठरवले होते. प्रत्यक्षात तीचे उत्पादन 1947 मध्ये सुरू झाले होते. त्याच सुमारास व्हेस्पा या स्कूटरचे सुद्धा  उत्पादन सुरू झाले होते. तत्कालीन आर्थिक  दृष्ट्या कमजोर असलेल्या भारतात 1950 च्या सुमारास API (Automobile Products of India)  ने  लॅम्बरेटाचे असेंम्ब्लिंग सुरू केले होते. 1972 मध्ये इनोसेंटी कडून संपूर्ण हक्क घेऊन उत्तर प्रदेश मध्ये SIL ( स्कूटर इंडिया लिमिटेड ) ने लॅम्बरेटा सारखीच विजय डिलक्स ही स्कूटर बाजारात आणली होती.  व तद्नंतर बजाज स्कूटर भारतीय बाजारात उपलब्ध झाली. परंतू  सरकारने आता गाड्यांचे आयुर्मान 15 वर्षे ठरवले व त्यानंतर अनेक गाड्या भंगारात जाऊ लागल्या. आज बाजारात अनेक जुन्या गाड्या विक्रीस असतात. जुन्या/ नव्या कार विक्रीच्या अँप वरून कुणी व्यापारी अब्जाधीश सुद्धा झाला आहे म्हणे, असो !  वास्तविक पाहता तुम्ही कोणत्याही गाडीचा योग्य रखरखाव, देखभाल म्हणजेच Maintanance केले तर ती गाडी पंधराच काय तर अनेक वर्षे चांगली चालू शकते. आजही अनेक Ambessador, Fiat, मारुति 800 रस्त्यावर धावतांना दिसतात. जुनेच तेवढे चांगले असेही नाही अनेक नवीन, प्रवाशांच्या सुरक्षिततेची अत्यंत काळजी असलेल्या गाड्या आज बाजारात आहेत. काळाच्या ओघात अनेक गाड्या मागे पडल्या त्या खराब होत्या म्हणून मागे पडल्या असेही मात्र नाही.  परवा  धर्मेंद्र , माला सिन्हाचे लॅम्बरेटा वरचे ते कृष्ण धवल चित्र पाहून लॅम्बरेटाच्या या स्मृती जागृत झाल्या. स्मृतींच्या या प्रवासात तुम्हाला सुद्धा घेऊन जावेसे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच. आजकाल जुने कोणाला आवडते ?  आज जुन्या माणसांचीच किंमत केली जात नाही तर वस्तूंची तर दूरच. वृद्धाश्रमांची संख्या वाढतेच आहे, जेष्ठ नागरीक एकाकी होत आहे , प्रसंगी त्यांचेवर हल्ले होत आहेत, त्यांची फसवणूक होत आहे अशा या काळात जुन्या माणसांचीच किंमत नाही तर जुन्या वस्तू आणि वाहने तर कुणाच्याच खिजगणतीतच नसणार. तरीही अनेकांना जुना काळ, Antic जुन्या गोष्टी , यांचे बाबत जिव्हाळा आहे . आजकालच्या use and throw च्या काळात त्यांच्या पूर्वीच्या पिढीने या वस्तूंची , वाहनांची जीवापाड घेतलेली काळजी त्यांनी पाहिलेली आहे.  त्यांना हे सारे हृदयस्पर्शी वाटते. त्यांचेसाठीच ही लॅम्बरेटाची आठवण. 



४ टिप्पण्या: