२२/०३/२०२३

Article about educational condition since last 30 years in Buldhana District

बुलढाणा जिल्ह्यातील शैक्षणिक स्थित्यंतरे 

शिवराय घडविण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांंवर

तरुण भारत अकोला आवृत्ती वर्धापन दिन विशेष

बुलढाणा जिल्हा मातोश्री जिजामाता यांचे माहेर. या माऊलीने शिवरायांना जसे शिक्षण दिले, नैतिक शिक्षण दिले तसा आदर्श जिल्ह्यातील शैक्षीन संस्थांनी घेऊन शिवरायांसारखे आदर्श तरुण निर्माण करण्याचा वसा घेतला पाहिजे

शिक्षण विषय हा भारतातील एक महत्वाचा असा विषय आहे. या भारतवर्षात पुर्वी हजारो वर्षांपासून शिक्षणाची परंपरा सुरु आहे. ज्ञानाधिष्ठित अशी ही गुरुकुल परंपरा ऋषीमुनींच्या काळापासून सुरु आहे. नालंदा, तक्षशीला सारखी विद्यापीठे इथे होती, परदेशातील विद्यार्थी इथे शिकण्यासाठी येत, मोठी ग्रंथसंपदा इथे होती. परंतू परकीय आक्रमकांनी हे सर्व उध्वस्त केले परंतू तरीही ईश्वरचंद्र विद्यासागर, माष्टर महाशय, महर्षी कर्वे, भगिनी निवेदिता, टिळक, आगरकर, फुले दाम्पत्य यांनी हा वसा घेतला व ही ज्ञानज्योत तेवती ठेवली. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात मात्र मेकॉलेच्या धोरणानुसार शिक्षण देणे सुरु झाले. यात आपण आपला "स्व" विसरलो व आजच्या आपल्या शिक्षण प्रणालीचे स्वरूप आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर आहे. स्वातंत्रोत्तर काळात देशातील अनेक भाग हे अविकसित असेच होते, दुर्गम होते, दळणवळणाची साधने अत्यल्प होती. अशाच या अविकसित भागांपैकी एक जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा.

    बुलढाणा शहराला जिल्हा बनवण्याचे कारण म्हणजे गो-या साहेबांना मानवणारी व आवडणारी थंड हवा. खामगांव हे बुलढाणा शहरातील सर्वात मोठे शहर. स्वातंत्र्यपुर्व काळात या जिल्ह्यातील शैक्षणिक स्थिती ही इतर ठिकाणी होती तशीच होती. काही शासकीय शाळा या जिल्ह्यात त्या काळात होत्या. मात्र या लेखात आपण इंग्रजकालीन बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक स्थितीचे मुल्यांकन किंवा स्थिती वगैरे पाहणार नसून आजपासून सुमारे तीस वर्षांपुर्वीची बुलढाणा जिल्ह्यातील शैक्षणिक स्थिती व आजच्या स्थितीबाबत चर्चा करणार आहोत. तरीही स्वातंत्र्यपुर्व काळात खामगांव शहरात राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली होती. या शाळेस अनेक स्वतंत्रता सेनानी व इतर मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. व येथील अनेक माजी विद्यार्थी समाजात उत्कृष्ट कार्य करित आहेत. खामगांव या एकेकाळच्या कापसाच्या मोठ्या बाजारपेठेच्या ठिकाणी गोविंदराम सक्सेरिया यांच्या मोठ्या आर्थिक मदतीने गो.से. महाविद्यालय स्थापन करण्यात आले त्याच सुमारास बुलढाणा येथे जिजामाता महाविद्यालय व तद्नंतर चिखली, मलकापूर, जळगांव जामोद, मेहकर याठिकाणी सुद्धा महाविद्यालये सुरु झाली परंतू ही सर्व महाविद्यालये ही कला, विज्ञान व वाणिज्य शाखेची होती. जिल्ह्यात अभियांत्रिकी, विधी, वैद्यकीय महाविद्यालये मात्र नव्हती. खामगांव येथे 1960 च्या दशकात शासकीय तंत्रनिकेतन मात्र सुरु झाले. काही तालुक्यात औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे होती व खामगांव येथे पंचशील होमिओपॅथी महाविद्यालय सुद्धा त्याच काळात सुरु झाले होते. या महाविद्यालयात सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून विद्यार्थी येत असत व येतात. काही परदेशी विद्यार्थी सुद्धा इथे शिक्षण घेण्यासाठी पुर्वी यायचे. 80 च्या दशकात शेगांव येथे संत गजानन महाराज संस्थानचे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु झाले. प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषद व नगर परिषदांच्या अनेक मराठी शाळा होत्या. बुलढाणा जिल्ह्यातील ही अशी शैक्षणिक स्थिती 1990 च्या दशकापर्यंत होती. अशी स्थिती असली तरी जिल्ह्यातील तत्कालीन अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरांकडे धाव घेतली व उच्चविद्याविभूषित सुद्धा झाले. जिल्ह्यात शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी मोठ मोठ्या पदांवर सरकारी व खाजगी क्षेत्रात नोक-या केल्या. कुलगुरू, पोलिस अधिकारी, न्यायाधीश यांसारखी अनेक पदे बुलढाणा जिल्ह्यात शिकलेल्या विद्यार्थ्यांनी विभूषित केली आहेत तर काही आजही कार्यरत आहेत. आजपासून सुमारे तीस/पस्तीस वर्षांपूर्वी मात्र जिल्ह्यात विकासाची गती वाढली. जिल्ह्यातील अनेक शहरात विविध उद्योगधंदे सुरु झाले, शेतीमध्ये आधुनिक तंत्र आले व शिक्षण क्षेत्र सुद्धा झपाट्याने आगेकूच करू लागले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नवीन महाविद्यालये सुरु झाली, अनेक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू झाल्या, इंग्रजी माध्यमांच्या शेकडो शाळा सुरु झाल्या. या इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळांमुळे अनेक मराठी शाळा बंद पडल्या व काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आज प्रत्येक पालकास आपला पाल्य हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच शिकावा अशी भावना दिसून येत आहे. ही परिस्थिती तर सर्वदूर आहे. आज बुलढाणा जिल्ह्यात अनेक नवीन महाविद्यालये आहेत, अभियांत्रिकी, विधी, तंत्रनिकेतन अशी अनेक महाविद्यालये आहेत. आज शैक्षणिक संस्था अमाप झाल्या आहेत विद्यार्थ्यांना तिथपर्यन्त पोहोचण्यास दळणवळणाची साधने विपुल प्रमाणात आहेत. आज शिक्षण क्षेत्रात पुर्वीपेक्षा कैकपटीने अत्याधुनिक शैक्षणिक साधने सुद्धा उपलब्ध आहेत. पुर्वी जसे जिल्ह्यातील लहान गावातील विद्यार्थ्यास तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी म्हणून यावे लागत होते आज तसे नाही. सुरु झालेल्या अनेक संस्था ह्या ग्रामीण भागाला लागूनच आहेत शिवाय यातील काही संस्था तर अगदी "KG To PG" आहेत, त्यांच्याकडे चांगले "इन्फ्रास्ट्रक्चर" आहे. आज "इन्फ्रास्ट्रक्चर"कडे संस्थाचालकांचे पुरेपूर लक्ष असते कारण आज पालक सोयी सुविधा पाहूनच आपल्या पाल्याचा प्रवेश त्या संस्थेत करण्याचे पाहत असतात. पुर्वी "इन्फ्रास्ट्रक्चर" काहीच नसायचे परंतू संस्थांचा जो मुख्य हेतू आहे तो मात्र उच्चकोटीचा होता. पुर्वीच्या नगर कौलारू , पावसाळ्यात ठिकठीकाणी गळणा-या शाळा , बसायला पट्ट्या हे सर्व जाऊन आता शैक्षणिक संस्था कशा झकपक झाल्या आहेत शाळा/ महाविद्यालये यांचे बाह्यांग अत्यंत देखणे असे आहे परंतू अंतरंग , शिक्षणाचा दर्जा मात्र पुर्वीसारखा राहिला नसल्याचे अनेक जेष्ठ, सेवानिवृत्त व पालकांचे म्हणणे आहे. आज जिल्ह्यात अनेक संस्थात अनेक अत्याधुनिक शैक्षणिक कोर्सेस उपलब्ध आहेत परंतू पदे भरण्यास मात्र मान्यता नसते, जिल्ह्यातील या अनेक महाविद्यालयातून तासिका तत्वावर शिकवणारे व नुकतेच पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अननुभवी विद्यार्थीच शिक्षक म्हणून दिसतात. विद्यापीठ , शासन यासंबंधीत सर्वांनी अनुभवी व कायमस्वरूपी शिक्षक प्राध्यापक वृंद कसे नियुक्त कर्ता येतील याबाबत विचार करणे अत्यावश्यक झाले आहे. बहुतांश वेळी तासिका तत्वावर शिकवणारे शिक्षक हे त्यांच्या विद्यार्थ्यांचे सिनियर असतात व त्यामुळे विद्यादानाचे कार्य हे तितकेसे उत्कृष्टपणे होतांना दिसत नाही. आज जिल्ह्यात कित्येक शाळा, महाविद्यालये, तांत्रिक विद्यालये, कौशल्य विद्यालय अशा शैक्षणिक संस्था आहेत परंतू या शैक्षणिक संस्थांतील दर्जा हा अत्युत्कृष्ट असा असावा निव्वळ कारखान्यातून उत्पादन बाहेर येते त्याप्रकारे या शैक्षणिक संस्था या सुशिक्षित विद्यार्थ्यांचे उत्पादन बाहेर काढणा-या संस्था ण व्हाव्यात तर स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत अशा "मनुष्य निर्माण" करणा-या Man Making Education असणा-या असाव्यात. बुलढाणा जिल्हा मातोश्री जिजामाता यांचे माहेर. या माऊलीने शिवरायांना जसे शिक्षण दिले, नैतिक शिक्षण दिले तसा आदर्श जिल्ह्यातील शैक्षीन संस्थांनी घेऊन शिवरायांसारखे आदर्श तरुण निर्माण करण्याचा वसा घेतला पाहिजे. शैक्षणिक संस्थांची नुसती संख्या वाढवून, त्यांचे जाळे वाढवून आपला जिल्हा प्रगत झाला असे म्हणणे योग्य होणार नाही तर या संस्थांतून किती विद्यार्थी देशासाठी आगेकूच करत आहे ? सेवा भावनेने एखादे व्रत हाती घेत आहे ?, सामाजिक जाणीवा त्यांना आहेत काय ?, ते देशाचे आदर्श नागरीक आहेत काय ?, त्यांना जीवनाची दिशा या संस्था देतात काय ? हे सर्व पाहणे याचे चिंतन करणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. यातील काही संस्था निश्चितच अपवाद आहेत परंतू असे अपवाद अधिकाधिक वाढावेत तरच तो खरा विकास ठरेल , खरी प्रगती ठरेल.

विनय वि. वरणगांवकर 

खामगांव

7588416238

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा