३१/०८/२०२३

Article about Rakshabandhan and "Bhadra" , A time period of the day in Hindu Panchang (Calendar).

 सण संभ्रम रहीत साजरे व्हावे 


यंदाच्या रक्षाबंधनात झालेल्या भद्रांच्या संभ्रमामुळे आगामी काळात पंचांग अभ्यासक, वेद शास्त्र पारंगत, ज्योतिष्य शास्त्राचे अभ्यासक यांनी एकत्र येऊन विचार विनिमय करून हिंदु सण हे केंव्हा व कसे साजरे करावेत याचे आवाहन योग्य प्रकारे करीत जावे.

यंदाचे रक्षाबंधन जवळ येताच माध्यमांवर रक्षाबंधन कोणत्या वेळेस साजरे करायचे याबद्दल विविध मते मतांतराचे संदेश फिरू लागले. भद्रा आहेत म्हणून रक्षाबंधन हे संध्याकाळ नंतर करण्यात यावे असे या संदेशांमध्ये सांगण्यात आले होते. संध्याकाळ नंतर म्हणजे  विस्तृतपणे सांगितल्यास काही संदेशांमध्ये सायं सात नंतर काहींमध्ये रात्री आठ नंतर तर काहींमध्ये रात्री नऊ नंतर बहिणीने भावाला ओवाळावे असे सांगण्यात आले होते.  यामधील एका संदेशात रावण आणि शुर्पणखा यांच्या रक्षाबंधनाचा सुद्धा उल्लेख आला होता. रावण आणि शुर्पणखा यांचे रक्षाबंधन भद्रा कालात झाले होते असे म्हटले होते. यंदाच्या रक्षा बंधनातील या भद्रा प्रकरणामुळे सर्वच हिंदू बांधव संभ्रमात पडले की नेमके रक्षाबंधन केव्हा करावे ? मला आठवते मी लहान असताना आमच्याकडे सकाळी लवकर प्रल्हाद जोशी भटजी यायचे व घरातील सर्वांना मंत्रोच्चारण करून राखी बांधायचे. आम्ही सगळे त्यादिवशी सकाळी लवकर उठून प्रल्हाद भटजी येण्याच्या आधी तयार राहत असू. त्यांनी राखी बांधल्यावर आम्हाला मोठा आनंद होई, घरात मंगलमय,  प्रसन्न असे वातावरण निर्माण होई.  ते आमच्या सायकलच्या हँडलला सुद्धा राखी बांधून द्यायचे. 40-50 वर्षांपूर्वीच्या काळातील ही गोष्ट आहे. तेंव्हा सुद्धा भद्रा असतीलच ना ! पण तरीही प्रल्हाद भटजी दरवर्षी सकाळीच यायचे व रक्षाबंधन करून द्यायचे.  माझे आजोबा सांगायचे ज्या दिवशी जो सण आलेला आहे तो पुर्ण दिवसच शुभ असतो. दिवसभरात तो सण केव्हाही साजरा केला तरी चालते असे ते म्हणायचे. शिवाय भद्रा म्हणजे काय हेच अनेकांना ठाऊकच नाही व तसे ते मला ही ठाऊक नव्हते. काल भद्रा - भद्रा प्रकरण सुरु होते म्हणून मी ते ज्योतिष्यशास्त्र व पंचांग यांचे जेष्ठ अभ्यासक बळवंत नारायण उपाख्य बाळासाहेब कुळकर्णी ह.मु. अमरावती यांच्याशी संपर्क करून जाणून घेतले असता भद्रा म्हणजे दिवसातील अशूभ काळ असे कळले या काळात मंगल कार्य संपन्न होत नाही असे त्यांनी सांगितले. पण भद्रा काळ हा योग्यरित्या व अभ्यासपूर्वकच सांगितला जावा असेही ते म्हणाले. तर काही जेष्ठ लोक असेही सांगतात की काही भद्रा या चांगल्या असतात तर काही भद्रा या वाईट असतात त्यामुळे चांगल्या भद्रांच्या काळात कार्य करण्यास, सण साजरा करण्यास काही हरकत नसते. अशी नाना मते कळली.

  आज माध्यमांचा उपयोग योग्य ते संदेश पाठवण्यासाठी होण्याऐवजी बरेच वेळा संभ्रम निर्माण करणारे संदेश, अफवा पसरवणारे संदेश, अंधश्रद्धा वाढविणारे संदेश यांचीच आदानप्रदान होतांनासाठी दिसतो. पंचांगात जसे सांगितले त्याप्रमाणे आपले सण साजरे होत असतात. मी काही पंचांग अभ्यासक नाही परंतु हिंदू धर्मातील सणांबद्दल पंचांग अभ्यासकांकडून  अगदी अचूक असे मार्गदर्शन हिंदू बांधवांना व्हावे असे  वाटते. किंबहुना तशी गरजच आहे. आता गणेशोत्सव समीप आलेला आहे त्यामुळे विघ्नहर्त्याची प्राणप्रतिष्ठा केंव्हा करावी याबद्दलचे सुद्धा विविध मते मतांतरे असलेले संदेश येतीलच तेव्हा हिंदू बांधवांनी गणेश चतुर्थीचा जो दिवस आहे तो संपूर्ण दिवस योग्य मानून पार्वतीनंदनाची प्राणप्रतिष्ठा करावी असे वाटते. आगामी काळात माध्यमांवर पंचांग अभ्यासक, ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक यांनी एकत्र येऊन विचार विनिमय करून हिंदु सण हे केंव्हा व कसे साजरे करावेत याचे आवाहन योग्य प्रकारे करावे. यामध्ये शंकराचार्यांनी सुद्धा मार्गदर्शन करावे असे यंदाच्या रक्षाबंधनावेळी भद्रांच्या झालेल्या घोळामुळे वाटते.  हिंदू धर्म हा सनातन धर्म आहे, सर्वसमावेशक आहे, यातून नाना पंथ निर्माण झालेले आहे, हिंदू धर्मात कुणावर काही सक्ती नाही, धर्मातील प्रत्येकाला पूजाविधी आदींचा स्वत:चा मार्ग निवडण्याची अनुमती आहे, देव मानण्याची सक्ती सुद्धा नाही. असा हा जगाच्या पाठीवरील एकमेव धर्म, एकमेव जीवनपद्धती आहे. तेंव्हा या धर्मातील सण साजरे होतांना त्यांच्यात सुसूत्रता असावी असे कालच्या संभ्रमामुळे वाटते म्हणून हा लेखन प्रपंच.  ज्योतिष्यशास्त्री, पंचांग अभ्यासक, वेदशास्त्र अभ्यासक, पुरोहित मंडळी यांनी सणांच्या वेळी धर्मबांधवांना योग्य ते मार्गदर्शन करावे असेच यंदाच्या रक्षाबंधनाच्या वेळी भद्रांच्या झालेल्या संभ्रमामुळे सांगावेसे वाटते. 

२४/०८/२०२३

Article about successful moon mission of India, Chandrayan-3 , ISRO

आओ तुम्ही चांद पे ले जाये

चंद्राच्या दक्षिण धृवावर सर्वात प्रथम जाण्याचा मान भारताने पटकावला आहे. याचा समस्त भारतवासीयांना अभिमान आहे व भारतीयांचा आत्मविश्वास इस्रोच्या या महतप्रयासाने केलेल्या कार्यामुळे दुणावला आहे. आपणही जगात उल्लेखनीय कामगिरी करू शकतो असा विश्वास तरुणांमध्ये दृढ झाला आहे. याप्रसंगी अनेकांनी भारतातील खड्डे, पाणी , भाकरी अशा टीका केल्या असल्या तरी भारत जागातील महासत्ता बनण्याकडे घोडदौड करीत असल्याचे जग म्हणत आहे.

गत महिन्यात भारताचे चंद्रयान तीन हे चंद्राकडे जाण्यासाठी झेपावले. अवकाशात मार्गक्रमण करता करता हे यान विविध कक्षा पार करत काल दिनांक 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आणि भारत हा चंद्राच्या दक्षिण धृवावर  यान उतरवणारा जगातील सर्वात पहिला देश ठरला. या मोहिमेच्या सुरुवातीपासूनच देशभरात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते व काल तर ते व्दिगुणित झाले. सर्व देशवासी वृत्तवाहिन्या व इंटरनेटवरून चांद्रयानाचे चंद्राच्या भूमीवर होणारे लँडिंग पाहण्यास उत्सुक होते. मी  शाळेतून घरी आलो आणि फ्रेश होण्यापूर्वीच सर्व भारतवासीयांना अभिमानास्पद वाटणारा असा तो क्षण पाहण्यासाठी सर्व कुटुंबियासह टीव्हीवरील चांद्रयान संबंधित वृत्ते पाहू लागलो. चंद्रयान 3 चे लँडिंग हे लाईव्ह दाखवणे सुरू होते. India on Moon अशी प्रतिक्रिया इस्त्रोचे प्रमुख सोमनाथ यांनी दिली. थोड्याच वेळात विक्रमने सुद्धा "I reached on Moon and you too" असा संदेश देशवासियांना पाठवला. थोड्याच वेळातच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथून इस्रोचे व देशवासी यांचे अभिनंदन केले. आपल्या भाषणात बोलताना मोदी म्हणाले की "पूर्वी चंदा मामा दूर के असे गीत म्हटले जायचे परंतु आता चंदा मामा टूर के असे म्हणावे लागेल" अर्थात चंद्रावर सुद्धा प्रवास करणे शक्य होईल असे ते म्हणाले. तो दिवस भविष्यात नक्कीच येईल. 2019 मध्ये जेंव्हा भारताच्या चंद्रयानाचे लँडिंग व अयशस्वी झाले होते तेव्हा समस्त देशवासी हळहळले होते परंतु चार वर्षातच पुन्हा इस्रोच्या वैज्ञानिकांनी कठोर मेहनत घेऊन जगाच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी खर्चात चंद्रयान तीन ही मोहीम राबवली व यशस्वी सुद्धा करून दाखवली. चांद्रयानच्या यशस्वीतेमुळे चंद्रावरच्या कविता, गीते,  लेख प्रसारित होत आहे. कित्येकांना चंद्रावर आधारित चित्रपट गीतांचे सुद्धा स्मरण झाले व माध्यमांवरती गीते प्रसारीत झाली. दूरदर्शनवर पूर्वी ख्रिसमस असले की आओ तुम्हे चांद पे ले जाये हे गीत हमखास लागायचे 

 ओ तुम्ही चांद पे ले जाये,

छोटासा बंगला बनाये , 

 एक नयी दुनिया बनाये | 

अशा ओळी त्या गीतात होत्या. चंद्रावरील कविता व गीते या जरी तत्कालीन कवींच्या कल्पना असल्या तरी त्या कल्पना सार्थ होण्याची चिन्हे चांद्रयान तीन च्या यशस्वी मोहीमेमुळे दिसत आहे. 

चलो दिलदार चलो चांद के पार चलो,

हम है तैयार चलो |

हे सुद्धा असेच चंद्राच्याही पलीकडे चलण्याची कल्पना करणारे कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेले गीत असले तरी ती कल्पना शक्य होतांनाचे चित्र आता दृष्टीपथात आहे. भारतीय संस्कृतीत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वच धर्मीयांमध्ये चंद्राला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव असा देश आहे की जो विज्ञान तंत्रज्ञान यांचा उपयोग मानवतेसाठी, मानव कल्याण्यासाठी करतो व इथे अध्यात्म व विज्ञान यांची सांगड आहे. पौराणिक कथांमध्ये सुद्धा चंद्राला मोठे स्थान दिले गेलेले आहे.  इंदू, निशापती, रजनीनाथ, रजनीकांत, शशी, शशांक, सुधांशू  या नांवानी सुध्दा चंद्राला ओळखले जाते. भगवान शंकराच्या शिरावर चंद्र धारण केलेला दिसतो. गणपतीने चंद्राला शाप देण्याची सुद्धा एक कथा आहे. मुस्लिमांमध्ये ईदच्या दिवशी चंद्र  दर्शनाचे महत्व आहे. अमेरिकेने जरी पूर्वी चंद्रावर पाऊल ठेवले असले, रशिया व चीन ने जरी चंद्रावर यान पाठवले असले तरी चंद्राच्या दक्षिण धृवावर सर्वात प्रथम जाण्याचा मान भारताने पटकावला आहे. याचा समस्त भारतवासीयांना अभिमान आहे व भारतीयांचा आत्मविश्वास इस्रोच्या या महतप्रयासाने केलेल्या कार्यामुळे दुणावला आहे. आपणही जगात उल्लेखनीय कामगिरी करू शकतो असा विश्वास तरुणांमध्ये दृढ झाला आहे. याप्रसंगी अनेकांनी भारतातील खड्डे, पाणी, भाकरी अशा टीका केल्या असल्या तरी भारत जागातील महासत्ता बनण्याकडे घोडदौड करीत असल्याचे जग म्हणत आहे. दोन वर्षांपूर्वी सुशांत राजपूत नामक अभिनेत्याने आत्महत्या केली होती त्या आत्महत्येचे गूढ अद्यापही उलगडलेले नाही. सुशांतला खगोलशास्त्रात रस होता, त्याला चंद्रावर जमीन खरेदीची इच्छा होती. त्याची ती इच्छा जरी पुर्ण झाली नसली तरी आगामी काळात चंद्रावर जाण्याची मानवाची प्रचंड इच्छा पूर्णत्वास जाण्यासाठी शास्त्रज्ञांचे त्या दिशेने प्रयत्न सुरु आहे. आगामी काळात इस्त्रो सुद्धा "आओ तुम्हे चांदपे ले जाये" याप्रमाणे चंद्रावर मानव पाठवण्याची मोहीम राबवेल अशी आशा आता भारतवासियांना आहे.

१०/०८/२०२३

Article on the occassion of friendship day 2023

 छोटी छोटी बातोंकी है यादें बडी...(मैत्री दिनोत्तर लेख)

मी व प्रविण धनंजयच्या घराच्या दिशेने जाऊ लागलो. जातांना आमच्या मनात त्याच्या घरचे आता रागावणार तर नाही, बोलणार तर नाही ? असे मोठे भययुक्त प्रश्न  घेऊन आम्ही जात होतो. धैर्याने त्याच्या घरी पोहोचलो. तो तळघरात राहत असे. धनंजयने पलंगावर अंग टाकले होते, पायाला पट्टी बांधली होती.

ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजे जागतिक मैत्री दिन आपल्या भाषेत फ्रेंडशिप डे. यंदा पण तो उत्साहात साजरा झाला. विचारांची, संदेशांची देवाणघेवाण झाली, अनेक मित्रांशी संवाद झाला. अनेक मित्रांच्या आठवणी ताज्या झाल्या. कोरोनाने हिरावून नेलेल्या मित्रांचे स्मरण झाले. बालपणीचे मित्र व त्यांच्या सोबत घालवलेले सुवर्ण क्षण आठवले. मित्र म्हणजे काय ? अनेकांनी याबद्दल नानाप्रकारचे विचार प्रकट केले आहे. रक्ताच्या नात्यात जोडता आले नाही म्हणून देवाने मित्र या नात्याची देणगी मानवाला दिली असे म्हटले जाते. ज्याच्या सहवासात संवाद नसतानांही दीर्घकाळ पर्यंत राहता येऊ शकते असे मित्रत्व असते. माझ्या आजोबांचे एक मित्र आमचेकडे बरेचदा यायचे कितीतरी वेळा त्यांना व आजोबांना मी विनासंवादाचे बसलेले पाहिले आहे. शेवटी “नाना येतो मी आता” असे म्हणून ते निघत. मला याचे मोठे आश्चर्य वाटे. आपल्या मित्राच्या फक्त आणि फक्त सहवासासाठी म्हणून ते येत. डोळ्यातून ख्याली खुशाली व्यक्त झाल्यावर मग त्यांना त्यात शब्दांचीही गरज वाटत नसे. अशा विविध गोष्टींचे स्मरण मला या मैत्री दिनाचे निमित्ताने झाले. या विचार शृंखलेत आमच्या शालेय जीवनातील आठवणीची एक कडी सुद्धा जोडल्या गेली. आम्ही सहावीत असतांना आमच्या वर्गात एक नवीन मुलगा दाखल झाला. मध्यम ऊंची, सावळा वर्ण, बोलके डोळेतल्लख बुद्धीचा. नांवही अर्जुनाचे “धनंजय”, धनंजय काशीनाथ तम्मेवार. जेमतेम एक वर्ष आम्ही सोबत असू. पण आजही आमची ती एक वर्षाची मैत्री स्मरणात आहे. स्मृती कायम टिकण्यासाठी काही निमित्त असते कधी ते चांगले असते तर कधी त्याला वेदनेची झालर सुद्धा असते. तसे निमित्त आमच्या मैत्रीच्या स्मृतीतही होतेच. एक दिवस सायंकाळी आम्ही खामगांवातील आर्य समाज मंदिराच्या गल्लीत खेळत होतो. एक दिवस खेळल्यानंतर आम्ही तिघे मी, प्रविण मिश्रा आणि हा धनंजय असे तिघेजण आर्य समाज मंदीरासमोरून जात होतो. या ठिकाणी आता काही दुकाने आहेत. आम्ही एकमेकांना लोटालोटी करत चाललो होतो. आर्य समाज मंदिरास तारेचे कंपाऊंड होते व समोरच्या बाजूचे कुंपण रोड उंच झाल्याने अतिशय ठेंगणे होते. आमच्या लोटपोटीमुळे धनंजयला एक धक्का जोरात लागला व तो त्या कुंपणावरून मंदिराच्या प्रांगणात पडला. पडतांना त्याचा गुडघा कुंपणाच्या अणकुचीदार तारेस स्पर्शून गेला, त्याचा पाय कापल्या गेला, रक्त वाहू लागले. मी व प्रवीण त्याचे ते वाहणारे रक्त पाहून खुप घाबरलो व बालपणी असा काही प्रसंग घडल्यावर जशी घाबरगुंडी उडते तशीच ती आमचीही उडाली. जी चुक व्हायला नको होती तीच आमच्याकडून झाली. त्याला तिथेच सोडून भितीने आम्ही तिथून निघून गेलो, त्याला घरापर्यंतही सोडले नाही. कसाबसा उठून तो लंगडत-लंगडत घरी गेला असे नंतर कळले होते. मी घरी गेलो परंतू मनात प्रचंड कालवाकालव झाली. कालवाकालव, घालमेल, भीती, दु:ख हे शब्द आज आठवत आहेत परंतू आपल्या जख्मी मित्राला तसेच टाकून आल्यावर झालेली तेंव्हाची मनाची अवस्था कथन करता येत नाही. त्या अवस्थेमुळे मी माझ्या घरी घडलेला प्रकार सांगून टाकला. “अरेरे, असे नाही करू रे” माझे आई-वडील दोघेही म्हणाले. “त्याच्याकडे उद्या बिस्किटचा पुडा घेऊन त्याला भेटायला जा” वडील म्हणाले. मी दुस-या दिवशी प्रविणकडे गेलो त्याचे घर रस्त्यातच होते. मी व प्रविण धनंजयच्या घराच्या दिशेने जाऊ लागलो. जातांना आमच्या मनात त्याचे कुटुंबीय आता रागावणार तर नाही, बोलणार तर नाही असे मोठे भययुक्त प्रश्न घेऊन आम्ही जड पावलांनी मार्गक्रमण करीत होतो. धैर्याने त्याच्या घरी पोहोचलो. तो तळघरात राहत असे. धनंजयने पलंगावर अंग टाकले होते, पायाला पट्टी बांधली होती. आम्ही घरात शिरलो, भितीने निशब्दच होतो. बिस्किटचा पुडा त्याच्या हातात दिला. “तुम्हीच आहे का रे ते ? असे सोडून जायचे असते का मित्राला ?" त्याची आई म्हणाली. आईच ती, आमचे कावरेबावरे झालेले चहेरे पाहून ती माऊली आम्हाला काही रागावली नाही. त्याच्या बहिणी, भाऊ आमच्या भोवती जमा झाले, नंतर त्याचे बाबा सुद्धा कुठून तरी आले होते असे स्मरते पण ते सुद्धा आम्हावर ओरडले नाही. त्यांनी मोठ्या मनाने आम्हाला क्षमा केली होती. आता आमचे दडपण गेले होते, थोड्या वेळाने हसतमुखाने आम्ही तिथून निघालो. पुढे काही दिवसांनी शाळेतल्या हजेरीत त्याचे नांव आल्यावर “यस सर” असा त्याचा आवाज आलाच नाही. नंतर कळले की धनंजयच्या बाबांची बदली झाली व धनंजय खामगांव सोडून गेला. त्यानंतर त्याचा काहीच अतापता नव्हता. फेसबुकवर आता काही वर्षांपूर्वी तो सापडला. थोडाफार संवाद झाला. छ. संभाजीनगर इथे तो आता वास्तव्यास आहे. गेल्या एप्रिल महिन्यात तो शेगांवला सहकुटुंब आला असता त्याने मला फोन केला, आम्ही एका उपहारगृहात 37 वर्षांनी भेटलो, सौ. वहिनी, मुलगी, पुतणी यांच्याशी ओळख करून देतांना “हाच तो विनय” अशी ओळख करून दिल्यावर आम्ही सर्व हसलो. बालपणी आमच्या मस्तीमुळे त्याच्या पायावर कायमच्या उमटलेल्या त्या व्रणामुळे त्याच्या कुटुंबियांना वरील सारी हकीकत आमच्या भेटीपूर्वीच कळलेली होती. त्याच्या पायावर आणि माझ्या व प्रविणच्या मनावर तो व्रण कायमच राहील पण त्याला भेटायला जा अशा वडीलांनी दिलेल्या सल्ल्यामुळे आमची मैत्री सुद्धा कायम राहिली. आज फ्रेंडशिप डे निमित्ताने हे सारे आठवले. घडलेली गोष्ट छोटी नव्हती पण तरीही गुलजारच्या "छोटी छोटी बातोंकी है यादें बडी" या ओळी आठवत होत्या आणि आता तर या आठवणीत धनंजयची सहकुटुंब झालेली आनंददायी भेट पण समाविष्ट झाली होती.

०३/०८/२०२३

Article about Bhide Guruji and calling him with new lastname Kulkarni

भिडे यांना कुळकर्णी संबोधन, सत्य की मिथ्या ?

ज्याप्रमाणे भिडे गुरुजी यांनी थोर समाज सुधारक यांच्याबद्दल अपमानास्पद  वक्तव्य केले की ती त्यांच्या आवाजाची तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेली नक्कल होती याचा तपास व्हायला पाहिजे तसाच भिडे गुरुजी यांचे कुळकर्णी हे अडनांव सत्य आहे की मिथ्या ?  हे सुद्धा समोर यावे. 

भिडे गुरुजी यांनी सुधारकांबद्दल केलेल्या वक्तव्यांबद्दल नुकताच वाद निर्माण झाला आहे. विधानसभेत सुद्धा त्याचे पडसाद उमटत आहे. मी काही धारकरी नाही किंवा शिवसंग्रामचा सभासद नाही तरी मला इथे एक प्रश्न उपस्थित झाला तो म्हणजे भिडे गुरुजी यांच्या अडनांवाचा. माझ्याप्रमाणेच इतर अनेकांच्या मनात सुद्धा असा प्रश्न नक्कीच उपस्थित झाला असेल. भिडे गुरुजी यांच्या अमरावती, अकोला, खामगाव येथे सभा झाल्या. अमरावतीच्या सभेनंतर समाजसुधारकांबद्दल गुरुजी यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची क्लिप समाज माध्यमांत व्हायरल झाली व एकच वादंग निर्माण झाले भिडे गुरुजींनी केलेले वक्तव्य हे त्यांनीच केलेले आहे की त्यांच्या आवाजाची तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कॉपी करून , छेडछाड करून  सुनियोजितरीत्या ती व्हिडिओ/ऑडिओ क्लिप समाज माध्यमांमध्ये पसरविली गेली याचा तपास अमरावती पोलीस करीत आहे. या क्लिप नंतर खामगांव येथे निवेदने, निदर्शने झाली. अकोला आणि खामगाव येथील सभेत भिडे गुरुजी यांनी त्यांच्या सभा महात्मा फुले यांना अभिवादन करून सुरु केल्या हे सुद्धा सर्वत्र प्रसिद्ध झाले. भिडे गुरुजींच्या वादग्रस्त विधानानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली आणि कोणीतरी भिडे गुरुजी यांचे नाव मनोहर कुळकर्णी असल्याचा जावईशोध लावला तसे पाहता महापुरुषांबद्दल कोणीही चुकीची वक्तव्य करणे हे निषेधार्हच आहे. याने आपल्या समाजात जातीय तेढ निर्माण होते. त्यामुळे असले उद्गार कोणीही काढू नये. काल सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हरियाणा प्रकरणात प्रक्षोभक विधाने करू नये अशी सूचना केली आहे. भिडे गुरुजींच्या झालेल्या भाषणाबद्दल व तदनंतर प्रकाशित झालेल्या अनेक लेख व वृत्तांमधे अनेकांनी त्यांचे नांव हे मनोहर कुळकर्णी असे असल्याचे लिहिले. पुन्हा नवीन वाद निर्माण व्हावा किंवा जातीय तेढ निर्माण व्हावी असाच हेतू या अशा कृत्यामागे असल्याचे स्पष्ट होते कारण 2019 मध्ये माझी व ज्याला काही लोक फ्रॉड असे संबोधत आहे असे शिवाजी महाराजांचे 32 मण सोन्याचे सिंहासन पुनश्च निर्माण करून ते रायगडावर स्थापित करण्याचे ध्येय ऊराशी बाळगणा-या भिडे गुरुजींशी वैयक्तिक भेट झाली होती. त्यावेळी सांगलीच्या काही लोकांशी संपर्क झाला होता. आता या आठ दिवसातच भिडे गुरुजी यांंना कुळकर्णी असे संबोधल्यावर सहजच माझ्या मनात भिडे यांचे अडनाव खरच कुळकर्णी आहे का ? किंवा त्यांच्या पुर्वजांपैकी कुणाला "कुळकर्णी" ( देशमुख , देशपांडे, वतनदार यांसारखी उपाधी ) अशी उपाधी होती का ? असे प्रश्न निर्माण झाले म्हणून मी सांगलीतील काही लोकांशी संपर्क केला. हे लोक असे आहेत की जे सांगली शहरांत गेल्या 60-70 वर्षापासून वास्तव्यास  आहे,  त्यांचे तेथे पिढीजात वास्तव्य आहे अशी ही मंडळी आहे. अशा या मंडळींना भिडे गुरुजींचे अडनाव हे खरेच कुळकर्णी आहे का ? किंवा त्यांच्या घराण्यास पुर्वाश्रमीची कुळकर्णी ही उपाधी आहे का ?  असे विचारल्यावर " हे तर आम्ही पहिल्यांदाच ऐकत आहोत" असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. "आम्ही लहानपणापासून सांगलीला राहतो परंतु भिडे गुरुजींना कुणी कुळकर्णी म्हटल्याचे किंवा त्यांचे आडनाव कुळकर्णी असे  असल्याचे कधीही ऐकले नाही". असेही या मंडळींनी स्पष्ट केले. असे असल्यास भिडे गुरुजी यांना समाज माध्यमांनी व काही वृत्तपत्रांनी कुळकर्णी असे संबोधणे म्हणजे खोटी वृत्ते/ अफवा पसरवणे अशी गंभीर बाब आहे. आणि खरेच जर त्यांचे अडनांव कुळकर्णी असेल तर तसा पुरावा देणे सुद्धा जरूरी आहे. एका पोलीसाचा अपमान करण्याचे प्रकरण अंगावर असलेल्यांनी तर थेट अफझलखानाच्या वकीलाच्या घराण्याशी भिडे गुरुजी यांचा संबंध जोडला. भिडे गुरुजी यांनी खरेच थोर समाज सुधारक यांच्याबद्दल अपमानास्पद  वक्तव्य केले की त्यांच्या आवाजाची तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नक्कल करून तशा क्लिप समाजात पसरवण्यात आले हे तपासांती समोर येईलच त्याचप्रमाणे भिडे गुरुजी यांचे  कुळकर्णी हे अडनांव सत्य आहे की मिथ्या ?  हे सुद्धा समोर यावे. 

०१/०८/२०२३

Article about Lokmanya Tilak and Dasganu Maharaj, Gajanan Maharaj

संत दासगणू वर्णित लोकमान्य टिळक

करावयासी राष्ट्रोद्धार | योग्य बाळ गंगाधर | याच्या परी न होणार | राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे || 

आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी. या दोघांचेही कार्य आपापल्या क्षेत्रात उत्तुंग असे आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि संत गजानन महाराज हे एका सभेत एकत्र आले होते. श्री संत दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथातील 15 व्या अध्यायातील लोकमान्य टिळकांच्या सभेशी संबंधित ओव्यांपैकी 10 ते 23 व 39 , 71 अशा काही ओव्या खाली देत आहे. यावरून आपल्याला गजानन महाराज , दासगणू महाराज व लोकमान्य टिळक यांचे श्रेष्ठत्व, एकमेकांप्रतिच्या भावना दिसून येतात. या ओव्या पुढीलप्रमाणे

टिळक बाळ गंगाधर | महाराष्ट्राचा कोहिनूर | दूरदृष्टीचा सागर | राजकारणी प्रवीण जो || 

निज स्वातंत्र्यासाठी | ज्याने केल्या अनंत खटपटी | याची धडाडी असे मोठी | काय वर्णन तिचे करू? ||

करारी भीष्मासमान | आर्य महींचे पाहून दैन्य | सतीचे झाला घेता वाण | भीड न सत्यांत कोणाची ||

वाक्चातुर्य जयाचे |  बृहस्पतीच्या समान साचे | धाबे दणाणे इंग्रजांचे | पाहून जयाच्या लेखाला ||  

कृती करून मेळविली | ज्याने लोकमान्य ही पदवी भली | ती न त्यांना कोणी दिली |  ऐसा होता बहादुर ||

तो एके वेळी अकोल्याला | शिवजयंतीच्या उत्सवाला | लोकाग्रहे येतां झाला | व्याख्यान द्याया कारणे ||

झाली तयारी उत्सवाची | त्या अकोल्यामध्ये साची | मोठमोठाल्या विद्वानांची | गेली गडबड उडून ||

दामले, कोल्हटकर, खापर्डे | आणखी विद्वान बडेबडे | जमते झाले रोकडे | तया अकोल्या ग्रामासी ||

अध्यक्ष त्या उत्सवाचे | नेमिले होते टिळक साचे | नाव ऐकता टिळकांचे | व-हाड सारे आनंदले ||

शिवरायांची जयंती | याच्या आधीच या प्रांती | झाली पाहिजे होती | त्याचे कारण ऐसे पहा ||

शिवाजीची जन्मदात्री | जी वीर माता जिजा सती | ती वऱ्हाडीच आपुली होती | सिंधखेडी जन्म जिचा ||

त्या वीरगाजी शिवाजीला | जिने पोटी जन्म दिला | व-हाड-महाराष्ट्र एक झाला | या सतीच्या कर्तृत्वे ||

माता होती व-हाडी | पिता महाराष्ट्री शहाजी गडी | अवघ्या दांपत्यात ही जोडी | खचित होती अनुपम ||

आधीच उत्सव शिवाजीचा | जो कलिजा महाराष्ट्राचा | आणखी वरी अध्यक्ष त्याचा | टिळक बाळ गंगाधर || ....

करावयासी राष्ट्रोद्धार | योग्य बाळ गंगाधर | याच्या परी न होणार | राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे || 

संत दासगणूंच्या  वरील वर्णनानंतर टिळकांच्या सभेचे वर्णन केले आहे. यात गजानन महाराजांना सभेसाठी निमंत्रित केल्याचा उल्लेख व टिळकांच्या भाषणाचा व सभेस उपस्थित गणमान्यांचा उल्लेख आलेला आहे.    टिळकांच्या भाषणानंतर गजानन महाराज म्हणतात

अरे अशानेच पडतात | काढण्या दोन्ही दंडाप्रत | ऐसे बोलून गणगणात | भजन करू लागले |

गजानन महाराजांचे  वरील 71व्या ओवीतील भाकीत खरे ठरले होते. आज टिळक पुण्यतिथी निमित्त वरील ओव्या वाचन व लेखन करण्याची ईश्वर कृपेने प्रेरणा झाली व या ओव्या आपल्यापर्यंत पोहचवाव्या असे वाटले.

जय गजानन.