90 च्या दशकात शाळेत येता जाता भिंतीवर लिहिलेले एक वाक्य माझ्या दृष्टीस पडत असे. त्या काळात निवडणुका असल्या की आजच्यासारखा भपकेबाज प्रचार नसे. मोठ-मोठ्या प्रचार गाड्या,फ्लेक्स बोर्ड, कटआउट असे काही तेव्हा नव्हते. भिंतींवरती गेरू ,कोळसा, निळ आदीने प्रचार वाक्ये लिहून, निषाण्या, चिन्हे काढून विविध पक्षांचे उमेदवार प्रचार करीत. त्यातलेच मला जाता येता दिसणारे ते वाक्य होते. ते वाक्य माझ्या मनात कायमचेच बसले. कारण मी ज्या धर्मात जन्मलो त्या धर्माच्या उत्पत्ती बाबत प्रश्न करणारे ते वाक्य होते. ते प्रचार वाक्य होते "हिंदू कौम कहाँ से आयी?" हा तत्कालीन प्रश्न परमेश्वर यांच्या हिंदू धर्म कुठून आला, त्याचा संस्थापक कोण ? असाच आहे भाषा व शब्द यात काय तो फरक आहे. हिंदूबहुल असलेल्या देशात बहुसंख्यांंकांनाच त्यांचा धर्म कुठून आला असे 35 वर्षांपूर्वी विचारले गेले होते, त्याआधीही अशाप्रकारच्या प्रश्नांची विचारणा झाली होती व आजही कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्वर यांच्यासारखे लोक तीच विचारणा करीत आहे. परमेश्वर यांच्या आधी तामिळनाडूचे मंत्री आणि आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म नष्ट करून टाकण्याचे विधान केले होते. त्या टीकेनंतर मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियांक खरगे यांनी सुद्धा त्यांचीच री ओढली व त्यानंतर परमेश्वर यांनी सुद्धा हिंदू धर्माच्या संस्थापका विषयी व हिंदू धर्माची उत्पत्ती कशी झाली असा प्रश्न उपस्थित केला आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून आपल्या देशात हिंदू धर्माला अनेकदा अनेकांनी दूषणे दिली. हिंदू सहिष्णू असल्याने सहनच करीत गेले त्याचाच परीणाम मग चित्रपट, कला क्षेत्रावर सुद्धा झालेला दिसला. चित्रपटातून हिंदू पात्रे, पुजारी आदी व्यंगात्मक, हास्यास्पद असे दाखवले गेले, हिंदू देवी देवतांची आक्षेपार्ह अशी चित्रे काढली गेली तरीही हिंदू मूग गिळून होते. देवी देवतांवर अनेकांनी तोंडसुख घेतले आणि अजूनही घेत आहे परंतु या देशात ग्रीक आले, शक आले, हूण आले, मुघल आले इंग्रज, डच, पोर्तुगीज आले सर्वांनी आपल्यावर राज्य गाजवले तरीही ही आपली सनातन संस्कृती टिकून आहे. धर्म बुडवण्याचे , भ्रष्ट करण्याचे नाना उपद्व्याप झाले तरीही "...हस्ती मिटती नही हमारी" याप्रमाणे हिंदू धर्म, सनातन धर्म ही संस्कृती टिकून राहिली व राहील. स्टॅलिन, प्रियांक नावातच परमेश्वर असलेले कर्नाटकचे गृहमंत्री अशा कितीही लोकांनी काहीही म्हटल्याने काही एक फरक पडणार नाही. सनातन संस्कृतीचं या हिंदू धर्माचं एकमेव वैशिष्ट्य असं आहे की ही संस्कृती अनादी अनंत काळापासून एक जीवन पद्धती म्हणून अस्तित्वात आहे. यात प्रत्येकाला आपली आपली पूजा पद्धती, जीवन पद्धती जगण्याची अनुमती आहे, एवढेच काय तर देव न मानण्याची सुद्धा अनुमती आहे, हा एकमेव असा सर्वसमावेशक धर्म आहे, हा धर्म अनादी अनंत आहे. म्हणूनच स्वामी विवेेेकानंद म्हणाले होते की, "जिस तरह अलग-अलग स्रोतों से निकली विभिन्न नदियां अंत में समुद्र में जाकर मिल जाती हैं, उसी तरह मनुष्य अपनी इच्छा के अनुरूप अलग-अलग मार्ग चुनता है, जो देखने में भले ही सीधे या टेढ़े-मेढ़े लगें, परंतु सभी भगवान तक ही जाते हैं." कोणतीही अनुसरण पद्धती असली तरी सर्व मार्ग एकाच ईश्वराकडे जातात ज्याला लोक वेगवेगळ्या नावांनी ओळखतात अशी शिकवण देणारा एकमेव हिंदू धर्म आहे. हिंदू धर्माचा कुणीही असा संस्थापक नाही हे ठाऊक असूनही परमेश्वर यांच्यासारखे लोक पुन्हा पुन्हा तेच मुद्दे का उपस्थित करतात? याचे कारण स्पष्ट आहे की आगामी निवडणुकांच्या काळात आपली सत्ता कशी कायम राहील याचे तसेच कधी नव्हे तशा झालेल्या हिंंदू जागृृतीचे त्यांच्या मनात भय उत्पन्न झाले आहे. म्हणून हिंदूंच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे, वैचारिक भेद निर्माण करण्याचे अशा लोकांचे नाना प्रयत्न सुरू आहेत. परंतु अशा लोकांना कधीही मुळीच थारा मिळणार नाही आणि हिंदू धर्माची उत्पत्ती कशी झाली म्हणजेच हिंदू कौम कहाँसे आयी ? असले प्रश्न कुणी विचारु नाही. तरीही असे प्रश्न विचारले जरी गेले तरी त्याचा काहीही एक परिणाम या सनातन धर्मावर होणार नाही हे स्टॅलिन सारख्यांंनी ध्यानात घ्यावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा