१९/१२/२०२३

What happened before 10 years ? , read in this article.

एक दशक लेखनाचे 

जननिनाद मधील स्तंभ व तदनंतर ब्लॉग सुरु करून 10 वर्षे झाली.लेखन सुरु केले त्यावेळी असे वाटले नव्हते की आपण इतके लिहू.परंतु वाचकांचा उदंड प्रतिसादवेळोवेळी मिळणाऱ्या प्रतिक्रियाप्रेरणा यामुळे आजच्या या लेखनाच्या दशवर्षपूर्ती पर्यंत येऊन पोहचलो. लेखांना मिळालेल्या
प्रतिसादाबद्दल खामगाव परिसरातील 
वाचकवर्ग तसेच वृत्तपत्र इंटरनेट आवृत्तीब्लॉग, फेसबुकच्या 
माध्यमातून वाचणारे तसेच जन-निनाद , तरुण भारत, वृत्तकेसरी, देशोन्नतीचे संपादक, आणि 
कर्मचारीवृन्दांचे आभार.

     2013 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकाची होळी कुण्यातरी नतद्रष्टांनी केली. या घटनेने संताप झाला दुःख झाले आणि ते दुःख, तो रोष कागदावर लिहून व्यक्त केला आणि तोच पहिला लेख ठरला. मग 19 डिसे 2013 रोजी हा पहिला लेख प्रकाशित झाला व तेंव्हापासून दर गुरुवारी एक लेख याप्रमाणे लेख लिहिता लिहिता आज 19 डिसे 23 रोजी लेखनास 10 वर्षे सुद्धा झाली. या 10 वर्षातील आजचा हा 575 वा लेख आहे. वृत्तपत्र व ब्लॉग मिळून हे 575 लेख आहेत. लिखाण सुरु केल्यावर काही कालांतराने ब्लॉग लिहिणे सुरु केले त्यामुळे या 575 लेखांपैकी 500 लेख हे ब्लॉगवर आहेत, सुरुवातीचे 75 लेख ब्लॉगवर पोस्ट झाले नाहीत. कोणतेही एक कार्य नियमित करावे असे म्हटले जाते इतर माहीत नाही परंतु लेखन कार्य का कोण जाणे मी नियमित करू लागलो. कदाचित समाजातील विघटनवाद, निराशावाद, अपप्रवृत्ती, नक्षलवाद, शहरी नक्षलवाद, भ्रष्ट नेते, नोकरशहा अशा बाबी व अनेक सकारात्मक बाबींनी लेखनास प्रवृत्त केले व या कार्यात नियमितता आजपावेतो तरी राखू शकलो. सहज म्हणून एक लेख लिहिला, लेख काय 15-20 ओळी रखडल्या होत्या. पण ते लिखाण सांज दैनिक जन निनादचे आमचे मित्र विशाल चांडक व अ‍ॅड अनिल चांडक या बंधुद्वयांना आवडले, तो दिवस गुरुवार होता, ते म्हणाले, ”छान लिहिले आता दर गुरुवारी लिहीत जा” , “काय लिहिणार एवढे ?” असे मी उत्तरल्यावर, ”भरपूर विषय असतात, लिहा” चांडक यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पहिलाच लेख स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी लिहिल्या गेला व चांगला प्रारंभ झाला. मग दुसरा, तिसरा असे लेख दर गुरुवारी नेमाने लिहीत गेलो, कित्येकदा गुरुवार व्यतिरिक्त सुद्धा काही प्रासंगिक लेख लिहिले, तरुण भारत, देशोन्नती, लोकमत, वृत्तकेसरी, साप्ताहिक जनमंगल या वृत्तपत्रातून सुद्धा लेख प्रकाशित झाले. या लेखांपैकी निवडक 20 लेखांचा संग्रह असलेले "खामगांवचे ठासेठुसे" हे पुस्तक छापील व ई-बुक स्वरूपात प्रकाशित झाले. अनेक वाचकांनी त्यास पसंती दिली. दोन लेख पु.ल.देशपांडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रकाशित ई-बुक मध्ये सुद्धा प्रकाशित झाले. लेख प्रकाशित होत होते, या लेखातील विचार माझ्या मनातून प्रसवले जात होते, मी जरी लिहीत असलो तरी संत तुकाराम ज्याप्रमाणे “गोविंद वदवी तेच म्हणे” असे म्हणाले होते या ओळींचे स्मरण मला कित्येकदा व्हायचे, नव्हे होतच असते. तसेच माझ्या या लेखांच्या लिहवित्यास सुद्धा मी मनोमन नमन करत होतो. लेखामागून लेख लिहिल्या गेले, वाचकांचे चांगले अभिप्राय येत गेले, त्यातून आणखी लिहिण्याची उर्मी होत गेली व लेखनाचे जणू व्यसनच जडले. खामगांव शहरातील जुन्या परंतू आता भग्न, भकास झालेल्या स्थळांबद्दलची, खामगांवातील खाद्य संस्कृतीची, वेड्यांविषयीची अशा तीन लेख मालिका सुद्धा लिहिल्या. वाचकांच्या प्रतिक्रिया येतच होत्या ज्या मला आणखी लिहिण्यास भाग पाडत होत्यामी लहान शहरातील एका सांज दैनिकातून लिहीत असल्याने माझ्या लेखांचे वाचक हे निमशहरी व ग्रामीण आहेतहो पण सोशल मीडियामुळे, माझ्या ब्लॉगमुळे व जन निनादच्या इंटरनेट आवृत्तीमुळे माझे लेख देश-विदेशातील उच्चशिक्षित लोक सुद्धा वाचत आहेत. पण पंक्चर दुरुस्तीच्या दुकानदाराने, ऊसाच्या रसाच्या गाडीवाल्याने, टँकरवाल्याने वा इतर किरकोळ विक्रेत्यांनी किंवा तळागाळातील वाचकांनी जेंव्हा माझ्या लेखांबद्दल मला प्रतिक्रिया दिली तेंव्हा मला विशेष आनंद झाला. कारण खरा भारत ग्रामीण भागातच दिसतो असे म. गांधींनी म्हटले होते, त्याच ग्रामीण भागातील हे लोक होते. यातील काहींनी त्यांना माझ्या कित्येक लेखातील सर्वांना घेऊन चालण्याची भाषा, जातीभेद न पाळण्याबाबत केलेले आवाहन, संत व थोर पुरुष हे सर्वांचेच आहेत, आपली विचारसारणी कोणती का असेना पण राष्ट्र प्रथम असले पाहिजे असे उल्लेख खुप भावल्याचे व्यक्त केले. काही जहाल लिहिल्यावर किंवा कटू असे सत्य लिहिल्यावर अनेकांनी "उगीच असे लिहीत नका जाऊ" असा सल्ला दिला पण तरीही जे विचार सत्य आहे, राष्ट्रहितैषी आहेत ते मी कोणत्याही क्षोभाची तमा न बाळगता लिहिलेच. मंगळवार/बुधवार आला की आगामी लेखासंबंधीत विचार मनात येण्यास सुरुवात व्हायला लागते व गुरुवारी लेख प्रकाशित होतो. लेख प्रकाशित झाल्यावर सोशल मिडीयावर तो शेअर पण करतो. ते आवश्यक आहे की नाही माहीत नाही कारण भगवंताने गीतेत सांगून ठेवले आहे की , “...मा कर्मफलहेतुर्भुर्मा..” अर्थात हे अर्जुना कर्माच्या फळाप्रती आसक्ती ठेवू नको. माझ्या लेखातून मात्र मला आपण निर्मिलेली गोष्ट इतरांना कळावी, त्यांना ती आवडावी ही ईच्छा म्हणजे एक प्रकारची फलप्राप्तीची सुप्त आशा कुठेतरी असतेच, लोकेषणाच ती. त्यामुळे मी करीत असलेले लेखन हे ईश्वरपर्यावसायी होत नव्हते व हे लेखन कर्म लौकिक अर्थाने जरी यशस्वी वाटत असले तरी आध्यात्मिक दृष्टीकोनातून मात्र कदाचित वाया जाणारे कर्म आहे. असे सर्व विचार आज लेखनाची दहा वर्षे पुर्ण झाल्यावर मनात आले. लेखनाचा हा छंद जडल्यावर लेखनावर प्रेमच जडले असेच वाटत आहे फक्त या कर्मातून अहंकार निर्माण न होवो हेच भगवंताकडे निवेदन. 

   हा प्रवास ज्यांच्यामुळे शक्य झाला ते  वाचकवृंद व ज्यांच्यामुळे हे लेख वाचकांपर्यंत पोहचू शकले त्या सर्व वृत्तपत्रांच्या संपादक महोदय व कर्मचारी वृंद यांचे मनस्वी आभार.

(500 लेख पुर्ण झाल्यावर मे 2022 मध्ये मी लिहिलेल्या लेखावर आधारीत)

६ टिप्पण्या:

  1. Ha lekh mala sarvat jast aavadala purn vachala aani aapan aapale manogat khup pramanik pane mandale hyacha mala abhiman pan vatala aani lekhanatun chnagalya goshtichi ujalan aani vait goshtivar prahar he sudha aadhyatmik karya hoy ase mala vatate mhanun aapala ha chhand aani lekhan seva nirantar suru raho hich parmeshwara kade vinanti jio mere dost Vinay ji 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान लेख आहे. आपले लेख मी नेहमी वाचत असते. आपल्या लेखातून अनेक गोष्टींची माहिती झाली आजचा लेख तर खूपच उत्तम. तुमच्या लेखन कार्यात अशीच उत्तरोत्तर प्रगतीत होत राहो ही मनापासून सदिच्छा व्यक्त करते

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर देव आणि खूप खूप अभिनंदन.

    उत्तर द्याहटवा
  4. सुंदर देव. खूप खूप अभिनंदन आणि पुढेही सतत लिहीत रहा.

    उत्तर द्याहटवा
  5. लिखाण खुप छान व प्रगल्भ झाले आहे

    उत्तर द्याहटवा
  6. इतके अप्रतिम लिखाण तुम्ही करत आलात तरी तुमच्या लेखातून तुमच्या नावाप्रमाणेच विनयशीलता झळकत आहे.Down to the Earth यालाच म्हणतात. गजानन महाराजांच्या. गुरुवारी तुमच्या लेखांचा स्त्रोत सुरू झाला तो असाच महाराजांच्या कृपेने अखंड, अविरत सुरू राहो आणि सामाजिक विषमता तसेच समाज विघातक बाबी त्याच प्रमाणे समाजात घडणाऱ्या याहीपेक्षा जास्ती सकारात्मक बाबी तुमच्या लिखाणा द्वारे वाचकांसमोर येवोत हीच माउलींना प्रार्थना

    उत्तर द्याहटवा